प्रवेश पहिला

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


प्रवेश पहिला

[ स्थळ : एक लहानशी खोली. आत शिरण्याचे दार समोर भिंतीला मधोमध आहे. डाव्या बाजूला दोन खिडक्या आहेत; पण त्या आतून लावून घेतल्या असल्यामुळे बाहेरचे काही दिसत नाही. उजव्या हाताकडे पलीकडील कोपर्‍यातल्या दाराकडे पाहिले, तर त्या बिचार्‍याला क्वचित आपले मन मोकळे करुन बोलण्याची परवानगी मिळत असावी, असे त्याच्या तोंडाला बसलेल्या गंजलेल्या कुलुपावरुन सहज दिसून येईल. समोरील दाराला उजव्या हाताला एक साधे टेबल असून, त्याच्यावर सात आठ पुस्तके, टाइमपीस, लिहिण्याचे सामान, हिंक्सचा दिवा वगैरे जिनसा आहेत. टेबलाखाली सारुन ठेवलेली खुर्ची दिसतेच आहे. तसेच वर कविवर्य शेले यांचा फोटो असलेले एक क्यालेंडर टेबलाच्या अमळ वर भिंतीला लावलेले आहे. दोन खिडक्यांच्या मध्यभागी एक लहानशी पेटी ठेवलेली आहे. कपडे वगैरे ठेवण्याकरिता समोर डाव्या हाताकडे भिंतीला दोन खुंट्या आहेत. खोलीच्या तुळईच्या अलीकडे पूर्व पश्चिम सतरंजी पसरली असून तिच्यावर गोळा करुन ठेवलेली वलकटी आहे. घड्याळात अकराचे ठोके पडतात. चारपाच मिनिटानंतर गणपतराव समोरील दार उघडून आत येऊ लागतात. अंधार असल्यामुळे पलीकडचे काही दिसत नाही. ]
जोशीमास्तर : फ़क्त गुलाम अन् दश्शा.
शंकरराव : बर तर हे लावा पाचशेसे ( बदामचा गुलाम अन् दश्शा टाकतो )
बाळासाहेब :  लेकाच्यांनी डाव चांग्ला काढला बरे का !
भाऊराव : ( रागाने ) तुम्ही बसला आहात ना दळभद्रे !
बाळासाहेब :  आता काय झाले ?
भाऊराव : ( रागाने ) अहो तुमच्यासमोर मी बसलो आहे का मेलो आहे ! मी पाने आटपली तरी हात घेत नाही ! तुम्ही मधे हात घेत नाही, सगळी पाने त्यांना चांगली जातात ! म्हणे त्यांनी डाव च्यांगला काढला ! लाज नाही वाटत ! तुम्ही काय हजामती करीत  बसलात ! ( एक दोन डाव खेळून होतात. )
जोशीमास्तर : हे एक दश्श्यांचे हजार लावा ! ( बदामचे दोन दश्शे टाकतो. )
भाऊराव : छे: ! छे: ! छे: ! खेळण्यातला माझा अगदी मूड गेला !
बाळासाहेब :  आता सारखे ते जर हुकूम खेळत आहेत -
भाऊराव : कबूल आहे, आमचीच चूक आहे ! थोबाडीत मारून घेऊ ?
जोशीमास्तर : आता बाळासाहेबांची काय चूक आहे ? पानेच जर -
भाऊराव : ( रागावून मोठ्याने ) गप बसा जोशीमास्तर ! मधे एक अक्षर बोलू नका ! ते आमचे गडी आहेत ! त्यांना मी काय वाटेल ते बोलेन - जोड्याखाली सुद्धा मारीन ! ( एक दोन डाव खेळून होतात. )
शंकरराव : हे आपले एक चारशे ( बदामचे दोन गुलाम टाकतो. ) त्यांचे किती आहेत ?
जोशीमास्तर : सारे तीनशे चाळीस आहेत.
शंकरराव : म्हणजे हजार नाहीतच ना ? ( जोशीमास्तर गालातल्या गालात हसतात. )
भाऊराव : ( शंकररावास रागाने ) काय मार पाहिजे वाटते ? ( इतक्यात खाली गलका चाललेला ऐकू येतो. भाऊराव उठून खिडकीशी जातो ) अरे राम्या, केश्या, चक्या, काय बाजार मांडला आहात रे तुम्ही ! गप बसा अगदी ! ( जागेवर येऊन बसतो. ) काय पान घेतले ?
जोशीमास्तर : ( पाने मोजून ) नाही बोवा मी नाही घेतले !
शंकरराव : ( हातातील पाने मोजून ) मीही नाही घेतले !
बाळासाहेब :  माझ्या हातात अकराच पाने.
भाऊराव : हात कोणाचा होता ?
शंकरराव : माझा काही नव्हता.
जोशीमास्तर : माझाही नव्हता.
शंकरराव : तुमचा बाळासाहेब ?
बाळासाहेब :  छे ! काय ते आठवत नाही. पण मी अगदीच भिकार पान टाकले होते.
शंकरराव : हं: ! सगळेच कसे आपण विसरलो हो !
भाऊराव : ( रागाने पानांच्या ढिगावर जोराने थप्पड मारून पान घेतो व तेच खेळतो )
( शंकरराव, बाळासाहेब, व जोशीमास्तर पाने घेतात. )
जोशीमास्तर : ( आनंदाने उडून ) वा ! भले र बोके ! पान पण आले आहे ! छान ! ( तिघांस चौकटचा गुलाम दाखवतो. )
शंकराराव : ( किंचित् कपाळाला आठ्या घालून ) बरे खेळा आता !
जोशीमास्तर : कोणाचा आपलाच हात ना ?
शंकरराव : हो आपलाच. काय दाखवता ?
जोशीमास्तर : हे आपले दोन हजार. ( चौकटचा गुलाम खाली टाकतो ) काय पान आले पण ! आता काय नुसते हुकूम झोडीत सुटायचे !
भाऊराव : ( रागाने ) मुकाट्याने नाही का हो खेळता येत ? बोलायला कशाला पाहिजे !
खबरदार एक अक्षर बोलाल तर !
( मारे हुकमांची सरबत्ती सुरू होते. मधून भाऊराव व बाळासाहेब हात घेतात पण त्यांचे ८०/६० पलीकडे काही महत्त्वाचे मार्क लागत नाहीत. शेवटचे सात आठ हात शंकरराव व जोशीमास्तर ह्यांचेच होतात. सहा वाजून दहा मिनिटांनी डाव संपतो. )
शंकरराव : आता हा शेवटचा हात आहे.
जोशीमस्तर : मग हा आपला शेवटचा ! ( बदामचा दश्शा खेळतो ) त्यांच्या जवळ आहे काय मारायला ! लाव आपले शेवटचे दहा !
शंकरराव : ( मार्करकडे पहात ) आपले झाले आहेत सात हजार तीनशे पन्नास. म्हणजे आपल्याला अजून पाचशी अन् पंधराशी पचत आहेत.
जोशीमास्तर : अन् त्यांचे ?
शंकरराव : ( भाऊरावाजवळील मार्करकडे पहात ) त्यांचे आहेत सारे पाचशेवीस.
जोशीमास्तर : पण नेम नाही ! डाव केव्हा उलटेल ते सांगता येत नाही.
शंकरराव : ( भाऊरावाकडे गंभीरपणे पहात ) हो, ते तर आहेच.
भाऊराव : अशा तर्‍हेने खेळणे म्हणजे नीचपणा आहे !
शंकरराव : आता काय झाले ?
भाऊराव : असे खेळणे म्हणजे शरम वाटायला पाहिजे !
शंकरराव : ती काय म्हणून ?
भाऊराव : ते दोन हजार लावणे म्हणजे निर्लज्जपणा आहे !
शंकरराव : पण तू पान आधी घेतलेस का ?
भाऊराव : तुम्ही काय हजामती करता ? हात कोणाचा काय - डावात लक्ष नाही तुमचे ! खेळता कशाला ? खराटे घेऊन रस्ते झाडीत फ़िरा !
शंकरराव : मग तू त्याच वेळेला सांगायचेस !
भाऊराव : काय सांगायचे !
शंकरराव : की बोवा ‘ तुम्ही हे दोन हजार लावू नका ! ’
जोशीमास्तर : अन् त्या वेळेला आम्हाला ते पान आले म्हणून ! नसते आले म्हणजे मग ?
भाऊराव : ( रागाने ) जोशीमास्तर, तुम्ही एक अक्षर बोलू नका ! मी पुन: म्हणतो की, असे खेळणे म्हणजे अगदी पाजीपणा आहे !
शंकरराव : पण हा तुझा लॉ पॉईंटच् - मुद्दाच चुकला.
बाळासाहेब : तो कसा ?
शंकरराव : म्हणजे असे. आम्ही जेव्हा दोन हजार लावले तेव्हा यांनी हरकत घेतली नाही. डाव सगळा पुरा झाल्यावर बोलून काय उपयोगी ? हो, ज्या अर्थी आपण सबंध डाव खेळलो, त्या अर्थी तुम्ही आमचे मार्क लावणे ऍक्सेप्ट् ( कबूल ) केले असे नाही का होत ?
बाळासाहेब : तरीसुद्धा भाऊरावाचाच पॉइंट बरोबर आहे ! कारण असे -
भाऊराव : ( तणतणत ) जाऊ द्या ! आपल्याला खेळायचेच नाही !
शंकरराव ( घाबरून ) पाहिजे तर नवीन गेम सुरू करू. ( गलात करू लागतो. )
भाऊराव : ( रागाने ) साफ़ खेळायचे नाही आपल्याला ! ( असे म्हणू जोराने फ़डके हिसकून पत्ते उधळून देतो. पत्ते माडीवर होतात )
जोशीमास्तर : ( गंभीरपणे ) आता बसण्यात काय अर्थ आहे ?
भाऊराव : ( रागाने ) चालते व्हा ! ( जोशीमास्तर निघून जातात. शंकरराव व बाळासाहेब माडीवर झालेले पत्ते अगदी एक अक्षर न बोलता गोळा करून आणतात व फ़डके पसरून त्यावर ठेवून देतात. )
शंकरराव : ( अगदी गरिबाने ) भाऊराव हे पत्ते मोज रे. ( पत्ते मोजू लागतो. )
भाऊराव : ( मुकाट्याने पत्ते मोजू लागतो ) तुझे किती झाले ?
शंकरराव : माझे झाले एकशे बेचाळीस.
भाऊराव : मग बरोबर आहेत. ( पत्ते फ़डक्यावर पसरतो. )
बाळासाहेब : काय म्हातार्‍या खरेच !
शंकरराव : काय झाले !
बाळासाहेब : तू खेळाचा अगदी विरस केलास.
शंकरराव : ( पानांची गलत करीत ) ऍ: ! चाललेच आहे ! आता खेळायचे असे नाही काही ! चल भाऊराव ! बसा हो बाळासाहेब. ( पाने सगळी गोळा करतो. भाऊराव व बाळासाहेब खेळायला बसतात. तिघे खेळू लागतात. भाऊराव व बाळासाहेब सिगारेटस् पेटवून आपली घाट इंजिने सुरू करतात. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP