मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २१ वा| आरंभ अध्याय २१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० अध्याय २१ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशांबागुरुभ्यो नमः । गोविंद गोवळ गोकुळपति । गोगोधना निजविश्रांति । गोविंदगुणीं गुंततां वृत्ति । गोविंदप्राप्ति गुणनाशें ॥१॥गोशब्दार्थवाच्य बाण । त्याचा प्रेरिता तूं संपूर्ण । यालागीं गोविंद हें अभिधान । तुज लागून स्वतःसिद्ध ॥२॥तुझिया निजबोधाचा शर । होतां लिंगदेहीं कडतर । विकळ पडिला अहंकार । न थरे समोर समरंगीं ॥३॥मग तो सोऽहंभावें मिळणी । आणितां लागला तुझिये चरणीं । तेव्हां अवघा तुझेपणीं । पूर्णत्व लाहोनि भजिन्नला ॥४॥तुझिया प्रत्यक्ष कामबाणें । गोपी वेधिल्या जीवें प्राणें । शेखीं त्यांमाजि घालूनि ठाणें । केलें साजणें तयांसी ॥५॥ तुझा जयासि लागला बाण । ते ते पावले निजनिर्वाण । पुन्हा खुंटलें भेदभान । जीवप्राण मग कैंचा ॥६॥गोगोधनें स्वैराचारीं । भरतां विषयाच्या डोंगरी । त्यांतें झोडूनि विवेकवेत्रीं । निजात्मक्षेत्रीं आखीरसी ॥७॥म्हणोनि तुवां गोवळपणें । सर्व गोकुळ संरक्षणें । गोकुळपति या कारणें । म्हणती पुराणें श्रुतिस्मृति ॥८॥भानूपासूनि प्रतिबिंब वरी । अभंगप्रभा निरंतरीं । तेथ अबळांचे अंतरीं । प्रतिमा खरी मानतसे ॥९॥तेवीं सच्चित्सुखविश्रांति । करणद्वारा बहिःस्फूर्ति । विषयाभासीं भाऊनि भ्रमती । मंदमति भवग्रस्त ॥१०॥जैसा आत्मच्छायेभेणें । दचकोनि मरे त्या मारिलें कोणें । तेवी विषयांच्या साचपणें । भव भोगणें प्राकृता ॥११॥येरवीं स्वआस्तिक्येंवीण । कैचें करणांसि चैतन्य । तदभावीं विषयभान । कैचें कोठूनि कोणासी ॥१२॥एवं विषयानंदरूपें भ्रांति । किंवा वास्तव निजविश्रांति । उभयसुखात्मक संवित्ति । गोगोधना तुझेनी ॥१३॥तें हें गोविंदगोमय जग । सबाह्य गोविंद अभेद सांग । असोनि गुणमयीचा आवग । पाडी पांग सुखाचा ॥१४॥पुन्हा गोविंदगुणकीर्तनीं । भाग्यें रंगे जेव्हां वाणी । गोविंदप्राप्ति तेचि क्षणीं । होय जाणी त्रिगूणांचीं ॥१५॥गुणत्रयाचें मोडतां नांव । गुणमयीसी कैंचा ठाव । गोविंद प्रकटे स्वयमेव । दयार्णव दीनांचा ॥१६॥तोचि वंदूनि अभेदभावें । गोविंदाज्ञेच्या गौरवें । चाले व्याख्यान तेथ द्यावें । श्रोतीं स्वभावें अवधान ॥१७॥कायसा भानूपुढें प्रकाश । कीं जलार्णवावरी पाऊस । पूर्णानंदा कासेनि तोष । कीजे विशेष विचारा ॥१८॥परंतु भक्तीची ऐसी जाति । सूर्यापुढें काडवाती । सागरास्तृप्यंताम् म्हणती । तज्जल हातीं अर्पूनी ॥१९॥तैसे संत स्वानंदघन । तयासी करूनि सावधान । आरब्धग्रंथाचें व्याख्यान । परिसावया प्रार्थना ॥२०॥परंतु नभाच्या आलिंगना । सामर्थ्य असे दिगंगना । कीं वर्षलिया अंबुकणा । सांठवण जळराशि ॥२१॥तैसे सद्गुरु आणि संत । अभेदबोधाचा परमार्थ । श्रोत्यां वक्त्यां सप्रेम भरीत । भेदरहितस्वानंदें ॥२२॥यालागीं तुमचेंचि बोलणें । तुमचें तुम्हींच बोलणें । तुम्हां वेगळें ऐकिजे कोणें । गोडसेपणें रुचलेनी ॥२३॥आपुले रक्तमांसाची जळू । गर्भीं चरोनि प्रसवे बाळ । जर्हीं ते प्रायशः समळ बहळं । माता निर्मळ प्रिय मानी ॥२४॥तैसी आवडी तुमची तुम्हां । तिचें स्वरूप नकळे आम्हां । बालभाषणीं वाढवा प्रेमा । स्वानंदगरिमा हे तुमची ॥२५॥तंव संत म्हणती राहें । सद्गुरुआज्ञेचेनि उत्साहें । व्याख्यान चालवीं लवलाहें । श्रवणीं स्नेहें यंत्रिलों ॥२६॥ऐसा संतांचा आह्लादकर । पूर्णसुखाचा उद्गार । येतां प्रज्ञेसि अनावर । प्रमेयपूर उचंबळला ॥२७॥मग मौनें माथा ठेवूनि चरणीं । म्हणे ऐका जी बादरायणि । परीक्षितीचिये सांगे कर्णीं । तें वाखाणीं यावरी ॥२८॥पूर्वीं वर्षाशरद्वर्णन । करूनि तेथें श्रीभगवान । कैसा क्रीडला तें लक्षण । केलें निरूपण सविस्तर ॥२९॥तया शरत्काळीं वनीं । रामगोपेंशीं चक्रपाणि । वेणु वाहतां व्रजभुवनीं । पडला कानीं गोपिकांच्या ॥३०॥तेणें हरोनि नेली चित्त । मग त्या वदती एकमेकींतें । कृष्णक्रीडाविलासातें । ये अध्यायीं ते कथा ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP