सहोक्ति अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“गुणप्रधानभावानें विशिष्ट असा दोन पदार्थांचा (परस्परांशीं) ‘सह’ (बरोबर, संगे) या अर्थानें संबंध (जोडला जाणें) म्हणे सहोक्ति,”
‘रमणीयत्व’ हें अलंकाराच्या सामान्य लक्षणांतील विशेषण सर्व अलंकारांना समानच आहे हें आम्ही अनेक सांगितलें आहे. तें रमणीयत्व ह्या सहोक्तींत, (१) कार्यकारणभावाची उलटापालट हें जिचें स्वरूप आहे, (२) श्लेषभित्तिक (म्ह० श्लेषमूलक) अभेदाध्यवसान हें जिचें स्वरूप आहे, व (३) केवळ अभेदाध्यवसान हें जिचें स्वरूप आहे अशा (तीन प्रकारच्या) अतिशयोक्तीनें मदत केल्यानें होते, असें कुणी म्हणतात.’
“दैव आणि दिल्लीचा राजा, परस्परांत (जणु) मसलत करून एखाद्या माणसाविषय़ीं अनुकूलत्व अथवा प्रतिकूलत्व एकाच वेळीं धारण करतात.” (म्ह० राजा कोपला कीं दैवही कोपतें, इ०)
ह्या ठिकाणीं (दैव व राजा यांचें प्राधान्य सारखेंच असल्यामुळें त्यांच्यांत गुणप्रधानभाव नाहीं; म्हणून) वरील लक्षणाची अतिव्याप्ति होऊ नये एवढयाकरतां, लक्षणांत गुणप्रधानभावावच्छिन्न येथपर्यंतचा भाग घातला आहे. (म्ह० सहार्थानें जोडलेल्या दोन पदार्थांत गुणप्रधानभावच पाहिजे.)
(सहोक्तीचें) उदाहरण :---
“शत्रु स्त्रियांच्या केसात, त्यांच्या सगळ्या खजिन्यासह, शत्रुराजांच्या प्राणांसह, हे राजा ! निष्ठुर अशा तूं, युद्धांत धनुष्याची दोरी वेगानें खेंचलीसल.” (तूं खेंचता झालास)
ह्या ठिकाणीं धनुष्य (धनुष्पाची दोरी) खेंचणें हें कारण पथम व केस ओढणें वगैरें कार्यें (नंतर) (असा वास्तविक कार्यकारणभावाचा क्रम पाहिजे असतां) ह्याच्या उलटापालटीवर (म्ह० कार्यकारण एकाच वेळीं असणें ह्या अतिशयोक्तीवर) आधारलेला असा येथील सहभाव आहे. कार्यकारणाच्या ह्या उलटापालटीला कारण राजाचा निष्ठुरपणा. (त्या निष्ठुरपणानें शत्रूंचें सर्वंस्व नष्ट करून हा सगळा घोटाळा केला.)
अथवा (सहोक्तीचें) हें दुसरें उदाहरण :--- “हे राजा क्रोधानें भरलेला तूं शत्रूंच्या भाग्यासह आसनावरून (म्ह० सिंहासनावरून) उठतोस; व त्या शत्रूंवर मृत्यूच्या बरोबर एकदम तुटून पडतोस.”
पहिल्या उदाहरणांत, ओढणें या क्रियेचीं कर्में :--- (धनुष्याची दोरी स्त्रियांचे केस वगैरे) एकमेकांबरोबर आलेलीं असल्याचें सांगितलें आहे, पण या दुसर्‍या उदाहरणांत, राजा व भाग्य, राजा व मृत्यु असें दोन दोन कर्ते मिळून एकच क्रिया करीत असल्याचें सांगितलें आहे, हा या दोहोंत फरक. (राजाचें उठणें हें कारण व भाग्य उहणें हें कार्य यांच्या क्रमांतही येथें उलटापालट आहे.)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP