विकल्प अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“दोन विरुद्ध पदार्थांची आळीपाळीर्ने प्राप्ति होणें, हा विकल्प.” (एकाच धर्वीवर) आपापल्या प्रमाणांनीं अथवा कारणांनीं (आपल्याला दाखविणार्‍या प्रमाणांनीं) प्राप्त झालेले आणि म्हणूनच, सारख्याच तोलाचे (बळाचे) असे दोन विरुद्ध धर्म, परस्परविरूद्ध असल्यामुळेंच एका वेळीं एकाच धर्मीवर राहणें अशक्य असल्यानें, त्यांची (त्या धर्मीवर) शेवटीं आळीपाळीनेंच प्राप्ति होणार हें उगड आहे. हा अलंकार समुच्चयाच्या थेट विरुद्ध आहे,  जसा व्यतिरेक उपमेच्या थेट विरुद्ध आहे तसा. ह्या ठिकाणीं विकल्पानें (म्ह० आळीपाळीनें) येणार्‍या दोन पदार्थांत असलेलें साद्दश्य, हें या अलंकाराचें बीज आहे; कारण साद्दश्य घेतल्यानेंच या अलंकारांत चमत्कार उठून दिसतो. नाहींतर (म्ह० दोन विकल्पित पदार्थांत विकल्प आहे, असें म्हणावें. उदा) :--- ‘जीवनं मरणं वाऽस्तु नैव धर्मं त्यजाम्यहम’ (जीवन किंवा मृत्यु कांहीं येवो, मी धर्म मुळींच सोडणार नाहीं.) या ठिकाणीं जीवन व मरण या दोहोंत साद्दश्याची प्रतीति नाहीं. विकल्पालंकाराचें उदा० :--- “सीतेला अर्पण कर (परत कर) किंवा प्राण अर्पण कर (मर), गिधाडांना तृप्त कर (मर) किंवा ब्राम्हाणांना तृप्त कर. (राज्य कर.) यमाचा आश्रय कर (मर) किंवा रामाचा आश्रय कर (शरण जाऊन जग); तुला पाहिजे तसें वाग.”
या ठिकाणीं अर्पण करणें, तृप्त करणें व आश्रय घेणें यांच्या (या क्रियांच्या) ठिकाणीं, स्वमानाचें रक्षण करणें हें प्रमाण मानल्यास कर्म म्हणून अनुक्रमें प्राण, गृध्र व यम या तीन पदार्थांची (धर्मरूप पदार्थांची) प्राप्ती होते; मानल्यास (म्ह० प्राण रक्षण करणें हें केव्हांही योग्य आहे ही प्रमाण गोष्ट मानल्यास अनुक्रमें, कर्म म्हणून सीता, द्विज व राम या तीन (धर्मरूप) पदार्थांची प्राप्ति होते. या दोन परस्परविरुद्ध (धर्मरूप) पदार्थांची (उदा० एकाच अर्पणक्रियेवर प्राण आणि सीता या दोन धर्मांची) प्राप्ति एकाच वेळीं (एकच क्रियारूप धर्मीवर) होणें शक्य नसल्यानें, त्यांची आळीपाळीनें प्राप्ति (मानली) पाहिजें. या ठिकाणीं आलेल्या कर्मांच्या जोडयांत, (उदा० अर्पणक्रियेचीं दोन कर्में प्राण व सीता, या जोडींत,) तीं दोन्हीं कर्में, एकाच क्रियेचीं फलें असणें या समान धर्मामुळें (उदा० अर्पण क्रियेचीं फलें म्हणून हीं दोन्हींही कर्में) सारखीं असल्यानें, परस्परांशीं सद्दश आहेत. (अर्थात या दोन कर्मांत साद्दश्य आहे.)
यावर शंका अशी :--- “वरील (प्राणानर्पय० या श्लोकांत) अर्प, तर्प वगैरे धात्वर्थांचे फलरूप धर्म असणें, या द्दष्टीनें दोन कर्मांत जसें साद्दश्य प्रतीत होतें तसें, ‘जीवनं मरणं वास्तु०’ या श्लोकांतही अस्तु यांतील अस या धातूचा सत्ता धर्म जीवन व मरण या दोहोंना एकच असल्यानें, त्या जीवन व मरण या दोन (कर्तृरूपी) पदार्थांतही साद्दश्य प्रतीत होणें योग्य आहे” (यावर उत्तर :---) प्रतीत होणें योग्य असेल, पण साद्दश्य प्रतीत होत नाहीं (हेंही तितकेच खरें.). “कां हो, कां नाहीं (साद्दश्य) प्रतीत होत ?” असें विचाराल तर, यावर, “ कवीचे ह्या ठिकाणीं (साद्दश्य सूचित होतें असें असांगण्याचें० तात्पर्य नाहीं.”  हें घ्या प्रश्नाला उत्तर. ह्या श्लोकांत, मरण व जीवन समान आहे, असें सांगण्याचा कांहीं कवींचा अभिप्राय नाहीं; तर ‘विषं भुङक्ष्व मा चास्य गृहें भुङथा:’ (त्याच्या घरीं जेवण्यापेक्षां, विष खाल्लेस तरी बेहेत्तर - विष खाऊन मरणें बरें. ) या वाक्यांतल्या अर्थाप्रमाणें (तात्पयार्थाप्रमाणें) ‘धर्मपालन करण्यानें मरण आलें तरी बेहेत्तर (जास्ते चांगलें) पण जगून धर्म सोडणें नको.’ असें सांगून निषिद्ध जो धर्मत्याग त्याच्याविषयांचा अत्यंत तीव्र द्वेष (तिटकारा)  सूचित करणें हें श्लोकाचें तात्पर्य आहे. व हा धर्मत्यागाविषयींचा तिटकारा दाखविण्याकरतांच, मरण हा शब्द श्लोकांत घातला आहे. मरण (व जीवन या दोन) (कर्तृरूपी) अधिकरणावर सत्ता हा समान धर्म (हा) आहे,  असें येथें सांगायचें नसल्यानें, जीवन व मरण ह्या दोहोंत येथें साद्दश्य उत्पन्नच होत नाहीं.
कुठें कुठें लुप्त असलेला समानधर्म घेऊनही साद्दश्य सूचित झालें असतां, हा विकल्प अलंकार होतो. उदा० :--- भगवन्दीतेंत “मेलास तर स्वर्गाला जाशील, जिंकलेंस तर पृथ्वीचा उपभोग घेशील.”  (भ. गी. २।३७)
ह्या श्लोकांत महीभोग (म्ह० पृथ्वीचा उपभोग) व स्वर्गप्राप्ति हीं दोन्हींही उत्तम असणें या समानधर्मामुळें (उत्तमत्व या समानधर्मामुळें) त्या दोहोंमधीला साद्दश्य (कवीला) सांगायाचें आहे. ह्या ठिकाणीं, “महीचा भोग (महीकर्मकभोग) व स्वर्गाची प्राप्ति (म्ह० स्वर्गकर्मिका प्राप्ति) ह्या दोन धात्वर्थांच्या मध्यें विकल्प आहे.” असें कांहींचें म्हणणें, तर “महीकर्मक भोगाचा आश्रय जो कर्ता प्रथमान्त व स्वर्गकर्मक प्राप्तीचा आश्रय जो कर्ता प्रथमान्त या दोन आख्यातार्थांच्या (आश्रय या आख्यातार्थांच्या) मध्यें विकल्प आहे” असें दुसर्‍यांचें म्हणणें. कांहीं झालें तरी मही व स्वर्ग या दोहोंत येथें विकल्प नाहीं हें निश्चित; कारण मही व स्वर्ग हीं कर्मरूपी कारकें असल्यानें  त्यांचा कारक म्हणून क्रियांशीं (प्राप्ति व भोग या क्रियांशीं अनुक्रमें) अन्वय झाल्याशिवाय त्यांच्यांत विकल्प मानणें योग्य नाहीं.
“(तें असो. पण० या श्लोकांतील प्राप्ति व भोग ह्या धात्वर्थामध्यें दोन्हीही क्रियांचा एकच कर्ता (अर्जुन हा) असणें, हा साधारणधर्म येथें (हत: यांतील कर्ता दाखविणार्‍या विभक्तीनें) सांगितला असल्यानें, येथें साधारणधर्म लुप्त आहे असें तुम्ही कसें म्हटलें ?” (या शंकेवर उत्तर असें :---) कर्तारूपी साधारणधर्म घेऊन येथें सुंदर साद्दश्य उत्पन्नच होणार नाहीं. नाहींतर (म्ह० कर्तारूपी साधारण धर्मानें सुंदर साद्दश्य होतें असें मानलें तर, ‘हतो वा नरकं गत्वा जित्वा वा भोक्ष्यसे महीम्’ या वाक्यांतही (कर्तारूपी साधारण धर्म एक असल्यानें) साद्दश्याची प्रतीति होते, असें म्हणण्याचा प्रसंग येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP