श्री उमाहेमावती व्रत - व्रतकथा

उमा हेमावती व्रत मनोभावे केल्याने संपत्ती आणि संतती प्राप्त होते.


श्री उमाहेमावती हे शक्तितत्त्वाचे श्रेष्‍ठ असे स्वरुप आहे. उमाहेमावती हीच पराशक्ति. देवाना गर्व झाला तेव्हा ती त्यांच्यासमोर प्रगट झाली. त्यावेळी तिने उमाहेमावती हे नांव धारण केले. उमाहेमावती ही ब्रह्मशक्ति आहे. उमाहेमावतीनें असे अनेक अवतार घेतले. ललितादेवी हा सुद्धा त्याच शक्तिचा अवतार.
भंडासुर दैत्याने भगवान श्री शंकराची तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले. भंडासुराला शंकराने अमरत्वाचा वर दिला. त्यामुळे भंडासुर फारच मातला. उन्मत्त झाला. त्यानें पृथ्वीवर धुमाकूळ घातला. ऋषिमुनीना त्रास दिला. देवकार्ये बंद पाडली. मंदिरे उध्वस्त केली. स्वर्गातही त्याने देवांना जाऊन छळले. तेव्हां याच पराशक्तिने ललिता देवीचा अवतार घेतला. ललिता देवीने भंडासुराचा संहार केला. त्या अवताराला कामेश्वरी असेहि नांव आहे. त्याच पराशक्तिच्या उमाहेमावतीची ही अवतार कथा आहे.
एकदा देव आणि दैत्यांचे घनघोर युद्ध झाले. दैत्यांपुढे देवांचे कांही चालेना. तेव्हां याच ब्रह्मशक्तिच्या शौर्यशाली कामगिरीमुळे जयाचे पारडे देवांच्या बाजुने झुकले. दैत्य पराभूत होऊन सैरावैरा पळत सुटले. पराशक्तिच्या कृपेमुळे देवांचा विजय झाला. तीच ब्रह्मशक्ति म्हणजेच ही पराशक्ति. या शक्तिने आपणाला जय मिळवून दिला याचा देवांना विसर पडला. जयामुळें देवांना अहंकार झाला. स्वर्गात विजयोत्सव साजरा झाला. स्वसामर्थ्याचा देवांना गर्व झाला. ब्रह्मदेवाला देवांना झालेली घमेंड पाहून दुःख झाले. त्याला ती गोष्‍ट आवडली नाही. ब्रह्मदेवानें यक्षाचे रुप धारण करुन तो देवांसमोर प्रगट झाला.
त्या यक्षाला पाहून देवांना मोठे नवल वाटले. 'हा कोण, कुठला ? अकस्मात इथं कसा आला ? त्याची चौकशी करण्यासाठी अग्नि पुढे गेला. यक्षाने गवताची एक वाळलेली काडी त्याच्या पुढयात टाकली परंतु अग्नि ती काडी जाळू शकला नाही. तो खजिल होऊन मागे फिरला, म्हणून वायुला इंद्राने पुढे जाण्यास सांगितले. वायु मोठया ऐटीत पुढं गेला. त्यानेही खूप प्रयत्‍न केला; तरीसुद्धां त्याला ती काडी तसूभरही हालविता आली नाही. इंद्र क्रोधायमान होऊन पुढें सरसावला. तो यक्ष तिथेंच अंतर्धान पावला. त्याजागी दिव्य तेज पसरले. त्या प्रकाशातून देवी श्री उमाहेमावती प्रगट झाली. दाहिदिशातून देवीवर पुष्पवृष्‍टी झाली. सर्व देव तिच्या चरणीं लीन झाले. मातेला त्यांनी वंदन केले.
श्री उमाहेमावती देवीने त्या सर्व देवांना सांगितले, 'तुमचे सामर्थ्य किती आहे हे मला समजले. अग्नि आणि वायु यांना प्रचंड प्रयत्‍न करुनहि ती क्षुल्लक काडी जाळता आली नाही.' किंवा जागेवरुन जराहि हालविता आली नाही. यावरुन तुम्हां सर्वांना कळून आलेच असेल या विश्वात ज्या कांही क्रिया घडतात त्यामागे माझीच सर्व शक्ति असते. मी म्हणजे पराशक्ति. मी म्हणजे ब्रह्मशक्ति, आदिशक्ति, भगवती. म्हणून माझे हे उमाहेमावतीचे रुप लक्षात ठेवा. माझे रुप हेच लक्ष्मीचे रुप. तुम्हांला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला म्हणून मला हे रुप घेऊन तुमच्या समोर प्रगट व्हावे लागले. माझ्या या रुपाची शुक्रवारी जे भक्ती करतील त्यांना मी सर्व शक्तीमान करीन. त्यांच्यावर विजयालक्ष्मीची कृपा होईल. उमाहेमावतीचे हे अमृताचे उद्‌गार ऐकून सर्व देवांनी तिला वंदन केले. देवीचा जयजयकार केला. मातेनें सर्व देवांना आशिर्वाद दिला. देवांनी मातेची गौरवगाथा गायिली. देवी गुप्‍त झाली.
उमाहेमावतीचे पूजन करावयाचे असल्यास श्रीलक्ष्मीचे कोणत्याही स्वरुपाचे चित्र समोर ठेऊन तिचे चिंतन करावे. स्वस्थ चित्ताने तिची मूर्ति डोळयासमोर आणावी; आणि म्हणावे -

ॐ कारं परमानंद, सदैव सुखसुंदरीम् ।
ज्ञानलक्ष्मी, धनलक्ष्मी उमाहेमावती नमोस्तु ते ॥
सर्वज्ञे सर्ववरदे सुरपूजिते आद्यशक्ति ।
महाशक्ति भगवती उमाहेमावती नमोस्तु ते ॥
नमः सर्व स्वरुपेच नमः कल्याण दायिके ।
महासम्पत्प्रदे देवी उमाहेमावती नमोस्तु ते ॥
ब्रह्मरुप सदानंदे सदानंद स्वरुपिणी ।
द्रुतसिद्धिप्रदे देवी उमाहेमावती नमोस्तु ते ॥


अशी मातेची प्रार्थना, आराधना करावी. उमाहेमावती माता सर्व कल्याणांची कल्याणरुपिनी आहे. सर्व मनोरथांची साधिका आहे. तिच्या कृपेमुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. उमाहेमावती भक्त वत्सला आहे. मातेवर अचल निष्‍ठा ठेवून तिची पूजा श्रद्धेने दर शुक्रवारी केल्यास दैन्य, दारिद्रय, मानसिक क्लेश नष्‍ट होतात. आनंद, सुख, समाधान, संपत्ति, संतति, कीर्ति, यश लाभते. त्यांचा सदैव विजय होतो. माता आपल्या भक्तांना जपत असते. सदैव रक्षण करीत असते.
जय, आनंद, सुख, शांति, धनऐश्वर्य, ज्ञान, किर्ति मिळावी यासाठीं उमाहेमावतीचे व्रत शुक्रवारी अवश्य करावे. उमाहेमावती माता भक्तांचे संसार प्रकाशित करते. उमाहेमावती प्रकाश स्वरुपा लक्ष्मीमाताच आहे. तिचे रुप लक्ष्मी सारखेच आहे. उमाहेमावती मातेचा वत्सल, वरदहस्त सर्वांना लाभो.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP