TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

द्वितीय पटल - तत्त्वज्ञानोपदेश २

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


तत्त्वज्ञानोपदेश २
या सर्व ( प्रमुख चौदा ) नाड्यांपासून त्यांच्या शाखा व उपशाखा निघून क्रमश: साडेतीन लाख नाड्या आपापल्या स्थानी जाऊन स्थित झाल्या आहेत.

या सर्व ( साडे तीन लाख नाड्या ) भोगवहा आहेत म्हणजे भुक्त पदार्थांना त्या आपल्या रूपाने प्रवाहित करीत असतात. या सर्व नाड्या वायूच्या संचारात अत्यंत दक्ष असून त्या ओतप्रोत म्हणजे संयोग - वियोग या कार्याच्या रूपाने मनुष्य शरीरात व्याप्त किंवा विद्यमान आहेत.

बारा कलांनी युक्त असा सूर्यमंडलाच्या मध्यात जो अग्नी प्रज्वलित असतो त्याच्या द्वारा अन्नाचे पचन होते. हा वैश्वानर अग्नी माझ्या ( शिवाच्या ) तेजापासून उत्पन्न झाला आहे. हा अग्नी प्राण्यांच्या देहात राहून विविध प्रकारच्या अन्नांचे पचन - पाचन करण्यात तत्पर असतो.

हा वैश्वानर अग्नी आयुष्य वाढवितो. बल प्रदान करतो व शरीराला पुष्टी देतो. या अग्नीमुळेच शरीर कांतिमान होते. हा अग्नीच शरीरातील सर्व रोगांचा नाश करणारा अर्थात् आरोग्य प्रदान करणारा आहे.

या वैश्वानर अग्नीला विधीपूर्वक अर्थात् गुरुदीक्षापूर्वक प्रज्वलित करून नंतर त्यात अन्नाची आहुती दिली पाहिजे म्हणजे भोजन केले पाहिजे याचा अर्थ असा की, वैश्वानर अग्नीला म्हणजे कुंडलिनी शक्तीला प्रज्वलित करण्यासाठी म्हणजे जागृत करण्यासाठी शक्तिपात करणार्‍या अर्थात् शक्तिसंक्रमण करणार्‍या सद्गुरूंकडून योगदीक्षा घेतली पाहिजे. अशा रीतीने कुंडलिनी शक्तिस्वरूप अग्नी दररोज साधनाने प्रज्वलित होऊ लागला की, त्याला अनुकूल जे अन्न असेल त्याचेच साधकाने भोजन करावे.

या देहाला ब्रह्मांड असे नाव आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणे आहेत. येथे मी प्रधान प्रधान स्थाने सांगितली. शास्त्राध्ययनाने ही स्थाने ज्ञात होतात. या शरीरात विद्यमान असलेल्या स्थानांची अनेक नावे आहेत. ती सांगणे आम्हाला शक्य नाही किंवा ती कथन करण्यास आम्ही समर्थ नाही. अर्थात् आत्तापर्यंत जेवढे वर्णन केले तेच खूप आहे. यापेक्षा अधिक वर्णन करणे म्हणजे व्यर्थ परिश्रम करण्यासारखे आहे.

अशा प्रकारे कल्पित केलेल्या या देहात राहिलेला जीव अनादि कालापासून चालत आलेल्या वासनारूपी माळेत अर्थात् जाळ्यात गुरफ़टून जाऊन किंवा फ़िरत राहून कर्माच्या बेडीमध्ये अडकून पडतो.

हा जीव नाना प्रकारचे विविध गुण ग्रहण करीत संसारातील सर्व प्रकारचे व्यापार करतो. तो पूर्वार्जित अर्थात् मागील जन्मातील शुभाशुभ विविध कर्मांची फ़ले भोगतो. ॥४०॥
==
संसारात जी जी शुभाशुभ कर्मे दृष्टीस पडतात त्या सर्वांचे आदिकारण एकमात्र कर्मच आहे. सर्व प्राणी आपापल्या कर्मानुसार सुखदु:खांचे भोग भोगत असतात. अर्थात् प्राणी जे जे कर्म करतात त्याचे फ़ल त्यांना निश्चित भोगावे लागते.

जे जे सुखदु:ख देणारे काम - क्रोध - लोभ - मोह - मद व मत्सरादि दोष आहेत ते ते सर्व जीवाच्या कर्मानुसारच प्रवृत्त होत असतात. याचे तात्पर्य असे आहे की, मनुष्याला जे सुखदु:ख होते त्याचे मूळ कर्मच आहे. शुभ कर्मामुळे सुख व अशुभ कर्मामुळे दु:ख प्राप्त होते.

पुण्य कर्माच्या अनुष्ठानाने शरीरधारी जीवाला सुखाची प्राप्ती होते व पुण्याचे फ़ल म्हणून श्रेष्ठ प्रकारची भोजन सामुग्री किंवा विविध प्रकारच्या वस्तू त्याला स्वत:ला आपोआप मिळतात.

अशा प्रकारे हा जीव आपल्याच कर्माच्या बलाने सुख किंवा दु:ख भोगतो किंवा त्याला सुखदु:ख भोगणे क्रमप्राप्त होते. जेव्हा जीव पापकर्मात आसक्त होतो तेव्हा त्याला दु:खच प्राप्त होते किंवा भोगावे लागते अर्थात् त्याला सुखलाभ होत नाही, हे निश्चित आहे. याचे तात्पर्य असे की, पापकर्म करणार्‍या जीवाला दु:ख निश्चित भोगावे लागते. जरी त्याला सुख मिळाले; तरी ते क्षणिक असून ते सुखही पूर्वसंचित पुण्याचे फ़ल असते.

जीव आपल्या कर्मानुसार सुखदु:ख भोगतो. यामध्ये काहीही फ़रक पडू शकत नाही; कारण कर्माचे फ़ल सुख किंवा दु:ख आहे. अर्थात् कर्ता व भोक्ता यात काहीही भिन्नता नाही म्हणजे जो कर्ता आहे तोच भोक्ता आहे. जेव्हा चैतन्य आत्मा मायोपाधीने युक्त होतो तेव्हा ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते.

ज्या जीवाच्या भोगाकरिता जो काल निश्चित असतो, त्या कालातच आपल्या कर्मफ़लाचा भोग प्राप्त करण्यासाठी अर्थात् सुखदु:ख भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. ज्या प्रमाणे नेत्रदोषामुळे शिंपीवर चांदीचा आरोप केला जातो म्हणजे शिंपले हे चांदीच आहे असे भासते त्या प्रमाणेच आपल्या कर्मदोषाच्या प्रभावामुळे जीव ब्रह्मावर या मिथ्या संसार - प्रपंचाचा आरोप करतो म्हणजे ब्रह्म हा संसारच आहे असे त्याला भासते किंवा संसारामुळे त्याला ब्रह्माचे ज्ञान होत नाही.

जीवाला वासनेमुळेच किंवा वासनेच्या कारणामुळेच भ्रम उत्पन्न होतो. जोपर्यंत वासनेचे मूळ नाहीसे होत नाही तोपर्यंत भ्रम केव्हाही नष्ट होत नाही. या प्रमाणेच जेव्हा ज्ञान उत्पन्न होते तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही. यामुळे ज्ञानच मोक्षाचे साधन आहे. ( ज्ञान म्हणजे अंत:सुप्तशक्ती कुंडलिनीची जागृती होय. ज्ञान हे शक्तीच्या रूपानेच मूलाधारात निद्रिस्त असते. ज्यावेळी गुरुकृपेने अर्थात् शक्तिपाताने ही शक्ती जागृत होते त्यावेळी आतूनच ज्ञान उत्पन्न होते. यामुळे ज्ञानाला साधन म्हटले आहे. )

जे काही विशेष दृष्टीने साक्षात् दृष्टीस पडते ते प्रत्यक्ष भ्रमालाच कारण होते. अर्थात् विशेषरूपाने प्रत्यक्ष दिसणार्‍या दृश्यजालामध्येच जीव अडकून पडतो. हेच त्याच्या बंधनाचे कारण आहे. मायेच्या आवरणामुळे किंवा पडद्यामुळे बुद्धी दृश्य प्रपंच्याच्या वर जात नाही अर्थात् प्राण मणिपूर चक्राच्या वर सरकत नाहीत. मणिपूर चक्रापर्यन्तच वैष्णवी मायेचे आवरण असते. यामुळेच जीवाला यथार्थ ज्ञान होत नाही. याशिवाय याचे दुसरे कोणतेही कारण नाही. माझे हे म्हणणे अगदी नितांत सत्य आहे.

जोपर्यंत ब्रह्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष दृश्यमान पदार्थांचा भ्रम नष्ट होत नाही. जेव्हा आत्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो म्हणजे आत्मा स्वत: प्रकट होतो तेव्हाच ब्रह्म प्रत्यक्ष प्रकट होऊन संसारभ्रमाचा नाश होतो. आत्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाल्याशिवाय ब्रह्म संसारात नाही, हा भ्रम निवृत्त होत नाही. याचा अर्थ असा की, आत्मसाक्षात्काराशिवाय संसरभ्रमाची निवृत्ती होणे फ़ार कठीण आहे.

आत्म्याचे विशेष दर्शन झाल्यावरच संसारासंबंधीचे मिथ्या ज्ञान नाहीसे होते. ज्याप्रमाणे शिंपल्यावरील चांदीचा भ्रम किंवा शिंपले हे चांदी आहे हा भ्रम शिंपले प्रत्यक्ष हाती आल्याशिवाय जसा नाहीसा होत नाही त्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराशिवाय अन्य कोणत्याही उपायाने त्या अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. ॥५०॥
==
जोपर्यंत आत्म्याचे साक्षात्कारात्क ज्ञान होत नाही म्हणजे साक्षात्कार होऊन आत्मज्ञान करतलामलकवत् प्रत्यक्ष हाती येत नाही तोपर्यंत सर्व प्राणिमात्र, संसार आदि विविध प्रकारे दृष्टीस पडतात अर्थात् हे सर्व दृश्यजात खरे आहे असे वाटते.
आपल्याला प्राप्त झालेले जे कर्मार्जित शरीर आहे त्याच्या द्वारा निर्वाणाचे, मोक्षाचे किंवा आत्मज्ञानाचे साधन झाले; तरच शरीर धारण केल्याची अर्थात् जन्माची व स्थितीची सफ़लता आहे. अन्यथा सर्व व्यर्थ आहे. याचा अर्थ असा की, जोपर्यन्त शरीर आहे तोपर्यन्त आत्मज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे; कारण शरीर नाहीसे झाल्यावर कोणतेही साधन होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर; कर्मानुसार पुन्हा देह धारण करणे भाग पडते. यासाठी सद्गुरुकृपा प्राप्त करून घेऊन आत्मज्ञानात तप्तर होणेच श्रेयस्कर आहे. अन्यथा मनुष्य शरीराची प्राप्ती होऊनही शरीराचा व्यर्थ भार वाहण्यात लाभ कोणता ? सारांश ज्या मनुष्याने आत्मज्ञानप्राप्तीसाठी काही साधन केले नाही व जो विषय - भोगातच रमून गेला त्याचा जन्म म्हणजे मातेला दु:ख व पृथ्वीला भारच होय.

जीवाच्या ठिकाणी ज्या प्रकारची वासना राहते त्या प्रमाणेच वासनेला वश होऊन जीव शुभ किंवा अशुभ कर्मे करीत असतो; कारण या वासनेमुळेच जीवाचा जन्म व मृत्यू होत राहतो.

याकरिता जो योगीसाधक संसारसागर पार करून जाण्याची इच्छा करतो त्याने आपल्या वर्णाश्रमातील विहित कर्म फ़लरहित होऊन केले पाहिजे. अर्थात् मुमुक्षू साधकांनी निष्काम कर्म करणेच श्रेयस्कर आहे.

विषयासक्त पुरुष निरंतर विषय सुखाच्या इच्छेमध्ये व सुखातच बुडून राहतात. साधन किंवा मोक्ष यांसंबंधी चर्चा करण्याचाही अशा पुरुषांची वाणी तयार नसते अर्थात् अशा विषयासंबंधी त्यांचे सर्व विचार अवरुद्ध झालेले किंवा थांबलेले असतात. असे लोक पापकर्मातच रत झालेले असतात. याचे तात्पर्य असे आहे की, विषयासक्त पुरुषांची वाणी परमार्थाची चर्चा न करता विषयभोगांच्या चर्चेत गुंतलेली असते; कारण परमार्थाचई चर्चा करताना त्यांना खेद होतो. मात्र मन, कर्म व वचनाने त्यांना विषयसुख प्रिय असल्याने ते त्यातच सतत गुंतलेले असतात.

जेव्हा ज्ञानी पुरुष आत्म्याच्या द्वारा आत्म्याला पाहत असता अन्य कोणतीही वस्तू पाहत नाही अर्थात् आत्म्याच्या अतिरिक्त ज्ञानी पुरुषाला अन्य कोणतीही वस्तू दिसत नाही म्हणजे सर्व वस्तुमात्राचा त्याच्या दृष्टीने अभाव होतो तेव्हा माझ्या मते ज्ञानी पुरुषाने कर्माचा त्याग केला; तर त्याला कोणताही दोष लागत नाही, असे श्रीशंकर जगन्माता पार्वतीला सांगतात.

ज्ञानामध्ये कामक्रोधादि सर्व पदार्थांचा लय होतो यात काहीही संदेह नाही. जेव्हा इतर सर्व तत्त्वांचा अभाव होतो तेव्हा स्वयमेव तत्त्व अर्थात् आत्मज्ञानच प्रकाशित होत राहते. याचे तात्पर्य असे आहे की, सिद्धयोगाचे साधन करताना जागृत कुंडलिनी शक्ती कामक्रोधादि सर्व शक्तींचा स्वत:त समावेश करून सुषुम्नामार्गाने जाऊ लागली की, इतर सर्व तत्त्वे नाहीशी होत जातात व एकमात्र आत्मतत्त्वच प्रकाशित होत. राहते. ॥५७॥

अशा प्रकारे श्रीशिवसंहितेतील हरगौरीसंवादात्मक योगाचे कथन करणारे तत्त्वज्ञानोपदेशाचे द्वितीय पटल समाप्त झाले.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:10.1570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Procyon

  • प्रश्वा, सरभा 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site