विराटपर्व - अध्याय पहिला

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


वत्सळ ताताधिक जो गुरु धौम्य ज्ञानपुण्यराशि कवी
अतिगहन राजसेवाधर्म तया कुरुकुळेश्वरा शिकवी. ॥१॥
धौम्य, द्रुपदपुराप्रति जातां घेवूनि अग्निहोत्रास,
प्रार्थूनि म्हणे, ‘ न शिवो या यजमानासि, अग्नि हो ! त्रास. ’ ॥२॥
सशतांग इंद्रसेनाद्यनुचर कृष्णाश्रयासि धाडून,
पाठविला द्द्रुपदपुराप्रति दासीदासवर्ग झाडून. ॥३॥
गेले विराटनगरा पांडव अज्ञातवासकामुक ते,
चुकतें भावि, तरि सुखा सुज्ञ श्रीकांतदास कां मुकते ? ॥४॥
जी तच्छस्त्रत्राणा आश्रय त्या संकटांत होय शमी
शिवमूर्तिसी श्मशानीं, तीचें वर्णूं न काय हो ! यश मीं ? ॥५॥
भेटोनि विराटासि प्रथम युधिष्ठिर वदे मनोज्ञ असें,
‘ नामें कंक द्विज मीं, धर्माश्रित, अक्षकेलिदक्ष असें. ’ ॥६॥
ठेवी विराटनृप बहुमानें सभ्यांत या हि सभ्यास,
वर्ते नृपाश्रितांत नृपाश्रितसा चि, नसतां हि अभ्यास. ॥७॥
मग भीम म्हणे, ‘ राया ! मी धर्माश्रित लहानसा, माजी
आख्या बल्लव, सेवा होती प्रभुच्या महानसामाजी. ’ ॥८॥
स्वमहानसीं विराट स्थापी पूजूनि बल्लवाला, हो !
हळहळुनि म्हणे धर्म, ‘ स्वपदा हरिपादपल्लवा ! लाहो. ’ ॥९॥
होवूनि मलिनवेषा जातां राजप्रियेकडे कृष्णा
चित्तीं म्हणे, ‘ अहा ! बहु अवघड हे उंबरे कडे, कृष्णा ! ’ ॥१०॥
पाहुनि पुसे सुदेष्णा, ‘ बाइ ! कवण तूं ? असी दशा कां ? गे ! ’
‘ कृष्णाश्रिता भुजिष्या सैरंध्री मीं, ’ असें तिला सांगे. ॥११॥
राज्ञी म्हणे, ‘ पहाया रूप असें, ईश्वरीस नवसावें.
कोण सचक्षु म्हणेल स्वगृहीं तुज सुंदरीस न वसावें ? ॥१२॥
परि निश्चयें त्यजिल मज, पाहुनि तुज भूप सुकमनीयतें;
वाटे विलोकिता जरि हें अद्भुत रूप शुक, मनीं येतें. ॥१३॥
काय करावें, म्यां तरि, जरि सुंदरि ! अनुसरेल पति तूतें ?
वद, केंवि आवरावी अमृतफळहृता रसज्ञमति तूतें ? ’ ॥१४॥
‘ दैवें सैरंध्रीपण हें कांहीं काळ पातलें पदरा
पांचा गंधर्वांची पत्नी मीं पावल्यें कधीं न दरा. ॥१५॥
स्पर्शों न दे चि बाई ! स्वप्नीं हे मन्मना विवेक मळा,
गगनमनिकरींच्या तम केव्हां तरि काय हो ! शिवे कमळा ? ॥१६॥
हें वपु परभोग्य नव्हे; जो पुरुष बळें चि हात लाविल या,
पावेल लय, ज्योतिस्पृग् जेंवि पतंग मातला विलया. ॥१७॥
उच्छिष्ट चारितां मज, मजकरवीं धुववितां चि चरणातें,
नर कीं नारी पावे मत्पतिपासूनि सद्य मरणातें. ’ ॥१८॥
तीतें म्हणे सुदेष्णा, ‘ मन्निकट स्वस्थ तूं सये ! रहें;
त्वत्सख्यभाग्यदुर्लभ, यावें स्वप्नांत ही न येरा हें. ’ ॥१९॥
मग तंतिपाळनामें राहे सहदेव होवुनि खिलारी,
लीला हे, कौरव किति ? न बहु हरिजनीं स्मरादि निखिलारी. ॥२०॥
स्त्रीवेष क्लीबत्व स्वीकारी शक्रभू; पतन येतें
इतरा, परि तो न चळे; शिकवी नृत्यादि भूपतनयेतें. ॥२१॥
रक्षिति हरिहरूपें पक्ष्में ज्या अतिशयप्रिया बुबुळा,
नामें बृहन्नडा तो होय, धरुनियां करांत कंबु, बुळा. ॥२२॥
नकुळ म्हणे, ‘ मीं ग्रंथिकनामा हयशास्त्र जाणता, राया !
तो शालिहोत्र कीं हा तुल्य चि; अश्वांसि, जाण ताराया. ॥२३॥
ज्याचा ठायीं नांदे सन्नीति जसी दयाधिका रामीं,
राया ! करीत होतों त्या धर्माच्या हयाधिकारा मीं. ’ ॥२४॥
मत्स्य म्हणे, ‘ आश्रय मीं तुज, पल्वल जेंवि मानसमराला;
नरयान त्यापुढें किति, कामा ये जें विमान समराला ? ॥२५॥
धर्माश्रितांसि आश्रय मीं, लोकां हांसवितिल कविराट,
परि शोभेल चि, भासत होतां लोकांस वितिलक विराट. ’ ॥२६॥
ग्रंथिक म्हणे, ‘ नरेंद्रा ! येथें हि स्पष्ट तो चि धर्म असे;
ऐसें नसतें, तरि हे येते न प्रार्थितां कशास असे ? ’ ॥२७॥
अज्ञातवासकाळीं त्यांची कष्टा दशा वदावि किती ?
द्रव्यार्थ भीमअर्जुन अन्नें लब्धांबरें तदा विकिती. ॥२८॥
वरचेवर दे धर्म द्यूतविजितपणधन स्वभावांस;
समयज्ञ कवि न म्हणतिल ‘ कृपण ’ असें त्यां घनस्वभावांस. ॥२९॥
एकांतीं गुप्तपणें भेटे, चोरांसि जेंवि चोरसखा,
सहदेव म्हणे, ‘ बहु कृश दिसतां, व्हा तुष्ट, पुष्ट, गोरस खा. ’ ॥३०॥
स्वामीपासुनि नकुळ हि जोडी भ्रात्रर्थ धन हयां सजुनीं,
अंतःपुरीं मिळालीं वस्त्रें अर्जुन हि दे तयांस जुनीं. ॥३१॥
दयितांसि द्रुपदसुता भेटे भलत्या मिषें, न दे विरहा;
तन्मति तिला म्हणे ‘ पति अतिमृदुल, न भेटतां न देवि ! रहा. ’ ॥३२॥
तें अमृतवर्ष दर्शन त्यांसि, अदर्शन चिराटन गरांत,
एवं मासचतुष्टय ते क्रमिती त्या विराटनगरांत. ॥३३॥
ब्रह्मोत्सवांत तेथें ये साक्षान्मल्लकाळ जीमूत,
ज्याची आणी बहुतां भुजरणनिपुणांसि काळजी मूत. ॥३४॥
‘ आहे कोण्ही मजसीं भांडेसा ? ’ हें सगर्व मल्ल वदे;
रंगीं तया क्रियोत्तर राजाज्ञेनें सशंक बल्लव दे. ॥३५॥
काळासीं हि कराया सिद्ध चि तो धीरवीर भीम रणा;
कळतां, सुयोधन पुन्हा व्यसनीं, पाडील, या चि भी मरणा. ॥३६॥
भीमभुजाशनिपातें बाहुरणीं दुष्ट मल्ल तो चिरडे;
रंगीं बहुगर्वें जो हांसे फुगवूनि गल्ल, तो चि रडे. ॥३७॥
धरिती घडींत शतदा म्लानिविकास सर्व मल्लास्यें;
जिष्णु म्हणे, ‘ न धरावा जनरंजनरंगगर्व मल्लास्यें. ’ ॥३८॥
फिरवुनि शतदा केला पिष्ट क्षितिवरि सलील आपटुनीं.
तें प्राशिलें नियुद्धामृत नयनमुखें करूनि आ पटुनीं. ॥३९॥
रायें प्रसन्न होउनि देतां निजवस्त्ररत्नधनदानें,
‘ हाय ! ’ म्हणे भीम, जया पूजावें करुनि यत्न धनदानें. ॥४०॥
मग भीम करी हरिसीं, पुरवाया राजदारकाम, रण,
कृष्णा म्हणे, ‘ सख्या ! हरि ! देसि न मज तूं उदार कां मरण ? ’ ॥४१॥
दश मास क्रमिति असे, प्रभुसम मत जे सदार विश्वास,
अत्युग्र दीर्घ सोडी, ज्यांसि विलोकुनि, सदा रवि श्वास. ॥४२॥
कीचकनामा सेनापाल श्याल प्रसिद्ध राज्याचा
भंगूं पाहे कृष्णाव्रत,  वांछी अभ्युदय धरा ज्याचा. ॥४३॥
भगिनीस म्हणे, ‘ पूर्वीं आढळली या न हे मला भवनीं,
वाटे जन्मदरिद्रा झाला बहुकोटिहेमलाभ वनीं. ॥४४॥
मोहेल इला पाहुनि शक्र हि; मग अन्य कां न नर मोहे ?
मजसीं, अधःकराया अहिसुरनरकन्यकानन, रमो हे. ’ ॥४५॥
लब्धतदनुमोदन तो जंबुक सिंहीस, कीं सकाम ससा
व्याघ्रीस, सतीस बळें शांतीस वरावयासि तामससा, ॥४६॥
रावणसा बहु विनवी, प्रेम प्रत्यक्षरीं हि नव दावी.
कीचक नीच कलुषनिधि, त्याची आर्यांत गोष्ठि न वदावी. ॥४७॥
मळवूं पाहे स्वबळें या श्रुतिला काय नीच कलि हा ? वा
दशमुखमुखमळजळनिधिखळपतिपंक्तींत कीचक लिहावा. ॥४८॥
कृष्णा म्हणे, ‘ अहाहा ! बुडती, तरि भजति नीच कामातें,
सावध हो, गा ! वध हो न, व्याळी जाण कीचका ! मातें. ॥४९॥
परदारा मीं, मत्पति गंधर्व, प्रबळ उग्र शिवशील,
मागें सरसिल, तरसिल; मरसिल, जरि मज बळें चि शिवशील. ’ ॥५०॥
प्रिय पांचजन्य जीस, प्रिय तदितर त्या भुजेसि कंबु कसा ?
झिडकारिला सतीनें, सिंहीनें दुष्टबुद्धि जंबुकसा. ॥५१॥
बंधु भजो, पति न भुलो, म्हणउनि, नसतां परस्व सामान्य,
ती त्या कार्यासि करी, जरि न करावें, पर स्वसा मान्य. ॥५२॥
ती तीस म्हणे, ‘ कीचकसदना जावूनि आण गे ! हाला. ’
धाडी बळें वृकाच्या, घालुनि हरिणीस आण, गेहाला. ॥५३॥
कृष्णा म्हणे, “ न जाइन, जेंवि मृगी वृकबिळा, विटागारा,
साधुगृहा धाड, परमतप्ता तत्पथशिळाविटा गारा. ॥५४॥
उचित शुचि तरि च नृवपु, व्रतविघ्न म्हणोन देवि ! टाळावें.
म्हणति विट ‘ विटाळावें, ’ परि वेद म्हणों न दे ‘ विटाळावें. ’ ” ॥५५॥
विनवी ऐसें बहु तरि तीस सुदेष्णा म्हणे तरी ‘ जा च. ’
फार चि बरी निरयगति, परवशता शतगुणें करी जाच. ॥५६॥
ती आपणा म्हणे, ‘ हा ! द्रौपदि ! तुजवरि हरी च विटला, गे !
चुकलीस तूं चि, नसतां पदरीं अघ, पाठिला न विट लागे. ’ ॥५७॥
ज्या श्रीकृष्णसखीतें योग्य नमाया सुरासुर सतीतें,
प्रेषी आणाया ती राज्ञी, मानुनि सुरा सुरस, तीतें. ॥५८॥
जातां परार्थ ही बहु तापातें पावली सुरामा ती,
न करील कां पित्याची दुर्गतिची मावली सुरा माती, ॥५९॥
त्या संकटीं सतीनें दीनांचा बंधु कृष्ण आठविला,
त्या सवितृमंडलस्थें राक्षस रक्षार्थ गुप्त पाठविला. ॥६०॥
कीचक विलोकुनि म्हणे त्रिजगद्गुरुविष्णुच्या हि आलीस,
‘ रंभा चि सुदति ! तूं या नळकूबरमंदिरासि आलीस. ॥६१॥
सर्वस्व अर्पितों तुज, देवि ! करीं पूर्ण का, हो दारा,
विकत मिळतां स्मितसुधालेशें घेसी न कां महोदारा ? ’ ॥६२॥
इत्यादि नीच कीचक दुष्कर्माची धरूनि आस वदे.
कृष्णा म्हणे, ‘ सुदेष्णेकरितां पात्रीं भरूनि आसव दे. ’ ॥६३॥
तों कर धरुनि खळ म्हणे, ‘ दासी आहेत फार अन्या या,
बैसा शयनीं, राज्ञी करित्ये, करवूनि दास्य, अन्याया. ’ ॥६४॥
कर आसुडितां चि पडे धडडड वात्याजवें जसा विटपी,
कैंचें तेज बळ तशा दुर्वृत्तीं जो सुरारसा विट पी ? ॥६५॥
तंवकें उठोनि धावुनि, पळतां, कवळूनि नीच कबरीतें,
नृपतिसमक्ष हि पाडी लत्ता हाणोनि कीचक बरीतें. ॥६६॥
तों तो राक्षस पाडी मागें ढकलूनि कीचकाला हे,
जाणों गरुडें उडवुनि आपटिला मत्त नीच कालाही. ॥६७॥
पाहे विराटनिकटस्थित धर्म, तदंतिकस्थ भीम हि, तें,
न सतीस लात बाधे, जेंवि पुनररण्यवा सभी महितें. ॥६८॥
अस्तीकशपथ अहिचें कीं हरिचें आवरी बळ खलीन,
धर्म तसें भीमाचें, तो म्हणतां, ‘ भूखलीं खळ खलीन. ’ ॥६९॥
भीमांगुष्ठासि धरी स्वांगुष्ठें धर्मराज दडपून,
नाहीं तरि, तेव्हां चि श्येनतसा मारिता चि झडपून. ॥७०॥
रोधी युधिष्ठिराज्ञावेळा भीमार्णवाचिया वेगा,
नाहीं तरि, जगदंतक पूर तया तेधवा चि यावे, गा ! ॥७१॥
कृष्णा रडत म्हणे, ‘ या रायावरि धर्मनीति विटताहे,
कैसी उपेक्षितां, हो ! सभ्य ! श्रीकीर्तिहानि विटता हे ? ॥७२॥
प्रेमें रक्षितिल सदा, म्हणुनि दिलें मीं जयांसि मत्तातें,
ते गंधर्व उपेक्षिति मज कां ? कां मारिती न मत्तातें ? ॥७३॥
या शुचि वपुतें योग्य न सेवाया, योग्य कीचक मळातें;
जें राजहंसमत, त्या तुडवितसे काक नीच कमळातें. ’ ॥७४॥
ज्या नीति सतीची बुधमान्या अतुच्च पायरी, तीतें
दासीपरि पाहे हा, नुमजे चि विराटराय रीतीतें. ॥७५॥
भूप म्हणे, ‘ मज तुमचें कलिकारण न समजे चि तर्कशतें;
नुमजुनि मधुर हि वदतां, लागे गाळीपरीस कर्कश तें. ’ ॥७६॥
कंक म्हणे, ‘ सुज्ञे ! जा, त्वां न अनाथासमान वरडावें,
गे ! गांजितां परें स्वस्त्रीतें, न म्हणेल मानव रडावें. ॥७७॥
गंधर्व त्वत्पति कीं, तरि ते सुसमर्थ, देशसमयज्ञ;
थोरां न अन्य मान्य श्रितरक्षणकीर्तिलेशसम यज्ञ. ’ ॥७८॥
तेथुनि राज्ञीपासीं जावूनि, म्हणोनि ‘ तात ! अंब ! ’ रडे,
फोडी जैसी व्याघ्रविमुक्त कुळभ्रष्ट धेनु हंबरडे. ॥७९॥
कळतां म्हणे सुदेष्णा, ‘ नाहीं च विचार कीचकीं अधमीं,
सखि ! उगि; जरि म्हणसिल, तरि करिन तव सुखार्थ बंधुचा वध मीं. ’ ॥८०॥
कृष्णा म्हणे, ‘ वधावा भ्राता त्वां कां ? तुजा न अपराधी;
पति गंधर्व न दुर्बळ, माजी प्रार्थील किमपि न परा धी. ’ ॥८१॥
निजदुःखाहुनि केवळ कनकनगास हि गणील हा न सती,
तैं द्वारकापुर तसें आणी बहुदा मनीं महानस ती. ॥८२॥
जाय निशीथीं साध्वी, दावी तिस तत्प्रभा चि वाट तमीं;
चित्तांत म्हणे, ‘ भीमा दयिता दयिता नसेंन वाटत मीं ? ’ ॥८३॥
पाहोनि म्हणे भीमा, ‘ आश्रय तुज काय हें महानस ? हा !
न यशोहानि सहा, गा ! सुज्ञा ! संहकाय हेमहान सहा. ’ ॥८४॥
साश्रु गळां पडुनि म्हणे, “ मेलां किंवा तुम्हीं अहां सासु ?
होत्यें म्हणत, ‘ वियाली माजी च रिपुक्षयावहां सासु. ’ ॥८५॥
मीं काय ? भली निद्रा सुखदात्री ! काय हा लहान सखा ?
गमलें वपु चि यशोधिक, तरि अन्न चि, धरुनि हें महानस, खा. ॥८६॥
निजलां काय मृतापरि ? जागे व्हा, सिंहसे उठा, राहो
निद्रा, कीर्ति वरा, हो ! ह्रीप्रद हा बाहु भृगुकुठारा हो. ” ॥८७॥
भीम गडबडोनि उठे अंकीं च निवास तीस दे वामीं,
चित्तीं म्हणे, ‘ बहुदिसां आतळलों या सतीस देवा ! मीं. ’ ॥८८॥
‘ दयिते ! कां आलीस ? प्रमदे ! हा आर्द्र कां पदर ? ज्याये !
भ्यालीस भीरु ! भय कां ? भेटे त्याला चि कांप, दर ज्या ये. ॥८९॥
तूं काय भार ? भामिनि ! उतरसि मांडीवरूनि कां ? बस, ये,
झालें काय ? वद सुदति ! सुमुखि ! सति ! रडों नको चि, थांब, सये ! ’ ॥९०॥
देवी म्हणे, “ पुसतसां, जाणुनि ही खेद काय मातें ? हो !
विनवा तुम्हीं तरि, ‘ सुकृत जें बंधच्छेदका, यमा तें हो. ’ ॥९१॥
पुसतां, नसे स्मृति म्हणुनि ? बहु उत्तम, सांगत्यें बरें, परिसा;
परि साच निजाना, कीं लोहाची भीड काय जी ! परिसा ? ॥९२॥
कृष्णसखी, द्रुपदसुता, धर्मस्त्री, सून पांडुराज्याची
कविगणगणपतिगौरी कीर्ति सुधासिंधुपांडुरा ज्याची; ॥९३॥
कवि जीस राजसूयामाजि, व्यापुनि महीनभा, गाती,
झाली विराटसदनीं सैरंध्री परम हीनभागा ती; ॥९४॥
जी कुरुसभेंत नेली द्यूतजिता किंकरी म्हणुनि अरिनीं,
बहु घाबरी च केली, जसि देवुनि हाक हस्तिनी हरिनीं; ॥९५॥
खळ दुर्दशार्थ सोडित होता चि, त्यजुनियां दया, लुगड्या,
स्मरतां चि भीड पडली जीची, दीनांचिया दयालु गड्या; ॥९६॥
कीचक नीच कर तिचा धरि, परि हरिची सखीन अनुसरली,
कर आसुडितां पडतां खळ, तेथुनि दूर ती सुतनु सरली. ॥९७॥
पळतां, पाठीस तिच्या लागे, वेणी धरूनि दे हिसके,
स्वकराग्रें हि शिवाया न रवि जिच्या कांतिसंपदे हि सके. ॥९८॥
लत्ता हाणुनि मूर्छित केली सुकुमार मूर्ति भूपातें,
अजि ! सोसलें कसें पतिहृदया ? सोसो ससभ्यभूपा तें. ॥९९॥
पका बुद्धि करितसे सुयशाची वृद्धि, मृत्तिका काची;
हरिनीं श्ववृत्ति वरिली, कीं हंसानीं च वृत्ति काकाची. ॥१००॥
तेज तुम्हां असतें तरि, उरता हाणोनि न विट लातेला;
अहितायुला न पीतां तेजस्वी दीप न विटला तेला. ॥१०१॥
देवा ! वांचाया, हे स्त्री मातीसी च तुडविली, लाजो;
तो हि पति, उद्धरीना अरिनें व्यसनांत बुडविलीला जो. ॥१०२॥
हे स्त्री नव्हे, प्रतिष्ठा तुमची, जरि इस सोडितां पाणी,
‘ धर्मे चार्थे च, ’ असें वदलां कां प्रथम जोडितां पाणी ? ॥१०३॥
निस्तेज मीं हि; दीपकवर्तिहर जसा खराखु, रामेला
श्रीरामाच्या हरितां, तत्तेजें खळ खराखुरा मेला. ॥१०४॥
मज मरण सुसह, परि हें दुःसह बहु, धातया ! न रामेला
रक्षी वरूनि जो, जन म्हणती बहुधा तया नरा मेला. ’ ॥१०५॥
दावी रडोनि जाले जे गंध उगाळितां स्वहात किणी.
भीम म्हणे, ‘ विधिलेखनि ! लेखनिं नच वचकलीस घातकिणी ! ’ ॥१०६॥
नेत्रें पुसोनि कवळुनि भीम सतीला म्हणे, “ उगी, न रडें,
अज्ञातवास नसता, तरि अरिचें तैं चि मुरडितों नरडें. ॥१०७॥
धर्माज्ञेतें भ्यालों मीं, साध्वि ! न अंधनंदनगदेतें;
सुख गुरुवचोनुग चि वपु दे, न सुरसगंधनंदनग दे तें. ॥१०८॥
एकांत नृत्यशालाशयनीं भेटे, असें चि कर; ज्याये !
येइल तसें चि माज्या, नृहरीच्या यश जसें चि करज्या ये. ॥१०९॥
काळा हि न भीति सती; स्त्रीश्वरि ! भ्यालीस काय अल्पा या ?
कल्पाया सत्य, स्मित कर, म्हण, ‘ नृत्यालयस्थतल्पा या. ’ ॥११०॥
कल्पाग्निपुढें कूपीं कृष्णे ! राहेल काय ओलावा ?
गरुड म्हणतां ‘ प्रतिभटा ! ’ वांचेल कसा म्हणोनि ‘ ओ ’ लावा ? ॥१११॥
उत्साहभरें हृदयीं पर्वीं पाथोधिसा चि वाढत मीं
पूर्वींच नृत्यशाळाशयनीं जावुनि बसेन गाढतमीं. ॥११२॥
मुळमुळ रडों नको, सति ! सीतेस हि सोडिलें न भोगानें,
तेज असोनि हि वरिले काळकृताभ्युदयलय नभोगानें. ॥११३॥
हरिभक्तच्छळ करितां, तत्काळ उलेल कां न नीचोर ?
निश्चय, सद्धन हरितां, निजमार्ग भुलेल काननीं चोर. ” ॥११४॥
करवुनि खळवधनिश्चय, तेथुनि गेली सती स्वशयनातें,
कंठीं क्षपा स्मरोनि प्राणसख्या पुंडरीकनयनातें. ॥११५॥
गांठी तिला पुन्हां तो खळ, जेंवि पतंग दीपकलिकेला,
प्रार्थुनि म्हणे, ‘ सुमुखि ! मज भज, तुजसीं म्यां चुकोनि कळि केला. ॥११६॥
सुंदरि ! विराट राजा नावांचा जाण, साच मत्स्यप हा,
श्रृंगाररसतरंगिणि ! तळमळतो संगमार्थ मत्स्य पहा. ॥११७॥
जरि हा विराट राजा, तरि कांहीं काल कां न वदला ? गे !
वृद्धकळत्र युव्या, मज हें तेंवि पहावयासि पद लागे. ’ ॥११८॥
त्यासि खरें भासेसें प्रियशिक्षित सस्मित स्वयें वदली;
परि कांपली सतीची तनु, जैसी मंदमारुतें कदली. ॥११९॥
खळ पाय धरूं पाहे; सुमति म्हणे, ‘ कासया नति ? सरा हो !
परि पात्र निजरहस्या भ्राता वा दास, या न तिसरा हो. ’ ॥१२०॥
तें वाटे त्या हालापानाद्यतिपातकायना सत्य;
मग मनिं म्हणे, ‘ पित्याचा पाहतसे हात काय नासत्य ? ’ ॥१२१॥
केल्या संकेतातें ती निजरमणासि सूचवी रमणी,
विटदृष्टितें कळत्रीं भावी स्वनखांत सू च वीरमणी. ॥१२२॥
त्या शून्यनृत्यशाळाशयनीं सांजे चि गुप्त भीम निजे,
जागति ते, स्वाकारें भुजगांच्या नित्य देति भी मनिं जे. ॥१२३॥
झाली शाळा केवळ कृष्णा पोषूनि अंधकारा ती,
जाणों सुयशोर्थ तमोगुण धाडी तेथ अंधकाराती. ॥१२४॥
चित्तीं भीम म्हणे, ‘ सुरवर घे म्हणवूनि ‘ हा ! सुरापसदा ! ’
‘ धिग्धिग् ! छी छी ! ’ म्हणवुनि घेइल लोकांत हा सुराप सदा. ” ॥१२५॥
आला त्या साध्वीसीं इच्छुनि जो परम नीच कामरण,
प्राप्त न होईल कसें त्या मद्यमदांध कीचका मरण ? ॥१२६॥
पाहे शयनीं निजला होता जो कांत कीर्तिवरटांचा;
बसल्या ज्याच्या दुर्जननागफणारूपकीर्तिवर टांचा. ॥१२७॥
जों सांसपी तयाच्या,मृगपतिच्या जेंवि फेरु आंगातें,
करिती करकर, जाणों म्हणति जडवरासि ‘ मरसि कां ? ’ गातें. ॥१२८॥
‘ आलों तुज भेटाया घेवुनि सर्वस्व हें उपायन हो !
प्रमदे ! त्वत्प्राप्तीस्तव बहु केला; विफळ हा उपाय न हो. ॥१२९॥
असता दीप तरि, सुमुखि ! मानुनि मज मूर्तमदन, रमतीस;
‘ लटिकी ’ म्हणूनि, हृदयामाजि न देतीस पद नरमतीस. ’ ॥१३०॥
हळुच म्हणे भीम, “ तुम्हीं सुमहागुणनदनदीप; काशाला
दीप ? प्रकाशली कीं पावुनियां वदनदीपका शाला. ॥१३१॥
तुमचें लोकांत, अहो कीचक ! सामान्य काय हो ! शील ?
संगासि उर्वशीच्या स्वप्नीं तरि काय गा ! ढवा लाहे ? ॥१३२॥
सैरंध्री वीरवधू या तुज नरकाय गाढवाला हे. ॥१३३॥
नारद म्हणे, ‘ मिळविलें यश, निर्मुनि हें चि रत्न मत्तातें. ’
वंदावें माथां कीं तुडवावें त्वां धुळींत मत्ता ! तें ? ॥१३४॥
धरितोसि जीविताशा तूं गरळप मंद नीच काशाला ?
त्वद्रक्तकर्दमें हे आतां चि भरेल कीचका ! शाला. ॥१३५॥
भगिनी रडेल, तुज अनुमोदुनि, नरकालयासि पाठवुनीं,
दुर्मंत्रीं सुह पावे जी; हेमंतांत जेंवि पाठ वुनी. ” ॥१३६॥
ऐसें बोलुनियां, धृतखळगल बलजलधि तो भला बुकली;
पावेल जय कसा, प्रभुसेतुसवें करिल जो अलाबु कली ? ॥१३७॥
प्रबळासीं करिल स्त्रीस्तव आमृति कां न नीच मूढ कली ?
सुकवि हि दशमुख निजतनुसह काळवृकाननीं चमू ढकली. ॥१३८॥
प्राणा मुकेल इच्छुनि सिंहीचे गज हि सबहुमान मुके;
मां न मुके कोल्हा ? कां ‘ छी ! ’ म्हणतिल त्या जनाधमा न मुके ? ॥१३९॥
ब्रह्र्याकरवीं स्मरवी, मधुसूदनचरित जें, पवनभू तें
कांपवि शेषफणेतें न विराटाच्या चि त्या भवनभूतें. ॥१४०॥
दावी दूरुनि नरकग्रामाची भीम कीचका वेस
कलिमाजि लघुत्वप्रद शक्तीस तसे चि नीच कावेस. ॥१४१॥
जें सुयश पाकशाळा मिरवी, न हतेभकेसरिगुहा तें;
हें किति ? असो; नियुद्धाविषयीं याची न ये सरि गुहातें. ॥१४२॥
जातां भीम म्हणे, ‘ गे ! अपराध तुजा करूनि पर मेला;
वांचेल नीच कीचक कैसा, लावूनि पाय परमेलों ? ॥१४३॥
त्या सीतेला वासविवायससा, तुज हि कीचक विटाळी,
त्या या हि दंडिता प्रभु; साहे दोषासि नीच, कवि टाळी. ॥१४४॥
व्यसनीं प्रभु रक्षी, मीं काय ? विसरलीस काय गे ! हरितें
तत्स्मरणदीप नसतां, व्यापिल तम कां न कायगेह रितें ? ॥१४५॥
ऐसे चि खळ विदारुनि, देइल बहु लाज भीमकर पविला,
ज्यांहीं न हा चि चित्तीं, तो हि सतीकांत भीम करपविला. ’ ॥१४६॥
गुर्वाज्ञा म्हणवुनि जों जाय सती मृतविटासि लक्षाया,
मानी दिधला काळव्याघ्राला मांसपिंड भक्षाया. ॥१४७॥
स्मित करुनि म्हणे, ‘ पापा ! कां रे ! प्राणादिसर्वहानीच्या
बीजा व्यभिचारित्वा भजलासि, धरूनि गर्व, हा ! नीच्या ! ’ ॥१४८॥
साध्वी तेथूनि निघे, चिंती पतिभुज मनांत हरिसारे,
राजसभापाळांतें दूरूनि म्हणे, ‘ समस्त ! परिसा, रे ! ॥१४९॥
मत्पति गंधर्व, तिहीं सोडविलें, वधुनि कीचका, मातें.
मेले दशाननादिक, तर्‍हि वश होतात नीच कामातें. ’ ॥१५०॥
सैरंध्रीनें कथितां कीचकवधवृत्त, धांवले लोक,
तदनुज उपकीचक शत ससुदेष्णविराट पावले शोक. ॥१५१॥
तें देखत, खांबाला आलिंगुनि, दूर राहिली होती,
कृष्णा मृतबंधूनीं साश्रूंत निरश्रु पाहिली हो ! ती. ॥१५२॥
बहुधा काळ म्हणे तिस, ‘ मारिन खळ तव बळें, नसें दूर;
अरिरक्त पहा, दृक्प्रिय गणपमुखस्थ हि असा न सेंदूर. ’ ॥१५३॥
खळ म्हणति, ‘ सस्मितमुखी ती सैरंध्री पहा उभी, मरण
गुरु पावला यदर्थें, करुनि पतींसीं जिच्या सुभीम रण. ॥१५४॥
हूं, आणा, बांधा, हो ! एकाकी वीर हा न सेउ चिता,
मेला स्वसंगकामें, तत्सहगति कसि इला नसे उचिता ? ॥१५५॥
भावोजी ! जेणें या दासीस प्राप्त होय सुरता तें
वाइट काय ? म्हणा ‘ हूं ’ स्वर्गीं दोघें करूत सुरतातें. ’ ॥१५६॥
चालविली कृष्णसखी बांधुनि, जसि ती स्वबंधुची किरडी,
चिरडी तत्काळ न त्यां, भीम विवेकी भला, न तो शिरडी. ॥१५७॥
नेतां सती म्हणे, ‘ जरि वधितां मज, मारितों न हा कामी,
गंधर्वराजसुत हो ! दीनापरि मारित्यें न हाका मीं. ॥१५८॥
धांवा, उडी च घाली, मानी घाली, न नीच, कास रणीं;
रक्षा स्वकीर्ति, घालूं पाहति मजसहित कीचका सरणीं. ’ ॥१५९॥
श्रमला, परि भीम उठे, सुचवी, ‘ व्याकुळ न हो ’ असें तिजला.
गज गंजिता व्रतस्थास इंही, राहेल सिंह कां निजला ? ॥१६०॥
निजवेषासह टाकी प्राक्तारावरुनि तो उडीला, हो !
कां जीव म्हणेल, ‘ पतन जरि  हे लाहेल, तरि कुडी लाहो ? ’ ॥१६१॥
द्यावा त्या दुष्टांच्या जनु अंतःपूर्वपुरविलापाला,
जावुनि पुढें चि भीमें तरु उपडुनि, त्यासि नुरविला पाला. ॥१६२॥
‘ बा ! विटलासि सुबिरुदा केंवि ? ’ असें केशवास हसतीला
जाळावयासि घेउनि गेले जों ते शवासह सतीला, ॥१६३॥
तों तो गर्जोनि म्हणे, ‘ हा आलों, सर्व मारितों खळ गे !
हे केवळ कंटक, या राष्ट्रीं न बरे, जसे पथीं खळगे. ’ ॥१६४॥
बहु खळवळ खळबळ करि पाहुनि कुरुनायका, द्रवे, यश तें
अद्भुत, पक्षिपतिपुढें ठाकावें काय काद्रवेयशतें ? ॥१६५॥
त्यजुनि पळाले पंचोत्तरशत मनुजाकृती पंशु चितेतें.
अजि ! साहतील कैसें, शुचिदुःसह तेज जें अशुचि तें तें ? ॥१६६॥
भीमप्रतापतपनें झाले बहु शुष्ग्क ते जसे पळवे,
पळ वेचे तों गांठीं, हरिणांला हरिपुढें कसें पळवे ? ॥१६७॥
वधिले खळ अपराधी गरुडें अहिसे, न लागतां पळ, ते;
वधिता चि भीम गांठुनि, जर्‍हि लंघुनि सप्तसागरां पळते. ॥१६८॥
पुष्पोत्कटा चि दुसरीं गणितील अजान कीचकवितीतें,
जी कृष्णा साध्वी, कां म्हणतील न जानकी च कवि तीतें ? ॥१६९॥
भीम म्हणे, ‘ करिन तुजें सति ! मर्दुनि रिपुशतायुतें, हित मीं;
बुडवी बळें अकाळीं सद्द्वेष महाशतायुतें हि तमीं. ॥१७०॥
छळिले दशाननें, परि झाले प्रभुदार काय कातर ते ?
भीतां द्वंद्वांसि कसे हरिजन भवसिंधुनायका तरते ? ॥१७१॥
जें कर्म सिंधु इतरां, मज हरिदासासि आड वाटे तें,
जा तूं आल्या चि पथें, जातों मीं धरुनि आडवाटेतें. ’ ॥१७२॥
जोडुनि यश मिरवे जन, परि भगवज्जन कशास मिरवेल ?  
बहु पानवेल मिरवी तेंवि न मिरची यशास मिरवेल. ॥१७३॥
ज्या स्तवुनि म्हणति हरिभुज, ‘ कवि हो ! आम्हांत पौरवा घाला. ’
त्या हि जसे ते भ्याले, स्वप्नीं हि तसे पौर वाघाला. ॥१७४॥
भी च चतुर्थी, कृष्णादेह चि बहुधा कलाप हा, याला
स्त्री, बाळ, वृद्द, साधु हि, पुरजन बहु धाकला पहायाला. ॥१७५॥
स्त्रीस विराट म्हणे, “ गे ! सैरंध्रीला निरोप दे, विनवीं,
म्हण ती, ‘ त्वदतिक्रमजन्यें यावीं भयें न देवि ! नवीं. ’ ॥१७६॥
भुलविल गंधें रुचिर स्त्री मूर्तिमती सुरा, न राहो ती;
दुःसह कामविकार स्त्रीरत्नास्तव सुरा नरा होती. ॥१७७॥
गंधर्वभयें काळिज धडधड उडतें, करें पहा गे ! हें,
त्वद्बंधूंचीं झालीं युगपच्छूंन्योत्सवें महागेहें. ” ॥१७८॥
येतां मार्गें पाहे, यद्वारीं भीम, तें महानस ती,
स्वविवाहमंडप गणी, मानी वृत्तोपयममहा न सती. ॥१७९॥
स्मित करुनि म्हणे, ‘ त्रात्या त्या गंधर्वाधिपा असो नमन,
विसरेल कसें, व्यसनीं अभयें सुख पावलें असोन, मन ? ’ ॥१८०॥
बल्लव म्हणे, ‘ विराजे पाणि श्रितसमवनें, न वलयशतें;
केलें कलत्ररक्षण पतिनें, तरि काय हो ! नवल यश तें ? ’ ॥१८१॥
ये उत्तरा पहाया सांडुनि गाण्यास नाचण्यासहित,
केंवि म्हणेल रसज्ञा, सोडुनि शालीस, नाचण्यास हित ? ॥१८२॥
रोमांच तिच्या देहीं विजयश्रवणीं उभारती, वाटे
भेटे खळबळविजयीं साक्षाद्देवीस भारती, वाटे. ॥१८३॥
‘ गे ! सखि ! सैरंध्रि ! कसें जालें ? कसि गे ! सुटोनि आलीस ? ’
ऐसें बृहन्नडा ही तीस पुसे, जेंवि आलि आलीस. ॥१८४॥
तीस म्हणे सैरंध्री, ‘ तुज मजसीं काय उत्सवद नातें ?
स्पर्शेल, वृत्त वदतां, खळनाम प्राप्तकुत्स वदनातें. ॥१८५॥
तुज लाभ काय यांत, व्यासंग त्यजुनि नृत्यगानाचा ?
जा सकळा, मद्वृत्तश्रवणानें काय कृत्य ? गा, नाचा. ’ ॥१८६॥
बोले बृहन्नडा, ‘ प्राक्सहवासें दुःख सुख तुजें शिवतें,
नेणे जनमन, साक्षी विश्वाचा एक जाणतो शिव तें. ’ ॥१८७॥
गेली राजगृहीं, तों तीस सुदेष्णा म्हणे, न कोपावें,
सैरंध्रि ! भूप भीतो, तूं या नगरीं वसों नको, पावें. ’ ॥१८८॥
कृष्णा म्हणे, ‘ त्रयोदश दिवस वसों दे, ’ असें चि वद राज्या;
अयश न यावें तुमच्या, यावें अस्वल्प सुयश पदरा ज्या. ॥१८९॥
येथुनि नेतील मला गंधर्व, बहुप्रसाद करितील,
हरितील ताप तुमचे, ज्ञाति सपूर्वज्ञ हि कीर्ति वरितील. ’ ॥१९०॥
वदतां असें समंजस, मग केंवि म्हणेल तीस ती ‘ जाच ’ ?
अपराध लव हि नसतां, कां हो ! सोसील ती सती जाच ? ॥१९१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP