अंक पाचवा - प्रवेश २ रा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


दुसरी खोली
[ काळ्या व कोंडाऊ ]
कोंडाऊ - काळ्या , हें काय लचांड झालें पाहिलेंस का, बाईसाहेबांचे पहिले नवरे चंद्रराव आले.
काळ्या : - ( हंसत ) चंद्रराव आले ! मंजी समंद होऊनशेनी आल का काय ?
कोंडाऊ - समंद होऊन नाहीं . खरोखरीच आले.
काळ्या - अग चल . अशी का ठकबाजी लावलियास माज्या ह्योर ? म्येलेल मानुस परतुन कदीं आलया ? मरुन ह्यैना दोन ह्यैना झाल असल तर एकाद मानुस स्वप्नांत मातुर कुणाला तरी दिसत . पन् त्येसनी मरुन सात वर्स झाली ; आन् ह्नन चंदरराव आल मागारी ?
कोंडाऊ - आतां काय सांगूं तुला ? खरेंच आले.
काळ्या - मग आमचा बा न्है आला तर ? त्यो मरुन सम्दी वर्स चार झालीं !
कोंडाऊ - अजून तुला खोटें वाटतें ? बाईसाहेबांच्या पायांशपथ चंद्रराव परत आले. झालें ?
काळ्या - ( गोंधळून ) आं - बर, कवा आल ?
कोंडाऊ - रात्रींच . तूं गोसावडा म्हणून समजलास तेच चंद्रराव. उगीच त्यांना काईबाई बोललास .
काळ्या - मग मातुर त्या भामट्यान तुमासनी खास फशिवल . तूं झालीस म्हातारी, तवा तुला लागलया येड . अग बायकु मिळावी म्हन् मीच चंदरराव अशी त्येन थाप मारली आन् दुसर काय ? म्या असल पुष्कळ भोंदु बघितल्याती. ( रागावून ) इचिभन ! कुट है त्यो ? चल दावतो त्येला काळ्याचा हिसका. चल -
कोंडाऊ - मेल्या मोठयानें तरी बोलूं नकोस. बाईसाहेबांनीसुध्दां ओळखलें. सगळ्या खुणा पटल्या . आणखी काय म्हणतोस ?
काळ्या - बाईसायबानी वळकल असल तर मग ह्नोर काज माज हान्न न्है .
कोंडाऊ - तें झालें . पण बाईसाहेब तर पाट लावून चुकल्या , आतां पुढें वाट ?
काळ्या - म्होरली वाट हत कुना ल्येकाला दिसतीया म्हना, पन चंदरराव किती झाल तरी बी पयल्या लगनाच नवर , तवा जातभाई त्येच्या परमानच सांगणार , बाम्नबी त्येच म्हन्नार , आन् सरकारपातोर ग्येल तरी बी तसच व्हनार.
कोंडाऊ - हो, मला सुध्दां असेंच वाटतें . पण चंद्रराव आतां पाट लावलेल्या बायकोला नांदायला कसे घेतील ?
काळ्या - कां ? त्येला कंची हरकत है ? ह्मोतुर लागून अजून पुर दोन रोज बी झाल न्हैत. आन् आपली बायकु घ्ररांत घ्येयाला कोन नग म्हन्नार ?
कोंडाऊ - तूं मेल्या अगदीं अडाणी आहेस, गरीबगुरीबात तसें उष्टेमाष्टे चालतें . पण त्यांना लोकं हंसतील कीं तसें केले तर.
काळ्या - हंसत्याल त्यांच दात दिसत्याल. पन बायकु तर गावल कीं न्है ? आन् इक्त  बी करायचा नसल, तर असना म्होतुराच नवरा. त्येच्याकड चार म्हैन नांदल, ह्येचाकड चार म्हैन नांदल ! तत काय बिनस्तया !
कोंडाऊ - मेल्या पुरे शहाणपण आतां ! तोंडाला जसे काहीं हाडच नाहीं. मेला म्हणतो, ’ असेनात दोन नवरे ! ’ असें कुठे झालें आहे ?
काळ्या - आन् दुरपतिला पाच नवर व्हत म्हुन बाम्न सांगत्यात . त्ये खोट असल न्है ? उगच स्वांग इचिभन !
कोंडाऊ - बरें बाबा , तूं म्हणतोस तें खरें , झाले ? पण अगोदर जिवाजीरावाकडे जा, आणि चंद्रराव आले आहेत असें सांगून त्यांना घेऊन ये जा .
काळ्या - त्या म्हातार्‍याकडे ? नगग बया ! तूच जा व्होव तर . मी तत ग्येलों तर माज टाळकच सडकील त्यो ! लइ कडवा है बग .
कोंडाऊ - तर मग कसें करायचें ! मला काहीं इथून हालतां येत नाहीं . न जाणो, काहीं बरें वाईट झालें तर दोष आमच्या कपाळीं येणार , म्हणून  म्हणतें .
काळ्या - व्हय, ह्ये मातुर खर. बायलापायीं खून बी पडत्याती ; तवा अगुदरच खबरदारी राकावी, यांत शेनपन है .ह्यो निगालुच बग तडक. ( दोघेही जातात. कोंडाऊ बाईसाहेबांकडे जाते )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP