TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अंक चवथा - प्रवेश १ ला

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


प्रवेश १ ला
स्थळ : बाग
मैत्रे० : ( प्रवेश करुन ) ह्या गणिकेचा केवढा तरी लोभविष्टपणा आणि केवढा तरी कृपणपणा हा ! केवढे आश्चर्य हें ! दुसरी तिसरी काहि गोष्ट न काढता हिने ती रत्नमाला मुकाट्याने घेतली . एकदा तरी नाही म्हणायचें होते. तसेच दुसरे , तिची इतकी संपत्ती , पण इतकेदेखील म्हणाली नाही कीं , " अहो मैत्रेयभटजी , तुम्ही फार थकलेले दिसतां , तर थोडीशी सुंठसाखर खाऊन घोटभर ऊन पाणी प्या. " छे फार दुष्ट स्वभाव ! म्हणतात तें खरें , कंदावाचून कमळ , कलहावाचून ग्रामसंबंध, विश्वासु सोनार आणि निर्लोभी गणिका , ही सापडणें फार कठीण . तर आतां कसेही करुन आपल्या मित्राला या गणिकेच्या नादापासून सोडविलें पाहिजे. तेव्हां त्याची आधीं गांठ घ्यावी. ( पड्द्याकडें पाहून ) काय रे वर्धमानका, श्रेष्ठ चारुदत्त कोठें आहे ? काय म्हणतोस, वृक्षवाटिकेंत बसला आहे ? बरें तर तिकडेच जावें . ( जातो . )
चारु० : ( आसनावर बसून ) हें आज अकालींच दुर्दिन उभ्दवलें .
पद -- ( चाल - मल्हार , त्रिताल )
आनंदें नटती । पाहूनि ज्या गृहमयूरपंक्ती ॥धृ॥
गमनोत्सुक हे हंस असुनियां ॥ धैर्य नसे त्यां गमन कराया ॥
कामुकगगनासम रोधाया ॥ मेघ पहा फिरती ॥१॥
दिंडी
बघुनि वाटे या नील पयोदातें । हरिच दुसरा कीं आक्रमी नभातें ॥
बलकांची शंखसीं करीं माला । तडित्पीतांबर बांधिला कटीला ॥१॥
पद -- ( त्रिताल )
चपलासें या जलधारा ॥ दिसति विमल रजताच्या तारा ॥
सौदामिनिच्या स्फुरणें होती ॥ नष्ट परीक्षण दृष्य मागुती ॥
भासे जणुं भूमीवरि पडती ॥ गगनपटाच्या दशा झरारा ॥१॥
पद -- ( चाल-- नोहे नारी ही. )
काहीं दिसती हे मेघ नभीचें ॥ बक हंसचि साचे ॥
जलधिक्षोभें उंच उसळले कांही संघ मीनामकरांचे ॥धृ॥
दुसरे भासति हे नृपमंदिरसे ॥
किती तुंग गिरीसे ॥ वातें हालवितां बहु त्यासरसें ॥
पय धरिती ऐसे ॥ यांच्या तिमिरानें जग भरलेसे ॥ मजला हें भासे ॥
खल शिखि गर्जंति आनंदानें , कोकिल धरिती मार्ग वनीचें ॥१॥
-- मैत्रेयला इतका वेळ कां लागला बरें ?
मैत्रे० : ( येऊन ) का मित्रा , आज वाटिकेंत येऊन बसलास ?
चारु० : कोण ? मैत्रेया ? आलास , ये बैस.
मैत्रे० : हो बसतों .
चारु० : इतका उशीर कां लागला रे ? असो ; पण तूं ज्या कामाल गेला होतास त्याचें काय झालें ?
मैत्रे० : मित्रा , तें कार्य बिघडलें !
चारु० : कां ? तिनं रत्नमाला घेतली नाही वाटतें ?
मैत्रे० : इतकें कोठें आहे आमचें दैव ! तिने आपल्या कमलासारख्या कोमल हातांची अंजली करुन , ती माला घेऊन आपल्या मस्तकावर धरली .
चारु० : तर मग बिघडलें म्हणून काय म्हणतोस ?
मैत्रे० : बिघडलें नाहीतर काय ? अरे, ज्याचा उपभोग आपण एक दिवसहि घेतला नाहीं आणि ज्यांचे मोलहि फारसें नाहीं , अशा त्या अलंकारांकरितां चतु: समुद्रातील सारभूत ती रत्नमाला घालविलीस , याहून बिघडायचें तें आणखी काय ? मीं म्हटलें , ती रत्नमाला घेणार नाहीं ; पण ती कसली लोभी ! तिनें घेतली तीं घेतलीच.
चारु० : मित्रा , असें म्हणूं नकोस. कारण --
साकी
मजवरि ठेवूनि बहु विश्वासा ठेव ठेविली होती ॥
मूल्य तयाचें अलंकार तो ऐसें आणी चित्तीं ॥
कुतर्क कां करिसी ॥ व्यर्थचि दोष तिला देसी ॥
मैत्रे० : मला संतापायला दुसरें एक कारण झाले. ती माझ्याकडे पाहून आपल्या दासीला खुणावून तोंडाला पदर लावून खदखदां हंसली ! असा तिनें माझा उपहास केला. यासाठीं मित्रा , मी म्हातारा ब्राह्मण तुला हात जोडून अशी विनंती करितों कीं , अत:पर हा जननिद्य जो वेश्यासंबंध त्याचा त्याग कर. अरे , या वेश्या म्हणजे जोड्यातल्या खड्यासारख्या आहेत. लवकर निघत नाहीत . आणि खुपल्यावाचून राहात नाहीत.
चारु० : मित्रा, आतां ही निंदा पुरे कर. माझ्या अवस्थेनेंच मला प्रसंगातून काढिले आहे. कसें म्हणशील तर पहा --
पद -- ( चाल-- लोपविली बहुत शोभा . )
हतबल तो अश्व वेगें धांवाया लागतां ॥
नुचलति बा चरण त्याचे बहु यत्नें उचलितां ॥
मन तैसें निर्धनाचें चोहिंकडे धांवतें ॥
परि होतां खिन्न येतें स्वस्थानीं मागुतें ॥१॥
-- दुसरी तुला एक गोष्ट सांगतो कीं , मला तिची आशाच नाही. कारण--
साकी
धन ज्या जवळी स्त्री त्याची बा धनवश ती नवरामा ॥
( मनांत छे छे , " गुणवश ती नवरामा ॥ " ) परि त्याजिलें मज धनें
म्हणूनि म्यां त्याजिली तीहि सुकामा ॥
मैत्रे० : ( मनांत )  हा वरती पाहून दीर्घ श्वास सोडतो आहे ; यावरुन असें दिसतें कीं , मी याचें इतकें निवारण केलें तरीं याची उत्कंठा अधिकच वाढली. तस्मात् मदनाची गति वक्र म्हणतात ते खोटें नाही. ( उघड ) मित्रा, मी वसंतसेनेचा निरोप घेऊन निघालों त्या वेळेस ती म्हणाली . भटजी , आज संध्याकाळी मी तुम्हालां भेटायला येणार आहें , असें चारुदत्ताला सांगा. यावरुन माझा तर्क असा वाहतो कीं , ती रत्नमालेने संतुष्ट झाली नाही म्हणून काही तरी अधिक मागायला येत असेल.
चारु० : येऊं दे आली तर ; संतुष्ट होऊन जाईल.
( कुंभीलक नांवाचा चेट येतो. )
कुंभीलक : हा श्रेष्ठ चारुदत्त येथें बसला आहे आणि तो व्दाड भटही तेथे जवळच आहे. असो; आपण वसंतसेनेच्या आज्ञेप्रमाणे तिचा निरोप चारुद्त्ताला कळवावा. ( पुढें जाऊन ) अरें , पण हा बागेचा झापां लावला आहे ; आतां आतां कसें जावें ? त्या भटाला कांही खूण करावी , म्हणजे तो इकडे येईल.
( मातीची ढेकळे त्याला मारतो. )
मैत्रे० : अरे, कुंपणांतल्या आंब्यांच्या झाडावर जशी ढेकळे मारावी, तशी ढेकळे मला कोण मारितो ?
चारु० : अरे , बंगल्याच्या सज्जावर पारवे क्रिडा करीत असतील त्याने माती पडली असेल; ढेंकळे कोण मारितों ?
मैत्रे० : अरे रांडलेका, दुष्ट पारव्या, दांडक्यानें पाडाचा आंबा जसा पाडावा
तसा तुला खालीं पाड्तो. ( मारावयास उठतों .)
चारु० : मित्रा,बैस खाली . ( धोतर धरतो. ) तो गरीब बिचारा पारवा आपल्या स्त्रीबरोबर क्रिडा करीत असेल, त्याला कां उगीच उपद्रव ?
कुंभी० : काय हा मूर्ख भट ! त्या पारव्याकडे पाहतो आहे ! ( पुन: ढेंकळें मारतो . )
मैत्रे० : अरेच्या ! पुन: ढेंकळें ! ( चोहोकडून पाहून )  अरे हा कुंभीलक आलों - आलों ; थांब . ( जाऊन झांप उघडून ) ये आंत, काय रे, अशा अंधारातूंन पावसांतून इकडे कोणीकडे ?
कुंभी० : अहो ही ती --
मैत्रे० : कोण ? ही ती कोण ?
कुंभी० : आपली ही ती --
मैत्रे० : अरे ही ती , ती ही असें काय करतोस ? नीट सांग.
कुंभी० : तुम्ही तरी कोण ही ती, कोण ही ती, असें काय विचारतां ? नीट विचारा.
मैत्रे० : बरें नीट सांग कोण ती ?
कुंभी० : आतां याला दुसर्‍या रीतीनें सांगावें. ( उघड ) भटजी आंब्याला मोहोर कोणत्या ऋतूंत येतो ?
मैत्रे० : मूर्खा ग्रीष्म ऋतूंत.
कुंभी० : विचार करा .
मैत्रे० : ( चारुदत्ताजवळ येऊन ) मित्रा, ज्यांत आंब्याला मोहोर येतो तो ऋतू कोणता ?
चारु० : अरे वसंत.
मैत्रे० : ( कुंभीलकास ) मूर्खा , वसंत.
कुंभी० : बरें , धनकनकसंपन्न राष्ट्राचें रक्षण कोण करितो ?
मैत्रे० : मूर्खा, रस्ते.
कुंभी० : नीट विचार करा.
मैत्रे० : ( चारुदत्ताजवळ येऊन ) मित्रा, धनकनकसंपन्न राष्ट्राचें रक्षण कोण रे करतो ?
चारु० : अरे सेना .
मैत्रे० : ( कुंभीलकास ) अरे , सेना.
कुंभी० : बरें , माझ्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आतां एकदम द्या.
मैत्रे० : सेनावसंत.
कुंभी० : पदें फिरवून सांग.
मैत्रे० : ( पाय फिरवून ) सेनावसंत.
कुंभी० : अहो , शब्दांची पदें फिरवून सांगा.
मैत्रे० : हं ! हं ! वसंतसेना आली होय ? तरीच ! तर मग चारुदत्ताला कळविलें पाहिजें . ( जवळ जाऊन ) मित्रा, तुझा धनिक तुला भेटायला येणार आहे.
चारु० : माझा धनिक ? आमच्या सर्व कुलाला धनिक हा शब्दच ठाऊक नाही.
मैत्रे० : कुलाला नाही , पण तुला तो आतां प्रत्यक्ष दर्शन देणार आहे.
चारु० : असें काय ? नीट सांग काय तें .
मैत्रे० : नीट सांगूं ? वसंतसेना तुला भेटायला येत आहे.
चारु० : उगीच चेष्टा करितोस वाटतें माझी ?
मैत्रे० : खोटें वाटत असेल तर या कुंभलकास विचारुन पहा.
चारु० : खरेंच काय रे कुंभीलका , वसंतसेना येत आहे ?
कुंभी० : होय महाराज; अगदीं निघाल्या आहेत आणि हेंच कळवायला त्यांनी मला पुढें पाठविलें आहे.
चारु० : शाबास ! तूं मला आनंदाचें वर्तमान सांगितलेस याकरितां हें बक्षिस .
( शेला देतो. )
कुंभी० : ( शेला घेऊन मुजरा करुन निघून जातो. )
मैत्रे० : मित्रा, ही इतक्या अंधारातूंन कां येत आहे समजलास ? तूं दिलेली रत्नमाला हलक्या मोलाची आणि तिचे दागिने बहुमोलाचे म्हणून आणखी काहीं मागायला येत आहे.
चारु० : अरे , येऊं दे . आली तर संतुष्ट होऊन जाईल . अरें , पण ही पहा पावसाची सर अगदी अंगावर आली ; तर ही सरेपर्यत आपण आतल्या चौकांत तिची वाट पहात बसूं चल.
( वसंतसेना , तिचा विट व एक दासी प्रवेश करितात. )
विट० :
पद- ( चाल - आम्हीं काशीचे ब्राह्मण )
जरि नाहिं कमल तें करीं , तरिहि सुंदरी, दिसे दुसरी , कामुका इंदिरा खरी ॥१॥
ही कामाची तलवार, करिल ज्या वार , ठार तो समजा, नवमदनमंजिरी उमजा ॥२॥
मानी कुलकामिनी , सहज ही बघुनि , मूर्ति नयनीं , झुरणीस लागती मनीं ॥३॥
ऐसी लीलावती, कराया रती, प्रियासह ती, चालली नटुन गजगती ॥४॥
-- आर्ये वसंतसेने , पाहिलास का हा चमत्कार ?
पद -- (  " पंचतुंड नररुंड " या चाली० )
पंकें भरली वदनें ज्यांचीं ऐसे दर्दुर जल पीती
केकावति मदभरें शिखंडी सुप्रसन्न हे तरु दिसती ॥१॥
साधुनराला दुर्जन ऐसे लोपविती घन चंद्रला ॥
कुलटेसम ही एके ठायीं नच राहे चंचल चपला॥२॥
वसंत० : विटा ,तूं म्हणतोस तें खरें आहे; तसेंच हे मेघ गर्जना करितात , हें ऐकून मला वाटतें कीं , ही रात्रच माझ्याशीं मोठ्या रागान भांडायला येत आहे.
विट : असें कशावरुन म्हणतेस ? तिचा तुझा काहीं सवतीमत्सर आहे कीं काय ?
वसंत० : अरे हो ; सवतीमत्सर नाहींतर काय ? ती मला असें म्हणत असेल -
पद -- ( येतें आलें थांब मी जलदी. )
किती कपटी अससि तूं सवती ! ॥
रतिरंग मन दंगचि असतां , आलिस कशि एकांतीं ? ॥धृ०॥
लग्नपयोधर शशिकांता मी नाहीं कशी तुज भीति ? ॥२॥
ऐसे गजुनि कुपित निशा ही , रोधितसे कीं माझे गति ॥३॥
विट : तर मग या रात्रीची निंदाच केली पाहिजे .
वसंत० : अरे , निंदा करुन काय फळ ? स्त्रीजातीच्या स्वभावच असा. तुला मी एक सांगतें -
साकी
मेघांनी बहु वर्षुनि गर्जुनि अशनिपात जरि केला ॥
मानिति नच त्या प्रियाकडे ज्या निघति जावया बाला --
विट : आर्ये , वसंतसेने , हा पाहिलास का दुसरा चमत्कार -
पद -- ( चाल -- लग्नाला जातो मी. )
नोहे हा पवन जवन वारु भासतो ॥
जलधारा शरभारचि काय वर्षतो ॥धृ॥
गर्जत घनभेरि महा ॥
चपलाध्वज झळकत हा ॥
हरुनि मेघभूप पहा ॥
नेतो शशिकरसमुहा ॥
जेविं सबल नृप
परकरभार नेत तो ॥१॥
वसंत० : अरे विटा , या दुष्ट मेघांचें नीच कर्म पाहिलेंस कां ?
विट : तें कोणतें ?
वसंत० :
पद -- ( चाल -- अरसिक किती हा शेला. )
अवचित या मेघांनीं ॥ शशिकांति चोरिली संधी साधुनि ॥धृ०॥
भर्ता निर्बल मानुनि ॥ न्यावी त्याची स्त्री बहुतांनीं ॥
तैसे या मेघांनी ॥
शशिकांति चोरिली संधी साधुनी ॥१॥
विट० : तसेंच या दुष्ट मेघांच्या योगानें या दाही देखील पहा कशा निस्तेज दिसतात त्या  !
वसंत० : ( मेघांकडे पाहून )
पद - ( चाल -- रामकरी जरि नृपपद गेलें )
निर्लज्जा मी प्रियसदनाला ॥ जातां भिवविसि कां तूं मजला ? ॥
लावूनि जलधाराकर तनुला ॥ स्पर्श कसा करिसी ? ॥१॥
-- (ऐकत नाहीं असें पाहून ) मेघा ! -
आरड सोडीं बहु जलधारा ॥ पाड विजा कीं वर्षी गारा ॥
स्त्रिया निधति ज्या रमणमंदिरा भीति न त्या तुजला ॥२॥
-- बाई चपले --
अंजनीगीत
कठिण असे गे मन पुरुषांचे ॥ करुणा नाहीं हॄदयीं त्याचे ॥
परि तूं स्त्री मग या अबलेंचें ॥
दु:ख न जाणसि कां ? ॥१॥
विट : आर्ये वसंतसेने , तूं या विजेची निंदा करितेस हें ठीक नाही. हिचा तुझ्यावर केवढा उपकार आहे पाहिलास ? -
साकी
मधुनि मधुनि ही चमके ऐशी गगनीं म्हणुनिच दिसतो ॥
गाढतमीं या प्रियसदनाचा स्पष्टचि मार्ग तुला तो ।
निंदसि कां तीतें ? ॥ स्मरसि न कां या उपकृतितें ? ॥१॥
वसंत० : ( काहीं पुढे जाऊन पाहून ) विटा , आर्य चारुदत्ताचा वाडा हाच काय ?
विट : होय, हाच . आर्ये वसंतसेने ; तूं सकलकलाभिज्ञ आहेस ; चतुर आहेस, तेव्हां मी तुला उपदेश करावा असें नाही ; परंतू स्नेहास्तव राहवत नाही म्हणून सांगतो कीं , त्या चारुदत्ताची आणि तुझी गांठ पड्ल्यावर त्याच्यावर अत्यंत कोप करु नकोस. कारण -
दिंडी
फार कोपें रतिसौख्य होत नाहीं ॥
कोप नसतां काम तो विरस होई ॥
स्वल्प कोपूनि कोपवी अल्प त्यातें ॥
तुष्ट होउनि तोषवी स्वप्रियातें ॥१॥
वसंत० : बरें , मीं आलें आहें म्हणून त्या श्रेष्ठ चारुदत्ताला कळीव.
विट : ठीक आहे. ( चारुदत्ताजवळ जाऊन ) महारज,
पद -- ( चाल -- माझें हृदय पोळत. )
बहु नीपतरु फुलुनि डुलति हे कदंबही तयापरी ॥धृ०॥
जलदाकुल गगन अशा समयीं सुंदरी ॥
स्मरशहरत मुदितमना येत मंदिरीं ॥
मेघजलें आर्द्रवसनकेशही शिरीं ॥
विद्युदघनघोररवें फार घाबरीं ॥
ती कर्दममय चरण धूत राहिलिसे व्दारीं ॥१॥
चारु० : ( मैत्रेयास ) मित्रा , कोण आली आहे पाहून ये.
मैत्रे० : ( वसंतसेनेकडे जाऊन ) कोण , तूं का ? ये .
वसंत० : आर्या, मी नमस्कार करतें .
मैत्रे० : तुझें कल्याण असो !
वसंत० : ( विटास ) ही छ्त्रधारिका चेटी हवी तर परत जातांना उपयोगी पडेल.
विट : असो. ( मनांत ) या युक्तीनें हिनें हिला व मला परत जायला सुचविलें. ( उघड ) वसंतसेने, मी जातों , पण इतकें लक्षांत ठेव --
पद -- ( चाल -- अस्तमान झाला. )
कपटानृतभूमी ॥ मायादंभ गेह नामी ॥धृ०॥
केवळ रतिकेलीचें मंदिर ॥ सुरतोत्सवसौख्याचें आगर ॥
ऐसी गणिकातनु ही सुंदर ॥ म्हणुनि कामहोमीं ॥
चतुरे, तोषवि तो कामी ॥१॥
वसंत० : आर्या मैत्रेया , तुमचा द्युतकार कोठें आहे ?
मैत्रे० : ( मनांत ) वाहवा ! द्युतकार म्हणून माझ्या मित्राला हिनें मोठाच मान दिला ! ( उघड ) अगे, तो शुष्कवृक्षवाटिकेंत बसला आहे.
वसंत० : तुमची शुष्कवृक्षवाटिका ती कोणती ?
मैत्रे० : अगे , जेथें कोणी खात नाहीं , पीत नाहीं , ते शुष्कवृक्षवाटिकाच .
वसंत० : ( हंसत ) असें का ?
मैत्रे० : तूं आत जा .
वसंत० : ( चेटीस ) अगे , पण मी आंत जाऊन बोलूं काय बाई ?
चेटी : ताईसाहेब,इतकेंच बोला कीं ,अहो द्युतकार ! हा प्रदोशसमय
तुम्हाला शुभ आहे ना ?
वसंत० : असें कसें बोलवेल बाई माझ्याच्यानें ?
चेटी : मुद्दाम नको बोलायला. त्यांच्यापुढें गेलांत म्हणजे आपोआप येईल तोंडातून.
मैत्रे० : हं , वसंतसेने, चल आंत.
वसंत० : (आत जाऊन चारुदत्ताच्या अंगावर फुलें फेकून ) का द्युतकार हा प्रदोषसमय तुम्हालां सुखावह आहे ना ?
चारु० : ( तिच्याकडे पाहून उठून ) काय वसंतसेना आली ? वसंतसेने ! -
साकी
प्रदोष माझा आजवरी तो जागरीच कीं गेला ॥
विरह्श्वास सोडित सखये, निशाकाल दवडीला ॥
गांठ तुझी पड्तां ॥ होइल आतां सुखदाता ॥१॥
-- प्रिये, या आसनावर बैस.
मैत्रे० : हो हो ; तुझ्याकरितां हा गालिचा मुद्दाम घातला आहे. बैस यावर.
( सर्व बसतात. )
चारु० : मित्रा मैत्रेया -
दिंडी
श्रवणिं सखिच्या कादंब कुसुम पाहे ॥
स्तनांवरि तें जलबिंदु ढाळिताहे ॥
मला वाटे युवराजपदीं हातें ॥
भूपतनया अभिषेक जणूं करीतें ॥१॥
-- मित्रा , हिची दोन्हीं वस्त्रे अगदी भिजून गेली आहेत. तर हिला दुसरी कोरडीं आणून दें .
मैत्रे० : ( कुरकुरत ) हो आणतो.
चेटि : भटजी , बसा तुम्ही , मी देतें आणून .
मैत्रे० : ( एकीकडे ) मित्रा, माझ्या मनांत हिला काही विचारायचे आहे ; विचारु काय रे ?
चारु० : हो हो खुशाल विचार.
मैत्रे० : काय ग वसंतसेने, तूं अशा पावसांतून , काळोखातून इकडे गे कोणीकडे आलीस ?
चेटी : ताईसाहेब , हा ब्राह्मण अगदी भोळा दिसतो. मी याला उत्तर देतें .
वसंत० : अगे , भोळा बरें असेल ! पक्का शहाणा आहे तो.
चेटी : अहो भटजीबुवा , तुम्ही आणून दिलेल्या रत्नमालेचं मोल काय, म्हणून त्या विचारायला आल्या आहेत.
मैत्रे० : ( एकीकडे ) तरी मीं याला मघाशी सांगितलें कीं , तूं दिलेल्या रत्नमालेने संतुष्ट न होता दुसरें काही मागायला येत आहे. ( चेटीस ) तुला रत्नमालेचे मोल घेऊन काय करायचें आहे गे ?
चेटी : तसें नव्हें , तुम्हीं जी रत्नमाला आणून दिलीत, ती आपली असें समजून ताईसाहेबांनी द्युतात गमावली व ज्यानें जिंकली त्याचा कोठे ठिकाणा नाही.
मैत्रे० : उं : ! ही आमचीच कल्पना , उष्टी ! उष्टी !
चेटी : तेव्हां त्या द्युतकाराचा ठिकाणा लागेपर्यत हे दागिने तुमच्याजवळ असूं द्या . ( अलंकार दाखविते ; मैत्रेय ते पाहून विचार करितो. ) कां , फारशी दृष्टी लावून पहातां ? हे दागिने तुमच्या ओळखीचे आहेत वाटतें ?
मैत्रे० : नाहीं , आपलें उगीच . कारागिराची कुशलता पाहून माझी दृष्टी तिकडे लागली.
चेटी : तर मग तुमच्या दृष्टीनें तुम्हाला फसविलें म्हणायचें . अहो , ताई -साहेबांनी तुमच्यापाशीं जे ठेवायला दिले होते तेच हे अलंकार.
मैत्रे० : मित्रा, आमच्या घरुन चोरीला गेलेले तेच हे अलंकार.
चारु० : काय ? तेच हे ? तर मग आमचीं बोटें आमच्याच डोळ्यांत गेली म्हणायचीं . असो. पण ही एक आनंदाची गोष्ट समजली पाहिजे.
मैत्रे० : हे अलंकार तुम्हाला कोठून मिळाले असें हिला विचारुं का ?
चारु० : हो हो; काय चिंता आहे ?
मैत्रे० : ( चेटीस ) हं ? हं ?
चेटी : ( मैत्रेयाचे कानाशीं ) असें असें .
चारु० : अरे , असे कानांत काय कुजबुजतां ?  मी कोणी परका आहे की काय ?
मला कळूं द्या काय तें .
मैत्रे० : अरे, ही ( जवळ जाऊन कानाशी लागून ) असे सांगते;
विचार हवे तर .
चारु० : खरेंच काय गे ते अलंकार ?
मैत्रे० : मित्रा आतां कसला संशय ? तेच हे.
चारु० : मी कोणाचे प्रिय वचन कधी निष्फळ केले नाही . येवढ्याकरितां ही घे आंगठी. ( आंगठी काढावयास जातो पण नाही असें पाहून लज्जित होतो. )
वसंत० : ( मनांत ) यासाठीच तुझ्या संगतीची इच्छा करावी ती !
चारु० : ( एकीकडे वळून खेदानें ) शिव शिव् ! काय दु:ख हें --
पद-- ( राग कानडा , त्रिताल )
धनहीन पुरुष जो होई ॥
काय जंगीं या जीवित त्याचे रोष तोषही निष्फळ जाई ॥धृ०॥
दंतावांचुनि भुजंग लोकीं ॥ विपक्ष खग वा शुष्क तरुच कीं ॥
नाही जलाचा लव ज्या टाकीं ॥ कोण तया पाही ॥१॥
--तस्मात मित्राम व्यर्थ रे आमचे जिणें ! कारण संतोषकाळीदेखील ही निर्धनता आडावी येते.
मैत्रे० : मित्रा, उगीच जिवाला संताप करुन घेऊ नकोस. तुझ्याकडे काय दोष आहे. ( हसून ) पण काय गे ! ज्यांत हे दागिने बांधले होते, तो माझा पडदणीचा जुना पंचा कोठे आहे ?
वसंत० : आर्या ,रत्नमालेची या जनाची तुलना करणे आपल्याला बरें कसे वाटले ?
चारु० : वसंतसेने , असें जर न करावें तर कसें करावें ? कारण तूंच पहा कीं --
साकी
भूतार्थावरि पौरजनांची श्रध्दा बसेल कैसी ॥
संशय माझा येईल त्यांना निंदितील कीं मजसी ॥
म्हणूनि असें केलें ॥ तुजला विपरित कां गमलें ॥१॥
मैत्रे० : काय गे वसंतसेने , तूं आज येथेच निजणार वाटतें ?
चेटी : अहो, भटजीमहाराज , आपल्याला एवढी रिकामी उठाठेव कोणी सांगितली आहे ?
मैत्रे० : नाही गे , आपलें सहज विचारलें . पण मित्रा , पाहिलेंस कारे , आम्ही येथे सुखाने बसलो आहो हें पाहवेना म्हणून आम्हांला उठविण्यासाठी जसा काय हा पर्जन्य जलधारा सोडित पुन: आला .
चारु० : मित्रा , हा पहा चमत्कार ! -
पद -- ( झंपा , प्रबंध )
जशी सज्जनांची मनें असति बहू विमल ती , तेविं घन वर्षति सुनिर्मल जलें ॥
जिष्णुकरशरततींसमचि धारा गळति ॥
कर्कश ध्वनि करिति वेगामुळें ॥
चंडवातें किती बिंदु भूवरि पडति ।
शक्रकोशांतलिंच मुक्तफळें ॥१॥
--अहाहा ! प्रिये वसंतसेने , हा पाहिलास का चमत्कार ! --
पद -- ( वसंत , बहार , त्रिताल )
जलधरसंधें नभ भरलें तें ॥ वासित झालें सौरभवातें ॥धृ०॥
कांता जैसी प्रियतम पतिला । आलिंगन दे . तशि ही चपला ॥
धावूनि वेगें या मेघाला ॥ प्रेमें आलिंगन बघ देते ॥
( वसंतसेना शृंगारभावाने अभिप्राय समजून चारुदत्ताला आलिंगन देते. चारुदत्तहि स्पर्शसुखाचा आनंद दाखवून तिला आलिंगन म्हणतो. )
साकी
मेघा अति गंभीर रवानें करीं गर्जना आतां ॥
स्पर्शे रोमांचित मी झालों आलिंगी मज कांता ॥
मन्यथ संचरला ॥ कदंबसुमता ये तनुला ॥१॥
मैत्रे० : अरे दुष्टा दुर्दिना , या मेघगर्जनेनें आणि विद्युतलतेच्या स्फुरणाने हिला भिववितोस हें चांगले करीत नाहीस .
चारु० : छे - छे , मित्रा , या दुर्दिनाची निंदा करु नकोस  . याचा माझ्यावर मोठा उपकार आहे. कारण याच्या योगाने माझ्या प्रियेनें मला आलिंगन दिलें . अहाहा मित्रा --
पद -- ( राग मालकंस , त्रिताल )
तेचि पुरुष दैवाचे ॥ धन्य धन्य जगिं साचे ॥ धृ०॥
अंगें भिजलीं जलधारांनी ॥ ऐशा ललना स्वयें येऊनी ॥
देती आलिंगन ज्यां धावूनि ॥ थोर भाग्य त्यांचे ॥१॥
अंक चवथा समाप्त

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:25:09.3030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पंच वृत्ति

  • कृदवृत्ति, 
  • तद्धीतवृत्ति, 
  • समासवृत्ति, 
  • एकशेषवृत्ति, 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.