प्रवेश तिसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : गणपतरावांच्या स्वप्नातील बाग. बाकावर सरासरी पंचवीस व अठ्ठावीस वर्षाचे असे दोघेजण बसले असावेत असे वाटते. ]

पहिला : खरेच का आपण येथे आलो आहोत ?
दुसरा : हो, हो, ती बाग ही !
पहिला : पण येथे कसे आलो बोवा !
दुसरा : ते काही ठाऊक नाही.
पहिला : मग मघाचे स्वप्न की आताचे स्वप्न ? मघाशी आपण पॅरिसमध्ये ....
दुसरा : काय बोवा, मला काही.... कसे अन् काय इथे आलो आहोत खरे.
पहिला : पण आपण इकडे सासून इस्पितळापाशी कसे ?
दुसरा : अरे, ती पहा गंमत !
पहिला : खरेच की !
दुसरा : आणि इस्पितळापाशी न्हाव्याचे दुकान ?
पहिला : तो कोण गणपतराव का ?
दुसरा : हो. तोच तो.
पहिला : अरे, तो तर त्या माणसाची हजामत करतो !
दुसरा : शाबास ! सगळे सोडून दिले आणि हा धंदा आरंभला का...
पहिला : हं. बरी फजिती झाली आहे !
दुसरा : अं: त्याची उडवायला रे किती वेळ !
पहिला : माझ्या मनातून फार आहे की या गणपतरावाची एकदा....
दुसरा : कारण ?
पहिला : फार त्याला घमेंड आहे असे दिसते.
दुसरा : ती कशाबद्दल ?
पहिला : बायकांच्या बाबतीत... आपण कधी चुकलो नाही, अन् कधी.... चुकणारही नाही.
दुसरा : असे का ? अरे वा: ! स्वारी कधी बोलली होती वाटते...
पहिला : नाही, बोलला नाही.
दुसरा : मग कशावरुन म्हणतोस ?
पहिला : मला आपले कळले आहे.
दुसरा : तेच कसे ते सांग ना.
पहिला : कसे ते काही.... पण कळले आहे येवढे खरे...
दुसरा : हं: ! काय पहा !
पहिला : काय झाले ?
दुसरा : तू बोलायला, अन् मला युक्ती सुचायला, एकच गाठ...
पहिला : वा ! मग काय छानच.... !
दुसरा : पण... एक मोठी अडचण आहे बोवा.
पहिला : ए: ! अडचण कसली आली आहे त्यात !
दुसरा : नाही, होईल तेव्हाच. पण या कामात....
पहिला : माझ्या बायकोची मदत पाहिजे....
दुसरा : हं; येवढेच.
पहिला : मग काय तेव्हाच...
दुसरा : त्यात काही त्यांना...
पहिला : ठीक आहे.
दुसरा : कसे करायचे ते....
पहिला : आले लक्षात.
दुसरा : ठरले तर...
पहिला : ठरले म्हणजे.... ठरले म्हणजे... ठरले म्हणजे....
दुसरा : वा ! तू तर नाचायलाच.... मग मीही...
पहिला : आपल्याबरोबर....
दुसरा : ह्या सगळ्या इमारतीही....


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP