विशेष अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


या सर्व प्रकारांचीं क्रमानें उदाहरणें :---
“कानापर्यंत (दीर्घ) नयन असणार्‍या हे राजा, एक गंमत ऐक; तुझ्या आधारानें राहणारी कीर्ति (आज) दाही दिशांच्या माथ्यावर राहत आहे; आणि तुझ्या एकटयाचाच आधार घेऊन राहणारा अनेक गुणांचा समूह, हे गुणनिधे ! प्रौढ कवींच्या मुखांचे ठिकाणीं सतत नांदत आहे.” ह्या ठिकाणीं दिशांचा माथा ह्या दुसर्‍या आधारावर कीर्तिरूप आधेय राहिल्यानें (विशेष अलंकाराचा) पहिला प्रकार.
‘आसफखानरूपी चंद्र स्वर्गांत गेला असतां, त्याच्या आश्रयानें राहणार्‍या वस्तूंचा संपूर्ण नाश झला, हें तर योग्यच आहे; परंतु आश्चर्य हें कीं, त्याची कीर्ति या भुवनाच्या पोकळींत आश्रयावांचून विहार करीत आहे.’ (विशेषालंकाराच्या पहिल्या प्रकारांतील दोन पोटभेदांची हीं दोन उदाहरणें झालीं.) आतां विशेषाच्या दुसर्‍या प्रकाराचें उदाहरणे :---
‘सीतेच्या बाहूंच्या वेंघेंत राहाणारा असूनही, रामचंद्र, सुंदर स्त्रियांच्या डोळ्यांत, शत्रूंच्या पुढें, वाणी ज्यांची दासी आहे अशा महाकवींच्या वचनांतही राहतो.’
विशेषाच्या तिसर्‍या पकारचें उदाहरण :---
‘धनुष्यांतून बाहेर पडणार्‍या बाणांच्या समूहानें, ज्यानें सारें त्रैलोक्य भरून काढलें आहे व रावणाचे प्राण हरण करण्याकरतां जो सज्ज झाला आहे अशा रामाला रणांगणांत पाहाणार्‍या लोकांना, प्रचंड वार्‍याच्या वेगामुळें ज्यांचा डोंबाळा पसरला आहे अशा आपल्या ज्वालांनीं जगाला ग्रासून टाकणारा, व ज्याच्याकडे पाहवत नाहीं असा, कल्पातांचा अग्नि पाहायला मिळाला.’
ह्या ठिकाणी रामाल पाहाणार्‍या लोकांनीं कल्पांताचा अग्नि पाहणें हें, ‘अशक्य अशा दुसर्‍या वस्तूचें निर्माण होणें’ (असें) म्हटलें आहे.
येथें एक शंका अशी कीं, “कवडया मिळण्याच्या लोभानें रात्र पडेपर्यंत ताक विकायला भटकणार्‍या एका गवळ्याच्या मुलीला रस्त्यांत एक अमूल्य इंद्रनील मणी मिळाला.” ह्या पुढें येणारा प्रहर्षण व मागें येऊन गेलेला विषम या दोन अलंकारांच्या संकरांत, विशेषाच्या या तिसर्‍या प्रकाराची अतिव्याप्ति होत आहे; कारण, ह्या ठिकाणीं दही (ताक) विकायला निघालेल्या गवळ्याच्या मुलीला इंद्रनील मणी मिळाला असें वर्णन आहे. (त्यामुळें या ‘लोभाद्वराटिकानाम’ इ० श्लोकांत विशेषाचा तिसरा प्रकार होऊ लागेल.) यावार (प्राचीनांचें उत्तर) असें :---
‘अशक्य अशी दुसरी वस्तू निर्माण करणे’ या, विशेषाच्या तिसर्‍या प्रकाराच्या लक्षणांतील शब्दाला, ‘अभेदाध्य्वसायमूलकत्व’ या एका विशेषणाची पुस्ती जोडावी (म्हणजे वरील लोभाद्वराटिका० इत्यादि श्लोकांत विशेष अलंकाराचा तिसरा प्रकार अतिव्याप्त होणार नाहीं). कालानलो वीक्षित: ह्या नुकत्याच वर दिलेल्या विशेषालंकाराच्या उदाहरणांत, ज्याप्रमाणें अशक्य अशा दुसर्‍या कल्पांताग्निरूपी वस्तुला पाहणें हें, राम व कल्पांताचा अग्नि या दोहोंचा अथवा त्या दोहोंच्या दर्शनाचा अभेदाध्यवसाय केल्यानेंच निर्माण होतें, त्याप्रमाणें, “दही विकायला भटकणांर्‍या०” या श्लोकांत अमूल्य इंद्रनील मणी पाहणें हें कांहीं अभेदाध्यवसानानें निर्माण झालेलें नाहीं. (म्हणून अतिव्याप्तीचा दोष येथें येत नाहीं. म्हणजे या श्लोकांत विशेषालंकास आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण या श्लोकांत अभेदाध्यवसानाची मदत झालेली नाहीं. अभेदाध्यवसान येथें असतें तर येथेही विशेषालंकार आहे, असें म्हणतां आलें असतें.) तुम्ही म्हणाल, “भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणीं इंद्रनील मण्याचें अभेदाध्यवसान ह्या ठिकाणीं केलेलेंच आहे. मग येथें अभेदाध्यवसान नाहीं. असें कसें म्हणतां ?” यावर उत्तर असें :---
“एखादें कार्य सुरू करणार्‍याच्या इ०” विशेषाच्या लक्षणांत जें कार्य, कर्त्याचें विशेषण म्हणून प्रविष्ट झालें आहे, त्या कार्याशीं अशक्य अशा दुसर्‍या वस्तूचा अभेद होणें, ही गोष्ट लक्षणांत सांगावयाची आहे. प्रस्तुत ‘लोभाद्वाराटिकानां०’ या श्लोकांत ताक विकणें याच्याशीं इंद्रनील मण्याचें अभेदाध्यवसान झालेलें नाहीं.
कुणी म्हणतील, ‘विशेषालंकाराचा हा तिसरा प्रकार अतिशयोक्तिनें गतार्थ झाला आहे (म्हणजे त्याचें काम अतिशयोक्तिनें भागवलें जाईल; मग तो निराळा प्रकार कशाला सांगतां ?’). यावर प्राचीनांचें उत्तर हें :--- या तिसर्‍या प्रकारच्या वरील उदहारणांत राम ह्या विषयाचें, कल्पांताचा अग्नि याव विषयीनें निगरण केलेलें नाहीं; (त्यामुळें येथें अतिशयोक्ति आहे असें म्हणतां येत नाहीं.) आतां रूपकानें हा प्रकार गतार्थ आहे असेंही म्हणतां येत नाहीं; कारण ह्या ठिकाणीं विषय व विषयी यांचें सामानाधिकरण्य (किंवा समानविबक्तिकत्व) नसल्यानें येथें रामावर कल्पांताच्या अग्नीचा आरोप सिद्ध होत नाहीं. स्मृति अलंकारानेंही हा तिसरा प्रकार गतार्थ होत नाहीं; कारण कालानल (कल्पांताग्नि) हा पाहणें या क्रियेचें कर्म असल्याचें (म्ह० पाहिला गेला असें) श्लोकांत शब्दानें सांगितलें गेलें असल्यामुळें, तो कालानल स्मृतीचें कर्म झाल्याचें (म्ह० आठवला गेल्याचें) सिद्ध झालेलें नाहीं. (अर्थात स्मृतीचा विषय कालानल झाला नसल्यामुळें, येथें स्मरणालंकारही मानतां येत नाहीं.) यावरून, अशक्य अशी दुसरी वस्तु निर्माण करणें हा विशेषालंकाराचाच तिसरा प्रकार मानला पाहिजे, असा प्राचीनांचा याबाबतींत अभिप्राय.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP