सभापर्व - अध्याय सहावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


दुर्योधन हि म्हणे, “ गे ! धर्मास ‘ अनीश अनृत ’ हें चवघे
तव धव भीमादि मुखें म्हणोत, ऐकोत सभ्य हे अवघे. ॥१॥
येणें चि दासभावापासुनि तूं पावसील सुटकेला.
अस्मत्प्रसादकारण हें चि, न शतवार पाणिपुट केला. ॥२॥
कीं ‘ मीं अनीश्वर ’ असें धर्म म्हणो साधुरीतिस त्यजुनीं;
आवडती तूं चि नवी, बहु नावडती च होय सत्य जुनी. ॥३॥
काय वदतील सभ्य ? व्याकुळ झाले तुझ्या चि तापानें,
कीं एकदा चि फुटलें त्वत्पतिपंचककपाळ पापानें. ” ॥४॥
त्या दुर्योधनवचनें खळबळलें तदनुजादिखळबळ तें,
जैसें श्रवणीं पडतां साधूक्त पिशाचकटक खळबळतें. ॥५॥
धर्माकडे चि पाहत होते ते कुजन सुजन ही, परि तो
किमपि न वदला; बहुधा समयीं समयज्ञ मौन ही धरितो. ॥६॥
भीम म्हणे, “ अस्मदसुप्रभु धर्म, नृपेंद्र हा नव्हे लटिका,
नसतें असें, तरि मला तुमच्या मथना न लागती घटिका. ॥७॥
कपटद्यूतीं अजित हि नृप जरि जित आपणासि मानील
मानूं तसें चि आम्हीं, अस्मद्रीतीस विश्व वानील. ॥८॥
हे कृष्णा तों अजिता, ऐसें हि असोनि साहतों अनया,
गुरुवश नसतों तरि अरिरुधिरांच्या कां विनिर्भितों न नाया ? ॥९॥
हे काय अशक्त ? पहा या माझ्या वज्रतुल्य बाहूंतें;
यांच्या आकृतिला जें उचित, भुजगराजतेज बाहूं तें. ॥१०॥
माते ! क्षमे ! म्हणों दे या त्वद्वशगा मनुष्यदेवा ‘ हूं,
हो भीम पळ विशृंखळ, खळखळ खळरक्तपूर दे वाहूं. ’ ॥११॥
गुरु आज्ञा देता, तरि अरिकरिहरि मीं सपत्न - शशकांतें
वधितों, काय श्रम मज मथितां या धार्तराष्ट्र - मशकांतें ? ॥१२॥
आज्ञा पुन्हा कशाला ? आहे पहिली च गुरु वराज्ञा; ते
न पुसति पुनःपुन्हा जे झाले सेवूनि गुरुवरा ज्ञाते. ” ॥१३॥
भीष्म द्रोण विदुर त्या क्रुद्धाला म्हणति, ‘ बा ! न कोपावें,
करिसील सर्व; संप्रति ह्मणतोसि तसें करूं नको, पावें,. ’ ॥१४॥
कर्ण म्हणे, ‘ हे च तिघे धर्मविलंघसमर्थ, चवथा न;
यांसि तसें पतिनिंदाव्यसन, जसें दे मुलांसि चव थान. ॥१५॥
इच्छिति मूळच्छेद स्वामीचा, न गणिती महाघातें,
व्याकुळ मनीं न होती, स्कृतयशांच्या अशा महा घातें. ॥१६॥
द्रौपदि ! ऐक मदुक्त, छात्र तनुज दास हे अधन; यांत
तूं दासधन, सुयोधन नाथ तुझा, स्पष्ट हें स्मृति - नयांत. ॥१७॥
दुर्योधनदारचरणसंवाहननिरतबुद्धि हो भावें,
त्वन्नाथ धार्तराष्ट्र, न पांडव, दीनीं तुवां न लोभावें. ॥१८॥
अथवा स्वपतिजयें जरि आत्मजयातें न मानिसी स्वमतें,
तरि तूं तरुणि अपतिका, अन्य करीम कांत हें भलें गमतें. ॥१९॥
वर्तति मनमानेसें सुरतपरा अपतिका स्त्रिया बटकी,
तें तुज विदित असो, गे ! जो तो कामी गळां पडे, हटकी. ॥२०॥
तुज परिमितपतिक असा काशाला दारभाव ? सांडावा.
अपरिमितपतिक दास्य स्वीकारुनि कामचार मांडावा. ॥२१॥
सहदेव नकुळ अर्जुन भीम युधिष्ठिर हि दास हे अवघे,
न तुझे पति, तूं दासी, जो तुज मानेल तो सुखें धव घे. ’ ॥२२॥
ऐसें ऐकुनि सोडी अहिपतिसा भीमसेन सुसकारा,
बहुधा गुरुसंकोच ग्रासी तन्नामवर्ति सु - ‘ स ’ कारा. ॥२३॥
भीम म्हणे धर्मातें, “ राया ! या नीच सूततनयास
काय म्हणों ? ‘ स्वकुळोचित वदतो, ’ ह्मणतील साधुजन यास. ॥२४॥
द्यूत न करितासि जरि न्यायें जरि वर्ततासि, तरि बापा !
कां होतों दास ? नृपा ! स्वप्नांत हि न करिताम किमपि पापा. ॥२५॥
कां या सभेटं करिते अरि तेजोभंग ? कां असें वदते ?
जे शशरवें विरावे, देती मृगराजमस्तकीं पद ते ! ” ॥२६॥
तों दुर्योधन बोले ‘ धर्मा ! अजिता जरि द्रुपदतनया
तरि वद, वदन वरि करीं, कीं जाणसि सुज्ञ तूं नया अनया. ’ ॥२७॥
ऐसें पुसे, कुचेष्टा तो दुर्मद त्या सभेंत ही मांडी.
कृष्णदेखत दावी डावी उघडी करूनियां मांडी. ॥२८॥
भीष्म ह्मणे, ‘ जरि समरीं या मांडीवरि गदा न बसवी,
तरि पितृसालोक्यातें क्षण हि न पावेन, नरक वसवीन. ’ ॥२९॥
विदुर ह्मणे, ‘ हे अजिता, खळ हो ! हें कर्म काय हो ! करितां ?
कैंचें कुशळ शशांचें, शापुनि समरासि सिंह होकरितां ? ’ ॥३०॥
पुनरपि सुयोधन ह्मणे, “ कृष्णे ! चौघे ‘ अनीश धर्म ’ असें
बोलोत, मुक्त करितों; कीं मत्सदनीं करूनि कर्म असें. ” ॥३१॥
जिष्णु म्हणे, ‘ यापूर्वीं होता हा ईश आमुचा साचा,
आतां प्रभु कोणाचा ? न मला संकोच दुष्टदासाचा. ’ ॥३२॥
इतुक्यांत चि धृतराष्ट्रक्षितिपतिच्या अग्निहोत्र - भवनांत
जंबुक शिरोनि बोले, पितरांच्या जेंवि वल्लभ वनांत. ॥३३॥
तो जंबुक आरडतां, बहु रासभ दुष्ट खग हि आरडले,
उत्पातज्ञ सदय जन तेव्हां चि मनीं म्हणोनि ‘ हा ! ’ रडले. ॥३४॥
तेव्हां धृतराष्ट्रातें गांधारी विदुर अशुभ कळवीती,
त्यातें अतिप्रयासें नानापरि बोध करुनि वळवीती. ॥३५॥
वृद्ध ह्मणे, ‘ रे मंदा ! कां स्वकुलज्येष्ठबंधुभार्येसीं
आम्हांसमक्ष करिसी अतिवाद त्यजुनि लाज आर्येसीं. ॥३६॥
असकृन्निवारिलें जरि सुज्ञें विदुरें तसें चि मत्तातें,
करिसी भलतें चि कसें ? भवमानिसि कां सदुक्त मत्ता ! तें ? ॥३७॥
वत्से ! सति ! मतिमति ! अतिमान्या मज तूं, क्षमा करीं दे हें,
वर माग, राग न धरीं, मत्पुत्रांचीं तुझ्या करीं देहें. ’ ॥३८॥
सुमति ह्मणे, “ जरि देतां वर, वचनें स्तवुनियां हि, मामाजी !
‘ धर्म अदास असो, ’ हा वरपट द्या आजि या हिमामाजी. ॥३९॥
प्रतिविंध्यास ह्मणावें, ‘ हा दासात्मज ’ असें न बाळानीं,
अनुचित दाससुतत्व, स्कंधीं ज्या वाहिलें नृपाळानीं. ” ॥४०॥
भूप म्हणे, ‘ हें दिधलें, दुसरा मज माग वर सुने ! ’ त्रात्या,
ऐसें परिसोनि पुन्हां वर मागे ती सती सुनीत्रा त्या. ॥४१॥
‘ सायुध सरथ नकुळसहदेवार्जुनभीम यांस दासत्व
न शिवावें, हें द्यावें मज यांचें स्थिर असो सदा सत्व. ’ ॥४२॥
‘ माग ’ म्हणे तिस राजा तिसरा जाय अलया तिचा राग;
नागवधूतें जाणों पाजी वरदुग्ध करुनियां आग. ॥४३॥
देवी ह्मणे, ‘ उदारा ! स्त्री योग्य नव्हे तिजा वर वराया,
लोभें आशींची चि न, मणिराशींची बरी वरव, राया ! ॥४४॥
नीचत्वतीर्ण तत्पति हे सुकृतें पावतील कल्याण.
येतां सदश्व हाता, दुर्लभ त्याहूनि काय पल्याण ? ’ ॥४५॥
कर्ण म्हणे, ‘ ज्यां व्यसनोदधिमग्नाम गुरु, सुमित्र, सुत नुतरी,
त्यांला झाली भाग्यें प्रपत, पहा, हे समर्थ सुतनु तरी. ’ ॥४६॥
‘ स्त्री गति पांडुसुतांची, हा ! दैव ! ’ असें म्हणोनि भीम कर
चोळी, अनुजासि म्हणे, “ जिष्णो ! यादोगणीं न भी मकर, ॥४७॥
तैसा मीं शत्रुगणीं, परि पाश तयासि तेंवि मज राजा,
दाखवितों कौतुक, जरि वत्सा ! म्हणतासि ‘ करुनि गजरा जा. ’ ॥४८॥
स्त्रीस सभेंत हि शिवला, मग एकांतीं नसेल कां विट तो ?
जो शुचि तो स्वप्नीं ही परदारांच्या विलोकनें विटतो. ” ॥४९॥
कर्णाकडे विलोकुनि हांसोनि म्हणे, ‘ धनंजया ! स्मरतें
कंसातें मन; त्या जें ग्रासी तत्काळ तेज तूं स्मर तें. ’ ॥५०॥
जिष्णु म्हणे, ‘ नीचासीं संत न वदती, म्हणोनि सुज्ञानें
सोसावें, बा आर्या ! कीं तूं आहेसि पूर्ण सुज्ञानें. ’ ॥५१॥
भीम म्हणे, “ धर्मा ! ‘ हूं ’ मात्र म्हण, प्राज्य राज्य तूं कर गा !
करगा भूमि करीं मग, हरिला, व्हाया सदा मुदाकर, गा. ’ ॥५२॥
क्रोधें भीम खवळला कल्पांतज्वलनसा च, परि त्यातें
प्रतिबंधकमणि झाला धर्म, रिपुपतंगदाह करित्यातें. ॥५३॥
धृतराष्ट्राप्रति अंजलि करुनि युधिष्ठिर म्हणे, ‘ अहो तात !
तुमचे पाद तसे प्रिय अमृतकराचे हि मज न होतात. ॥५४॥
ईश्वर तूं, त्वद्वचनीं मन्मन, जाणोनि परम हित, रमतें;
राज्यपदाधिक गुरुपद, वदतों हें गुरुमतें, न इतर - मतें. ॥५५॥
पूर्वीं गुरुवचनें जो पी दुग्धरसा गरासहित राया !
त्या प्रह्लादातें बुध गाती भवसागरास हि तराया. ॥५६॥
देवा ! सांगावेंसें जें तुज वाटेल, सांग पां यांतें,
हे वाहतील पांच हि तुझिया प्रीत्यर्थ आंग पायातें. ’ ॥५७॥
धृतराष्ट्र म्हणे, ‘ धर्मा ! आलासि तसा चि त्या नव पुरा जा.
रक्षार्ह शील रक्षीं, रक्षो हें च स्वयें, न वपु राजा. ॥५८॥
वत्सा ! अजातशत्रो ! तूं बंधुकृतापराधविसरा या
अंध स्थविर गुरुकडे पाहुनि आहेसि योग्य विसराया. ॥५९॥
अतिशुद्ध बुद्धिचें फळ शांति, भले सहनशील, बापा ! हें,
सर्व तुला विदित असे, आम्हां वृद्धांकडे चि बा ! पाहें. ॥६०॥
सुकृतातें चि स्मरति, न कुकृतातें, या चि साधु - रीतीची
रुचि रसिका, न सुधेची; कीं, केवळ अल्प माधुरी तीची. ॥६१॥
हें म्यां उपेक्षिलें कीं, पुत्रबळाबळ मला विदित व्हावें.
द्यूतविलोकनकौतुकमिलिताप्त हि भेटतील या भावें. ॥६२॥
कळलें पुत्रांत तुम्हीं श्रेष्ठ भले, जा स्वराज्य सांभाळा;
बुडतां असदनुसरणें, लावावा शब्ददोष कां भाळा ? ’ ॥६३॥
नमुनि पित्यासि निघाला तो व्यसनोन्मुक्त सस्वजन पार्थ,
सुजनासि गमे ज्याच्या कीर्तिश्रवणें चि जन्म अनपार्थ. ॥६४॥
दुःशासन, कर्णशकुनिदुर्योधन हे जया स्थळीं होते,
तेथें जाउनि सांगे, ‘ शक्रप्रस्थासि चालिले हो ! ते. ॥६५॥
सुटले शत्रु दुखविले अहिसे, वधितील हे तुम्हां, तारा
व्यसनांत आपणातें; न बरा हा नाशहेतु म्हातारा. ’ ॥६६॥
जाणोनि अत्यनिष्ट क्षिप्र तथा आंधळ्यासि भोंदाया,
धावुनि गेले शतसुत शोकाजगराननांत कोंदाया. ॥६७॥
त्यातें म्हणे सुयोधन, ‘ केला कीं व्यर्थ यत्न हा तातें,
मोहें गमाविलें, जें आलें अहिमूर्धरत्न हाता, तें. ॥६८॥
जों झाले न रणोद्यत सर्वोपायें सपत्न मारावे,
यांत चि कुशळ; स्वाश्रित जन सुज्ञें सर्वथैव तारावे. ॥६९॥
वृत्रारिप्रति वदला गुरु ज्या या भद्रधाम नीतीतें,
प्रभुवर्या ! अवमानुनि करिसी बहु खिन्न कां मनीं तीतें ? ॥७०॥
द्यूतजितप्रचुरधनें पूजुनि नृप सर्व, करुनि वश, अरि ते
मारावे, हें मन्मत; कीं, न भले वृत्तिचें हरण करिते. ॥७१॥
पांडव न सोडिले ते, दुखउनि अत्यंत उग्र अहि तातें.
नीतिज्ञ कोण दुसरा आत्मसुतांच्या करील अ - हितातें ? ॥७२॥
येतील कटक घेउनि, आम्हां वधितील, राज्य हरितील,
दयितेच्या क्लेशातें चिंतुनि ते काय गा ! न करितील ? ॥७३॥
आझुनि तरि सावध हो, द्यूतार्थ फिरोनि ये तसें कर, गा !
करिल पुन्हां मन्मातुळ शत्रूंच्या राज्यसंपदा कर - गा. ॥७४॥
द्यूतीं असा करूं पण, ‘ करणें वनवास अब्द बारा, ’ हें
होतां, ‘ अज्ञातवसति वत्सर ’ आइक, उगा चि बा ! राहें. ॥७५॥
अज्ञातवास अंतीं करणें जो काय, तो समानजनीं,
जरि उमगले, वसावें द्वादश वर्षें पुन्हां तसें चि वनीं. ॥७६॥
सिद्धिद मामा, ‘ मा मा ’ न म्हण, मदिष्टार्थ तप नको कांहीं.
प्रार्थावा पुत्रांहीं स्वपिता स्वसुखार्थ तपन कोकांहीं. ॥७७॥
होवूनि बद्धमूळ, स्वसहाय करूं समस्तनृपकटक,
मग मज भक्ष्य, व्यसनीं तरले ही अरि, जसे घृतीं वटक. ॥७८॥
व्यसनीं सरंध्र हि उरे, जोंवरि राहे धरूनि तळ उगला,
भक्ष्य चि इतर सुवृत्त हि बटक कटाहीं तरोनि जो फुगला. ’ ॥७९॥
अंध म्हणे, ‘ हूं, फिरवा, जावूं द्या जवन दूत, नंदन हो !
देवा ! युधिष्ठिराचा तो द्यूतोत्साह लेश मंद न हो. ’ ॥८०॥
द्रोणादि सुज्ञ वारित होते, परि न वळला चि तो कांहीं,
भरला भरीं, भुलविला, दावुनि धनलोभ दुष्ट तोकांहीं. ॥८१॥
लोभांध न गुरु हो ! तो आत्मारि तथा निजानुगांधारी,
आंत हि जो अंध तया बोध किती हो ! करील गांधारी ? ॥८२॥
‘ नरकीं बुडवील, न हा पुत्र, त्याग चि बरा न अत्याग;
बांधा, वधा खळाला, स्नेहें घडतें तुह्मांसि अत्याग. ॥८३॥
क्षणभरि मात्र खळतनुजविरहातें, मन करूनि गाढ, वहा;
राजगृहीं न वसावा, भ्रमलासि, नव्हे सदश्व, गाढव हा. ॥८४॥
एकैक शतसुताधिक ते सुत, यांहूनि काय हो ! ऊन ?
सन्मणि टाकुनि घेतां काच कसे सुज्ञराय होऊन ? ’ ॥८५॥
भूप म्हणे, ‘ बहुधा कुळ बुडतें, वारावयासि मीं न शकें,
गरुडास हि लंघ्य न जें; लंघावें दैव तें कसें मशकें ? ॥८६॥
गांधारि ! उगीच रहा, होऊं दे द्यूत; औरसा मान्य
श्रुति म्हणति, न इतराला; त्या मानिसि केंवि पौर सामान्य ? ’ ॥८७॥
ऐसें वदोनि भूपें पाठविला प्रातिकामि सूत बळें;
तेव्हां स्तविति खळ खळां, गळति खळखळां सु - साधु - नत्र - जळें. ॥८८॥
तो सूत दूर धावत जावुनि गांठी पथांत पार्थातें,
ठकवुनि लुटावया पटु ठक जेंवि स - सार्थवाह - सार्थातें. ॥८९॥
‘ द्यूतार्थ बाहतो तुज तात, युधिष्ठिर ! नराधिपा ! परत, ’
ऐसें तो सूत म्हणे; दे श्रवणें दुस्तराधि पाप - रत. ॥९०॥
धर्म म्हणे, “ क्षम नाहीं लंघाया सुज्ञ ही नर कपाळा;
स्तुत होय स्वःपाळा, केव्हां ‘ जी ! जी ’ म्हणे नरकपाळा. ॥९१॥
द्यूतें क्षय हें कळतें, परि फिरतों; लंघ्य काय हो ! तात ?
पितृवचनकर निरुपम श्रीकीर्तीचे निकाय होतात. ” ॥९२॥
द्यूतासि पुन्हां सेवी गुर्वाज्ञेकरुनि शिशु जसा गरळा,
किंवा परार्थ जेंवि प्राशी श्रीकंठ नीरसा गरळा. ॥९३॥
बसले सभेंत पांडव, शकुनि म्हणे, “ गा युधिष्ठिरा ! जरि तें
जितधन दिधलें, देवू, वृद्ध करू सर्व गेह आज रितें. ॥९४॥
राया ! आतां द्यूतीं एक चि आह्मीं तुह्मीं करूं पण हो !
‘ सर्वस्व हारवावें कीं जिंकावें ’ न भीरु तूं पण हो. ॥९५॥
द्यूतीं निर्जित झालों, तरि आह्मीं रौरवाजिनें धरुनीं
द्वादशवत्सर व्हावें वनवासी सुमुनिवृत्तिला वरुनीं. ॥९६॥
अज्ञातवास सजनीं परि वत्सर एक मग करावा हो !
होतां चि ज्ञात, पुन्हां पहिला वनवासपथ धरावा हो ! ॥९७॥
जित होतां वर्तावें या चि न्यायें तुह्मीं सदारानीं,
सजनीं वर्षभरि वसा, द्वादश वर्षें वसा सदा रानीं. ॥९८॥
तेरा वर्षें ऐसीं क्रमिल्यावरि लागला चि चवदावें
राज्य करावें आपण, हा पण कोण्हीं असत्य न वदावें. ” ॥९९॥
सभ्य म्हणति, ‘ अक्षग्रह घातभ्रमकर, नसे असा धुतरा.
कौरव हो ! गौरव हो सुजनीं; न करुनि असें असाधु, तरा. ॥१००॥
अन्योन्यकरें तुमचा बुध हो ! समरांत न सहसा वध हो.
धर्मा ! तूं तरि आइक, देती भयलक्ष अक्ष, सावध हो. ’ ॥१०१॥
धर्म म्हणे, “ न व्यसनी मी, त्यजितां परि निज प्रतिज्ञा ते,
जे सुप्रसन्न मजवरि केवळ विटतील संप्रति ज्ञाते. ॥१०२॥
शकुन ! खेळ यथेष्ट, द्यूतीं म्यां मांडिला त्वदुक्तपण,
‘ छद्में कल्याण नसे, ’ ऐकावें प्रथम हें मदुक्त पण. ” ॥१०३॥
पूर्वोक्त पणोच्चारण करुनि, सभेमाजि शकुनि अक्षांतें
टाकुनि, ‘ जितं ’ म्हणे, खळ कपटें जिंकी खळान्त - दक्षांतें. ॥१०४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP