श्लेष अलंकार - लक्षण १०

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


तुम्ही आणखी असेंहीं म्हटलें आहे कीं, ‘अयमतिजरठा:’ इत्यादि समासोक्तीप्रमाणें (असावुदयमारुढ: इ० प्रकृताप्रकृतस्थलीं) गूध श्लेष
मानावा,’ हें म्हणणेंही गर्भस्त्रावाप्रमाणें, गळून पडलें (म्हणायचें); कारण श्लिष्ट विशेशण असलेल्या समासोक्तींतहीं, अप्रकृतार्थ, व्यंजनेनेंच, प्रतीत होतो, ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. म्हणूनच ध्वनिकारांनीं, “समासोक्ति हा गुणीभूतव्यंग्याचा एक प्रकार आहे,” असें म्हटलें आहे व समासोक्तीनें श्लेषाचा बाध होतो, असें उद्‌भटा वगैरेचें म्हणणें आहे. बाध म्हणजे, श्लेषानें अशा ठिकाणीं प्रवृत न होणें एवढाच अर्थ असजायचा. आतां श्लिष्ट शब्दांचा प्रयोग अशा ठिकाणींकेला जातो, याची उपपत्ति येथें दोन अर्थ (उत्पन्न) होतात, या अर्थानेंच लावता येते. एवंच तुमचें म्हणणें चुकीचे आहे.
आतां आमचें (म्ह० जगन्नाथाचें) यावर म्हणणें असें :--- अनेकार्थस्थलीं अप्रकृतार्थ सांगण्याच्या बाबतींत, शब्दशक्तीचा कांहींतरी संभव असतो, असें कदाचित् म्हणतां येईल, पण योगरूढिस्थलीं (म्हणजे ज्या स्थलीं योगार्थ व रूढयर्थ हे दोन्हीही आले असतील अशा ठिकाणीं) योगार्थ शब्दशक्तीनें (म्ह० अभिधेनें) प्रतीत होतो असें म्हणणें कठिण आहे.
उदा० “चांचल्ययुक्त असे तुझे नयन, जलजांची (कमळांची) शोभा भले हरण करोत (त्यांत नवल नाहीं); (पण) अरण्यांत अति चंचल अशा मृगांची (मृगनेत्रांची) सुद्धां शोभा ते नयन कसे हरण करतात, हें मोठें नवल आहे !" ह्या श्लोकांत ‘चांचल्यगुणरहित अशीं जी कमळें त्यांच्यापेक्षा चांचल्यगुणांत अधिक असलेले जे तुझें नयन (डोळे) त्यांनीं त्यांच्या (म्ह० कमळांच्या) शोभेचा तिरस्कार करावा यांत कांहीं आश्चर्य नाहीं; पण आश्चर्य हें कीं, चांचल्यगुणानें युक्त अशा हरिणांचा त्या डोळ्यानें तिरस्कार करावा.” हा वाच्यार्थ पुरा झाल्यानंतर रुढयर्थानें रहित असा वरील शब्दांचा, केवळ योगार्थ घेऊन, ‘मुर्ख लोकांच्या पुत्रांचें (जडजानां) धन, नेणारांनीं (नेतृभि:) म्हणजे चोरांनीं हरण करणें हें सोपें आहे; पण सावध राहणार्‍या (मृगाणां म्ह० गवेषकाणां) लोकांचें धन चोरांनीं लुटणें हें कसें शक्य आहे ? असा ‘जलज’, ‘नयन’ व ‘मृग’ या शब्दांच्या योगार्थानें प्रतीत होणारा अर्थ, व्यंजनव्यापारा मानल्यावांचून, कसा उत्पन्न होऊ शकले ? कारण रूढिशक्तीनें योगशक्तीचें अशा ठिकाणीं पूर्व नियंत्रण होत असल्यामुळें, त्या ओगार्थाला स्वातंत्र्य नसतें (म्हणजे रुढयर्थाच्या ठिकाणीं योगार्थ आपलें डोकें मुळींच वर करूं शकत नाहीं). “रूढीपुढें योगशक्ति लंगडी पडते.” असा नियम अल्यामुळेंच (अतएव), पंकज वगैरे पदांपासून ‘पंकामध्यें उत्पन्न होणारें म्हणून,’ चंद्रविकासीं कमळ शेवाळ वगैरे अर्थांचा बोध लक्षणेनेंच होतो (असें शास्त्रकार मानतात.); कारण पंकज वगैरे योगरूढपदांच्या शक्तिज्ञानाचें कार्य पद्मत्व्विशिष्ट पद्माचा बोध होणें हेंच आहे, असें नैयायिकांनीं म्हटलें आहे. आणि म्हणूनच, ‘ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उ श्व:’ (भूत व भावी प्राण्यांचा ईश हा आजही आहे व उद्यांही तोच असणार) या वेदवाक्यामध्यें ईशान म्हणजे ऐश्वर्ययुक्त हा येथें जीव समजायचा का ईश्वर समजायचा, असा संशय प्राप्त झाला असतां ‘शब्दादेव प्रमित:’ म्हणजे ‘शब्दावरूनच ही गोष्ट निश्चित होते; म्हणजे ईशान या शब्दावरूनच ऐश्वर्यविशिष्ट ईश्वर असा अर्थ होत असल्यामुळें, ईशान हा जीव असूं शकतच नाहीं असें निश्चित ठरतें,’ असें उत्तरमीमांसाकार भगवान् व्यास ह्यांनीं ब्रम्हासूत्रांत म्हटलें आहे. (म्हणजे त्यांनींही शब्दाचा रूढार्थ होत असेल, त्या ठिकाणीं योगर्थ बिलकूल घ्यायचा नाहीं असा आपला अभिप्राय सांगितला आहे). म्हणजे पूर्वीं आलेल्या (चांचल्ययोगि० इ०) पद्यांत, अप्रकृत जो चोराचा व्यवहार, तो शक्तीनें समजण्यासारखा नसून व्यंजनेनेंच समजण्यासारखा आहे (हे सिद्ध झालें). बरें, वरील ठिकाणीं लक्षणा मानावी असें म्हणावें तर, मुख्यार्थबाध वगैरे (लखणेंच्या अटी) येथें नसल्यानें लक्षणा होते असें म्हणणेंही शक्य नाहीं. आतां तात्पर्यार्थाची अनुपपत्ति ही तात्पर्याथीचा बोध झाल्याव्रच होते, (म्ह० प्रथम तात्पर्यार्थाचा बोध होतो, आणि मगच तात्पर्यार्थाची अनुपपत्ति (ह्या वाक्यांत आहे असें समजतें). पण तो तात्पर्यार्थाचा बोध प्रथम होणार तरी कसा ? एवढयाकरतां व्यंजनेला शरण गेल्यावांचून (मानल्यावांचून) सुटकाच नाहीं. वरील श्लोकांत चोर - व्यवहार हा कांहीं बोलणाराला अभिधेनें सांगायचा नाहीं; मग त्याचें ज्ञान श्रोत्याला होण्याकरतां सह्रदयतेनें स्फुरणार्‍या या व्यंजनाव्यापारावांचून दुसरा उपायच नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP