सूत उवाच - यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव ।
पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि ॥११॥

मंगलाचरणीं गुरुचिंतन । करूनि सूत करी नमन । वैराग्यरूपें ऐश्वर्यकथन । करी संपूर्ण शुकाचें ॥८८॥
जनकें करितां व्रतबंध । सन्यस्तप्रवृत्तिसंबंध । सवें न घेतां द्वैत विरुद्ध । जो अगाधबोध चालिला ॥८९॥
न प्रवर्त्ततां कर्ममार्गी । नैष्ठिक विरक्ति लेइला अंगीं । सर्वात्मकत्वें निर्वाणयोगी । निःसंगसंगी चालिला ॥९०॥
विरल्त विपश्चित सद्गुणसमूह । पुत्र जातां व्यासासि मोह । बाधतां दुःखें फोडी टाहो । शुक एहीति म्हणूनि ॥९१॥
मोहग्रस्ता व्यासाप्रति । प्रत्युत्तरा पादप देतीं । कीं तो सर्वांतरगतस्थिति । सर्वात्मरति परिपूर्ण ॥९२॥
स्थावर जंगम अंतर्गत । एकात्मभावें भेदरहित । त्या मुनीतें वंदी सूत । श्रीमद्भागवत आरंभितां ॥९३॥

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥१२॥

संसारशत्रु जिंकिजे जेणें । जयनामक तो ग्रंथ म्हणणें । तदारंभीं पूजिजे नमनें । कीं देवताभिधानें सूत बोधी ॥९४॥
नारायणातें करूनि नमन । नरोत्तमातें अभिवंदून । व्यास व्राग्देवी नमस्कारून । ग्रंथारंभण करावें ॥९५॥
ऐशी समस्तां पौराणिकां । सूतें बोधिली परिणाळिका । आतां श्रोतयां शौनकादिकां । प्रश्नांगिकारें तोषवी ॥९६॥

मुनय : साधु पृष्टोऽहं भवद्भिर्लोकमंगलम् । यत्कृतः कृष्णसंपन्नो येनात्मा सुप्रसीदति ॥१३॥

मुनिगणातें संबोधून । म्हणे धन्य धन्य तुमचा प्रश्न जेणें त्रिजगाचें कल्याण । भवमोचनपूर्वक ॥९७॥
सर्व वेदशास्त्रगर्भींचें सार । कृष्णप्राप्तीचा विचार । मानस होतांची तत्पर । होय निर्विकार प्रसन्न ॥९८॥
तोचि पुरुषांसि परमधर्म । प्रसवे जो कां भक्तिप्रेम । अभंग अव्यभिचारी अनुत्तम । तैं आत्माराम मन होय ॥९९॥
भक्तियोगें श्रीभगवंतीं । प्रयोजितां चित्तवृत्ति । उभययोगीं दृढविरक्ति । मग ज्ञानप्राप्ति तद्द्वारा ॥१००॥
स्वधर्माचिये अनुष्ठानीं । प्रीति नुपजे जैं हरिगुणश्रवणीं । तैं तो धर्मची यमजाचणीं । पुरुषांलागूनि संसारीं ॥१॥
त्यां हें श्रीमद्भागवत । पुराणरूपें वेदमूर्त्त । उत्तमश्लोकगुणानुचरित । व्यासप्रणीत पीयूष ॥२॥
परमविरक्ता शुकाप्रति । व्यासें कथिलें जाणूनि सुमति । शुकास पुसतां परीक्षिति । शापदुर्गति चुकवावया ॥३॥
प्रायोपविष्ट गंगातटीं । भंवति तपोधनाची थाटी । तेथें बैसोनि व्यासपीठीं । शुकें स्वपाठीं निरूपिलें ॥४॥
तेथ शुकाच्या अनुग्रहें । मजही अवगत झालें जें हें । तें मी यथामतिप्रवाहें । निःसंदेह परिसवितों ॥१०५॥

सूत उवाच - इति ब्रुवाणं संस्तूय मुनीनां दीर्घसत्रिणाम् । वृद्धः कुळपतिः सूतं बव्हृचः शौनकोऽब्रवीत् ॥१४॥

दीर्घसत्रींचे मुनि समस्त । प्राश्निक स्तवूनि बोलतां सूत । पुन्हा त्यातें प्रश्न करित । वृद्ध बव्हृच शौनक ॥६॥

शौनक उवाच - सूत सूत महाभाग वद नो वदतां वर । कथा भागवतीं पुण्यां यदाह भगवान् शुकः ॥१५॥

महा प्रज्ञावता सूता । सर्वज्ञचूडामणि तूं वक्ता । शुकें बोधिल्या भागवता । आम्हांसि आतां निरूपीं ॥७॥
कोणे युगीं कोणें कालीं । काय निमित्त कोणे स्थळीं । व्यासें पुराणसंहिता केली । हे गोष्टी कथिली पाहिजे ॥८॥
आणि सार्वभौम परीक्षिति । वीर्यशौर्यादिसंपन्नकीर्ति । तो गंगातटीं निर्वाणार्थी । प्रायोपविष्ट कां झाला ॥९॥
बालोन्मत्तपिशाचवत् । गूढलिंगी शुकचेष्टित । तो केवीं पातका अकस्मात । केवींमहंत ओळखिला ॥११०॥
तेणें कैशी कृष्णलीला । निरूपिली धरित्रीपाळा । ते आम्हांसि इये वेळां । पुण्यशीळा परिसवीं ॥११॥
हे ऐकूनि मुनीचे प्रश्न । सूतें क्रमें जें केलें कथन । श्रोतीं होऊनि सावधान । तें निरूपण परिसावें ॥१२॥

सूत उवाच - द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये । जातः पराशराद्योगी वासव्यां कलया हरेः ॥१६॥

कोणे काळीं कोणे युगीं म्हणून । पुशिलें तो ऐका प्रश्न । द्वापार युग अर्धक्षीण । तैं द्वैपायन जन्मला ॥१३॥
वसु विमानीं विचारतां गगनीं । द्रवला अप्सरा देखोनि । तें वीर्य मत्स्यीं गिळितां जीवनीं । जन्मली तेथून सत्यवती ॥१४॥
तिये वासवीचिये जठरीं । व्यासरूपें जन्मला हरी । पराशरऔरस जगदुद्धारीं । जो मुनिवरीं अभिपूज्य ॥११५॥
तेणें देखोनि कलि संप्राप्त । अल्पायुषी जन समस्त । सत्यशौचस्वधर्मरहित । करुणावंत कळवळिला ॥१६॥
जाणोनि वेदांचें अपारपण । अल्पायुषी प्रज्ञाहीन । होती कळिकाळीं ब्राह्मण । यज्ञविधान केवीं राहे ॥१७॥
ब्रह्मा अध्वर्यु आणि होता । चौथा बोलिजे उद्गाता । वेदचतुष्टय यज्ञकार्यार्था । झाला निर्मिता कारुण्यें ॥१८॥
ऋग्वेद पढविला पैलमुनी । यजुष वैशंपायनालागुनी । साम अभ्यासि जैमिनी । सुमंता लागूनि अथर्वण ॥१९॥
माझा जनक रोमहर्षण । त्यासि पुराणसंहिता संपूर्ण । इतिहासेशीं करवी पठण । कलिनिस्तरण करावया ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP