प्रवेश पाचवा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : गणपतरावांची खोली; पण ती त्यांना स्वप्नात दिसत आहे. टेबलावर दिवा लावलेला आहे. स्वप्नातील गणपतराव घाईघाईने आत येऊन सतरंजीवर मट्कन् खाली बसतो. ]

गणपतराव : खिडक्या लावलेल्याच आहेत ना ?.... नाहीतर आत येऊन आणखी मला... करु तरी काय आता ! ( रडू लागतो )... प्रत्यक्ष स्नेहाच्या बायकोशी.... गेले ! इतक्या दिवसांचे चांगले आयुष्य पार ! ( मोठमोठ्याने स्फुंदू लागतो )... आता ?.... आता मी जाऊ तरी कुठे ?.... गोविंदरावाकडेसुध्दा ?... छे ! तिथेसुध्दा नाही ! इतक्या वर्षाचा स्नेह, पण... त्यांच्यापुढे जाऊ तरी कसा ? मनाचे पावित्र्य ! माझ्या मनाचा जोर !... ( स्फुंदत ) कुठे आहे आता !... जगातील प्रत्येक वस्तु या जोडेखाऊ ! या जोडेखाऊ !’ म्हणून ( खाली डोके टेकून अधिकच स्फुंदू लागतो )... अण्णा ! अण्णा !... पण त्यांना तरी हे काळे तोंड.... ( दोन्ही हातांनी तोंड झाकून मोठमोठ्याने रडू लागतो. ) विनूला नावे ठेविली, आणि मी ?.... जगात डोळे उघडून मी !.... मी आता पाहू तरी कसा ! ( पुन: रडू लागतो. )...  चला अफू खाऊन जीवच.... ( उठतो व टेबलाचा खण ओढून एक लहानशी डबी घेतो. त्यातील अफू घेऊन हातावर ठेवतो. ) हो ! खावीच... नाही, खायलाच पाहिजे आता !... रडून काय उपयोग !... देवा ! नुसत्या रडण्याने जर झालेल्या गोष्टी न झालेल्या होत्या, त किती... किती चांगले.... !
( इतक्यात पांढरी व काळी आकृती आत येते. पांढरी आकृती गणपतरावाजवळ जाऊन उभी राहते व काळी आकृती कोपर्‍यात उभी राहते. )
गणपतराव : ( घाबरुन ) कोण तू ?
पांढरी आकृती : मी तुला...
गणपतराव : ( काळ्या आकृतीकडे पाहून ) आणि तो ?
पांढरी आकृती : पुन: सांगतो....
गणपतराव : काय ?
पांढरी आकृती : नरकांतील दूत...
गणपतराव : आणि स्वर्गातील.... ?
पांढरी आकृती : दोन्हीही.... अगदी जवळ... सारखे टपून...
गणपतराव : ( घाबरुन ) पण मी अफू...
पांढरी आकृती : नाही, हे स्वप्न...
गणपतराव : काय ! हे स्वप्न !.... हे स्वप्न !!...
पांढरी आकृती : होय ! तुला आधी सावध करण्याकरिता....
गणपतराव : स्वप्न !
पांढरी आकृती : ध्यानात ठेव... ऐट नको करुस... मनातल्या मनातसुध्दा.... [ काळी आकृती नाहीशी होते. कंप सुटून, ती नाहीशी होते. अत्यंत तेजस्वी असा पांढरा स्वच्छ प्रकाश पडत जातो. पांढरी आकृती मोठी व उंचच उंच होत जाऊन, लांबवर जटा सोडलेली, कपाळाला भस्म लावलेली व गळ्यात रुद्राक्षांच्या, फुलांच्या वगैरेच्या माळा घातलेली, अत्यंत रेखीव तेज:पुंज अशी दिसू लागते. आकृती गणपतरावाकडे पहात पहात आपले तोंड त्याच्या तोंडाजवळ नेऊ लागते, तोच - ]


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP