पर्याय अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


दुसर्‍या पर्यायाचें उदाहरण :---
“दूर अंतरावरून आश्चर्यानें संथ झालेले; नंतर थोडासा परिचय झाल्यावर म्हणजे ओळख पटल्यावर चांचल्यानें युक्त, नंतर चोहोकडे कांति फेकणारे आणि शेवटी वडील मंडळींत मी एकदम जाऊन बसलों असतां, त्या कमलनयनेंचें डोळे (बाहुल्या) लाजेनें सारखे फिरत आहेत.”
एका उघडया जागेवर वडील मंडळींची सेवाचाकरी करीत बसलेल्या, व बाहेरगांवीं गेलेला आपला प्रियकर आतां येईल अशी कल्पना नसतांही (अशी शक्यता नसतांही) त्याला अचानक पाहणार्‍या, अशा एका स्त्रीचे डोळे हें या श्लोकांत एकच अधिकरण असून, त्या अधिकरणावर नयनांचीं विशेषणें म्हणून आलेले स्तिमितत्व (संथपणा) वगैरे धर्म हे (त्या आधिकरणावर) राहणारे पदार्थ (आधेय) आहेत. हे आधेयपदार्थ, नयन या आधारावर एकाच वेळीं राहणें शक्य नसल्यानें व त्या आधेयरूपी धर्मांचीं कारणें ही क्रमानें घडत असल्यानें, त्या आधेयांचा क्रम येथें सांगितला आहे.
“प्रथम कमळाच्या कळीएवढे दिसणारे (कळीची शोभा धारण करणारे) व नंतर चेंडूची शोभा अनुभविणारे (धारण करणारे) तुझे स्तन हे प्रिये ! आजकाल हत्तीच्या गंडस्थळाची लीला धारण करण्याचा यत्न करीत आहेत !”
या ठिकाणीं स्तन जरी दोन असले तरी कुचत्व या सामान्य धर्मानें ते एक समजून त्यांना एक अधिकरण केलें (मानलें); व त्यावर त्यांच्या आकारांत होणारे विशेष फरक हें अनेक आधेय, राहत असल्याचें वर्णिलें आहे. आतां स्तनाच्या पूर्वींच्या स्वरूपापेक्षां (आकारापेक्षां) नंतरच्या स्वरूपांत उत्कर्ष आहे असें वाटत असेल तर, ह्या ठिकाणीं एक विषय जो आकार, त्या एकच विषयाच्या द्दष्टीनेम होणारा सार अलंकारही आहे, असें म्हणा; (आणि येथें पर्यायाच्या जोडीला सार मानला तरी) पर्याय व सार यांच्या विषयांत फरक असल्यामुळें ते येथें परस्परांचा बाध करीत नाहींत.
आतां, “हे कृशांगी, तुझ्या सुंदर ओठांतच (शब्दश:, तोंडल्याप्रमाणें लाल ओठांत) पूर्वीं राग (लाल रंग हा अर्थ घ्या) दिसत होता; पण हें मृगनयने, तो आतां तुझ्या ह्रदयांतही दिसत आहे. (येथें राग - प्रेम हा दुसरा अर्थ घ्यावा.)”
ह्या श्लोकांत विकास या नांवाचा पर्यायाचा एक प्रकार आहे, असें जें कुवलयानंदकारांनीं म्हटलें आहे, तें बरोबर नाहीं. एका वस्तूशीं असलेला संबंध सुटल्यावर, दुसर्‍या वस्तूशीं संबंध होणें, याच अर्थीं लोकांत पर्याय या शब्दाचा प्रयोग करतात, ‘श्रोणीबन्धस्त्यजति तनुतां सेवते मध्यभाग:’ या काव्यप्रकाशकरांनीं पर्यायाचें म्हणून दिलेल्या उदाहरणांत, व ‘प्रागर्णवस्य ह्रदये०’ या अलंकारसर्वस्वकारांनीं दिलेल्या पर्याया उदाहरणांत, तसेंच दिसते. (म्ह० एका वस्तूशीं असलेला संबंध सुटल्यावरच दुसर्‍या वस्तूशीं संबंध होणें या अर्थीं, पर्याय शब्दाचा उपयोग केलेला दिसतो.) शिवाय य पर्याय अलंकाराच्या लक्षणांत आलेल्या ‘क्रम’ या शब्दानेंही तोच अर्थ सांगावयाचा आहे. तेव्हा या (बिंबोष्ठा एव० या) श्लोकांत एकविषयक सारालंकार आहे असें म्हणणेंच योग्य आहे. या एकविषयक सारालंकाराला रत्नाकर वगैरे ‘वर्धमानक अलंकार’ मानतात, त्याचा तर आपण महाशयांनीं उल्लेखच केला नाहीं ! ह्या ठिकाणीं हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं :---
“प्रथम (श्री विष्णूंच्या) पायांचें चुंबन घेऊन नंतर पोटर्‍या, गुढघे, मांडया, बेंबी व छाती ह्यांना अलिंगन दिल्यावर (आतां) माझी भावन विष्णूंच्या मुखकमलाच्या शोभेच्या ठिकाणीं क्रीडा करो.”
ह्या ठिकाणींही पर्याय नाहीं. कारण येथें उत्तरोत्तर वस्तूसी संबंध पूर्वीपूर्वींच्या वस्तूंना सोडून देऊन झालेला आहे, असें कवीला सांगावयाचें नाहीं, तर ह्या ठिकाणीं, मुखाविषयींची भावना म्हणजे मुखापर्यंतच्या सर्व अवयवाविषयींची भावना (माझ्या मनांत) आहे, असा कवीचा अभिप्राय आहे; केवळ मुखाविषयींच (शेवटीं) भावना आहे, असें कवीला अभिप्राय आहे; केवळ मुखाविषयींच (शेवटीं) भावना आहे, असें कवीला सांगायचें नाहीं. म्हणून कवीनें खेलतु (क्रीडा करो) असें म्हटलें आहे. (म्ह० क्रीडा ही विस्तृत भागावर संभवते,  केवळ एकाच जागेवर संभवत नाहीं; तेव्हां क्रीडतु यानें सर्वांगावर भावना राहो असा अभिप्रय;) कवीनें येथें ‘मज्जतु’ (बुडून जावो) असें म्हटलें नाहीं. (तसें म्हटलें असतें, तर त्याचा अर्थ, एकाच ठिकाणीं केंद्रित होऊन राहो, असा झाला असता.)
त्याचप्रमाणें. “पूर्वी ती (सुंदरी) प्रियकराच्या डोळ्याला बिलगली, नंतर त्याच्या मनांत बुडाली; आणि नंतर त्याच्या सर्व संवेदनांचा विषय झाली.”
या ठिकाणींही पर्याय अलंकार नाहीं. (कारण पूर्वींच्या वस्तूंना सोडून, नंतरच्या वस्तूंचा आश्रय घेणें हें येथें अभिप्रेत नाहीं.) तसेंच सारालंकारही येथें नाहीं; कारण उत्तरोत्तर उत्कर्ष अथवा अपकर्षही येथें दिसत नाहीं. तेव्हां अशा ठिकाणीं, शुद्ध क्रमालंकार असा एक निराळाच अलंकार मानावा.” असेंही कुणी (म्ह०० रत्नाकरकार) म्हणतात.
येथें ही दुसरीही गोष्ट ध्यानांत ठेवावी :--- “ज्या ठिकाणीं आधार, व आधेय या वस्तु, त्या दोहोंचा संबंध व त्यांचा क्रम या सर्वांपैकीं कुठेंतर कविलपनेंची आवश्यकता असेल (भासेल), तेथेंच हा पर्याय अलंकार होतो. पण ज्या ठिकाणीं वरील सर्वच बाबतींत लोकसिद्धत्व असेल (म्ह० लोकांत येथें क्रम वगैरे आहे, असें प्रसिद्ध असेल) येथें कोणताच अलंकार होणार नाहीं. म्हणूनच, ‘श्रोणीबन्धस्त्यज्ति तनुतां सेवते मध्यभाग: । पदभ्यां मुक्तास्तरलगतय; संश्रिता लोचनाभ्याम्’ असें काव्यप्रकाशकारांनीं व ‘प्रागर्णवस्य ह्रदयें वृषलक्ष्मणोऽथ । कण्ठेऽधुना वससि वाचि पुन: खलानाम ॥’ असें अलंकरसर्वस्वकारांनीं (कल्पित क्रम वगैरेंचे) उदाहरण दिलें आहे. ह्या दोन्हींही उदाहरणांत आधार निराळा झाल्यामुळें, आधेयही निराळें झालें आहे, तरी सुद्धां कवीनें तीं सर्व आधेयें अभेदाध्यवसानाच्या बळावर एक मानली आहेत. पण आम्ही दिलेल्या पर्यायाच्या उदाहरणांत तर क्रम सुद्धां कल्पित आहे (लोकसिद्ध नाहीं). (उदा० :---) ब्रम्हालोकांत राहणार्‍या देवतेशीं आणि समुद्रांत राहणार्‍या अमृताशीं वाणीच्या माधुर्याचा अभेद मुळींच लोकसिद्ध नाहीं; अथवा त्या उदाहरणांत दाखविलेला क्रमही लोकसिद्ध नाहीं. अशी वस्तुस्थिति असल्यनें :---
“ज्या ठिकाणीं पूर्वीं प्रवाह होता, तेथें आतां वाळवंट आहे.” हें पर्यायाचें कुवलयानंदांत दिलेलें उदाहरण, ‘जेथें पूर्वीं घट होता तेथें आतां पट आहे’ ह्या वाक्याप्रमाणें केवळ लौकिक (लोकसिद्ध) उक्ति असल्यनें, (कविप्रतिभेनें कल्पित असल्यानें), पर्यायाचें (वास्तविक) उदाहरणच होऊ शकत नाहीं.

येथें रसगंगाधरांतील पर्याय प्रकरण समाप्त झालें

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP