अंक दुसरा - प्रवेश ३ रा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


प्रवेश ३ रा
[ तुळाजीराव , आनंदराव व शिपाईलोक येतात. ]            
आनंदराव - हां ! अशी बंडाई करु नका. कर्ज कर्ज काय ते हजार रुपयेच ना! दहा हजार रुपये जरी असते तरी ते फेडून टाकण्याची माझ्या अंगात ताकद आहे हे तुम्हाला ठाऊक असुन असा दंगा का करतां ? तुमचा पैसा मी देइन . आहे काय त्यांत !
शिपाई - आम्हाला तरी रावसाहेब आणखी काय पाहिजे? त्यांनी उलगडा केला काय आणि आपण केला काय एकच .
आनंद० -उद्यां या तर मग.
शिपाई -( मुजरा करुन निघून जातांत विचारतात. )उद्या खास ना ?
आनंद० - हो. अगदी खास.
दुर्गा - ( बाहेर येऊन ) उद्या काय ? नी खास काय ? आज तेंच उद्यां ? कांही दुसर्‍याच्याच संकटात मला लोटणार वाट्तें ?
आनंद० -छे छे ! संकटात नाहीं , आनंदात लोटणार !
दुर्गा -आतां मला या जगाता आनंदाची आशाच नाहीं उरली. रिकामी मेली जिवाला हुरहुर कशाला लावतां ? काय आहे तें सांगा ?
तुळाजी० - बायका भित्र्या म्हणतात तें काही खोटे नाहीं . वयनी, कर्ज कर्ज ते काय , आणि त्यासाठी इतका धीर सोडतेस ? त्या म्हातार्‍याच्या तापट स्वभावामुळें मला काही इकडे तिकडे करता येत नाहीं , पण दुसरा आधार देणारा कुणी नाही असे समजू नकोस.
दुर्गा - माझ्यासारख्या भिकारणीला कोण आधार देणारा मिळणार भाऊजी ?
तुळाजी० -असें का म्हणतेस ? असे तसे नव्हते . अगदी जीवाचे आहेत समजलीस ? हे पाहा आनंदराव ऐनप्रसंगी तुला संकटातुन पार पाडायला तयार झाले आहेत.
दुर्गा - ( किंचित विचारांत पड्ल्यासारखे करुन )ते कसे मला पार पाडणार ? यांत त्याचा मतलब काय तें तरी कळलें पाहीजे.
आनंद० - मतलब दुसरा कांही नाहीं, फक्त स्नेहासाठी मी पुढे झालों. तुमच्यावर असा प्रसंग गुजरावा व मीं तुम्हांला मदत करावी अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती व हें कधीं माझ्या मनात सुध्दां आलें नाहीं. कारण दुसर्‍याच्या ऋणांत रहाणें तुम्हाला आवडत नाहीं , हे मला पक्कें माहीत आहे, त्यांतून माझ्या ऋणांत तर मुळीच नको.
दुर्गा - ( मनाशीं ) खरेंच नको.
आनंद० - माझ्याविषयीं  तुमच्या मनांत शंका आली याबद्दल मला दिलगिरी वाट्ते. पण तुमच्याच गळ्याची शपथ घेऊन सांगतों कीं , तुमच्यावरचा प्रसंग टाळावा यांवाचून माझा दुसरा काहीं मतलब नव्हता. प्रसंगी उपयोगीं पडेल तो स्नेही असें माना; आणि मग तुम्ही सांगाल तर माझ्या मनांतील पुष्कळ दिवसांची आशा आंतल्या आंत दडपून टाकून बैरागी होऊन कुठें तरी निघून जातों.
दुर्गा - (आपल्याशीं ) हा यांचा उदारपणाच मला जाचणार बरें ! काहीं मतलबाशिवाय हजार रुपयांवर पाणी सोडायला कोण तयार होणार !
आनंद० - (तिनें एकदम तोंड फिरवलेलें पाहून ) असें कशाला ?मी तुमच्याकडे पाहातों म्हणून जर तुम्हांला त्रास होत असला तर मीच जातों निघून ! पुन: तुमच्या दृष्टीस म्हणून पडायचा नाही. ( उठून जाऊं लागतो. )
तुळाजी० - (त्यांस थांबवून ) पण हें असलें दूरदूरचें बोलणें उपयोगी नाही. वयनी, मी तुला असें विचारतों कीं , आनंदरावांच्या बोलण्याचा खरा भावार्थ तुला कळला आहे का ?
दुर्गा - तो कळून पुष्कळ दिवस झाले पण त्याचें काय ?
तुळाजी० - नाहीं, मी म्हणतों कीं मी समजतों तोच जर त्यांचा हेतु असेल, आणखी तोच जर तूं बरोबर ताडला असशील , तर त्यांच्या मनोदयाप्रमाणें जुळुन यावें हें मलाही बरें दिसतें.
दुर्गा -म्हणजे भाऊजी ? म्हणतां काय तुम्ही.
तुळाजी० - माझे म्हणणें काहीं वावगें नाही. हे पहा, तुझ्यावर हा असा प्रसंग आलेला ! तुझ्या खर्‍या आधाराचा खांब ईश्वरानेच उपटून टाकला. माहेरचें कुणीं उरलेच नाहीं. इकडे सासरा हा अशा प्रकारचा ! मी आहें; पण माझेही हात बाबांनी जखडून टाकले आहेत. मुलगा तर अजुन पाच सहा वर्षाचा बच्चा ! प्राप्ति मुळीच नसून अंगावर कर्जाची रक्कम वाढत चाललेली ! बरें कुठे तरी एखाद्या गरीबाच्या बायकोप्रमाणे दळणकांडण करुन पोट भरावें तर लौकिक संभाळला पाहिजे ?तेव्हां या सर्व गोष्टीचा जर पोक्तपणानें विचार केला तर आनंदरावांचा व तुझा विवाह व्हावा हें मला इष्ट दिसतें .
दुर्गा - काय ? विवाह !
तुळाजी० - हो. कारण , असा योग पुन: जुळुन यायचा नाहीं . याउप्पर जर तूं आपलाच हट्ट घेऊन बसलीस तर तुझेही नुकसान, तुझ्या मुलग्याचेही नुकसान. तेव्हां नीट विचार कर. ( काहीं वेळ तिच्याकडे पाहून ) आतां कदाचित तुझ्या मनांत ज्ञानातील लोकांची भीति आली असेल तर तीही काढून टाक . कारण शिंद्यांच्या घराण्यांत पाट लावायची चाल काहीं नवी नाही. इतकें कशाला ? वयनी, तुला खात्रीचे सांगतो की असें काहीं झाल्यावाचून आनंदरावांच्या उपकारांचे ओझं हलके व्हायचे नाही.
दुर्गा - ( तुळाजीस ) त्याचें माझ्यावर किती उपकार आहेत हें माझे मला नाही का कळत भाऊजी ? ( आनंदरावांकडे पाहून ) तुमच्या उपकारांची फेड कशी करावी याच विचारात आहे मी.
आनंद० - याला इतका विचार कशाला पाहिजे ? फक्त दोन शब्दांचें काम ?
दुर्गा - पण तुम्ही मानतां तसं मात्र नाहींहो ! कारण , माझ्या मनांतील सुखाची हौस, ते गेले , त्या दिवशींच करपून गेली. इतकेंही असून जर तुम्हीं माझ्याशीं - ( एकीकडे ) अगबाई ! मी कुणीकडे वहावलें ही ! नकोरे देवा ! ( उघड ) तुम्ही जा आतां. ( असें म्हणून एकदम निघून जाते . )
आनंद० - ( निराश होऊन ) तुळाजीराव ! बोलतां बोलतां हें काय लचांड झालें !
तुळाजी० - समजलों मी काय झालें तें . अहो, या बायका आहेत बरें ! मी पूर्वी तुम्हाला सांगितलें होतें , त्यांतलाच हा एक बहाणा आहे. आधीच ओढूनताणून चंद्रबळ आणण्याचे यांना बाळकडूं असतें, त्यांतून दीर जवळ म्हणून अधिक लाजली.
आनंद० - मग याला पुढें तोड !
तुळाजी० - तोड कसली ! मी जातों घराकडे निघून . तुम्हीही आणखी अर्ध्या घट्केनें तिची गांठ घ्या म्हंणजे झालें. तिच्या मनांत आहे यांत कांही शंका नाहीं .
आनंद० - बरें तर, तोंपर्यंत मुरलीधराचें दर्शन घेऊन येतों. काय होईल तें तुम्हाला कळवीनच. ( दोघेही निघून जातात. पडदा पडतो. )
( अंक दुसरा समाप्त. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP