प्रहर्षण अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“इष्ट वस्तूला उद्देशून प्रयत्न केला नसतांही साक्षात (सरळ) त्या इष्ट वस्तूचा लाभ होणें हा प्रहर्षण अलंकार.
पुढील तीनही प्रकारच्या प्रहर्षणाला लागू पडणारें हें सामान्य लक्षण आहे. ह्या तिघांपैकीं ‘अचानकपणें, इष्ट वस्तूचा लाभ होणें हा पहिला प्रकार. इष्ट वस्तु मिळावी म्हणून प्रयत्न करीत असतां, इच्छिल्या पेक्षां अधिकाची प्राप्ति होणें हा दुसरा प्रकार; व उपाय सांपडावा म्हणून प्रयत्न करीत असतां सरळ फळाचाच लाभ होणें हा तिसरा प्रकार. हा तिसरा प्रकार वरील व्याख्येंत यावा म्हणून व्याख्येंत मुद्दाम ‘साक्षात’ असें म्हटलें आहे.
क्रमानें उदाहरणें :---
“गळ्याला मिठी मारु पाहणार्‍या प्रियकराला रागाच्या भरांत एका सुंदरीनें (मृगनयेनें) दूर लोटलें असतां, तो  (बिचारा) तोंड वळवून निजला; तेव्हां ‘ह्याला मूर्च्छा तर आली नाहीं ना’ म्हणून घाबरुन, तिनें त्याचें चुंबन घेतलें, व खूप वेळ त्याच्या गळ्याला मिठी मारून बसली.”
ह्या ठिकाणीं कसलाही यत्न केला नसूनसुद्धा इष्टलाभ झाला आहे.
“रतिक्रीडा मंदिरांत आल्यावर हलकेच खुणवून (प्रियेच्या) मैत्रिणींना मी बाहेर घालविलें, व फुरंगुटून निजलेल्या माझ्या प्रियेला (कमलाक्षीला) मी पंख्यानें वारा घालूं लागलों. तिला हें सगळें कळलेंच होतें. तरीपण जसें कांहींच माहीत नाहीं, असें दाखवून, तिनें आपले डोळे मिटल्याचें सोंग केलें; अन ‘दमलीस ग बाई’ असें म्हणून तिनें आपल्या छातीवर माझा हात ठेवलान.”
येथें रुसलेल्या स्त्रीचा रुसवा घालवायचा यत्न करीत असतां तिचा रुसवा घालवून मिळणार्‍या सुखापेक्षां जास्त सुख, तिनें आपल्या हातानें त्याचा (प्रियकराचा) हात घेऊन तो स्वत:च्या स्तनावर ठेवल्यामुळें,  त्याला मिळालें. ह्या ठिकाणीं प्रहर्षणाचा तिसरा प्रकार होतो, अशी शंका घेऊ नका. कारण पंख्यानें वारा घालण्याच्य वेळीं स्त्रीचा रुसवा घालवायचा हेंच (प्रियकराच्या मनांतलें) मुख्य फळ असल्यानें तिच्या कुचाचा स्पर्श वगैरे जें दुसरें फळ तें (त्या वेळीं) त्याच्या मनांतच नव्हतें.
अथवा हें उदाहरण,
“कवडयांच्या लोभानें ताक विकायला रात्र पडेपर्यंत फिरणार्‍या (एका गवळ्याच्या मुलीला रस्त्यात एक उंची इंद्रनीलमणी सांपडला.”  ह्या ठिकाणीं प्रहर्षणाचा दुसरा प्रकार स्पष्टच आहे. याशिवाय एकमेकांना अनुरूप नसणार्‍या दोन वस्तूंचा संबंध येणें हा विषम अलंकारही येथें आहे. येथें महेंद्रमणी या शब्दाचा वाच्यार्थ विषयी व अतिशयोक्तीनें होणारा श्रीकृष्ण हा लक्ष्यर्थ हे दोन्हींही प्रहर्षणाला अनुकूल आहेत. कारण इच्छिलेल्यापेक्षां अधिक (किंमतीची) वस्तू मिळणें ही गोष्ट इंद्रनीलमणि व भगवान् श्रीकृष्ण या दोघांच्याही बाबतींत सारखीच आहे. पण विषमालंकारांत मात्र इंद्रमणि हाच विषयीकोटीत होणारा अर्थच केवळ, उपयोगी आहे. कारण कवडया जिला पाहिजेत, तिचा कोटी किंमतीच्या इंद्रनील मण्याशीं संबंध येणें, हे जसें जुळत नाहीं, आणि म्हणूनच हा विषम अलंकार होतो, तशी भगवान् श्रीकृष्णाचा संबंध गौळ्याच्या मुलीशीं येणें ही गोष्ट अननुरूप  नाहीं, (कारण दीनावर दया करणें हें भगवंतांना साजेसेंच आहे) म्हणून येथें विषम नाहीं. “अज्ञान्याशीं भगवंताचा संबंध येणें ही गोष्ट न जुळणारी आहे, आणि म्हणून येथें विषम माना” असें म्हणू नका; कारण ताक विकणारी असें म्हटल्यानेंच, तिचें अज्ञानित्व सिद्ध होत असल्यानें, कवडयांचा लोभ धरणें हें (आणखी एक अनुरूपतेचें) कारण सांगण्याचें मुळींच प्रजोजन नव्हते.
ज्या प्रकारच्या वस्तूची इच्छा असेल त्याच प्रकारची वस्तू मिळण्याकरतां यत्न करीत असतां तशीच ती वस्तु मिळत असेल (म्ह० अधिक किंमतीची नसून ज्या प्रकारची इष्ट वस्तु मिळावी म्हणून यत्न करावा त्याच प्रकारची वस्तु त्या प्रयत्नानें मिळाली) तर, सम अलंकारच हाणोर.
आतां तिसर्‍या प्रकाराचें उदाहरण :---
“तिच्या भेटीच्या उपायाचा विचार करण्याकरतां मी तिच्या मैत्रिणींच्या घरीं गेलों. तों ती माझी (सुंदर डोळ्याची) प्रिया गौरीची पूजा करायला आलेली मला तेथेंच दिसली.” ह्या ठिकाणीं तिच्या भेटीचा उपाय शोधण्याकरतां तिच्या मौत्रिणीच्या घरीं जाण्याचा यत्न केला असतां, त्या (यत्ना) नें साक्षात तिचीच भेट झाली. आतां “इच्छिल्यापेक्षां अधिक (किंमतीची) वस्तु मिळणें हा (दुसरा) प्रहर्षण” असे प्रहर्षणाच्या दुसर्‍या प्रकाराचें लक्षण करून त्याचें जें खालील उदाहरण कुवलयानंदकारांनीं दिलें आहे :---
“चातक पक्षी तहानेमुळें तीनचार थेंबांचीच मेघाजवळ याचना करतो; आणि तो मेघ अखिल विश्व पाण्यानें भरून टाकतो. अहाहा, काय ही मोठयांची उदारता !”
तें चुकीचें आहे. इच्छिल्यापेक्षां अधिक वस्तूची प्राप्ति ह्या प्रहर्षणाच्या, कुवलयानंदकारांनीं केलेल्या लक्षणांत, संसिद्ध या शब्दाचा  ‘नुसती प्राप्ति’ हा अर्थ घेणें बरोबर नाहीं, कारण प्राप्ति झाली तरी एखादी वस्तु इच्छिणार्‍याला ती वस्तु मिळाल्यानें अत्यंत संतोष होत नसेल तर, प्रहर्षण ह्या अलंकाराच्या नांवाची नीट संगती  लागणार नाहीं. म्हणून वरील श्लोकांत तो प्रहर्षण अलंकारच मानतां येणार नाहीं; परंतु वस्तूच्या लाभानें अतिशय संतोष होत असेल तरच तेथें प्रहर्षण अलंकार मानतां येईल. या द्दष्टीनें पाहतां प्रस्तुत उदाहरणांत चातकाला तीनचार थेंब पाहिजे असतां, मेघानें आपल्या पाण्यानें सारें विश्व भरून टाकलें तरी पण, त्यामुळें चातकाला कांहीं जास्त हर्ष झाला नाहीं; तेव्हां प्रहर्षण हा अलंकार ह्या ठिकाणीं कसा होऊ शकेल ? इच्छिलेल्यापेक्षां अधिक देण्यांत, दात्याचा उत्कर्ष होतो; हें मात्र नाकबूल करतां येणारा नाहीं. म्हणूनच ‘हन्त हन्त’ (अहाहा) इत्यादि अर्थान्तरन्यास अलंकार करून, त्या उत्कर्षाचा येथें परिपोष केला आहे. पण आम्ही दिलेल्या “लोभाद्वराटिकानां” या उदाहरणांत इच्छिल्यापेक्षां अधिक वस्तु मिळाल्यानें इच्छिणाराला जास्त संतोष झाला आहे या द्दष्टीनें, तेथें प्रहर्षण अलंकार योग्यच आहे.

येथें प्रहर्षण अलंकाराचें प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP