अंक पहिला - प्रवेश चवथा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( रेवती देवाला जाऊन घरीं परत जातांना )

रेवती - कसं घर गांठतं कोण जाणे ! आधींच उपास, त्यांत उन्हाची तिरीप लागून जीव कसा अगदीं कासावीस झाला आहे. अग बाई बाई ! ( फाल्गुनराव येतो. )
फाल्गुन - तिचा कुठें पत्ता नाही. देवळांत गेलो, आंबराईंत पाहिली, कुठें मागमूस नाही. जावं आतां घरींच. अरे, ही कोण ? आणि असे कां करते आहे ?
रेवती - अग बाई ? पडलें हो पडलें ! धांवा कुणी तरी ! ( एकदम घेरी येऊन पडते. )
फाल्गुन - अरेरे ! आलों हं, भिऊं नकोस. ( तिला सावरुन वारा घालूं लागतो. ) कुणाची कोण आहे बिचारी, कुणाला ठाऊक ! बरं तर बरं,  नाहीं तर या दगडावर कपाळ फुटून प्राणसुध्दां जायचा हिचा ! ( कृत्तिका माडीच्या खिडकीचें दार उघडून - )
कृत्तिका - कुत्रा कां भोंकतो बरं ? कां रे ? हें समोर कोण झाडाखाली ? आमची खाशीं स्वारी वाटतं ? बसून काय करताहेत ? अग बाई ! तो त्यांच्या खांद्यावर हात कुणाचा ? काय ग बाई हे पुरुष निलाजरे तरी ! भर दिवसा - वाटेवर - घरासमोर - ( न्याहाळीत ) ही मेली एक फांदी आड येते -
फाल्गुन - किती घाम आला आहे पहा. ( हातरुमालानें तिच्या अंगावरील घाम पुसतो. )
कृत्तिका - त्या अवदसेचा आपल्या हातरुमालनं घाम पुसताहेत हे पहाण्यापेक्षां देवा, मला आंधळी कां केली नाहीस ? बिछान्यावर माझे पाय कधी झोपेंत उघडे पडले तर तेसुध्दां कधी दुलईनं झांकले नाहीत आणि या सटवीचा घाम पुसायला, पदर सांवरायला, तिचं ओझं अंगावर घ्यायला, लाज नाहीं वाटत ? ठोकच आहे -  "  घरचीचं  तें मिठवणी आणि बाहेरचीचं मिठ्ठापाणी ! ! "
फाल्गुन - ( रेवतीच्या कानाजवळ तोंड नेऊन ) कां, आलीस का शुध्दीवर ? ए-
कृत्तिका - आतां काय करावं, गालाजवळ तोंड ? अहो, दुसर्‍या कोणाची नाही, पण त्या सूर्यनारायणाची तरी लाज धरा !
रेवती - ( बेशुध्दींत असतां ) छे: छे: ! रस्त्यांत काय पण !
कृत्तिका - ऐका ऐका, जळली तुमची अक्कल ती; तिची तरी घ्या थोडी उसनी !
फाल्गुन - माझ्या घरांत येतेस का ? कांहीं वेळानं तुला घरी पोंचवीन.
कृत्तिका - घरांत ? घरांत ? येऊं दे तर सटवीला. तिच्या झिंज्या नाहीं उपटल्या तर ही नांवाची कृत्तिकाच नव्हे ! पाऊल तरी टाक म्हणावं कीं, नखांनी तोंडच फाडून टाकतें ! म्हणे घरांत येतेस का ? आग लागो तुमच्या नवरेपणाला ! थांबा मीच येऊन देतें उत्तर ? ( खिडकीपासून निघून जाते. )
फाल्गुन - तुझं घर कुठं ? नावं काय ? कुणाची मुलगी तूं ?
रेवती - ( कण्हत ) माझं घर मंगळवाड्यांत. मी मघा नायकिणीची मुलगी. माझं नाव रेवती. आज मी सोमवार म्हणून सकाळी अंग धुऊन कार्तिकनाथाला म्हणून आलें. दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालून परतलें. परवापासून पित्त झालंच होत; त्यांत आज हे सकाळचं ऊन लागून एकाएकी भोंवळ आली. आपण जवळ होतां म्हणून बरं झालं !
फाल्गुन - माझ्या घरांत येऊन थोडा मुरावळा खातेस का ? म्हणजे बरं वाटेल जरा. हवी तर दूधांतून मात्रा देतो.
रेवती - नको म्हणायचं जिवावर येतं, पण पूजा केल्याशिवाय कांहीं खायचं नसतं. जवळच आहे घर; जाते हळूहळू.
फाल्गुन - बरं, मर्जी तुझी. तुला घरापर्यंत पोचवितों म्हणजे झालं. ऊठ हळूच. ( दोघे जातात. ) ( कृत्तिका लंगडत लंगडत येते. )
कृत्तिका - मेलं कायसंसं म्हणतात ना " घाईत घाई आणि विंचू डसला ग बाई ! " जिन्यांतून उतरतांना अशी ठेंच लागली कीं, कळ मस्तकांत जाऊन अंधेरी आली डोळ्यांपुढं ! जाऊ दे ती ठेंच.  होईल मेली बरी. पण झाडाखालीं कुणी दिसत नाही. म्हणजे ? घरांत शिरली कीं काय ? तें कोण जातं तें ? अंह ! मग गेलीं कुठें ? इकडेहि नाही कुणी. ( धांदलीनें ) रोहिणी, अग रोहिणी ! ही सुध्दां मेली कुठं नाहीशी झाली. ( रोहिणी येते. ) काय ग, हे कुठं आहेत ?
रोहिणी -- मला काय ठाऊक बाईसाहेब ?
कृत्तिका - आतां इतक्यांत घरांत नाहीं गेले ?
रोहिणी - नाही बाईसाहेब, मी सोप्यावर होतें !
कृत्तिका - सांग खोटं. तुझी जीभ झडेल बघ ! चांडाळणी, नवराबायकोंत असा बिघाड घालतेस. सात जन्म मुरळी होशील; तूं नाहीं म्हटलंस म्हणून मी कुठं ऐकतें ! आळीन, आळी धुंडाळून त्यांना बाहेर काढते बघ. अग बाई ! मेलें ग मेलें. मेली ठेचेवर ठेंच ! हे काय? ही तिच्याच कुणा तरी ह्याची तसबीर वाटतं ? हें ठीक - ठीक झालं ; खासं झालं ! आतां म्हणावं साता पाताळांत लपून बैस. ही सुतानं स्वर्गाला जाणारी कृत्तिका आहे. तिथून तिला शोधून काढतें तर होय म्हण. पण पहिल्यानं यांची एकदा चांगली खोड मोडली पाहिजे. आज हें असं केलं, उद्यां एखाद्या सटवीला माझ्या उरावर आणून नाचवतील ! नवरे, नवरे, नवरे ! असले कसले हे कसाब नवरे ? ( जाते )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP