उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण २२

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


वरील दोन्हीही मतांप्रमाणें पंचम्यंत पदाच्या अर्थाची (त्याला विषयी मानून) उत्प्रेक्षा केली जाते. कारण कीं, ‘इव’ वगैरे उत्प्रेक्षावाचक शब्दांचा, या पंचम्यंतार्थाशींच अन्वय होतो. या उत्प्रेक्षेंत, निमित्त म्हणूण येणारा धर्म, (प्रस्तुत, सैषा स्थली ह्या श्लोकांत,) उत्प्रेक्षेंतील विषयीच्या विषयितावच्छेदक धर्माशीं - मौनाशीं - समानाधिकरण असणारा व अतिशयोक्तिद्वारां मौनाशीं अभिन्न होणारा, निश्चलत्व हा होय. या उत्प्रेक्षेंत, मौनयुक्त नूपुर हा विषय आहे; व मौनद्वारां नूपुराच्या मौनित्वावर कार्यत्वाची (प्रयोज्यत्वाची) संभावना केली आहे.
अशा रीतीनें, ज्या धर्मीचा विशिष्ट धर्म उत्पन्न झाल्याची संभावना केली जाते, त्या धर्मीवर, (उदा० वरील श्लोकांत, नूपुर ह्या धर्मीवर मौन या धर्माची संभावना केली आहे) पंचम्यंतार्थाचा अन्वय (विश्लोषदु:खप हेतूचा अन्वय) सर्व ठिकाणीं, धर्मद्वाराच (मौनद्वाराच) केला जातो. (अशा स्थलीं हेतूचा अन्वय साक्षात् धर्मीशीं, उदा० येथील नूपुराशीं होत नाहीं.) पण ज्या ठिकाणीं, धर्मच, दुसर्‍या कोणत्यातरी धर्माशीं अभिन्न होऊन उत्प्रेक्षेचा साक्षात् विषय होतो, त्या ठिकाणीं, या धर्मरूप विषयाचा अवच्छेदक धर्मच उत्प्रेक्षेचें निमित्त म्हणून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, ‘विश्लेषदु:खादिव मौनमस्य’ असा वरील ‘सैषास्थली०’ या श्लोकांतील चौथा चरण केला तर, या उत्प्रेक्षेंत (मौन हा धर्म साक्षात् विषय होऊन त्यावर विश्लोषदु:खरूप हेतूची संभावना केली जाते; व त्या संभावनेचें म्ह० उत्पेक्षेचें निमित्त म्हणून,) मौन ह्या विषयाचा अवच्छेदक धर्म मौनत्व हें निमित्त होईल. हेतूत्प्रेक्षेंत पंचम्यन्त पदाऐवजीं तृतीयान्त पद आलें तरी, (या दोन्ही विभक्तींचा सारखाच अर्थ होत असल्यानें) त्याच्या अर्थाची व अन्वयाची सरणि पंचम्यंताप्रमाणेंच समजावी. फलोत्प्रेक्षेंत ‘तुमुन्’ वगैरे प्रत्ययांचा अर्थ फल. पूर्वीं (मागें) (पंचमीविभक्तीच्या बाबतींत सांगितल्याप्रमाणें,) या तुमुन्नन्त पदांतील प्रकृति व प्रत्यय व प्रत्यय यांमध्यें अभेद हा संबंध असतो. आतां, या तुमुन्नन्ताच्या फल या अर्थाचा उत्प्रेक्षेंतील विषयरूप धर्मीशीं साधनता (म्ह० कारणता) संबंधानें अन्वय होत असल्यानें, त्याच साधनतारूप संबंधानें त्या फलरुप अर्थाची (विषयी म्हणून) उत्प्रेक्षा केली जाते; (त्या विषयावर या फलाची उत्प्रेक्षा केली जाते.) त्या विषयाच्या एका अंशावर विशेषण म्हणून भासणारा धर्म या फलोत्प्रेक्षेंत निमित्त होतो; आणि तो विषय एखादा धर्म असेल तर, तशा उत्प्रेक्षेचें निमित्त म्हणून, त्या धर्मरूप विषयाचा अवच्छेदक धर्म (वगैरे) दुसराच एखादा धर्म घ्यावा लागतो. असा या फलोत्प्रेक्षेच्या दोन प्रकारांत फरक आहे. (म्ह० ज्या फलोत्प्रेक्षेंत विषय धर्मी असेल त्या ठिकाणीं, विषयाच्या धर्माशीं अभेदाध्यवसायानें एकरूप होणारा विषयीचा धर्म, निमित्त होतो; व जेथें विषय धर्म असले तेथें, त्या विषयाचा अवच्छेदक धर्मच निमित्त म्हणून येतो). अशा रीतीनें, समासांत आल्यामुळें अथवा प्रत्यय लागल्यामुळें विषयरूप पदार्थ, ज्या हेतु अथवा फल उत्प्रेक्षेंत गौण झाला असेल, त्यांतील विषयाशी, हेतु अथवा फल यांचा साक्षात् अन्वय संभवत नाहीं; म्हणून अशा ठिकाणीं, प्रधान असणार्‍या प्रत्ययार्थालाच उत्प्रेक्षेंत विषय मानतात. हेतूत्प्रेक्षेंत विषय व हेतु यांच्यांत प्रयोज्यत्वसंबंध असतो; तर फलोत्प्रेक्षेंत विषय व फल यांच्यांत प्रयोजकत्वसंबंध असतो. आणि हा संबंध विशेषणाच्या द्वारां बांधला जातो. या विशेषणाशीं हेतु व फल यांचा कसा तरी संबंध जोडता येत असल्यानें, विशेषणाला ही विषय मानणें योग झालें असतें; पण उद्देश्य  व विषय हीं दोन्ही स्वतंत्र सुटीं असलीं पाहिजेत असा नियम असल्यानें आम्ही विशेषणाला, विषय (म्ह० उद्देश्य) मानले नाहीं व विषयी ही मानले नाहीं. पण वरील नियम मानायचाच नसेल तर प्राचीनांचा पक्षच चांगला म्हणावा लागेल. (आणि मग हेतूची अथवा फलाची, अशा ठिकाणीं गौण विषयावरच उत्प्रेक्षा होते असें म्हणावें लागेल).
शिवाय, प्राचीनांच्या मताप्रमाणे, गौण बनलेल्या अथवा निगीर्ण असलेल्या विषयावरच, हेतुफलोत्प्रेक्षास्थलीं हेतु अथवा फल यांची उत्प्रेक्षा केली तर, (म्हणजेच त्या हेतूच्या कार्याचा, निगीर्ण विषयावर, व फलाच्या कारणाची, निगीर्ण अथवा अनुपात्त विषयावर, हेतु व फल यांची अनुक्रमें उत्प्रेक्षा केली तर,) ती, हेतूत्प्रेक्षा अथवा फलोत्प्रेक्षा न राहतां, शेवटी स्वरूपोत्प्रेक्षाच होईल. [उदा० सैषा स्थली० या श्लोकांत, प्राचीनांच्या मताप्रमाणें, अनुपात्त नि:शब्दत्व ह्या विषयावर विश्लेषदु:खरूप हेतूचें कार्य जे मौन त्याची अभेदसंबंधानें उत्प्रेक्ष केली तर ती हेतूत्प्रेक्षा न राहतां, स्वरूपोत्प्रेक्षाच होऊ लागेल; आणि फलोत्प्रेक्षेची हीच गति होईल.] आणि तसें झाल्यास, स्वरूप, हेतु व असे जे उत्प्रेक्षेचे तीन प्रकार प्राचीनांनीं मानले आहेत ते नष्ट होतील. आतां यावर प्राचीनांच्या बाजूनें कुणी म्हणतील कीं, प्राचीनांनी अनुपात्त विषय स्वीकारल्यास, “स्वरूपतादात्म्य (उत्प्रेक्षा) या द्दष्टीनें, या तिन्ही उत्प्रेक्षांत कांहींही फरक राहत नसला तरी सुद्धां, शुद्धस्वरूपोत्प्रेक्षा, आणि हेतु हें विशेषण असलेली स्वरुपोत्प्रेक्षा (१) व फल हें विशेषण असलेली स्वरूपोत्प्रेक्षा (२) या दोन विशिष्ट स्वरूपोत्प्रेक्षा, यांच्यामध्ये फरक आहेच आहे; कारण शुद्ध स्वरूपोत्प्रेक्षेंत हेतु व फल हीं विशेषणें नसतात.” पण तसें म्हणतं येणार नाहीं. कारण ‘तनयमैनाक’ इत्यादि (मागें आलेल्या) स्वरूपोत्प्रेक्षेच्या उदाहरणांत, ‘मैनाक या (आपल्या) मुलाला शोधणें’ हें पद, फलोत्प्रेक्षेच्या विशेषणकोटीत प्रविष्ट झालें असल्यानें, तेथील मुख्य स्वरूपोत्प्रेक्षेला, फलोत्प्रेक्ष मानण्याचा प्रसंग येईल; कारण अमुक प्रकारची ही उत्प्रेक्षा आहे असें ठरवायचें असेल तर त्याकरतां तो प्रकार, उत्प्रेक्ष्य विषयींत साक्षात् विशेषण म्हणूनच आला पाहिजिए असा कांहीं नियम नाहीं. (उत्प्रेक्षेचा प्रकार ठरविण्यांत विषयी साक्षात् विशेषण असणें हें मोठेसें कारण नाहीं. तें कारण मानलें तर, उदा० वरीलाख्यायिकावाक्यांत भुजायमानाया: हें पद स्वरूपोत्प्रेक्षेंतील उत्प्रेक्ष्य म्ह० विषयी असलें तरी, मैनाकगवेषण हें फल, त्या विषयीच्या विशेषणाच्या कोटींत आल्यानें, त्या सबंध उत्प्रेक्षेला फलोत्प्रेक्षा म्हणण्याचा प्रसंग येणार.) आपल्या जातभाईंशी हें भांडण आतां बस्स झालें.
(ह्याच विषयांत खोलांत शिरून सांगायचें झालें तर) उत्प्रेक्ष्यमाण म्ह० विषयी, एखाद्या उत्प्रेक्षावाक्यांत अनेक असतील तर, ज्या विषयीची उत्प्रेक्षा विधेय (प्रधान) असेल, त्या उत्प्रेक्षेच्या नांवानेंच व्यवहार होणें योग्य. कारण ती उत्प्रेक्षा त्या वाक्यांत प्रधान आहे. असा हा नियम असल्यानें, ‘विश्लेषदु:खादिव बधमौनम्’  ह्या श्लोकांत, नूपुर ह्या विषयावर दु:खाची उत्प्रेक्षा असली तरी, त्या उत्प्रेक्षेनें व्यवहार करणें योग्य नाहीं; कारण ही उत्प्रेक्षा मुख्य उत्प्रेक्षेचें अंग असल्यामुळें, तिला (विधेय न म्हणतां) अनुवाद्य म्हटलें पाहिजे, पण विश्लेषदु:खात् (इव) या पंचम्यंतार्थाच्या उत्प्रेक्षेचाच व्यवहार करणें योग्य होईल. कारण कीं, या उत्प्रेक्षेला ‘इव’ शब्दानें निर्दिष्ट केली असल्यामुळें ती विधेय आहे. (अतएव ती प्रधान आहे.) ह्याचप्रमाणें ‘चोलस्य’ इत्यादि श्लोकांतही वनान्ता: या विषयाच्या ठिकाणीं ललाटाक्षरदर्शन या विषयीची उत्प्रेक्षा आहे; तिनेंही व्यवहार करूं नये; पण  ‘तुमुन्’ प्रत्ययार्थाच्या म्हणजे फलाच्या उत्प्रेक्षेनें व्यवहार करणें योग्य होईल, अशाच रीतीनें, ‘तनयमैनाक०’ इत्यादि गद्य वाक्यांत फलोत्प्रेक्षेनें व्यवहार करूं नये, तसेंच, ‘कलिंदजानीरभरेऽर्धमग्ना:’ इत्यादि श्लोकांत, शशिकिशोर ह्या विषयीची बक ह्या विषयावर केलेली तादात्म्योत्प्रेक्षा मुख्य़ आहे, (तिनें व्यवहार करावा), असें म्हणू नये. अथवा ह्या तादात्म्योत्प्रेक्षेनें उभ्या केलेल्या, अंधकारानें वैरामुळें केलेल्या गिळणें या क्रियेचें जें कर्म (म्ह० शशिकिशोर) त्याची तादात्म्योत्प्रेक्षा जी केली आहे, तिचाही मुख्य म्हणून व्यवहार करूं नये. कारण कीं, विधेयोत्प्रेक्षाच नेहमीं प्रधान मानावी, असा नियम आम्ही पूर्वींच सांगितला आहे, हा विषय येथेंच थोडक्यांत पुरा करूं.
उत्प्रेक्षेमध्यें दोन प्रकारचे साधारणधर्म (निमित्त म्हणून) येतात. (१) आपण होऊन असलेला म्ह० स्वत:सिद्ध साधारण धर्म व (२) साधारण करण्याचे जे उपाय, त्यानें असाधारण असूनही जो धर्म साधारणासारखा केला गेला आहे तो साधारणधर्म. आतां, असाधारण धर्माला साधारण करण्याचे उपाय खालीलप्रमाणें संभवतात :---
कुठें रूपक हा उपाय; कुठें श्लेष, कुठें अपहनुति, कुठें बिंबप्रतिबिंबभाव, कुठें उपचार, अभेदाध्यवसायरूप अतिशयोक्ति, असे अनेक उपाय संभवतात.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP