सामान्य अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


प्रत्यक्ष ज्ञात असलेली वस्तु, त्याच जातीच्या (दुसर्‍या) एका वस्तूच्या प्रबळ ज्ञानाच्या योगानें त्या (दुसर्‍या वस्तू) हून निराळी आहे, असें कळेनासे होणे, हा सामान्यालंकार.
परंतु मीलित अलंकारांत (पहिल्या वस्तूंत लपून गेलेली दुसरी वस्तु प्रत्यक्ष माहीत नसतें, तेव्हां सामान्यालंकाराची, मीलितात अतिव्याप्ति होऊ शकणार नाहीं.
उदाहरण :--- “बर्फाच्या मोठया ढिगार्‍यानें पांढरा झालेला हिमालय पर्वत चंद्रकिरणांशीं एकरूप झाला असतां, (त्या हिमालयावर चालणार्‍या) चमरी गाया जणु शेपटयावांचून व आधारावांचून (अधांतरीं) पर्वतावर चालात आहेत (असें वाटूं लागलें)”
येथें चांदण्यांत, हिमालय व चमरींच्या शेपटया निराळ्या दिसेनाशा झाल्या, या (वर्णना) वर उत्प्रेक्षालंकाराची उभारणी झली असल्यानें,  सामान्यालंकार उत्प्रेक्षेचा गुण (म्ह० अंग)  झाला आहे.
पण कुणी असें म्हणतात कीं - “तुम्ही केलेल्या (सामान्यालंकाराच्या)  लक्षणांतले भिन्नत्वेनाग्रहणम’ [म्ह० (त्या दुसर्‍या वस्तू) हून (पहिली वस्तु) निराळीं आहे असें कळून न येणें]  हे शब्द काढून टाकून (त्याऐवजीं) ‘भिन्नजातीयत्वेनाग्रहणम म्ह. दुसर्‍यावस्तूहून पहिली वस्तु) निराळ्या जातीची आहे असें न कळणे, असें म्हणा. (लक्षणांत घाला).  असें केलें म्हणजे (पहिली वस्तु व दुसरी वस्तु) ह्या दोन वस्तु व्यक्तिश: निराळ्या आहेत असें ज्ञान झालें तरी (अशा वर्णनांत) सामान्य अलंकार होऊं शकेल. उदाहरणार्थ :---
“हे राजा ! पुष्पगुच्छांनीं सुंदर (दिसणार्‍या) व वार्‍यांनीं हालविलेल्या लतांनीं भरलेलें उपवन (बाग), तुझ्या शत्रूंच्या स्त्रियांना मोठें अरण्य झालें.”
ह्या श्लोकांत, (उपवन) अरण्य झालें तें, अरण्याचें कार्य जें लपायला सांपडणें तें उपवनाकडून केलें गेलें म्हणून, तें (महावनाचें) कार्य उपवानाकडून साधलें गेलें ते असें :--- तुझ्या सैनिकांना, त्या (शत्रू) स्त्रिया लतांहून, व्यक्तिश: निराळ्या आहेत असें प्रत्यक्ष ज्ञान असून सुद्धां त्या लतांहून भिन्नजातीय आहेत असें ज्ञान झालें नाहीं. पण पूर्वींच्या (म्ह० आमच्या म्ह० जगन्नाथाच्या) मताप्रमाणें (पाहतां) ह्या श्लोकांत (म्ह० स्तबकभरै० इत्यादि श्लोकांत) सामान्याहून निराळा कोणतातरी अलंकार मानावा लागेल.
(वरील तीन अलंकारांच्या बाबतींत) कांहींची शंका अशी :--- “मीलित, सामान्य व तदगुण ह्या तिघांमध्यें सामान्य असलेला ‘भेदाग्रह’ (म्ह० भेद न कळणें) हा एकच अलंकार (तिघांच्या ऐवजीं) माना, तीन निरनिराळे अलंकार कशाला ? (कारण) मीलिताम्त तर, प्रकृत व अप्रकृत वस्तूं (धर्मीं) च्या गुणांतला फरक कळत नाहीं, असें तुम्ही दाखविलेंच आहे. सामान्य अलंकारांत, कुणाच्या मतें, गुण वगुणी या दोहोंचाही आहे. सामान्य अलंकारांत, कुणाच्या मतें, गुण व गुणी या दोहोंचाही आपापसांतील (म्ह० गुणाचा गुणाहून व गुणीचा गुणीहून) भेद कळत नाहीं; तर दुसर्‍या कुणाच्या मतें कुठें (वरीलप्रमाणेंच) गुणगुणीचा (आपापसांत ) फरक कळत नाहीं, तर कुठें, केवळ दोन (सद्दश) वस्तूंच्या दोन भिन्नजातींमधील फरक कळत नाहीं. (असें दोन प्रकार). तदगुण अलंकारांतही  (दुसर्‍य़ा गुणाशीं) तद्रूप होणार्‍या गुणाहून, (त्याला) स्वत:शीं एकरूप करणर्‍या त्या दुसर्‍या गुणाचा भेद कळत नाहीं. यावर (वरील शंकाकारविरुद्ध) कुणी म्हणतील कीं, “ह्या तिन्ही अलंकारांत (भेद न कळणें हा प्रकार जरी साधारण असला तरी) प्रत्येकांत (स्वत:चा असा कांहीं तरी) अवांतर भेद असल्यामुळें, त्या तिघांनाही एक अलंकार मानणें योग्य होणार नाहीं;” पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण (असें म्हटलें तर) मग, लुप्तोपमा वगैरेहून पूर्णोपमा वगैरेंना निराळे अलंकार मानायचा प्रसंग येईल. तेव्हां ‘भेदाग्रह’ हा एकच अलंकार मानून, त्याचे, मिलित इत्यादि तीन अवांतर भेद आहेत, असें मानणेंच योग्य आहे; हे तीन निरनिराळे अलंकार आहेत, असें (मानणें योग्य) नाहीं.”
यावर (ह्या शंकेवर) आमचें (म्ह० जगन्नाथाचें) म्हणणें असें :--- मग (ह्याच न्यायानें) अभेद सुद्धां, एकच अलंकार आहे (असें म्हणा); व त्याचे (च) अवांतर भेद, रूपक, परिणाम, अतिशयोक्ति इत्यादि अलंकार होत, असेंही म्हणणें शक्य आहे. ‘रूपकादि अलंकारांत (प्रत्येकांत) चमत्काराच्या बाबतींत फरक आहे.’ (असें म्हणाल) तर प्रस्तुत मीलितादि तीन अलंकारांचीही ती स्थिति आहे.
आतां कुवलयानंदकारांनीं, “मीलित अलंकाराच्या रीतीनें, (दोन सद्दश वस्तूंमधील) भेद कळेनासा झाला असतां, कांहीं कारणानें, तो भेद कळून आला तर (त्या ठिकाणीं) मीलिताच्या उलट उन्मीलित नांवाचा अलंकार होतो व सामान्य अलंकाराच्या सरणीप्रमाणें दोन सद्दश वस्तूंच्या जातींचा फरक कळेनासा झाला असतां, कांहीं कारणानें, त्या वस्तूमधील भिन्न जातींचें ज्ञान झालें तर, तेथें सामान्याच्या उलट विशेषक अलंकार - असे दोन अलंकार होतात. यांचीं अनुक्रमें उदाहरणें :---
‘तुझ्या यशानें हिमालय माखला गेला असतां, त्याला, देव, गारठयामुळें, ओळखतात.’
(व) ‘चंद्र उगवला असतां, कमळें व मुखें निरनिराळीं दिसू लागलीं.”
असें जें म्हटलें आहे तें बरोबर नाहीं. कारण हे दोन (नवे) अलंकार अनुमान अलंकारांतच बसत असल्यानें (त्यांचें काम अनुमानालंकारानेंच भागत असल्यानें), त्यांना निराळे अलंकार मानतां येत नाहीं. (मानण्याची जरूर नाहीं.) यावर कुणी म्हणतील, “ह्या ठिकाणीं, (गारठयावरून हिमालय प्रत्यक्ष स्पष्टपणें ओळखूं येत असल्यानें, व साध्य हिमालय धडधडीत हजर असल्यानें, अनुमिति होऊच शकत नाहीं; अर्थात येथें अनुमान अलंकार आहे, असें म्हणणें शक्य नाहीं.” पण असें म्हणणें योग्य नाहीं. कारण (आम्ही केलेल्या) अनुमानालंकाराच्या लक्षणाच्या वाक्यांत आलेल्या अनुमिति या पदाचा अर्थ ‘साध्याशीं व्याप्तिसंबंधानें युक्त असा हेतु, पक्षाचा धर्म आहे, हें जें ज्ञान, त्या ज्ञानापासून (म्ह० हेतूच्या ज्ञाना पासून, हेतूपासून नव्हे,) उत्पन्न झालेलें ज्ञान’ असा आम्ही करतो. आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणीं (म्ह० अनुमानाच्या लक्षणांत) दुसरा एक पक्ष सांगितला आहे. प्रस्तुत ठिकाणीं, विषयाचें (म्ह० विशिष्ट हेतूचें) ज्ञान ज्याचें करण आहे अशा प्रत्यक्ष ज्ञानालाच आम्ही येथें अनुमिति म्हणतो. प्रमाणाप्रमाणांत फरक सांगणारे नैयायिक ज्या मार्गाचा अवलंब करतात तोच मार्ग (आम्हा) आलंकारिकांचा असता तर, ‘प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप नसणारी तीद् अनुमिति’ असा पारिभाषिक अर्थ आम्ही सांगितला असता. ‘यासारख्या तुम्ही केलेल्या अर्थानें, आदरणीय (प्राचीन) नैयायिकांनीं, अनुमिति या पदाचा प्रयोग केलेला नाहीं,’ असेंही तुम्हांला म्हणतां येणार नाहीं. आणि (समजा, प्राचीनांनीं अनुमिति पदाचा, आमच्यासारखा, पारिभाषिक प्रयोग नसला केला) तरी सुद्धां, तुम्ही ज्याप्रमाणें ‘उन्मीलित’ ह्या (अलंकारा) ची (नवी) परिभाषा (म्ह० संज्ञा, नांव) काढली तशी अनुमिति पदाच्या अर्थाची (नवी) परिभाषा काढायला (आम्हांला) मुळींच हरकत नसावी.
अथवा (तुमच्या म्हणण्याप्रमाणें) ‘अनुमितित्व ह्या जातीनें युक्त जी, ती अनुमिति’ (असें लक्षण) असू दे (ना); तरी सुद्धां, प्रस्तुत (‘हिमाद्रिं त्वद्यशो०’ इत्यादि) श्लोकार्धांत, (शीतगुणावरून होणार्‍या हिमालयाच्या प्रत्यक्ष ज्ञानानें) प्रतिबंध केल्यामुळें, अनुमिति होत नसली तरी, त्या नौमितीचें करण जें शैत्यज्ञान तें निर्विघ्नपणें होत असल्यानें (येथें) अनुमानाला (अनुमान आहे असें म्हणायाला) कसलीच अडचण नाहीं. अग्नि (तर) आहे, आणि (तरी सुद्धां) मणी, मंत्र वगैरेंमुळें, (त्यापासून) दाह (तर) होत नाहीं; पण म्हणून कांहीं हा (अग्नी) दाहाचें करण नाहीं, असें कांहीं म्हणतां येणार नाहीं. (कारण) करणानें फळ हमखास दिलें तरच त्याला करण म्हणावें असें नसून, त्या करणानें केलेला [केवळ] व्यापारच करणाच्या करणत्वाला कारण होतो.
वरील विवेचनानें,
“विसेषगुणाचें (प्रत्यक्ष) दर्शन, दुसर्‍या तर्‍हेच्या ज्ञाआला (म्ह० साध्याच्या अनुमितीला) प्रतिबंधक होत असल्यानें, चक्षु: संयोग वगैरे स्वत:च्या सामग्रीमुळेंच (साध्याचें) प्रत्यक्ष ज्ञान होत असल्यानें, (तें साध्याचें प्रत्यक्ष) अनुमितीचे करण (म्ह० अनुमानरूप करण) मानायला कसलेंही प्रमाण नाहीं; आणि म्हणूनच तुम्ही जी परिभाषिक अनुमिति येथें होते म्हणतां, तीच जर नाहीं; तर मग त्याचें करण जें अनुमान तें कुठून असणार ?” या (विरोधकांच्या) म्हणण्याचेंही खंडन झालें.
“आतां, तदगुणाच्या विशिष्ट स्वरूपाप्रमाणें, दोन भिन्न वस्तूंतील भेद कळेनासा झाल असतांही (तो मागून कळला तर) उन्मीलित अलंकार होतो. उदा०
“हें श्रीनृसिंह राजा, नृत्य करणार्‍या शंकराच्या प्रचंड हास्याच्या विस्ताराशीं सद्दश अशा तुझ्या यशांनीं त्रैलोक्याला सगळीकडून शुभ्र करून टाकलें असतां, त्या यशांनीं शुभ्र झालेला जो लक्ष्मीचा प्रियकर (विष्णु) त्याला, स्वत:च्या नाभि - कमलाच्या सुगंधाची समृद्धि प्राप्त झाली नसती तर, हुडकून काढणें, देवांना केव्हांही शक्य झालें नसतें.”
हें कुवलयानंदकारांचें म्हणणें बरोबर नाहीं. “तदगुण अलंकारांत, दोन गुणांमधील भेद कळेनासा होतो; पण ते दोन गुण ज्या दोन वस्तूंचें, त्या दोन वस्तूंमधील भेद कळेनासा होतो, असें मात्र नाहीं; ही गोष्ट निर्विवाद आहे. तुम्ही उदाहरण म्हणून दिलेल्या ‘नृत्यद्भर्गाट्ट०’ इत्यादि श्लोकांत, नाभीच्या सुगंधावरून ‘हे भगवान विष्णु’ ह्या रूपानें भगवंताचे ज्ञान झालें असलें तरी, त्याच्या नील वर्णाशीं (राजाच्या) यशाचा शुभ्र रंगाचा असणारा भेद (अजूनही) कळत नसल्यानें, तदगुण अलंकार कायमच राहील. ‘मग तदगुणाचा (तुमच्या मताप्रमाणें) प्रतिस्पर्धी उन्मीलित आहे,’ असें तुम्ही कसें म्हणतां ?
आतां, “एका गुणयुक्त वस्तूहून, जवळ असलेल्या दुसर्‍या गुणयुक्त वस्तूचा भेद न कळणें हाच तदगुणालंकाराचा प्राण (प्राणभूत वैशिष्टय)”  असें तुम्ही म्हणत असला तरी सुद्धा, प्रस्तुत श्लोकांत, तदगुण कायमच आहे, कारण ‘भगवान (विष्णु) शुभ्राहून निराळ्या म्ह० निळ्या रंगाचे आहेत’ असें ज्ञान होण्याचा उपाय (ह्या लोकांत सांगितलेला,) दिसत नाहीं, (तुम्ही म्हणाला) ‘जेथें भगवत्त्व असेल तेथें तेथें नीलत्व हें असणारच, असें व्याप्तियुक्त भगवंताचें ज्ञान नीलत्वाच्या ज्ञानाला उपाय होऊ शकेल.’ पण तेंही बरोबर नाहीं. कारण विष्णु पूर्वीं नीलवर्ण असले तरी, विशिष्ट कारणाच्या प्रभावानें आतां श्चेत झाले आहेत असे, प्रत्यक्ष प्रमाणाच्या सहायानें होणारें ज्ञान नाहीसें होणार नाहीं. (अशी वस्तुस्थिति आहे) म्हणूनच, तुमचा आधार जे अलंकारसर्वस्वकार त्यांनीं उन्मीलित व विशेषक या दोन अलंकारांची चर्चाच केली नाहीं. आणि म्हणूनच प्राचीनांनीं अलंकाराचे विभाग पाडले आहेत, त्यांच्यात, आतांच पहिल्यांदा (तुम्ही) कल्पिलेल्या (त्या) सगळ्या अलंकारांचा समावेश करणें शक्य आहे. (हा आमचा) निराळा (नवा) अलंकार आहे, अशा डौलदार भाषेंत, स्वत:चें मर्यादेवांचूनचे वागणें जाहीर करणें (तुमच्या सारख्या) मर्यादा पाळणार्‍या सभ्य गृहस्थांना शोभत नाहीं.
“वेताच्या सालीसारखी ज्यांची (अंग) कांति आहे, अशा तरुणींच्या कानांच्या टोकावरून गालावर उतरलेलीं नवीं चाफ्याची फुलें,  त्यांच्यावर भुंगे र्लालेनें झेपावले नसते तर, (हीं चांफ्यांचींच फुलें म्हणून) कुणाला ओळखता आलीं असतीं ?”
हें सामान्य अलंकाराचें उदाहरण देऊन, काव्यप्रकाशांत म्हटळें आहे :--- “ह्या ठिकाणीं भृंग ह्या (नंतरच्या) दुसर्‍या निमित्तामुळें तरुणींचा गालव चाफ्याचीं फुलें यातील भेद कळला असला तरी, तो त्या दोहोंचा पहिल्यानें वाटणारा अभेदा दूर करू शकत नाहीं; कारण, प्रथम झालेली अभेदाची प्रतीति टाकून देता येणार नाहीं.” पण (हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण) या श्लोकांत नंतर होणार्‍या (गाल व चाफ्याचीं फुलें या मधील) भेदाच्या ज्ञानामुळें पूर्वीं झालेली त्यामधील अभेदाची प्रतीति झाकून गेल्यानें, ती चमत्कार करू शकणार नाहीं; पण नंतर होणार्‍या भेदप्रतीतीमुळेंच चमत्कार उत्पन्न होणार. तेव्हां त्या (चमत्काराला कारण होणार्‍या) प्रतीतीला अनुसरूनच अलंकाराला नांव देणें योग्य ठरेल. असें नाहीं मानलें तर, व्यतिरेक अलंकाराला उपमा म्हणण्याचा प्रसंग येईल.
आतां विरोधाभास अलंकारांत प्रथम विरोधाची प्रतीति होते; व नंतर विरोधपरिहाराची (म्हणजे विरोधाच्या आभासाची) प्रतीति ओते, ही गोष्ट खरी; पण त्या दोन्ही प्रतीति मिळून विरोधाभास अलंकार होत असल्यानें, तो विरोधाभासच चमत्कार उत्पन्न करतो.


येथें रसगंगाधरातील सामान्यालंकार प्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP