अंक तिसरा - प्रवेश २ रा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


जिवाजीराव कुंभ्यांचा वाडा
[ जिवाजीराव व त्याचा पुत्र तुळाजीराव.]
जिवाजी० -काय म्हट्लेंस ?तिचे आणि त्याचें लग्न झालें ? कधीं ? कुठें ?
तुळाजी० -इथेंच काल संध्याकाळीं गोरजमुहूर्तावर झालें. मला तरी नुक्तेंच समजलें हें. आतांच मी घोड्यावर बसून असा वयनी राहाते त्या वाड्यावरुन येत होतो; तेव्हां तिथें मार वाजंत्र्यांची गर्दी चालली आहे. माणसांची एकच धांदल उडाली आहे. कुणी आत जातो , कुणी बाहेर येतो. हें पाहून सहज शोध केला तो हें प्रकारंण ? काय सांगूं बाबासाहेब , त्या वेळीं मला फार वाईट वाट्लें, व अंगाची लाही झाली. पण काय करुं ?तोंड खाली करुन मुकाट्यानें इकडे निघून आलों.
जिवाजी० - यांत मला आधी हें चमत्कारिक वाटतें कीं, तिनें कबूल केलें कसें ! दुदैव त्या आनंदरावाचें ; झालें .
तुळाजी० - पुष्कळ दिवस घाट्त होतें , आणि म्हणे , एवढे मात्र एक ठरलें आहे कीं तिने आपला वाडा सोडायचा नाहीं . आनंदरावानेंच तिथे जाऊन रहावे.
जिवाजी० - जाऊं देत, दोघेंही मरुं देत शिनळीचीं !
तुळाजी० - त्यांचे काही फार दिवस पटायचे नाही, हें मी खात्रीने सांगतो . आतां जरी तो आनंदाच्या शिखरावरा बसून स्वर्ग काय तो त्याला अगदीं दोन बोटें उरला आहे, तरी चार दिवस जाऊ द्या कीं तो पडलाच खालीं म्हणून समजा. पुढें त्यांचे त्यालाच वाटायला लागले कीं यांत काही अर्थ नाहीरें नाही. कारण , ती स्वत:च्या हौसेनें काहीं त्याला कबुल झाली नाहीं,अशी मला बातमी लागली आहे. मग खरें काय तें तिला ठाऊक किंवा त्याला ठाऊक ! पण एवढें खास कीं , आणखी थोडक्याच दिवसांत ही गोष्ट त्याच्या मनांत टोचायला लागून तो तिला कांही तरी भांडण काढून घरांतून हांकलून देणार !
जिवाजी० - तूं त्यांच्या लग्नाची गोष्ट मला सांगितलीस तेव्हाच माझ्या मनांत येऊन चुकलें हें . अरे, सांगून संवरुन पांढर्‍य़ा पायाची ती, तिचें कुणाशीं पट्णार ! असो. पुढल्यास ठेंच मागला शहाणा, या म्हणीप्रमाणे तू मात्र अक्कल शीक . तुझ्या भावानें  माझा शब्द मोडून पाहिजे तसे फंद केलें , म्हणून त्याचा परिणाम काय झाला तो लक्षांत आण, आणखी नीट माझ्याच तंत्रानें चालत जा.  म्हणजे परमेश्वराच्या कृपेनें तुला काहीं कमी पडावयाचें नाहीं, समजलास ?
तुळाजी० - हें काय सांगायला पाहिजे मला ! दादानें जितकें तुम्हाला दु:ख दिलें त्याच्या दसपट मी सुख देइन. तुमच्या हुकुमाबाहेर एक पाऊल देखील टाकणार नाहीं , हीच शपथ !
जिवाजी० - शाबास ! असा वागलास तरच माझ्या पोटीं येऊन सार्थक; नाहीं तरी काय ? असो ; पण तुळाजीराव, तुझ्या भावावर जरी माझा अतिशय राग होता तरी आतां काय त्याचें ? तो मेला , गेला, पार झाला. त्याच्या वरचा राग कांही त्याच्या पोरावर काढायचा नाहीं, त्या पोराची मला फार काकुळत येते. किती झाले तरी नातवंडच तें !का नाही येणार बरें ?
तुळाजी० - माझ्या मनांतून हें तुम्हाला कधीच विचारायचे होतें कीं त्या बापड्या पांच वर्षांच्या पोरानें तुमचा काय अपराध केला ?त्या लेंकरावर तुमचा इतका राग कशासाठीं ?पण म्हट्लें लहानां तोंडीं मोठा घास घेऊं नये, म्हणून उगीच राहिलों होतों. आतां तुम्हालाच त्याची दया आली, बरें झालें .
जिवाजी० - तेव्हां - कायरे ? हं - तेव्हां मी काय म्हणतों कीं , तूं भविष्य केल्याप्रमाणें आनंदरावानें जर त्या साडेसातीला वाटेस लावली तर त्या अज्ञान लेंकराचे विनाकारण हाल होतील. आणखी माझ्याच्यानें ते ऐकवायचे सुध्दां नाहीत. तर त्याच्या नांवावर काही थोडी जमीन घेऊन ठेवावी किंवा त्याच्या बेताची काहीं रक्कम -
तुळाजी० - पण बाबासाहेब - आपल्या खर्‍या नातवंडाची काळजी बाळगून , अशी व्यवस्था करुन ठेवणें कांही वाईट म्हणत नाहीं मी - पण त्या मुलाविषयी लोकांत कुजबुज ऐकली ती आपण आपली तुमच्या कानावर घालतों. म्हणजे -
जिवाजी० - कसली रे कुजबुज ? मूर्ख आहेत लोक.
तुळाजी० - मी नाहीं त्यांना मूर्ख म्हणायचा. कारण , दादांचे आणखी तिचें लग्न झालें, त्यापुर्वीच आनंदरावाचें तिच्या घरीं जाणें येणें असे. तेव्हां त्याचा आणि तिचा कांही चमत्कारिकच थट्टामस्करीचा प्रकार पाहून तिच्या बापानें आनंदरावाच्या देखतच ’एवढी थोरली झालीस तूं ! आणि पुरुषांबरोबर काय अंगमस्ती करतेस ?’ असें म्हणून दोन चार वेळां तिला दरडावलें. असें झालें तेव्हां त्यानें तिथें जाणे बंद केले.
जिवाजी० - बरें मग ? मुलाविषयीं कुजबुज करतात ती कोणती ?
जिवाजी० - ( रागानं ) तूं आहेस एक मूर्ख , आणि असे म्हणणारे लोक आहेत शतमूर्ख ! अरे त्या मुलाचा तोंड्वळा आणखी चंद्ररावाचा तोंडवळा अगदीं सारखा दिसतो, हे नाहीं वाट्ते तुझ्या लक्षात आलें ?
तुळाजी० - ( बाप रागवला असें पाहून ) हो हो ! तें कधीच मी पाहीले आहे, इतकेच नव्हे, तर तुमच्या आणि त्याच्या , माझ्या आणि त्याच्याही चेहर्‍यात साम्य दिसते, पण लोक काय म्हणतात तें मीं तुम्हाला कळविलें.
जिवाजी० - ( संतापून ) झक् मारतात लोक ! मी आतां अगोदरच माझ्या नातवाची काहीं तरी तरतूद करुन टाकतों. वास्तविक म्हट्लें म्हणजे माझ्यामागें तो निम्म्याचा मालक . परंतू त्या साडेसातीच्या पोटीं आला म्हणून त्याची चवथाई बुडवून बाकी चवथाईचा मालक त्याला करतों, आणि तुला तीन हिश्यांचा . जातों तर. आतां त्याच उद्योगाला लागतों.  (असें म्हणून निघून जातो. )
तुळाजी० - ( आपल्याशीं ) हें पाहिलें ! तें कारटें मला बाधक होणार म्हणून म्हणत होतों, तो प्रसंग शेवटीं येऊन ठेपलाच ! ( वेडावून दाखविल्यासारखें करुन ) ’त्या पोराची मला काकळूत येते’ ! वा, बाबासाहेब ! तुमच्या कोमल अंत: करणाची कमाल आहे ! ! परमेश्वरानें मनुष्य प्राणी तरी एक विचित्र निर्माण केला आहे.  प्रत्यक्ष त्या पोराची आई किती पाया पड्ली, किती काकुळतीला आली, किती रडली ! तरी या फत्तराला तिची दया आली नाहीं . कां ? तर म्हणे ती पांढर्‍या पायाची आहे, तिनें माझे घर बसविलें? आणि त्याच साडेसातीच्या पोटचें हे कारटें असून त्याच्यासाठीं आमच्या बाबासाहेबांचे मन कळवळते! काय चमत्कार आहे पहा ! पण मी आतां कशाला बोलूं ? म्हातारा काय काय करतो तें करुंदे. त्याच्या अकलेवर हिकमत लढ्वायचें काम माझें ! मी जो एवढा व्यूह रचला आहे तो चवथा हिस्सा त्या पोरट्याला देण्याकरीता नव्हे म्हणावें बरे आतां आपल्याला अगोदर आनंदारावाकडे पानसुपारीला गेलें पाहिजे. कारण मित्रत्वाची वरवर रेलचेल करुन आपला मतलब साधून घ्यायला आपलें काय जातें ?अंदरकी बात राम जाने ! (असें म्हणून निघून जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP