अर्थान्तरन्यास अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या अलंकारांत, समर्थ्यसमर्थकभाव आर्थ किंवा शाब्द कसाही असला तरी तो या अलंकाराला कारण होतो. काव्यलिंगांत मात्र हेतुहेतुमद्भाव (म्ह० कार्यकारणभाव म्ह० ज्ञाप्यज्ञापकभाव) आर्थच (म्ह० अप्रत्यक्षपणें ज्ञात होणारा, साक्षात् शब्दानें न सांगितलेला) असला पाहिजे. (तसें ह्या अर्थान्तरन्यासांत नसते; म्ह० ह्यांतील समर्थक हेतु शाब्द किंवा आर्थ कसाही असला तरी चालतो.) हि, यत्, यत: इत्यादि समर्थनवाचक शब्द नसले तरच समर्थ्य - समर्थकभाव आर्थ आहे, असें समजावें यांचें उदाहरण :--- “मूच्छें गतो मृतो वा’ ह्या ठिकाणीं आलेंच आहे. वरील समर्थनवाचक शब्द आले असल्यास, शाब्द अर्थान्तरन्यास होतो. त्याचेही उदाहरण ‘विपरीतग्रहणा हि०’ ह्या ठिकाणीं आले आहे. अथवा (शाब्द समर्थ्य - समर्थकभावानें होणार्‍या अर्थान्तरन्यासाचें) हें दुसरें उदाहरण :---
‘धर्मभ्रष्ट, नीट, पतित व नास्तित यांच्या टोळक्याचें तारण करणें याविषयींची जी तुझी आवड, ती कमी करणें ज्याप्रमाणें तुला अशक्य आहे, त्याप्रमाणें हे आई (गंगे) पापांच्या समूहाविषयींचें माझे प्रेम कमी करणें हें मलाही अशक्य आहे; कारण ह्या जगांत कोणालाही आपला स्वभाव टाकून देणें फार कठीण आहे.’
ह्या ठिकाणीं भगवती भागीरथी व तिचें स्तवन करणारा, ह्या दोहोंचा वृत्तान्त विशेष (असून प्रकृत) आहे; व त्याचा समर्थक जो चौथ्या चरणांत सांगितलेला सामान्य अर्थ, त्या अर्थाची समर्थकता, यत; या शब्दानें सांगितली आहे.
येथें शंकाकाराची शंका अशी कीं, “सामान्य अर्थ विशेष अर्थाचा समर्थक होणें, याचा शेवटीं हाच अर्थ होतो कीं, सामान्य व्याप्तिज्ञान, विशेषाला उद्देशून होणार्‍या अनुमितीला कारण होतें. असें न मानलें तर, (म्ह० अर्थान्तरन्यासाच्या या प्रकारांत सामान्य अर्थानें विशेषाचें समर्थन अनुमान पद्धतीनेंच केलें जातें. असें न मानलें तर) स्वभावादिकांना बदलतां येत नाहीं, या सामान्यरूप नियमाचा व्यभिचार आढळून आल्यास तो सामान्यरूप अर्थ विशेष अर्थाचें समर्थन करूं शकणार नाहीं. (म्ह० सामान्य अर्थ व्याप्तिज्ञानानें विशिष्ट असा असला, तरच तो विशेष अर्थाचें समर्थन करू शकतो.) “अगाऊ प्रतीत झालेल्या अर्थाचीच जास्त फोड समर्थन करू शकतो.) “अगाऊ प्रतीत झालेल्या अर्थाचीच जास्त फोड समर्थन वाक्यानें केली जाते; समर्थक अर्थानें कांहीं अनुमान होत नाहीं.” हें जें प्राचीनांचें म्हणणें तें, विचार न केला तरच गोड वाटेल. म्हणून (तात्पर्य काय कीं,) विशेषाचें सामान्यानें समर्थन करणें हा अर्थान्तरन्यासांतील पहिला प्रकार (व्याप्तियुक्त) अनुमानाहून निराळा होऊच शकत नाहीं. आतां (विशेष अर्थानें सामान्य अर्थाचें समर्थन हा) अर्थान्तरन्यासाचा दुसरा प्रकार मात्र, अधिकारणविशेषावर म्ह० पक्षविशेषावर (म्ह० विशिष्ट स्थळी) पूर्वीं असणारें हेतूचें सहचारज्ञान (म्ह० व्याप्तिज्ञान) झाल्यानें, पूर्वींचें जें सामान्यव्याप्तीचें ज्ञान तें फक्त द्दढ केलें जातें, हें त्याचें स्वरूप असल्यानें, (हा प्रकार) (नेहमींच्या) अनुमानाहून निराळा पड्तो. [कारण नेहमींच्या अनुमानांत सामान्य व्याप्तीनें (म्ह० व्याप्तिज्ञानानें) विशेष अर्थाचें समर्थन केलें जातें.]
यावर आमचें (म्ह० सिद्धांत्याचें म्ह० जगन्नाथाचें) म्हणणें असे कीं, ‘कवि ऐकत आहे’ (म्ह० तुमचें म्हणणें ऐकलें, अन पटलेंही.) आतां यावर कुणी म्हणतील ‘तुमच्या म्हणण्याप्रमाणें वरील प्रकार (अर्थान्तरन्यासाचा वरील प्रकार) अनुमानाहून निराळा नाहीं, असें मानलें तरी, विशेषानें सामान्याचें होणारें समर्थन हा जो अर्थान्तरन्यासाचा दुसरा प्रकार तो सुद्धां अर्थान्तरन्यास होऊं शकणार नाहीं; कारण पूर्वीं येऊन गेलेल्या उदाहरणालंकारांत त्याचा समावेश होऊ शकणार नाहीं; कारण पूर्वीं येऊन गेलेल्या उदाहरणालंकारांत त्याचा समवे होऊ शकतो.’ पण हें त्याचें म्हणणें बरोबर नाहीं; कारण उदाहरणालंकारांत ‘इव’ वगैरे शब्दांचे प्रयोग असतात; पण ह्या ठिकाणीं (म्ह० अर्थान्तरन्यासांत) त्याहून निराळा प्रकार आहे. (म्हणून या अर्थान्तरन्यासाच्या दुस‍र्‍या प्रकाराला उदाहरणालंकारांत समाविष्टा करतां येणार नाहीं.) “तरी पण अर्थान्तरन्यसांत वाचक शब्द नसल्यानें, त्याला फार तर आर्थ उदाहरणालंकार म्हणा; अर्थान्तरन्यसाचा हा एक प्रकार आहे, असें म्हणूं नका.” असें प्रतिपक्षीं म्हणत असतील तर, यावर आमचें (जगन्नाथाचें) उत्तर असें :--- उदाहरणालंकार व अर्थान्तरन्यास या दोहोंत फरक असा - सामान्य अर्थाचें समर्थन करणार्‍या विशेष वाक्यर्थाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारांत, अनुवाद्य अंशांत फक्त विशेष अर्थ असतो, (व त्या विशेषार्थाचा) विधेयांश हा पूर्वार्धांत असलेल्या सामान्य अर्थांत येऊन गेलेला असतो; आणि दुसर्‍या प्रकारांत, अनुवाद्य व विधेय ह्या दोन्हीही अंशांत विशेष अर्थ असतो. यापैकीं पहिला प्रकार उदाहरणालंकाराचा विषय होतो; व दुसरा प्रकार अर्थान्तरन्यासाचा विषय होतो; उदाहरणार्थ, ‘मूर्च्छां गतो मृतो वा निदर्शनं पारदोऽत्र रस: (मूर्च्छित अथवा मृत झालेला पारा याचें उदाहरण आहे.) ह्या (उदाहरण अलंकारांतील) विशेष अर्थांत, उपकारमेव कुरुते’ ह्या पूर्वार्धांतील सामान्य अर्थांत आलेली उपकार करणें ही जी क्रिया तीच विधेय आहे. (म्ह० उदाहरणालंकारतील मूर्च्छित अथवा मृत पारा हा जो विशेष अर्थ, तो अनुनाद्य कोटीमध्यें असून, विधेयांश ‘उपकार करतो’ हा, वरच्या ओळींत आलेल्या सामान्य अर्थांत आलेला आहे.) याचे उलट “रोगानपहरति पारद:सकलान्०” या अर्थान्तरन्यसामध्यें मात्र, अनुवाद्य व विधेय ह्या दोन्हीही अंशांत (म्ह० मूर्च्छित व मृत पारा हा अनुवाद्य अंशा व सर्व रोगांचा परिहार करतो हा विधेयांश ह्या दोन्हीही अंशांत) विशेष वाक्यार्थ आला आहे. अर्थान्तरन्यासाच्या लक्षणांतील विशेष या शब्दानें अनुवाद्य व विधेय या उभयांशरूप विशेषाचे ग्रहण करावें, म्हणजे या लक्षणाची उदाहरणालंकारांत अतिव्याप्ति होणार नाहीं. ‘केवळ या छोटयाशा फरकामुळें, अर्थान्तरन्यासाच्या ह्या प्रकाराला उदाहरणालंकाराहून निराळा मानतां येणार नाहीं; उलट उदाहरणालंकाराचाच अर्थान्तरन्यस हा एक विशेष (म्ह० प्रकार) मानतां येईल, असें तुम्ही (प्रतिपक्षी) म्हणत असाल तर - उदाहरणालंकार हा अर्थान्तरन्यासाचाच एक विशेष (प्रकार); प्रतिवस्तूपमा ही द्दष्टांताचच एक विशेष (प्रकार); व आर्थी उपमा म्हणजेच स्मरण, भ्रांमिमत् व संदेह अलंकार, असेंहीं म्हणणें सोपें आहे; कारण त्या ठिकाणींहि, त्या त्या मूळ अलंकाराहून, त्या त्या दुसर्‍या अलंकारांचा फरक अगदींच थोडा आहे. शिवाय उदाहरणालंकार हा प्राचीनांच्या मनाला (फारसा) रुचत नाहीं, कारण उपमेनेंच (म्ह० उपमेंतच त्याच्या समावेश करून) त्यांनीं ह्या उदाहरणालंकाराला उडवून टाकलें आहे. त्यामुळें त्यांच्या मते विशेषानें सामान्याचें समर्थन करणें ह्या प्रकाराला, या अर्थान्तरन्यासाहून दुसरीकडे टाकणें शक्यच नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP