परिणाम अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


‘(आरोप्यमाण) विषयीचा प्रकृताला उपयोग होतो’ याचा अर्थ काय ? ‘विषयीचा प्रकृत कार्यामध्यें उपयोग होतो,’ हा त्याचा अर्थ, का, प्रकृतरुफानेम त्याचा उप्योग होतो, हा त्याचा अर्थ ? ह्या दोन अर्थांपैकीं, पहिला अर्थ (तुमच्या द्दष्टीनें) संभवत नाहीं. कारण, “दासानें अपराध केला असतां, धन्यांनीं (मालकांनीं) त्याला लाथ मारावी हें योग्यच आहे. म्हणूनच, हे सुंदरी, (तूं मला लाथ मारल्याबद्दल) मला दु:ख होत नाहीं; परंतु माझ्या अंगावर उभे राहणार्‍या मोठया मोठया रोमांचरूपीं काटयांच्या टोकांनीं तुझ्या पायाला त्रास होईल, ह्याची मात्र माझ्या मनाला व्यथा होत आहे खरी,”
ह्या तुम्ही (अलंकारसर्वस्वकारांनीं) रूपकांचें उदाहरण म्हणून दिलेल्या श्लोकांत, विषयी कंटक, विषय जे पुलकाङ्कुर त्यांचें, पायाला बोचल्यानें होणारी जी व्यथा तद्रूप कार्य करीत असल्यानें, त्यांचा उपयोग झाला आहे; आणि म्हणूनच (तुमच्या व्याख्येप्रमाणें) ह्या श्लोकांत, परिणामालंकार होण्याचा प्रसंग येणारच. बरें, तुमचा दुसरा अर्थही मान्य करतां येत नाहीं; कारण तो केला तर.
“नंतर त्यानें, प्रौढ, (परिपव्क) स्नेहयुक्त व वदनाच्या मार्गाचा आश्रय करणार्‍या शब्दांच्या रूपानें, राजाला प्रथम नजराणा दिला; आणि त्यानंतर घोडे वगैरेंचा नजराणा दिला.”
हा श्लोक, तुम्ही स्वत:च, श्लोक, तुम्ही स्वत:च भिन्नविभक्तिक परिणामालंकाराचें उदाहरण म्हणून दिला आहे. त्याची संगाति लावतां येणार नाहीं. कारण कीं, राजांना आपल्या बासूस वळवून घेण्याकरतां, विषयी जो नजराणा त्याचा स्वत:च्या रूपानेंच ह्या ठिकणीं उपयोग झाला आहे. विषयी नजराण्यानें, वचनरूप विषयाचें रूप धारण करून, उपयोग केला आहे असें (म्हणतां येणार) नाहीं; उलट, विषय जीं वचनें त्यांचा विषयी जो नजराणा त्या रूपानेंच जास्त उपयोग झाला आहे. म्हणजे उलट ह्यांत परिणाम नसून त्याला विरुद्ध असलेलें रूपक आहे, म्हणून भिन्नविभक्तिक परिणामालंकाराचें आम्ही जें उदाहरण दिलें आहे तेंच चांगलें आहे. पण तुम्ही दिलेलें भिन्नविभक्तिक परिणामालंकाराचें हें उदाहरण, भिन्नविभक्तिक रूपकालंकाराचें उदाहरण होण्याच्या योग्यतेचें आहे. (ह्या वरील दोन्ही श्लोकांत) तृतीया विभक्तीचा अर्थ अभेद आहे हें खरें; पण तो अभदेसुद्धां, ज्याचा नयन हा अनुयोगी आहे व ज्याचा मीनवती हा प्रतियोगी आहे. अशा (मीनवती नयनाभ्याम् इत्यादि श्लोकांतील) अभेदासारखाच आहे. आणि म्हणूनच येथील तृतीयार्थ अभेदाचा अनुयोगी प्रकृत म्ह० विषयच आहे, असें मानलें पाहिजें.
( या परिणामालंकाराच्या बाबतींत) कांहीं लोकांचें म्हणणें असें :---
या अलंकाराच्या उदाहरणांत कांहीं ठिकाणीं केवळ विषय, आपणहून प्रस्तुत वृत्तांताला उपयोगी होत नाहीं; म्हणून त्याला विषयीशीं अभिन्न होऊनच राहावें लागतें, अशा ठिकाणीं, आरोप्यमाण परिणामालंकार होतो (असें म्हणावें). उदाहरणार्थ, :--- “ही सुंदर स्त्री वदनरूप चंद्राच्या योगानें माझ्या द्दष्टीला थंडगार करते.” ह्या ठिकाणीं, वदन हें चंद्राशीं अभिन्न होऊन राहाते. कारण कीं, केवळ वदनानें द्दष्टीला थंडगार करणें जुळत नाहीं. पण कांहीं ठिकाणीं, विषयीं, आपण होऊन, प्रकृत कार्यला उपयोगी नसतो, म्हणून त्याला विषयाशीं अभिन्न होऊन राहावें लागतें. अशा ठिकाणीं होणार्‍या परिणामालंकाराला विषयपरिणामालंकार म्हणावें. उदाहरणार्थ, :--- “ही सुंदरी वदनरूप चंद्रानें मदनसंतापाला दूर करते.” ह्या ठिकाईं चंद्र, वदनाशीं अभिन्न होऊन राहातो. कारण, केवळ चंद्रानें मदनसंतापाला दूर करणें शक्य नाहीं. अशा रीतीनें होणार्‍या, या दोन प्रकारच्या परिणामालंकाराला, रूपक म्हणणेंच योग्य होईल. कारण, आमच्या मतें रूपकाचें लक्षण असें आहे, ;--- “विषयत्व आणि विषयित्व या दोहोंपैकीं कोणत्या तरी एकाला प्राधान्य देऊन, निश्चित केलेल्या (अनुक्रमें) विषयित्व आणि विषयत्व या दोहोंपैकीं कोणत्या तरी एकाशीं अभेद सांगणें म्हणजे रूपक.” अशी (सर्वसामान्य) रूपकाची व्याख्या
असल्यामुळें, :--- “उपमान व उपमेय या दोहोंचा परस्परांशीं जो अभेद त्याला रूपक म्हणावें.” असें (काव्यप्रकाशकार मम्मटानीं) म्हटलें आहे. आणि म्हणूनच, “रूपकालंकाराहून परिणामालंकार निराळा म्हणतां येणार नाहीं.” (असें ह्या लोकांचें म्हणणें.)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP