भ्रान्तिमान् अलंकार - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्याशिवाय, ‘कोवळी पालवी समजून त्यांच्या हाताला पोपट चोंचा मारू लागले.’ ह्या मूळ संस्कृत वाक्यांतील ‘करिदष्टा:’ ह्या शब्दांत विधेयाची स्पष्ट प्रतीती होत नाही; म्हणून या ठिकाणीं, दुसर्‍या स्वतंत्र विधेयाची जरूरी आहे. त्याकरतां “कीरेर्दष्टा:” असा शब्दप्रयोग, ह्या ठिकाणीं करावयास पाहिजे होता, ‘कीरदष्टा: जाता:’ असा जाता: शब्दाचा अध्याहार तुम्ही केला तरी, पाहिजे असलेल्या विधेयाला न सांगणें, व नको असलेल्या विधेयाला सांगणें :--- असें करण्याचा प्रसंग तुमच्यावर येईल. त्याचप्रमाणें ‘तल्लोपायालपन्त्य: पिकनिनदधिया ताडिता: काकलोकै:’ ह्या चरणामध्यें कोकिळाच्या आवाजाला ‘कावळ्यांनीं ताडन करण्यास योग्य’ असें म्हटलें आहे. आवाज ताडन करण्यास योग्य असता तर, कोकिळाच्या आवाजाच्या भ्रांतीनें कावळ्यांनीं) आवाज करणार्‍या त्या स्त्रियांचें ताडन करणें योग्य झालें असतें. शिवाय कोकिळाप्रमाणें आवाज करणार्‍या स्त्रियांच्या ठिकाणी कोकिळांच्या आवाजाचा भ्रम होणें हेंही संभवत नाहीं आणि समजा तसा संभवत असला तरीसुद्धां तो भ्रम साद्दश्यमूलक नाहीं; तेव्हां या चरणाचा अर्थ योग्य रीतीनें जुळावा म्हणून ‘पिकनिकरधिया’ ( कोकिळांच्या समूहाची भ्रांति झाल्यामुळें) असा फरक केला पाहिजे. आतां तुम्ही म्हणाल कीं, “त्या स्त्रियांच्य आवाजाच्या ठिकाणीं कोकिळांच्या आवाजाची भ्रांति झाल्यामुळें त्या स्त्रियांच्या आवाजाच्या ठिकाणीं कोकिळांची भ्रांति उत्पन्न होऊन त्याद्वारा त्यांचा (स्त्रियांचा) आवाज कावळ्यांकडून होणार्‍या ताडनाला उपयोगी पडू शाकेल असें म्हणून या चरणाच्या अर्थाची चांगली संगति लावता येईल; व त्याकरतां या वाक्याचा शास्त्रीय भाषेंत चांगली संगाति लावता येईल; व त्याकरतां या वाक्याचा शास्त्रीय भाषेंत शाब्दबोध, असाही करतां येईल :---
‘प्रयोज्य (कार्य) हा अर्थ असलेल्या तृतीया विभक्तीच्या योगानें कोकिळांच्या आवाजाच्या भ्रांतीमुळें उत्पन्न झालेलें जें कावळ्यांकडून होणारें ताडन (म्ह० ताडनक्रिया) त्या ताडनक्रियेचें कर्म, आवाज करणार्‍या स्त्रिया.’
पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण तुम्ही सांगितलेला हा अर्थ ह्या चरणांतून निघूंच शकत नाहीं. चोरबुद्धया हत: साधु:’ (चोर समजून एका सज्जन पुरुषाला मारलें) ह्या वाक्यांत ‘चोर आहे असें समजलें जाणें ही क्रिया’ व ‘मारलें जाणें ही क्रिया,’ ह्या दोन क्रिया एकाच अधिकरणाच्या म्ह ० या वाक्यांतील कर्त्याच्या ठिकाणीं राहत असल्यामुळें, त्या दोन्ही क्रियांचा कार्यकारणभाव सूचित होतो, असें व्युत्पत्तिशास्त्र सांगतें. त्याचप्रमाणें, ‘दन्तिबुध्द्या हत: सूरैर्वराहो वनगोचर:’ (रानांत दिसणार्‍या डुकाराला हत्ती समजून शूर लोकांनीं ठार मारलें) ह्या ठिकाणी हत्ती समजणें, (म्ह० समजलें जाणें) ह्या क्रियेचें कर्म वराह आहे; व मारणें या क्रियेचें कर्मही वराहच आहे व या दोन क्रियांचें कर्म ‘वराह’ हा एकच असल्यामुळें ह्या दोन क्रियांमध्यें कार्यकारणभाव आहे असें समजावें. (म्ह० दन्तिबुद्धि ही वराहाच्या हननाला कारण आहे,)
परंतु तुम्ही ज्या पद्धतीनें अर्थ लावतां ती विचारांत घेतां, वरच्या ओळींत ‘दन्तिबुद्धया’ च्या ऐवजीं दन्तबुद्धया असें करावे लागेल; आणि तसे केलें तर, वरील चरणाचा (तल्लोपायालापन्त्य: इत्यादि चरणाचा) अर्थ समजण्यास कष्ट पडेल. शिवाय कोकिळाच्या आवाजाचे कूजित वगैरे शब्दांनींच वर्णन केलें जातें; निनद या शब्दानें त्याचे वर्णन करीत नाहींत. निनद या शब्दाचा प्रयोग, सिंहाचा आवाज, दुंदुभीचा आवाज वगैरे आवाजांचें वर्णन करतांना योग्य आहे. याशिवाय, वरील श्लोकांतील पहिल्या व दुसर्‍या चरणांत आलेल्या स्तन व पाणि या दोन शब्दांचा, चौथ्या चरणांतील ‘त्वदरिमृगद्दशां’ ह्या षष्टयंत शब्दाशीं, कसातरी अन्वय करतां येईल. (ते दोन शब्द त्या षष्टयंत शब्दाहून दूर असूनही व त्या शब्दाचा दुसरीकडे अन्वय होत असूनही, त्यांचा कसेंतरी करून ‘मृगद्दशां’ बरोबर अन्वय करतां येईल.) परंतु, तिसर्‍या चरणांतील ‘आलपन्त्य:’ ह्या प्रथमाबहुवचनांत आलेल्या विशेषणाचा, चौथ्या ओळींतील मृगद्दशां ह्या षष्टयंत विशेष्याशीं अन्वय करतां येणें शक्य नाहीं. त्यामुळें मृगद्दशां हें षष्टयंत पद या श्लोकांत अगदीं अलग पडतें. आतां विशेषणांच्या विभक्तींत बदल करून, त्यांचा विशेष्यांशीं अन्वय कदाचित् लावतां येईल. तरी सुद्धां प्रक्रमभंग व रचनेचा ओबदधोबडपणा हे दोन दोष या श्लोकांत जसेच्या तसेच राहणार. एकंदरीनें, व्युत्पत्तिशास्त्र न जाणणार्‍या एखाद्या अडाणी कवीनेच हा श्लोक रचला आहे (असें दिसतें). कदाचित दीक्षितांनीं भ्रांतिअलंकाराचा, ह्या श्लोकांत असलेला अंश घेऊनच, हा श्लोक उदाहरण म्हणून दिला असावा. थोडक्यांत हें सांगून झालें.
आतां अलंकारसर्वस्वकारांनीं भ्रांतिमान् अलंकाराचें लक्षण पुढीलप्रमाणें केलें आहे :---
“साद्दश्याद्वस्त्वन्तरप्रतीतिर्भ्रान्तिमान् । (साद्दश्यामुळें दुसर्‍या पदार्थाची प्रतीति होणे हा भ्रांतिमान् अंलकार.)” पण हें लक्षण बरोबर नाहीं. कारण ह्या लक्षणाची पूर्वीं सांगितलेल्या संशयालंकारांत, व पुढें सांगायच्या असलेल्या उत्प्रेक्षालंकारांत, अतिव्याप्ति होण्याचा प्रसंग येतो.
आतां वरील लक्षणांतील प्रतीति या शद्वाचा अर्थ ‘निश्चय’ असा जर केला, तर रूपकामध्यें येणार्‍या अभेदज्ञानांत ह्या लक्षणाची अतिव्याप्ति होण्याचा प्रसंग येईल. आतां हा प्रसंग टाळण्याकरितां “विषयाचा जो विषयपणा त्याला स्पर्श न करणारा असा येथील निश्चय आहे.” असें या लक्षणांत निश्चयाला आम्ही एक विशेषण देऊं, असें म्हणाल तर, आम्ही म्हणतो कीं, खुशाल द्या असें विशेषण. कारण तें देऊन सुद्धां अतिशयोक्ति अलंकारांत असणारें जें अभेदज्ञान त्यांत ह्या लक्षणाची होणारी अतिव्याप्ति तुम्हांला टाळता येणार नाहीं. आता या लक्षणांतील ‘प्रतीति’ (निश्चय) या शब्दाला तुम्ही अनाहार्य हें विशेषण देऊ पाहत असाल तर मग आम्ही केलेल्या भ्रांतिमान् अलंकाराच्या लक्षणासारखेंच शेवटीं तुमचें लक्षण ठरेल; (आणि इतकेंही करून तें तुमचें लक्षण भ्रांतिअलंकाराला जुळेल,) पण भ्रांतिमान् या ‘मतुब्’  प्रत्ययानें युक्त अलंकाराशीं, त्या तुमच्या लक्षणाची संगति लावतां येणार नाहीं.
मागें भ्रांतिमान् अलंकाराचें उदाहरण म्हणून आलेल्या ‘कनकद्रव’ इत्यादि श्लोकांत, सीता व वीज ह्या दोहोंमध्यें बिंबप्रतिबिंबभाव आहे, व त्याच श्लोकांतील युतत्व व मिलितत्व या दोन धर्मांमध्यें वस्तुप्रतिवस्तुभाव आहे असें समजावें.
“अत्यंत सौंदर्यानें व श्यामत्वानें शोभणार्‍या रामाला. वनामध्यें पाहिल्यावर हा पाण्यानें भरलेला मेघ आहे अशा समजुतीनें (भ्रांतीनें मोर एक सारखे नाचू लगले.”
ह्या श्लोकांत सुंदरपणा व श्यामत्व हे दोन धर्म अनुगामी आहेत.
येथें रसगंगाधरांतील भ्रांतिमान् अलंकाराचें प्रकरण समाप्त झाले.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP