TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अंक पाचवा - प्रवेश पहिला

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


प्रवेश पहिला
( चारुदत्ताचा वाडा , वसंतसेना व दासी प्रवेश करितात )
दासी : ताईसाहेब , आज आपल्याला उठायला जरा उशीर झाला , नाही ?
वसंत० : ( लाजून ) झाला असेल; पण श्रेष्ठ चारुदत्ताची स्वारी कोठे आहे ?
दासी : वर्धमानकाला सांगून ते मघाशीच पुष्पकरंडक जीर्णोद्यानांत गेले.
वसंत० : वर्धमानकाला त्यांनी काय सांगितले आहे ?
दासी : आपल्याकरितां गाडी तयार असूं दे म्हणून .
वसंत० : त्या गाडीत बसून मला कोठें जायचें ?
दासी : कोठें म्हणजे ? पुष्पकरंडक जीर्णोद्यानांत .
वसंत० : ( मोठ्या आनंदाने ) सखें , अगदी मनांत होतें तसेच झालें . काय सांगू तुला --
पद -- ( चाल -- अजि शेवटचा लाभ . )
जरि रात्रीचा काळ सुखाचा गेला ॥
सहवास तयाचा घडला ॥
जरि पाहूनि ते हास्यवदन बहु वेळां ॥ अति तोष मनाला झाला ॥
चाल ॥ तरि समाधान नयनांचे ॥ नच झालें पुरतें साचें ॥
घेईन पुन्हां मी त्याचे ॥चाल॥ सुखदर्शन तें केव्हां ऐसी मजला ॥
उत्कंठा या समयाला ॥१॥
दासी : पण ताईसाहेब , आतां उशीर आपल्याकडून आहे.
वसंत० :असें काय ? चल तर , ही निघालें मी . पण गाडी कोठें आहे ती ?
दासी : आतां इतक्यांत वर्धमानक गाडी तयार आहे म्हणून सांगायला येईल.
वसंत० : काय गे, ( इकडे तिकडे पाहून ) मी वाड्याच्या आंतल्या चौकांत
आहें ; नव्हें काय ?
दासी : वाड्यातल्या आंतल्या चौकांत इतकेच नव्हें ताईसाहेब , वाडयांतल्या सर्व मनुष्याच्या अगदी अत:करणात आहां . आपण आतां जाल तेव्हां धुतांबाईंना फार दु:ख होईल.
वसंत० : खरेंच . अगे , ही रत्नमाला घेऊन धूताबाई नेऊन दे आणि सांग कीं , ही या आपल्या दासीला शोभत नाहीं ; तर कृपा करुन आपण गळ्यांत घालावी . ( " आज्ञा " असें म्हणून ती जाते. )
( रदनिका रोहसेनेला घेऊन येते. )
रद० : बाळा , ही घे , ही घे . कशी छानदार आहे बघ . ती काय मेली सोन्याची पिवळी , वाईट ! ती नको गे बाई आमच्या सोन्याला !
रोह० : मी नाहीं जा घ्यायचा तसली मातीची . मला -
पद - ( असावरी , त्रिताल . )
सोन्याची गाडी दे ॥धृ०॥ दे आधीं करुन ,
मी जाऊन खेळेन , ही टाक मोडून , जा तुला हवी तर घेऊन ॥१॥
रद० : ( सुस्कारा टाकून ) -
पद- ( चाल नको हरी निशिं . )
नांव नको तें घेउं तान्हुल्या , विटाळा आंम्हां सोन्याचा ॥धृ०॥
हे दिन जाउनि जेव्हां पडतिल पुन्हां धनाच्या राशि घरीं ॥
खेळ घेउनी सोन्याची मग , तोंवरि बाळ हीच बरी ॥१॥
( त्याला वसंतसेनेजवळ घेऊन येते. )
वसंत० : रदनिके, आलीस , ये बैस . कोणाचा गे हा मुलगा ? अंगावर अलंकार नाहीत, तरी किती सुंदर दिसतो. याच्या मुखचंद्राकडे पाहून मला फार आनंद
होतो  . खरेंच , कोणाचा गे हा ?
रद० : हा आमच्या यजमानांचा मुलगा. याचें नाव रोहसेन .
वसंत० : असें काय ? तरीच ! (  उठून ) ये बाळ , ये  ! ( घेऊन ) बाळा
मला पापा दें पाहूं . हा लबाडा; रदनिके , याचा तोंडवळा आणि त्यांचा तोंडवळा अगदी सारखाच दिसतो, नाही ?
रद० : तोंड्वळाचसा काय , स्वभावसुध्दां एकसारखा आहे. सध्या आमचे यजमान त्यांच्याकडे पाहून दिवस लोट्ताहेत.
वसंत० : खरें म्हणतेस ? अगे , पण हा रडतो कां ? बाळा तुला काय पाहिजे ?
पद - ( चाल - निशा फार चढली )
रद० :
किति सांगूं हो गुण बाळाचे हट्टी मुलखाचा ॥
हट्टी मुलखाचा ॥ करावा लाड किती याचा ॥१॥
खेळत होता एक मुलासह , तो बाई थोराचा ॥
पाहूनि त्याचा मागुं लागला गाडा सोन्याचा ॥२॥
करुनि दिला मग यास तसा हा सुरेख मातीचा ॥
परि ऐकेना छंद कसा तो सोडीना मनिंचा ॥३॥
--आतं या गुलमाला मी सोन्याचा गाडा कोठला देऊं बरें ?
वसंत० : शिव शिव ! देवा ! ही निर्धनता फार वाईट --
पद - ( चाल -- आम्रमंजरी तुला )
कृतांत पुरुषा असा ॥ होसी निष्ठूर तूं बा कसा ? ॥धृ०॥
कमलदलीं जलबिंदुचि जैसे ॥ भाग्य नराचें चंचल तैसें ॥
खेळसि त्या सरसा ॥१॥ नको रडूं बाळका असा तूं ॥
तुझे सकलही पुरतिल हेतु ॥ राहि उगा पाडसा ! ॥२॥
रोह० : रदनिके कोण गे ही ?
वसंत० : बाळा , ही तुझ्या पित्याची गुणांनी विकत घेतलेली दासी आहे .
रद० : अरे , ही तुझी आई होते.
रोह० : तूं खोटें बोलतेस ; ही नव्हे माझी आई ! माझी आई म्हणतेस , तर हिच्या अंगावर दागिने गे कुठले ?
वसंत० :
साकी
( चाल - कंथ बिन रहे कैसी अकेली )
मनोहर असुनि तुझें मुख फार ॥धृ०॥
बाळा बोलूनि शब्द असें, कठिण परी बहु दीन ॥
भेद नको करुं ह्र्दयाचा होत जिवाला शीण ॥१॥
-- ( अंगावरील दागिने काढून ) ही पहा , आतां झालेंना मी तुझी आई ? हे घे दागिने आणि तुला हवी तशी गाडी करवून आण.
रोह० : मला नकोत जा.
वसंत० : ते कां रे बाळा ?
रोह० : कां म्हणजे ? तूं रडतेस म्हणून .
वसंत० : ( डोळे पुसून ) नाहीं बरें रडत , घे आतां .
( वर्धमानक येतो . )
वर्ध० : रदनिके, वसंतबाईसाहेबांना सांग कीं , मागल्या दरवाजापाशीं गाडी तयार आहे. लवकर निघायचें करावें .
रद० : ( वसंतसेनेजवळ येऊन ) गाडी तयार आहे ; आपल्याकडूनच उशीर आहे.
वसंत० : असें काय , तर ही मी उठलें . पण आंतून धूताबाईना भेटून येईपर्यंत थांब म्हणून सांग त्याला.
रद० : ( तसें सांगते व जाते. )
वर्ध० : बरें झालें . मी गाडीतील बैठक आणायाला विसरलों होतो तेवढी घेऊन येतो. ( पुढें पाहून ) अरे, हा कोण जती येत आहे ? अपशकुनच समजायचा ! बरें , आपण उजव्या बाजूनें जाऊं .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:25:09.4300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

simultation

  • न. सरूपण 
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.