अंक दुसरा - प्रवेश दुसरा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


( चेटी प्रवेश करिते. )
चेटी : आईसाहेबांनी मला काही निरोप सांगायला पाठविले आहे, पण ताईसाहेब रोजच्या जागेवर दिसत नाहीत. मग काय आज उठायला उशीर झाला कीं काय कोण जाणें .( पुढे पाहून ) ह्या आल्याच वाटते. तर आपण आतां बाजूला व्हावे.
( वसंतसेना आपल्याशीं कांही विचार करीत येते व तिची दासी मदनिका मागून येते. )
वसंत० :
पद : ( चाल - उभि जवळ खरी ती. )
त्या मदनमनोरमरुपीं , मन माझें गुंतुनि गेलें ॥
कधिं वाहिन काया त्यासी , प्रेमें ही ऐसें झालें ॥
दिवस तो पूर्ण सौख्याचा , येईल मज कवण्या काळें !
॥चाल॥
गुणरुपचिंतनीं पाही ॥ झोंप मज नाहीं ॥
शयनिं मी निजलें ॥ किती तरंग ह्र्दयीं उठलें ॥१॥
बरें मदनिके , मग पुढें काय झालें ?
मद० : हें काय बाई ! पूर्वी कांहीच भाषण झाले नसून ’पुढे काय झालें ’ म्हणून विचारतां हें काय ?
वसंत० : अं, मीं काय म्हटलें गे ?
मद० : ’ पुढें काय झालें ’ म्हणून .
वसंत० : असें काय ? (  चेटी जवळ येते. )
चेटी : ताईसाहेब आईसाहेबांनी सांगितले आहे कीं , लवकर अंग धुऊन तेवढी देवांची पूजा करा.
वसंत० : अगे , आईला सांग कीं , मी इतक्यात अंग धूत नाही ; ब्राह्मणाकडूनच पूजा करीव म्हणावें .
चेटी : आज्ञा ताईसाहेब. ( निघून जाते. )
मद० : ताईसाहेब , मी अगदीं स्नेहभावाने विचारतें हो , कुढ्या भावाने काही नाही . खरेच सांगा , तुम्ही मघाशीं जें बोललां त्याचा अर्थ काय ?
वसंत० : तुला कसें वाटतें ?
मद० : मला वाट्तें कीं , तुमचें चित्त कालपासून जाग्यावर नाहीं ; कोणी उत्तम पुरुष मनांत आणून त्याचें चिंतन करीत आहां असें दिसतें .
वसंत० : ( हंसून ) तरी म्हट्लें तूं मदनिका ! दुसर्‍याचे मनोगत जाणण्यात मोठी कुशल खरी.
मद० : ताईसाहेब , हें तुमचें करणें खरोखर मला आवडलें ; कारण भगवान कामदेव हा तरुण जनांचा मूर्तिमान आनंदच आहे. तर सांग पाहूं , तुमचे मन कोणावर गेलें आहे ? कोण राजावर कां राजवल्लभावर ?
वसंत० : काय , राजावर ? माझें नाहीं बाई मन त्यावर जायचें .
मद० : तें काय बरें ताईसाहेब ? ऐश्चर्यसुख भोगणारे राजे ते .
वसंत० :
पद-- ( चाल -- गुलचमनमे बीचू. )
भूपती खरे ते वैभवसुख सेवीती ॥
बहु दास सेवनीं दक्ष सदा रहाती ॥
अधिकारबळानें राज्यसूत्र चाळिती ॥
त्यां प्रज्ञा सकळ सन्मान थोर तो देती ॥चाल॥
म्हणूनि कां त्यांसि सेवावें , सांग तूं ॥
धनचि कां अधिक मानावें , सांग तूं ॥
गुण त्यांचे कां न बघावे, सांग तूं ॥चाल॥
संपत्तिबळाच्या मदें धुंद ते होती ॥
स्वच्छंद वागती नाहीं तया नयरीती ॥१॥
-- आणि त्यांच्याच माळेंतले ते राजवल्लभ !
मद० : राजा नाहीं , राजवल्लभ नाहीं ; तर कोणी गुणवान् रुपवान तरुण वेदभ्यासी असा ब्राह्मण का ?
वसंत० : छे ग ! भलतेच बोललीस, कारण -
पद - ( चाल - नंदगृहाच्या जवळ मुलीनो. )
वेदभ्यासी ब्राह्मण सारे देवचि भूवरिचे असती ॥धृ०॥
अमुच्या करीं जी पापें घडतीं ॥
तेचि तयांचे निरसन करिती ॥
म्हणूनि सुभावें सादर चित्तीं ॥
धनदानें द्यावीं , तयां तीं ॥१॥
मद० : तर कोण एखाद्या धनाड्य व्यापाराचा मुलगा का ?
वसंत० : छे - छे !
पद-- ( चाल--कानडी. )
योग्य न वणिज युवाही , न्युन नसें जरि अंगीं काहीं ॥धृ०॥
कांता प्रिय जी सुंदर तरुणी, लोटुनि तिस विरहानालिं गेहीं ॥
जाई सदा तो विपुल धनाच्या आशेने परदेशा पाह॥१॥
मद० : तर मग माझा नाही बाई तर्क चालत. तुम्हीच सांगा.
वसंत० : अगे, दुसरा कोण ? -
पद -- ( चाल -- जो मम नयनचकोरा इंदू. )
जो या नगरा भुषण खरा ॥ जैसा भाळीं शोभे हिरा ॥
ज्याच्या सदगुणगानीं गिरा ॥ रंगली सुजनांची ॥१॥
निर्धन असतां धनदापरी ॥ औदार्यातें अंगी धरी ॥
दुदैवानें छळिलें तरी ॥ शील न सोडी जो ॥२॥
करि जो दिनावरतीं दया ॥ लोकीं वागे पाहूनि नया ॥
वाहिली ही मी काया तया ॥ निर्मळ भावानें ॥३॥
मद० : पण कोण तो ? नावं कां सांग ना त्याचें
वसंत० : अगे , मी कामदेवाच्या उत्सवासाठीं गेलें होतें , त्या वेळेत तूंच ना
होतीस माझ्याबरोबर ?
मद० : होय , मीच होतें , मग ?
वसंत० : मग मला काय नवरीसारखें विचारतेस ? तुला नाहीं का आठवण ?
मद० : हं - हं ! समजलें . त्या दिवशी तुम्हीं ज्याची प्रार्थना केलीत आणि ज्यानी तुम्हाला वचन दिले तोच ना ?
वसंत० : होय , तोच . पण त्याचें नांव सांग पाहूं !
मद० : तो - मोतीचौकांत राहतो तो .
वसंत० : अगे, मी तुला त्याचें नाव विचारले - ठिकाण नाहीं विचारल.
मद० : अहो, जो सार्‍या नगरींत प्रख्यात , त्याचे नाव का मला ठाऊक नसेल ?
वसंत० : सांग तर.
मद० : श्रेष्ठ चारुदत्त , होय ना ?
वसंत : ( लाजून हर्षानें ) शाबास , बरोबर सांगितलेस. तूं मोठी चतुर खरी.
मद० : ( मनांत ) त्या पुरुषावर का हिनें मन ठेविलें ? ( उघड ) पण ताईसाहेब -
ठुंबरी -- ( चाल -- रुमक झुमक जोबाना. )
कुसुमसमय संपतां तरुचा । मधूकरि करि कां आश्रय त्याचा ॥धृ०॥
प्रियजन तुमचा निर्धन झाला ॥ काय असे तो कामाचा ॥१॥
पद -- ( चाल -- युवराज शिवाजी सुखी. )
वसंत० :
धनहीन असा होय सखे म्हणुनि त्यावरी ॥
जड्लें मम मानस हें जाण झडकरी ॥धृ० ॥
मजसम ज्या असति जगीं वारयोषिता ॥
त्यांनि सधन पुरुष बघुनि त्यासि सेवितां ॥
लोभी हें दूषण जन देति तत्त्वतां ॥
होइल तें सहज कसें सांग अंतरीं ॥१॥
मद० : इतके जर तुमचें मन त्याच्यावर गेलें आहे, तर चटकन् उठून त्याच्याकडे तुम्ही जात कां नाहीं ?
वसंत० : अगें , कां जात नाहीं हे तुला काय सांगूं ?
पद-- ( चाल - वस्त्रानें देह सारा. )
जरि सदना जाउनीयां त्याला मी भेटलें ॥
उपकृतिचें त्यासी आतां बळ नच गे राहिलें ॥
लज्जेनें दु:ख त्याच्या जरि चित्ता वाटलें ॥
दुर्लभ तें समज बाई दर्शन कीं जाहलें ॥१॥
मद० : अस्सं - अस्सं ! म्हणूनच वाटतें त्याच्या घरी अलंका ठेवलेत ?
वसंत० : मदनिके, बर गे तुझ्या लक्षातं आले हें ? तूं तरी मोठी धोरणी खरी !
( घाबर्‍या घाबर्‍या संवाहक येतो )
संवा० : नायकिणी , तुला मी शरण आलो, माझे रक्षण कर .
वसंत० : शरणागताला अभय आहे ; भिऊं नकोस . मदनिके, तेवढा दरवाजा लाव.
संवा० : ( मनांत ) सावकाराचे भय कसें असतें हें हिला ठाऊक आहे, ही एक फार चांगली गोष्ट झाली . जो आपली शक्ती पाहून ओझें घेतो तो चालतानां कधीहि अडखळत नाही.
( मदनिका दरवाजा लावून आल्यावर वसंतसेना तिला संवाहकाचा वृत्तांत विचार अशी खूण करितें )
मद० : तुम्ही कोण , कोठले, कोणाचे , तुम्ही आपली उपजीविका कशाने करतां ;
तसेच तुम्हाला भय कोणाचें आहे ; हे कृपा करुन सांगावें , अशी आमच्या ताईसाहेबांची इच्छा आहे.
संवा० : ऐका , सर्व सांगतो. पाटलिपुत्र नगरांत माझा जन्म ! माझ्या बापाचें नाव गृहपति. मी संवाहकाची वृत्ती करुन पोट भरतो.
वसंत० : आपण ही फार नाजूक कला शिकला आहां !
संवा० : अहो, पहिल्यानें ही सहज कला म्हणून शिकलो, परंतू आतां तीच कला माझ्या उपजीविकेचे साधन होऊन बसली आहे.
मद० : आपण हें फार खेदाचे उत्तर दिलें . बरें पुढें ?
संवा० : मी आपल्या घरीं असतां यात्रेकरु लोकांच्या तोंडून देशोदेशीच्या चमत्कारिक गोष्टी ऐकून देश पाहण्याच्या इच्छेनें घर सोड्लें . या उज्जयिनी नगरांत येतांच मला एक यजमान मिळाला. त्याची शुश्रूषा मी बरेंच दिवस केली . तो पुरुष फार गुणी, देखणा तसाच , गोड बोलणारा तसाच ; आपण  केलेला उपकार कधीहि उच्चारीत नाहीं आणि दुसर्‍याने केलेला अपकार कधी मनांत ठेवीत नाही. फार काय सांगावे , " हा माझा देह परोपकारार्थ झिजवण्याकरितां परमेश्चरानें दिला आहे " असें तो नेहमी म्हणत असतो.
मद० : ( वसंतसेनेस ) बाईसाहेब, तुमचा जो मूर्तीमंत मनोरथ , त्याचे गुण चोरुन , उज्जयिनी नगराला शोभा देणारा असा हा दुसरा कोण असावा बरें ?
वसंत० : माझ्या मनांत हेंच आले होतें ; पण पुढे काय सांगतो पाहू.
मद० : ( संवाहकास ) बरे , मग पुढे काय झाले ?
संवा० : बाईसाहेब , पुढे काय सांगू ? तो सत्पुरुष दुसर्‍यावर उपकार करण्याच्या कामीं आपल्या धनाचा व्यय् करितां करितां --
वसंत० : काय निर्धन झाला म्हणतां ?
संवा० : हें मी न सांगतां तुम्ही कसें ताडलें हो ?
वसंत० : अहो, त्यात काय कठीण ? सदगुण आणि वैभव ही फार दिवस एके ठिकाणी रहात नाहीत . नासक्या तळ्यांतच पाणी पुष्कळ असते.
मद० : अहो, त्या पुरुषाचे नाव काय बरें ?
संवा० : अहो , जो या पृथ्वीवरचा केवळ मनुष्यरुपी चंद्रच , अशा त्या सत्पुरुषाचे नांव कोणाला माहीत नाहीं ? तो मोतीचौकांत राहणारा श्रेष्ठ चारुदत्त .
वसंत० : ( हर्ष पावून बैठकीवरुन खाली उतरतें ) महाराज हे आपले घर आहे. मदनिके, जा यांना बसायला गालिचा आणून घाल आणि हातांत ताडाचा
पंखा घेऊन यांना वारा घालीत उभी रहा. हे फार श्रमलेले दिसतात.
( मदनिका तसे करितें . )
संवा० : ( मनांत ) काय हो आश्चर्य हें ! त्या श्रेष्ठ चारुदत्ताचे नाव घेताच
माझा केवढा सत्कार झाला ! शाबास चारुदत्ता , धन्य आहे तुझी ! पृथ्वीच्या पाठीवर जिवंत असा तूंच ; बाकीचे सर्व श्वास मात्र सोडणारे आहेत ! असो .
नायकिणी , तुहि बैस.
वसंत० : ( बसून ) हे श्रेष्ठा , तुमचा धनीं कोठें आहे आणि त्याच्याजवळ धन
कोणतें आहे ?
संवा० : आतां त्याच्यापाशी द्रव्य म्हणाल तर सत्कारावांचून काहीं नाही.
वसंत० : बरें , पुढे तुझी हकीगत सांग पाहूं .
संवा० : पुढें काय ! तो निर्धन झाला तेव्हा मी त्याला सोडिलें आणि द्युतकामात शिरलो. परंतू त्यातहि माझे नशिब फिरलें आणि द्युतात मी दहा मोहरा हरलो. त्या मोहरा द्यायला मजपाशीं नाहीत म्हणून द्युतकार मंडळीने फार हाल केले , तेव्हा पळत पळत तुमच्या घरांत शिरलो.
वसंत० : पाहिलेस मदनिके ! वृक्ष फलपत्रांनी रहित झाला म्हणजे त्यावर राहणारे पक्षी चहूकडे उडून जातात , तशी त्याची अवस्था झाली आहे. तें
असो ; तूं आतां हे कंकण घॆऊन त्या द्युतकारांकडे जा आणि सांग कीं , हें कंकण संवाहकानें दिलें आहे, तर हें घेऊन पुन्हां त्याला त्रास देऊ नयें . ( संवाहकास )
श्रेष्ठा , आतां खुशाल आपल्या मनुष्यांना भेटायला जा.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP