अंक दुसरा - प्रवेश पहिला

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( फाल्गुनरावांचे घर )

फाल्गुन - कालचा अर्धा दिवस आणि अर्धी रात्र शोधतां घालविली, पण ह्या चेहेर्‍याचा गृहस्थ कांही भेटला नाही. चौकांत गेलो, वसंतबागेत गेलो, संध्याकाळी कार्तिकनाथाच्या देवळात कीर्तनाला गेलो; कधी जायचा नाही, पण काल रात्री एक - दोन ठिकाणी जलशालादेखील गेलों ! कारण तिथें म्हणजे शोकी लोक गोळा व्हायचेच ! पण कुठं मागमूस नाहीं ! असो. आज भादव्यापासूनच आरंभ करु.  भादव्या, ए भादव्या, काय करतो आहेस ? जरा इकडे येऊन जा पाहूं !
भादव्या - ( आंतून ) झुंबरावचा मळ झाडतो आहे धनीसाहेब, आलोच.
( भादव्या हात आपटीत येतो. )
फाल्गुन - तुला एक छानदार चीज दाखवितो. ही पहा तसबीर कशी आहे ?
भादव्या - ( अचंब्यानें ) फार म्हणजे फारच नामी आहे, धनीसाहेब ! हें अणीदार सरळ नाक, पाणीदार गरगरीत डोळे, ही कोचीदार भडक पगडी, या कमानदार रेखलेल्या भिवया, ह्या पिळदार मिशा, हातांत ऐटदार मुठीची छडी, हा झोंकदार अंगारखा, जसा कांही राजा बसला आहे महालांत ! पण मला ही दाखवून काय करायची आहे धनीसाहेब ? ( हंसतो ) एखाद्या खुबसुरत बायकोनं पाहिली तर फिदाच व्हायची त्याच्यावर !
फाल्गुन - ( मनाशीं ) अगदी बरोबर. अनुभवाच बोलला . झालीच आहे फिदा ! ( उघड ) तुला दाखवूं. नको तर कोणाला दाखवूं ? तिला दाखवूं का ?
भादव्या - छे: धनीसाहेब, असं कसं म्हणता ? लग्नाच्या बायकोनं बघून काय करायचं ? तें वाईट - फार वाईट !
फाल्गुन - अरे, आपली मजेनं जवळ बाळगायला, नवरा कामाला गेला, म्हणजे करमणूक घटकाभर ! बरं तें जाऊं दे - ही कुणाची समजलास कां ? ते आपले - तूंच सांग पाहूं आधीं, तुझ्या ओळखीचे आहेत हे ?
भादव्या - छे: ! माझ्या नाहीं बोवा ओळखीचे दिसत. हा चेहरा मी आजच पाहातों काय तो. असल्या थोर लोकांच्या आणि आमच्यासारख्या गरीब माणसाच्या ओळखी कशा होणार ?
फाल्गुन - ( मनाशीं ) काय चोर आहे, अगदीं थांग लागूं देत नाही ! ( उघड ) अरे, कधीं कधीं आपल्या घरीं येतात. ते. तिची आणि ह्यांची कांही ओळख आहे माहेरची !
भादव्या - मीं तर त्यांना कधीं पाहिलं नाहीं ?
फाल्गुन - कधी पाहिलं नाहींस ? कधीं ह्यांच्याशी बोलला नाहींस ? कधी यांच्याकडे तिच्याकडून चिठी - चपाटी घेऊन गेला नाहींस ? कधी हे तिच्याकडे साखरपाण्याला आले नव्हते ? सकाळीं ? संध्याकाळी ? तीन प्रहरी ? रात्री ? कधीं आले नव्हते ? मार माझ्या पायांवर हात, नव्हते आले म्हणून ?
भादव्या - पण आपल्याशी खोटं कशाला बोलूं धनीसाहेब ? कधी बोललो नाही, कधी पाहिला नाही, चिठी नाही, चपाटी नाही, कांहीं नाही ! हा मारतों पायांवर हात ! खोटं बोलत असेन, तर या पायाच्या पायावर जळून जाईन !
फाल्गुन - अरे, अशा शपथांनी जर हात जळते, तर आज दुनियेंत मनुष्य दिसलं नसतं;सगळे जळून खाक झाले असते ! निदान् बायका तरी पार झाल्या असत्या !
भादव्या - मी प्रत्यक्ष पाहिलं आहे धनीसाहेब. आमच्या गांवांत एका धनगरान खोटी शपथ वाहिली, त्याबरोबर त्याची अर्धी अधिक मेंढर तिथल्या तिथं पटापट मेलीं बघा !
फाल्गुन - तें जाऊं दे. आधीं ह्यांतली तुला काय हकिकत माहित आहे सांग. खरं सांग. मागशील तें देतो ! एक छानदार घर बांधून देतो. थोडीशी जमीन देतो. हें बघा, तिनं तुला काय दिलं आहे, त्यापेक्षा तुला हजारपट जास्त देतो, पण हा गृहस्थ कोण आहे तेवढ सांग !
भादव्या - खरंच सांगू धनीसाहेब ? अगदीं बापाची शपथ घेऊन सांगतो, त्यांतलं मला कांहीएक ठाऊक नाही. याउप्पर काय शिक्षा कराल ती करा.
फाल्गुन - ठीक आहे, नको सांगू ! बाहेर पडल्याशिवाय राहायचं नाहीं समजलास ?
( भादव्या जातो. )

पद ( कां न मुरली )
कोण जगिं मला हितकर उरलें ? ॥
स्त्रियापुरुष गृह पशुही फिरले ॥धृ०॥
स्त्री परलंपट, सेवक फसवे ॥
श्वानहि रक्षणकार्ये विसरलें ॥१॥

( नोकर येतो. )
नोकर - ( पडद्यांतून ) फाल्गुनरावांचा बंगला हाच काय ?
फाल्गुन - होय, हाच. त्यांच्याकडे काय काम आहे तुझं ?
नोकर - त्यांच्याकडे नाही, आंत - त्यांच्या बाईकडे काम आहे.
फाल्गुन - ( मनाशीं ) मला स्वप्न पडलचं होत. कारण माझ्याकडे कुणाच काय काम असणार आमची बायको असताना ? अलिकडे पाहतो तों बायकांकडेच फार काम निघूं लागली. ( उघड ) बरं समजलों. पण कोणाकडुन आलास रे ?
नोकर - ते शनिबागेच्या कोपर्‍यावर - पण नाव सांगू नकोस म्हणून सांगितल आहे !
फाल्गुन - ( एक रुपया हातात धरुन ) हा घे. हं, आतां तूं नाव सांगितलंस म्हणून त्यांना कसं कळणार ?
नोकर - ( मनाशीं ) हे म्हणतात तें खरंच . तो कशाला विचारायला येतो आहे त्यांना ? ( उघड ) रुपया कशाला पाहिजे महाराज ? पण बरं - तर आपली मर्जी. शनिबागेच्या कोंपर्‍यावर श्रावणशेट म्हणून राहातात ते - त्यांनी ही चिठ्ठी फाल्गुनरावांच्या बायकोला द्यायला दिली आहे.
फाल्गुन - असं , असं, असं ! तर मग मीच फाल्गुनराव. ती बाहेर गेली आहे. आण ती चिठ्ठी इकडे.
नोकर - त्यांच्यापाशींच दे, असा हुकूम आहे महाराज !
फाल्गुन - ( आणखी दोन रुपये काढून ) हे घे आणि फाल्गुनरावांच्या बायकोलाच चिठी दिली आहे म्हणून सांग, म्हणजे झालं. नवर्‍याजवळ दिली काय आणि बायकोजवळ दिली काय. ती बाहेरुन आली कीं मी ही देतों तिला.
नोकर - ( मनाशीं ) तरी काय हरकत आहे ? बायकोची चिठ्ठी घेऊन नवर्‍याला काय करायचं आहे ? तो देईलच तिला. आपण रुपये उगीच कां बुडवा ? गृहस्थ मोठा उदार आहे. ( उघड ) बरं. तर महाराज, ( रुपये घेऊन ) ही चिठ्ठी बाईंना द्यायची. येतों तर.
फाल्गुन - बरं ये. मी देतों ही तिला. पण तूं आपल्या धन्याला तिलाच दिली म्हणून सांगशील ना ? नाहींतर - बरं जा --
नोकर - जी महाराज.
फाल्गुन - ही श्रावणशेटाची चिठ्ठी ( उघडू लागतो. ) माझ्या बायकोकडे कां ? त्याचा आणि हिचा काय संबंध ? तो कोण हिचा ? काय संबंध ? आणि नाव सांगायचा हुकूम नाही तो काय म्हणून  ? सरळ चिठ्ठीला चोरी कां ? तेव्हां सरळ नव्हे हेच खास ! आंत कांही तरी भानगड आहे ! बायका लिहायला वाचायला शिकल्या म्हणजे अशी पत्रापत्री सुरु करतात. ठीक आहे ! काय लिहितो तो ? " विनंती विशेष. तुमची चिठ्ठी मला पोहचली. सौभाग्यवतीची माहेरीं रवानगी करुन दिली. आणखी पंधरा दिवसांनी येईल. म्हणून मी उत्तरी कळवितों कीं, तुम्हीं विचारलेल्या प्रश्नासंबंधाने कांहीं काळजी करण्याची जरुर नाहीं. स्वाती ही आमच्या घरची विश्वासू कुळंबीण आहे. तुमच्यांत आणि तुमच्या यजमानांत भानगड उपस्थित होण्याचा कांही संभव नाही. यावरुन काय तें लक्षात आणावे. अधिक लिहिणे नको हे विनंति असं काय ? " सौभाग्यवतीची माहेरी रवानगी करुन दिली. ती कां ? हिला विघ्न येईल. " आणखी पंधरा दिवसांनी परत येईल. " तोपर्यंत तर चैन झाली ! पुढे काय म्हणतो ? " विचारलेल्या प्रश्नासंबंधांत काही काळजी करण्याची जरुर नाही ! " ठीकच जरुर नाही ! कशाला असेल ? बघणार कोण ? कळणार कुणाला ? तेव्हा प्रश्न कोणतां हें ध्यानात आल; आणखी काळजी कां नको हेहीं समजलं ! बरं पुढे काय म्हणतात हे राजश्री ! " स्वाती विस्वासू कुळंबीण आहे. " हो तिनं आजपर्यंत शेकडों काम केली असतील, आणखी बक्षिस उपटली असतील ! " पुढे भानगड उपस्थित होण्याचा संभव नाही. यावरुन काय ते लक्षात आणाव ! " काय लक्षात आणावं ? हेंच, हिनं आतां घरुन नट्टेपट्टे करुन देवाला म्हणून बाहेर पडाव, आणखी रस्ता चुकवून कार्तिकनाथाला जायचं ते श्रावणशेटला जावं. फार उत्तम बेत ! जा म्हणावं आतां ! ही चिठ्ठी घेऊण श्रावणशेटला गाठू का ? पण नको ! आपल्याला अशा आडरस्त्याला जायच नाही. आतां काय ? पुराव्यावर पुरावा. हवा तितका पुरावा मिळायला लागला. ही तसबीर, ही चिठ्ठी, आणखी दमान घेतल तर आणखीसुध्दा मिळेल. तेव्हा आतां आ हा: ! असें करावं ही जी विश्वासू कुळंबीण आहे तिला भेटाव, लागेल तितका पैसा देऊन फितूर करुन घ्यावी आणि पैसा दिसला म्हणजे ती फितूर होणारच ! आणि मग एक एक हळूच बाहेर काढून घ्यावं. ठीक ठरला बेत ! पण काय - अरे भादव्या, भादव्या इकडे ये ? मघाशीं इमानीपणाची ऐट मारीत होतास, आतां पाहातों तुझा इमानीपणा कसाला लावून ! कबूल आहेस ना ?
भादव्या - हो  धनीसाहेब. हा कांहीं डरणारा इमानी नोकर नव्हे. लावा कसाला !
फाल्गुन - आधीं तुला एक विचारतों, स्वाती स्वाती म्हणून, एक कूळंबीण आहे. ती ओळखीची आहे का तुझ्या ?
भादव्या - हो धनीसाहेब. आपल्या रोहिणीकडे येत असते वरचेवर !
फाल्गुन - ( मनाशीं ) याच्या ओळखीची आहे आणि रोहिणीकडे येत असते वरचेवर ! चाललं सुताला सूत जुळत. ( उघड ) बरं. तूं जाऊन तिला गुप्तपणानं भेट आणि आज संध्याकाळी तोंडाला तोंड दिसेनासं झालं म्हणजे, कुणाला न कळत या बंगल्याच्या आंबराईत मला येऊन भेट म्हणून सांग ! हे काम मोठ्या हुशारीनंच झाल पाहिजे, बरं का ?
भादव्या - हो, करतों धनीसाहेब.
फाल्गुन - पण हें रोहिणीला कळतां उपयोगी नाही. कारण ती आहे तिच्या मसलतींतली. शिवाय - पण तें तुला इतक्यात नाही सांगत. ती कुणाला दिसून उपयोगी नाही. जा तर ताबडतोब ! हे काम केलसं म्हणजे मग मघाशीं सांगितलंच. पण हें बघ, इकडे ये. आणखी काहीं सांगायचं आहे. नीट ऐकून घे. तिचं माझ एकांतात कांहीं नाजूक गोष्टीसंबंधांत बोलणं व्हायच आहे. हा जर का माझ्या बायकोला सुगावा लागला तर सगळचं फसलं म्हणून समज ! म्हणून तिला म्हणावं नीट बुरखा घेऊन सांगितल्या ठिकाणी येऊन उभी रहा. समजलास ? बुरखा - बुरखा घेऊन आली पाहिजे !
भादव्या - पण धनीसाहेब, बुरखा घेऊन आली तर संशयाला जास्त कारण होईल.
फाल्गुन - नाहीं, नाहीं . त्यांतली खुबी तुझ्या लक्षांत नाहीं यायची. बुरखा पाहिजेच. तुला काय ? सांगितलेलं काम करायचं बस्स !
भादव्या - बरं तर, हुकूमाप्रमाणे कामगिरी बजावून येतों. ( जातो. )
फाल्गुन - ही जर हुल्लड साधली तर - आणि हजार वाट्यांनी साधणारच ! मग काय ? गांवभर तिची फटफजिती केली नाही तर नावं बदलून ठेवीन ! बरं, चला आतां एक चक्कर मारुन येऊं शहरांत. या चोराची गांठ पडली तर बरंच झालं, नाहींतर तितकीच वेळ गेली ! ( जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP