मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना| नारा कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना गोंदा परसा भागवताचे अभंग नारा यादवांचे कुळीं झोंड जे जन... नारा संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद करूणा Translation - भाषांतर १. देवा माझें मीपण ठेवीं आपुले चरणीं । घाली माझे मनीं रूप तुझें ॥१॥मग मी लोकाचारी असेन वर्तता । राहीन चिंतिता चरण तुझे ॥२॥चंदनाची वृत्ति वेधले तरुवर "। सबाह्य अभ्यंतर काय झाले ॥३॥सरिता सिंधूसी निळोनि हरपली । सागरची झाली एकसरें ॥४॥लवण जळाचे प्रवृत्ति जसे । ऐक्यभावें न दिसे वेगळें कांहीं ॥५॥नारा म्हणे शरण आलों केशीराजा । ऐसा भाव माझा करींगा वेगीं ॥६॥२. तुज मी अनन्य शरण । सर्व पांडुरंगा जाण ॥१॥माता बाळा कोपे रागें । द्यावें आहारातें मागे ॥२॥जाय कडीयेसी नघे । परी तिची अंगसंगें ॥३॥झणे खटी परतें लोटी । परी सदा पायीं घाली मिठी ॥४॥नारा म्हणे नामयाचा । बापा सांभाळावी वाचा ॥५॥३. तुज भांडवल मोक्ष एक गांठी । तो केला पावन तुझ्या नामें ॥१॥आतां गौप्य काय आहे तुझ्यापाशीं । जें तूं मज देशी पांडुरंगा ॥२॥चतुर्विध मुक्ति द्दष्टि मज वोळंगती । ध्यातां तुझे चित्तीं चरणकमळ ॥३॥आणिका ऋद्धि सिद्धि दाखविसी आस । या दासीचा अभिलाष कोण करी ॥४॥भूतळीचें वैभव निजकर्मभोग । तें तुज उद्वेग करणें बहू ॥५॥नारा म्हणे नाम्यानें सांगितलें बीज । तेंचि मजसी गुज बोल कांहीं ॥६॥४. मी आहें तेथें मग तूं कईंचा । हा उपजन्माचा तोडी वेळ ॥१॥आपुला करोनि ठेवीं तुझ्या चरणीं । न मानिती कोणी क्षिती नाहीं ॥२॥सेवासुख देईं हेचि दुणेपण । येर तो अभिमान खंडीं देवा ॥३॥नारा म्हणे अससी माझिया जिव्हाळा । सुखरुपा विठ्ठला केशीराजा ॥४॥५. तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बहु जन्म वियोगें शिणलों होतों ॥१॥उठवितां येथुनी मुरकुंडी घालीं । कृपेची साउली देखुनी तुझी ॥२॥आहाळले पोळले तापत्रई विराले । तृष्णा विभांडीले नानापरी ॥३॥कामक्रोध मदमत्सरु अहंकार । देह निरंतर जाजावलें ॥४॥बुडतीया जरी अवचितां सांगडी । तें जीवें न सोडी तैसें झालें ॥५॥विनवी नामयाचा विष्णुदास नारा । वंशपरंपरा दास तुझा ॥६॥६. माझ्या विठोबाचें श्रीमुख साजिरें । झळकती कुंडलें मनोहर ॥१॥मना तें तूं आठवी आसनीं शयनीं । भोगिसी जन्मनीं सहज सुख ॥२॥गगनीं असो पैं न येतो मार्तंडू । तैसें तूं अखंडू करीं ध्यान ॥३॥कमलकळिके जैसा भ्रमर आसक्त । तैसा तूं निश्चित राहें चरणीं ॥४॥जैसा कां समंधु जीवन जळचरें । येणेंचि निर्धारें द्दढ धरीं ॥५॥नारा म्हणे माझ्या बापाचें साधन । सांपडली खूण अंतरींची ॥६॥७. तापत्रया तापलें देहे असे पीडिलें । वासना विभांडिलें मन माझें ॥१॥विठोबावेगळें न देखें मी सुख । पाहेन तुझें मुख एकवेळ ॥२॥सुखाची साउली पाहीन द्दष्टीभरी । जाईन महाद्वारीं लोटांगणी ॥३॥हारला शीणभाग जन्मजन्मांतरींचा । नारा नामयाचा शरणांगत ॥४॥८. पुंडलिकाद्वारीं होतसे वेव्हार । नामयाची पोरें भांडताती ॥१॥येऊनियां चौघे उभे ठेले सत्वर । बोलताती पोरें नामयाचीं ॥२॥आमुचा अंकी लागताती पुरणीं " नामयाचे ऋणीं बांधलासी ॥३॥नामयाचा नारा बैसलासे दारीं । विठोबावरी आळ राला ॥४।९. कैंचें आम्हां जाति कुळ । कैंच आम्ही धर्मशीळ ॥१॥तुझ्या नामीं अनुसरलों । तिहीं लोकीं सरते झालों ॥२॥नारा विनवी विष्णुदास । आमुचे वंशीं हा विश्वास ॥३॥१०. आम्हां व्रत एकादशी । देव केशव तीर्थ तुळसी ॥१॥अनेक नेणों बा साधन । आमचा विषय हरिकीर्तन ॥२॥संतसंगती निरंतर । प्रेमधन हें भांडार ॥३॥विनवी विष्णुदासाचा नारा । आमची ऐसी हे परंपरा ॥४॥११. कोटी यज्ञांची हीं फळें । त्यांहुनी हरिनाम आगळें ॥१॥तें फळ वेगळें सांगावया । नाहीं उपमा द्यावया ॥२॥महा पातकांचिया राशी । नामें पावती मोक्षासी ॥३॥दोन अक्षरांसाठीं । गणिका घातली वैकुंठीं ॥४॥हरिनामाचा संग्रह करा । म्हणे विष्णुदास नारा ॥५॥१२. काळा अलोट अभंग । हरीचे दास अंतरंग ॥१॥हाकारिती वेळोवेळां । कृष्णा गोविंदा गोपाळा ॥२॥कंठीं तुळसीच्या नाळा । नेत्रीं अश्रूचिया किळा ॥३॥गुढिया झळकती रोमांकुरीं । कंप न धरेचि शरीरीं ॥४॥आंतु बाहेरी निरंतरी । मागा पुढां अवघा हरी ॥५॥संतचरणींचा रज:कण । नारा नामयाचा प्राण ॥६॥१४. सुख दु:खा भेटों गेलें । चित्त चैतन्या मिळालें ॥१॥आला अनुभव नामाचा । ठेवा लाधला प्रेमाचा ॥२॥जन्ममरणाची काजळी । तुटोनी गेली तये वेळीं ॥३॥सरले संकल्प विकल्प । ह्रदयीं देखिलें विठ्ठलरूप ॥४॥शून्य जाले भावाभाव । अवघा आतुडला केशव ॥५॥नारा म्हणे नामयाचा । मज विश्वास नामाचा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP