आतां कुवलयानंद नांवाच्या ग्रंथांत अप्पय्य दीक्षितांनीं अपहनुति अलंकारचे प्रकार सांगण्याच्या प्रसंगानें, पर्यस्तापहनुनि नांवाचा प्रकार सांगत असतांना म्हटलें आहे कीं,
“दुसर्‍यावर (म्हणजे उपमानावर) आरोप करण्याकरतां केलेला जो त्या उपमानाचा निषेध त्याला पर्यस्तापहनुति म्हणावें. (उदाहरणार्थ,)
हा चंद्र नाहीं;  तर मग चंद्र कोण ? (उत्तर) प्रेयसीचें मुख हाच चंद्र (म्हणजे प्रेयसीमुख हाच खरा चंद्र.)” यावर विचार  करूं या.
ह्या पर्यस्तापहनुतीला अपहनुतीचा एक प्रकार म्हणणें योग्य नाहीं; कारण, अपहनुतीचें सर्वसामान्य लक्षण ह्या प्रकाराला लागूं पडत नाहीं. कसें तें पहा :---
“प्रकृताचा निषेध करून अप्रकृताची सिद्धि करणें हीच अपहनुति. ह्याचा अर्थ असा :--- उपमेयाला खोटें ठरवून त्याच्या जागीं उपमानाची, खरी वस्तु म्हणून, स्थापना करणें ही अपहनुति. हें काव्यप्रकाशकारांनीं अपहनुतीचें जें लक्षण केलें आहे, त्यांत तुमची ही पर्यस्तापहनुति बसत नाहीं, हें उघड आहे. (म्हणजे त्या लक्षणाच्या बाहेर ही तुमची अपहनुति पडतें.)”
ह्याचप्रमाणें. “विषयाचा लोप केला असतां दुसर्‍या वस्तूची (म्ह० विषयीची) होणारी जी प्रतीती ती अपहनुति.” हें अलंकारसर्वस्वकरांनीं केलेलें लक्षण पण, तुमच्या ह्या पर्यस्तापनुतीला लागूं पडत नाहीं. त्याचप्रमाणें :---
‘प्रकृताच्या (उपमेयाच्या) निषेधाच्या योगानें, त्याच्या ठिकाणीं दुसर्‍याची (म्हणजे उपमानाची), साद्दश्यामूळें, जी कल्पना केली जाते, ती अपहनुति, ही दोन प्रकारची; पहिली, दोन निराळ्या वाक्यांत मिळून होणारी, व दुसरी, एका वाक्यांत होणारीं.”
हें त्यानी चित्रमीमांसा ह्या आपल्या ग्रंथांत सांगितलेलें अपहनुतीचें लक्षण ही, ह्या (तुमच्या) पर्यस्तापहनुतीला लागूं पडत नाहीं. म्हणून, “हा चंद्र नाहीं; तर मग चंद्र कोण ? तर प्रेयसीमुख हाच चंद्र,” ह्या वाक्यांत दृढारोपरूपकच मानणें योग्य आहे. अपहनुति मानणें योग्य नाहीं. कारण कीं, ह्या वाक्यांत, उपमेयाचा व उपमानाचा जो विशिष्ट धर्म त्या दोहोंचें सामानाधिकरण्य कांहींएक अडचण न येतां प्रतीत होते.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP