पंचम पटल - प्रतीकोपासनाकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


आता प्रतीकोपासना कशी करतात ते कथन करतात. प्रतीक उपासना ही दृष्ट व अदृष्ट फ़ल देणारी आहे आणि प्रतीकाच्या केवळ दर्शनाने साधक पवित्र होतो यात काहीही संशय नाही.

कडक उन्हात उभे राहून साधकाने आपले नेत्र विस्फ़ारित म्हणजे स्थिर करून स्वईस्वराचे प्रतिम्बिब म्हणजे आपण ईश्वररूपाने कसे प्रतिम्बिबित होतो ते आकाशात पाहावे. ज्यावेळी आपले प्रतिम्बिब आकाशात अर्थात् शून्यात दिसू लागेल त्यावेळी ते वर आकाशातही अवश्य दृष्टीस पडेल.

जो साधक आपल्या स्वत:चे प्रतिम्बिब रोज आकाशात पाहतो त्याच्या आयुष्याची वाढ होते व त्याचा कधीही मृत्यू होत नाही.

ज्यावेळी साधक आपले संपूर्ण प्रतिम्बिब आकाशात पाहील त्या वेळी सभेमध्ये त्याचा जप होईल व युद्धामध्ये तो शत्रूला जिंकील.( त्या वेळी त्याला सर्वत्र विजय मिळेल व वायूला जिंकून तो सर्वत्र संचार करील. )

जर साधक नेहमी प्रतीकोपासनेचा अभ्यास करील; तर त्याला आत्मप्राप्ती होईल आणि या स्वप्रतीकोपासनेच्या प्रसादाने त्याला पूर्णानन्दस्वरूप पुरुषाचे म्हणजे आत्म्याचे दर्शन होईल. याचे तात्पर्य असे आहे की, ज्या वेळी साधकाला आपल्या हृदयाकाशात म्हणजे आज्ञाचक्रात स्वस्वरूपानुभूती येते म्हणजे आत्मस्वरूपाचे दर्शन होते त्या वेळी आत्मस्वरूप परमज्योतीचा प्रकाश सर्वत्र पसरतो व साधकाला परमानन्दाचा अनुभव प्राप्त होतो.

यात्राकालात, विवाह समयी, शुभकर्मात, संकटकाली आणि पापक्षय व पुण्यवृद्धी होण्याच्या वेळी जर स्वप्रतीकोपासनेचे आचारण केले म्हणजे आपल्या स्वत:च्या प्रतिबिम्बाचे दर्शन घेतले; तर नेहमी श्रेयप्राप्ती अर्थात् कल्याण होते.

जर साधकाने प्रतीकोपासनेचा निरंतर अभ्यास केला; तर त्याला आपल्या हृदयाकाशात म्हणजे भ्रूमध्यातील आज्ञाचक्रात आपले प्रतिबिम्ब दिसू लागते. या अवस्थेच्या प्राप्तीमुळे निश्चयी साधकयोगी मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करतो.

दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान, दोन्ही तर्जनींनी दोन्ही नेत्र, दोन्ही मधल्या बोटांनी दोन्ही नाकपुड्या आणि दोन्ही अनामिकांनी व कनिष्ठिकांनी मुख दृढतापूर्वक बंद करावे. जर अशा प्रकारे साधकयोग्याने ( या षण्मुखीमुद्रेचा ) वारंवार अभ्यास केला; तर त्याला हृदयाकाशात ज्योतिस्वरूप आत्म्याचे दर्शन होते.

जो पुरुष अर्थात् साधकयोगी स्थिरचित्त होऊन एक क्षणमात्रभर आत्म्याचे हे परमतेज पाहतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो.

जो साधकयोगी चित्त शुद्ध ठेवून किंवा शुद्धचित्त होऊन हा षण्मुखीमुद्रेचा साधनाभ्यास निरंतर म्हणजे अखंड करील तो सर्व देहादि कर्मांपासून मुक्त किंवा पृथक् होऊन आत्म्याशी अभिन्न होईल म्हणजे आत्मस्वरूप होईल. याचा अर्थ असा की, अशा प्रकारच्या सतत अभ्यासामुळे साधकाला आत्मदर्शन झाल्यावर मीच आत्मा आहे असे ज्ञान होते. यामुळे आपण आत्म्यापासून भिन्न आहोत असे तो स्वत: मानीत नाही. हीच त्याची आत्म्याशेसे असणारी अभिन्नता प्राप्ती आहे.

जो साधक आपला अभ्यास गुप्त ठेवून सदासर्वदा साधनात तत्पर राहतो, तो जरी पापकर्मात रत असला तरी त्याला मुक्ती प्राप्त होते; ( कारण असे साधन करणार्‍या साधकाची पापे साधनामुळे भस्म होत असल्याने त्याला पापे स्पर्श करू शकत नाहीत. )

हे मत्प्रिय पार्वती ! ही षण्मुखीमुद्रायुक्त नादसाधना प्रयत्नपूर्वक गुप्त ठेविली पाहिजे. ही साधना तत्काल प्रयत्न किंवा फ़ल देणारी आहे. ही योगसाधनाच साधक लोकांना निर्वाण देणारी आहे. या योगसाधनेचा अभ्यास करणार्‍या साधकाला क्रमाक्रमाने म्हणजे जसजशी नाडीशुद्धी होत जाईल त्याप्रमाणे अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. ( या नादात साधकाचे मन लीन झाले की, लययोग सिद्ध होऊन साधकाला मोक्ष अर्थात् शिवसामरस्याची स्थिती प्राप्त होते. )

अशा प्रकारचा योगाभ्यास करीत राहिल्यावर प्रथम मत्त भुंगे, नंतर वेणू व त्यानंतर वीणा यांच्या नादासारखा नाद साधकाला ऐकू येतो. त्या नंतर संसाराचा अंधकार दूर करणार्‍या घण्टानादासारखा नाद किंवा ध्वनी साधकाला ऐकू येऊ लागतो. त्या नंतर मेघ गर्जनेसारखा नाद ऐकू येऊ लागतो. हे प्रिये पार्वती ! आतून उपस्थित होणार्‍या या नानाविध अनाहत नादात साधक जेव्हा मन लीन करीत राहील किंवा त्या नादाकडे सतत लक्ष ठेवील त्यावेळी त्याचे मन निश्चयपूर्वक स्थिर होईल. या स्थितीमुळे मोक्ष देणारा लय साधकाला प्राप्त होईल अर्थात् अंतिम शिवसामरस्य सिद्ध होईल.

जेव्हा साधकयोग्याचे चित्त अनाहत नादात रमून जाईल म्हणजे नादात मन स्थिर होऊन ते त्याच्याशी एकरूप होईल अर्थात् चित्त अन्यत्र चलित होणार नाही तेव्हा सर्व बाह्य गोष्टींचे अर्थात् सर्व विषयांचे विस्मरण होऊन चित्त नादातच म्हणजे समाधीत लय पावेल. याचा अर्थ असा की, ज्यावेळी चित्त नादात लय पावते त्यावेळी समाधी अवस्था सिद्ध होते.

अशा प्रकारे ( अनाहत नादात चित्त लीन करण्याच्या अभ्यासात तत्पर राहणारा अर्थात् नादात चित्तलयाचा अभ्यास करणारा योगी, या अभ्यासाच्या द्वारा सर्व गुणांवर विजय प्राप्त करून आणि सर्वकार्यांच्या आरंभाचा त्याग करून चिदाकाशात म्हणजे चैतन्यस्वरूप हृदयाकाशात अर्थात् आज्ञाचक्रावरील आकाशात लीन होतो.

हे देवी पार्वती ! सिद्धासनासारखे दुसरे कोणतेही आसन ( श्रेष्ठ म्हणजे सिद्धी देणारे ) नाही. कुंभकासारखे दुसरे कोणतेही बल नाही अर्थात् श्वासप्रश्वासाच्या गतीचा म्हणजे इडापिंगलेतून वाहणार्‍या प्राणांचा निरोध होऊन ते सुषुम्नेत प्रविष्ट झाल्यावर जी स्थिती प्राप्त होते ती केवलकुंभकाची स्थिती हेच महान् बल होय. बल म्हणजे कुण्डलिनी शक्तीची जागृती होय असे प्रत्यभिज्ञाहृदयात कथन केले आहे. खेचरीसारखे दुसरी मुद्रा नाही व अनाहतनादात चित्त लीन होण्यासारखा दुसरा लय म्हणजे समाधी अवस्था नाही.
==========

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP