सा मुंच मुंचालमिति प्रभाषिणी निष्पीड्यमानाऽखिलजीवमर्मणि ।
विवृत्य नेत्रे चरणौ भुजौ मुहुर्निस्वैन्नगात्राक्षिपती रुरोद ह ॥११॥

जळूका झोंबे मर्मस्थळा । कीं तुंबिका लाविली ओढूनि अनिळा । तैसें शोषूनि स्तनमंडळा । जीवनकळा आकर्षीं ॥२४॥
तेणें पूतना झाली वेडी । म्हणे आतां सोडीं सोडीं । पुरे म्हणोनि अति तांतडीं । स्तनींहूनि तोडी बाळातें ॥२५॥
तंव तो उखळितां बाळें नुखळे । जेवीं काळव्याळ मर्मकळे । पूतना व्याकुळ फिरवी डोळे । जाती बेंबळ करपद ॥२६॥
प्राणव्याकुळपणें घाबरी । न धरत पातली बाहेरी । घर्में डबडबिली शरीरीं । कंप गात्रीं दाटला ॥२७॥
जाती करपद चांचरी । डोळां भरलीसे अंधारी । दीर्घस्वरें रुदन करी । नेत्र वटारी भयंकर ॥२८॥
विकळ आपटी हात पाय । म्हणे आतां मी करूं काय । कैशी वांचली याची माय । प्रत्यक्ष प्रलय स्तनपान ॥२९॥
अवर्षणीं बरगें गाय । मरतां खोडी हातपाय । पूतनाही तेणेंचि न्यायें । झाडिताहे करपद ॥१३०॥
जीवप्राणेंशीं मर्मकळा । पिळूनि घेतां झाली विकळा । नेत्र विवर्ण घुरघुरी गळा । कपट कुचाळा विसरली ॥३१॥
शुद्ध मनीं जो निर्विषकर । शोषी विषबाधा समग्र । तेंवि पूतनेचा कपटाचार । शोषी श्रीधर निजांगें ॥३२॥
कीं तो ब्रह्माग्नि केवळ । पूतनाकापट्यकिडाळ । जाळूनि निवडिलें निर्मल । हेम सोज्वळ निजतेजें ॥३३॥
परी ते नेणे कृतागसा । स्तनपीडनें पावली त्रासा । दीर्घस्वरें करितां क्रोशा । दाही दिशा गर्जती ॥३४॥

तस्या स्वनेनातिगभीररंहसा साद्रिर्मही द्यौश्च चचाल सग्रहा ॥
रसा दिशश्च प्रतिनेदिरे जनाः पेतुः क्षितौ वज्रनिपातशंकया ॥१२॥

आक्रंद्तां दीर्घस्वरें । नादावलीं गिरिकंदरें । सप्तपाताळादि विवरें । भयंकरें दणाणिलीं ॥१३५॥
अग्नीमाजीं उडे कपट । हीण पोटींचें होय प्रकट । तेवीं लोपूनि लावण्यनट । झाली स्पष्ट राक्षसी ॥३६॥
भयानक राक्षसीस्वर । विकराळ गर्जना गंभीर । पृथ्वीकंप झाला थोर । सचरचर थरारिलें ॥३७॥
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । दिशाचक्र कुळाचळ । नवग्रहांशीं नक्षत्रमाळ । कांपे चळचळ ब्रह्मांड ॥३८॥
नादें भरलें अंतराळ । भूतें भाविती प्रलयाकाळ । विद्युत्पातभ्रमें व्याकुळ । पडिलें सकळ जनपद ॥३९॥

निशाचरीत्थं व्यथितस्तना व्यसुर्व्यादाय केशांश्चरणौ भुजावपि ॥
प्रसार्य गोष्ठे निजरूपमास्थिता वज्राहतो वृत्र इवापतन्नृप ॥१३॥

ऐशी निशाचरी पूतना । हरीसि कपटें देतां स्तना । तेणें शोषितां जीवप्राणा । नाना विलपना आक्रंदे ॥१४०॥
पावली स्तनपानें क्रूरव्यथा । हस्तें पिटी आनन माथा । गोष्ठीं करपाद पाखुडितां । सोडी तत्त्वतां प्राणांसी ॥४१॥
पसरूनि मुख विचकोनि दांत । पूर्वदेह राक्षसी प्रेत । केश पिंजारले अद्भुत । पादहस्त पसरिले ॥४२॥
सुरसंग्रामीं वृत्रासुर । इंद्रें हाणोनि वज्रप्रहार । पाडिला तैसें भयंकर । राक्षसीशरीर उलथलें ॥४३॥
समरीं शंभु भेदी त्रिपुर । कीं राहूचें अर्ध शरीर । वज्राघातें भंगे शिखर । तैसें कलेवर रिचवलें ॥४४॥

पतमानोऽपि तद्देहस्त्रिगव्यूत्यंतरद्रुमान् । चूर्णयामास राजेंद्र महदासीत्तदद्भुतम् ॥१४॥

शुक म्हणे गा परीक्षिती । राक्षसी देह पडतां क्षिती । अत्यद्भुत तुजप्रति । वर्तलें तें सांगेन ॥१४५॥
कांहें न चळतां पूतना मेली । राक्षसीतनु गोकुळीं पडली । दीड योजन भू दडपली । वृक्षवल्लीशत चूर्ण ॥४६॥
पडतपडतां राक्षसीदेह । षट्क्रोश भूमि दडपोनि राहे । जीत मरतां भूतद्रोहें । न शिणे पां हे राक्षसी ॥४७॥
स्थूळ सूक्ष्म प्राणिमात्र । गुल्मलताद्रुम सर्वत्र । राक्षसीचें पडतां गात्र । झाले पात्र प्रळयाचें ॥४८॥
अत्यद्भुत राक्षसी देह । शुक आश्चर्य वर्णिताहे । परीक्षितिही चंवकोनि पाहे । सावध राहे वोथरला ॥४९॥

ईषामात्रोग्रदंष्ट्रास्यं गिरिकंदरनासिकम् । गंडशैलस्तनं रौद्रं प्रकीर्णारुणमूर्धजम् ॥१५॥
अंधकूपगभीराक्षं पुलिनारोहभीषणम् । बद्धसेतुर्भुजोर्वंघ्रिशून्यतोयर्‍हदोदरम् ॥१६॥
संतत्रसुः स्म तद्वीक्ष्य गोपा गोप्यः कलेवरम् । पूर्वं तु तन्निःस्वनितभिन्नहृत्कर्णमस्तकाः ॥१७॥

पाहतां विकराळ पसरलें वदन । नांगरदंडप्रमाण दशन । दाढा कराळ अतिभीषण । विकट तीक्ष्ण ज्यामाजीं ॥१५०॥
जिचें ऐसें प्रेतमुख । गिरिकंदरप्राय नासिक । गंडशैलासमान चूचुक । रौद्र भयानक दारुण ॥५१॥
तप्तताम्रबाबरझोंटी । सुटोनि विखुरली वीरगुंठी । संध्यारागप्रभा भेटी । वाटे भूतटीं उतरली ॥५२॥
अंधकूपप्राय सखोल । दृष्टिविहीन नेत्रयुगळ । पुलिनासारखे जघन स्थूळ । जठर निर्जळर्‍हद जैसें ॥५३॥
जैसे अमार्गीं बांधिले सेतु । जानु जंघा मांडिया हस्त । बाहूपासूनि समस्त । भासती व्यस्त भयानक ॥५४॥
ऐसें देखोनि भयानक । राक्षसीकलेवर विटंक । संत्रासिले व्रजींचे लोक । सहबालक गोपगोपी ॥१५५॥
पूर्वींच तिचा आक्रोशध्वनि । टाळी बैसली होती कर्णीं । हृदयीं भेदरा दचकोनी । भ्रमें मूर्ध्नि कोंदले ॥५६॥
त्यावरी हें विकराळ अद्भुत । देखोनि राक्षसीचें प्रेत । झाले अत्यंत भयभीत । पडिले मूर्च्छित विसंज्ञ ॥५७॥
मग मूर्च्छना सांवरून । विलंबें झाले सावधान । येर उरले जे विसंज्ञ । त्यां प्रबोधन ते करिती ॥५८॥
जेथ यशोदा रोहिणी । व्रजींच्या गोपी अवघ्याजणी । घाबर्‍या आल्या धांवूनि । अन्वेषणीं प्रवर्तल्या ॥५९॥
बाळक पुसती यशोदे माये । म्हणती अद्भुत उदेलें काये । मग त्या देखती लवलाहें । पूर्वस्नेहें कृष्णातें ॥१६०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP