शुक्रनीति - अध्याय चवथा

प्रस्तुत नीति शुक्राचार्यांनी न लिहिता मूळ नीति भगवान् श्रीशंकरांनी लिहिली आहे.

मिश्र प्रकरण
प्रकरण पहिले - सुह्रदादि निरुपण
आता मिश्र प्रकरण ( विविध विषयांचे प्रकरण ) संक्षिप्तपणे सांगतो. प्रथम सुह्रदादिची लक्षणे संक्षेप रुपाने सांगतो ती तुम्ही ऐका. ॥१॥

ज्याचे चित्त दुसर्‍या मित्राच्या दुःखाने पाघळते, जो दुसर्‍या मित्राच्या अपेक्षित कार्यात यश मिळावे म्हणून नेहमी प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे काहीही प्रेरणा नसताना आपल्या मित्राचा स्वतःहून सत्कार करतो. आपल्या मित्राची स्त्री, धन आणि गुप्त कामांचे वेळ पडली तर रक्षण करणारा असतो, ह्या चार लक्षणांनीयुक्त असणार्‍या मित्राला " उत्तम " म्हटले जाते. ह्यापेक्षा अन्य योग्यतेनुसार न्यून लक्षणांनी युक्त तीन, दोन आणि एक लक्षणाचा मित्र म्हणतात. ज्याचे चित्त मित्राच्या दुःखाने पाघळते. जो मित्राच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करतो आणि प्रेरणेशिवाय मित्राचा सत्कार करतो तो " त्रिपदमित्रक " आणि ज्याचे चित्त मित्राच्या दुःखाने पाघळते आणि जो मित्राच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करतो तो " द्विपदमित्रक " आणि जो फक्त मित्राच्या दुःखाने स्वतः दुःखी होतो तो " एकपदमित्रक " समजला जातो. ॥२॥३॥

एकच वस्तू आपल्या अधिकारात असावी अशी इच्छा करणारे दोघेजण, किंवा एकमेकांचे अपेक्षित कार्य नष्ट करणारे हे दोन्ही शत्रूता करणारे असतात. ॥४॥

पित्याचे सर्व द्रव्य माझेच आहे, दुसर्‍या भावाचे नाही. तो भाऊ माझ्या आधीन रहावा मी त्याच्या आधीन राहू नये आणि त्याला दूर करुन मी एकटाच सर्व गोष्टींचा उपभोग घेईन अशा प्रकारचा विचार दोन भाऊ मनात ठेवतात तेव्हा त्यांना " परमशत्रू " म्हटले जाते. जो फक्त द्वेष करतो आणि जो कुणी दुसर्‍याचा द्वेषपात्र होतो त्या दोघांना " एकतरफा शत्रू " म्हणतात. ॥५॥६॥

जो राजा शूरवीर, उन्नति होण्यासाठी कष्ट करणारा, बल आणि नीति ह्यानी परिपूर्ण असतो त्याला इतर राजे वेळ आली की गुप्तरुपाने वैरभाव आणि वरवर मैत्री दाखवितात. ह्या गोष्टीत काहीच आश्चर्य नाही. ह्यावरुन असे सिद्ध होते की, राजाचा कोणी मित्र नसतो. आनि राजासुद्धा कुणाचा मित्र नसतो. परंतु तरीही दोन राजे स्वार्थासाठी कृत्रिम मित्र बनून रहात असतात. तर काहीजण स्वभावतःच नेहमी मित्र किंवा शत्रू असतात. ॥७॥८॥९॥

मातृ कुळातील लोक, पितृ कुळातील लोक, आपली मुलगी, पत्नी, सासुरवाडीचे लोक, आते, मावशी, बहिण, नातू, नात, मावस बहिण, मावस भाऊ, चुलत भाऊ, चुलत बहिण हे सर्व जण, आणि राजा आणि गुरु हे सर्व मित्र असतात. ॥१०॥११॥

विद्या, शूरपणा, चतुरता, बळ आणि धीटपणा हे पाच सहज मित्र समजले जातात. कारण पंडित लोक ह्यावरच आपली उपजिवीका करतात. ॥१२॥

आई वडिलांची आज्ञा पाळणार्‍या मुलाला सार्थक पुत्र म्हणतात. शेकडो वाईट पुत्र असण्यापेक्षा एक सुपुत्र श्रेष्ठ आहे. ॥१३॥

स्वभावतःच खालील लोक शत्रू असतात. हिंसक, दुराचारी, ऋणी पिता, काका आणि त्याची मुले, व्यभिचारिणी माता, काकू आणि पत्नी. ॥१४॥

सासू सून, सवती सवती, नणंद भावजय, जावा जावा ह्या साधारणतः एकमेकांच्या शत्रू असतात. ॥१५॥

मूर्ख पुत्र, दुष्ट वैद्य, रक्षण न करणारा पती, अत्यंत क्रोधी राजा, प्रजा किंवा संतान आणि कंजूष धनवान हे सुद्धा शत्रूच असतात. ॥१६॥

दुष्टांकरीता राजा, कुलटा स्त्रियांसाठी पतिव्रता, दुर्जनांसाठी सज्जन आणि मूर्खांसाठी उपदेश करणारा शत्रू असतो. ॥१७॥

मूर्ख माणसाना उपदेश देण्याने क्रोध वाढतो. त्याने त्याला शांती मिळत नाही. सर्पाला दूध पाजल्याने ते विषवर्धक असते त्याने अमृत बनत नाही. विषापासून अमृत काढता येत नाही. ॥१८॥

ज्या उपायाने सर्प, हत्ती आणि सिंह यांना आपल्या ताब्यात ठेवता येते. त्याच प्रकारच्या यथायोग्य उपायांनी मित्र आणि शत्रू यांना ताब्यात ठेवावे. ॥१९॥

कारण प्रयत्न केल्याने मनुष्य जमिनीवर राहून स्वर्गाला जाऊ शकतो आणि वज्रालाही नष्ट करु शकतो. ॥२०॥

ज्यांचे परस्पर स्वभाव, स्थिती, विद्या, जात, सवयी, जीवन पद्धती सारखे असतील ते कधी निष्कपट भावाने सरळपणाने एकत्र आले तर ते मित्र होतात. ॥२१॥

तुझ्याशिवाय माझा दुसरा कोणी मित्र नाही असे मित्रासंबंधी बोलणे " साम वाक्य " आहे. आणि माझ्या जीवनासह माझ्या सर्व गोष्टी तुझ्याच आहेत असे म्हणणे " दान वाक्य " समजतात. ॥२२॥

" मित्रासमोर दुसर्‍या मित्रांच्या सुंदर गुणांची प्रशंसा करणे " हे मित्रासाठी " भेदवाक्य " आणि " तू जर असा आहेस तर मी तुझ्याशी मैत्री ठेवणार नाही " असे बोलणे मित्रासाठी " दंड वाक्य " आहे. ॥२३॥

जो स्वतः अपेक्षित कार्याची पूर्तता करीत नाही आणि दुसर्‍यासाठी अनपेक्षित कार्याची उपेक्षा करतो तो उदासीन जरी तह करण्यास तयार झाला तरी तो शत्रूच असतो. ॥२४॥

डाकू लोकांकडून शत्रूंना पीडा देणे, धनधान्य नष्ट करणे, दोष पहाणे, उग्र सैन्य आणि नीति ह्यांनी घाबरविणे, जर युद्ध झाले तर त्यावर न थांबता त्रास देत रहाणे ह्या सर्व गोष्टी शत्रूला " दंड " म्हणतात. ॥२५॥

नीति जाणणार्‍या राजाने निरनिराळ्या उपायाने त्याचे मित्र, उदासीन तसेच शत्रू आपल्यापेक्षा बलवान होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. ॥२६॥

दंडाच्या सहाय्याने वाईट आचरणापासून निवृत्त आणि नाहीसे करणे होते तसेच ज्या उपायाने मनुष्याचे वाईट गोष्टीपासून दूर जाणे होते त्याला " दंड " म्हणतात. ॥२७॥

हा दंड उपाय राजाच्या अधीन रहातो कारण तोच सर्वांचा स्वामी आहे.

झिडकारणे, अपमान करणे, उपाशी ठेवणे, बांधणे, मारणे, धन ताब्यात घेणे, शहराबाहेर किंवा राज्याबाहेर काढणे, डाग देणे, वाईट मार्गाने डोके उडविणे, गाढवावरुन धिंड काढणे, शरीराचा कुठलातरी भाग कापून टाकणे, प्राणदंड देणे, शुद्धी करुन घेणे हे सर्व उपाय दंडाचे भेद समजले जातात. ॥२८॥२९॥

दंडाच्या भीतिने प्रजानन आप आपल्या धर्मात मग्न रहातात आणि कोणा दुर्बलावर आक्रमण करीत नाहीत आणि खोटे भाषण करीत नाहीत. क्रूर लोक कोमलपणाने वागू लागतात. दुष्ट लोक दुष्टपणा सोडून देतात. पशुसुद्धा ताब्यात रहातात. चुगल्या करणारे आपले तोंड बंद ठेवू लागतात. आततायी लोक घाबरुन असतात. कर बुडविणारे लोक कर देऊ लागतात. जे कोणी घाबरत नाहीत तेही घाबरु लागतात. म्हणून राजाने नेहमी धर्माच्या रक्षणासाठी दंड देणारा असावे. ॥३०॥३१॥३२॥३३॥

घमेंडी, कर्तव्य आणि अकर्तव्य काय हे न जाणणार्‍या आणि कुमार्गावर चालणार्‍या गुरुलाही दंड देणे हे राजाचे कर्तव्य आहे. ॥३४॥

दंडासहित नीतिने व्यवहार करण्याने राजाची सर्व कामे यशस्वी होतात. कारण धर्माचा मोठा रक्षक दंडच मानला जातो. ॥३५॥

नेहमी दंड देण्यास योग्य असणार्‍या मनुष्याला दंड न देण्याने, दंड न देण्यास योग्य असणार्‍याला दंड देण्याने, अपराधापेक्षा जास्त दंड देण्याने, विद्वान लोक असा अनुचित दंड देणार्‍या राजाचा त्याग करतात आणि तो राजा ह्या कर्मापायी पातकी होतो. ॥३६॥

लोभामुळे प्रजाजन राजा प्रसन्न होईल असे वागू लागतात तर मग राजाच्या भितीमुळे त्याने शिकविल्याप्रमाणे का नाही वागणार ? नक्की वागतील. ॥३७॥

ज्या राज्यात राजा धर्मात्मा असतो तेथील प्रजाही धर्मनिष्ठ असते आणि जेथे राजा अत्यंत पापी असतो तेथील प्रजासुद्धा अधर्माने वागणारी असते. ॥३८॥

दारु पिणारा एकटाच बुद्धि आणि व्यवहार या दोघांमध्ये भ्रष्ट होतो. परंतु लोकांची बुद्धि किंवा व्यवहार भ्रष्ट करीत नाहीत. काम तसेच क्रोध या दोन्ही गोष्टी दारु आणि इतर मादक द्रव्यापेक्षा जास्त मादक असतात. ॥३९॥

राजा अत्यंत लोभाने प्रजेचे धन आणि प्राण हरण करतो. म्हणून काम, क्रोध आणि लोभ यांना सोडून राजाने दंड देणारा असावे. ॥४०॥

स्वभावतः चुगली करणारे लोक परस्पर मतभेद निर्माण करुन राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून राजाने कोणाकडून काही चुगली ऐकली तर नीट विचार करुन त्यानुसार कार्य करावे. ॥४१॥

कायिक ( शरीराला होणारा ), वाचिक ( वाणीने होणारा ), मानसिक ( मनाने होणारा ), सांसर्गिक ( संसर्गाने होणारा ) ह्या प्रकारचे चार अपराधांचे भेद आहेत. ह्यातील प्रत्येकबुद्धिकृत ( जाणून बुजून होणारा ) आणि अबुद्धिकृत ( न समजता होणारा ) भेदानुसार दोन दोन प्रकारचे होतात. ॥४२॥

हे अपराध पुन्हा दोन प्रकारचे होतात. एक कारित ( दुसर्‍याकडून करविलेला ), दुसरा अनुमोदित ( आपण अनुमोदन दिलेला ), अस्कृतकृत ( वारंवार केलेला ), अभ्यस्तकृत ( सातत्यानी केलेला ), स्वभावकृत ( स्वभावानुसार केलेला ), ह्या प्रकाराचे चार प्रकार असतात. ॥४३॥

डोळे आणि तोंड यांच्या खुणांनी मानसिक अपराधाला, क्रियेने केलेला कायिक, कर्कश वचनाने वाचिक आणि सहवासाने सांसर्गिक अपराधांचे गुण बघून त्यामुळे उत्पन्न झालेले आणि भविष्यात होणारे अपराध विचारांत घेऊन दंडाचा विचार केला पाहिजे. ॥४४॥४५॥

जो धनाच्या गर्वाने अपराध करतो त्याच्याजवळून धनाचा एक चतुर्थांश दंड घ्यावा. त्यानंतर पुन्हा तोच अपराध केला तर त्याच्या धनाचा अर्धा भाग घ्यावा. त्यानंतरही अपराध केला तर सर्व धन ताब्यात घ्यावे. तरीही पुन्हा तसाच अपराध केला तर जन्मभर तुरुंगात टाकावे. ॥४६॥

जो सहकार्‍याच्या श्रेष्ठतेचा फायदा घेऊन विद्या किंवा बल यांच्या अहंकाराने पाप ( अपराध ) करतो त्याला कायमचे तुरुंगात ठेवावे. तसेच त्याला मारपीट करावी. ॥४७॥

जेव्हा राजा अपराधी माणसाला जास्त दंड देणारा आणि धन लुटणारा होऊन अपराधाला क्षमा करीत नाही म्हणजे अयोग्य दंड देतो तेव्हा प्रजा रागावते आणि त्यांना शत्रू आपल्याकडे करुन घेतो. म्हणून राजाने जितका अपराध असेल तितक्या प्रमाणात विचार करुन दंड दिला पाहिजे. आणि क्षमाशील प्रजेला आनंद होईल असे वागले पाहिजे. ॥४८॥४९॥

जेव्हा राजा अधर्माने चालणारा होतो त्यावेळी प्रजेने " धर्मशील, बलवान आणि त्या राजाच्या शत्रूच्या आश्रयाला जाऊ " असे सांगून त्याला घाबरविले पाहिजे. जर त्याने अधर्माने वागण्याचे सोडले नाही तर आम्ही सर्व प्रजानन आपली साथ सोडून तुझा शत्रू धर्मशील आणि बलवान राजाला मिळू असे सांगून त्या अधर्मी राजाला घाबरवावे. ॥५०॥

जोपर्यंत राजा धर्मशील असतो आणि प्रजेबरोबर धर्मानुसार व्यवहार करतो तोपर्यंत तो राजा बनून राहतो. नाहीतर राजा अधर्माने वागणारा असेल तर त्याची प्रजा आणि तो स्वतः नष्ट होतो आणि त्याचे राज्य नष्ट होते. ॥५१॥

ह्या प्रकारे ह्या मिश्र प्रकरण नावाच्या अध्यायाच्या सुह्रदादि नावाचे पहिले प्रकरण मित्र, उदासिन आणि शत्रू ह्या विषयांसंबंधी सांगितले आहे. ॥५२॥

दुसरे प्रकरण
कोश निरुपण
एकाच प्रकारच्या वस्तूंच्या समुहाला " कोश " म्हणतात. तो सुटा सुटा अनेक प्रकारचा असतो. ॥१॥

सेना आणि प्रजा यांच्या रक्षणासाठी तसेच यज्ञासाठी ज्या कोशाचा संग्रह केला जातो तो राजाला ह्या लोकांत तसेच परलोकांतसुद्धा सुखकारक होतो. ह्याच्या दुसर्‍या कार्यासाठी केलेला कोशसंग्रह दुःखकारक होतो. ॥२॥

जो कोशसंग्रह स्त्री पुरुषांसाठी तसेच स्वतःच्या उपभोगासाठी केला जातो तो केवळ नरक देणारा समजावा. कारण तो परलोकात सुखकारक होत नाही. ॥३॥

ज्याने अन्यायाने धन मिळविले आहे तो त्या पापाचे फळ भोगणारा असतो. आणि जे धन योग्य माणसाकडून घेतलेले आहे किंवा योग्य माणसाला दिले जाते ते धन वाढत जाते. ॥४॥

जो न्यायाने धन मिळवितो आणि सत्कार्यासाठी खर्च करणारा असतो तो " सुपात्र " समजतात. ह्याच्या विरुद्ध अन्यायाने धन कमावून ते वाईट मार्गाने खर्च करतो त्याला " अपात्र " म्हणतात. म्हणून अपात्राच्या सर्व धनाचे हरण करणारा राजा दोषी होत नाही. ॥५॥

राजाने अधर्माने वागणार्‍या दुसर्‍या राजाजवळचे सर्व प्रकारचे धन वाटेल त्या उपायाने हरण करावे. तसेच ह्याच प्रकाराने शत्रूच्या राज्यातून धनाचे हरण करावे. ॥६॥

ज्याने नीति आणि शक्ती यांचा त्याग करुन म्हणजे अन्याय करुन आपल्या प्रजेला पीडा देऊन धनाचा संचय केला आहे त्याचे सर्व धन राज्यासकट शत्रूच्या आधीन होते. ॥७॥

विशेष संकट आल्याशिवाय प्रजेवर अधिक कर वगैरे लावू नये. तसेच तीर्थस्थान किंवा देवतांची संपत्ती यावर कर लावून राजाने आपला कोश वाढवू नये. ॥८॥

राजा शत्रूचा नाश करण्यासाठी सेनेचे रक्षण करण्यात गुंतलेला असतो त्यावेळी विशेष प्रकाराचा कर लावून प्रजेकडून धन जमा करावे. ॥९॥

राजाने आपल्यावर संकट आल्यावर " मी व्याज देईन " असे प्रतिज्ञापत्र देऊन सावकारांकडून धन बलपूर्वक घेतले पाहिजे. आणि जेव्हा संकट नाहीसे होईल तेव्हा व्याजासकट धन परत केले पाहिजे. ॥१०॥

धनाचा अभाव असल्याने सैन्याचे रक्षण करता न आल्याने प्रजा, राज्य, कोश आणि राजा क्षीण होतो. प्रबळ दंड दिल्यामुळे सुरथ आदि राजे राज्यच्यूत झालेले आहेत. ॥११॥

कोशाचे मूळ सेना आहे म्हणजे सेनेमुळे कोशाचा संग्रह होतो आणि सेनेचे मूळ कोश आहे. म्हणजे कोशामुळे सेनेचा, संग्रह होतो. आणि सेना आणि कोश यांचे रक्षण करण्याने कोश आणि राष्ट्र यांची वृद्धि आणि शत्रूंचा नाश होतो. प्रजेचे रक्षण करण्याअगोदर कोश, राष्ट्राची वृद्धि आणि शत्रूचा नाश हे तीन असतात. ह्या सर्वांच्या शेवटी स्वर्ग मिळतो. ॥१२॥१३॥

व्यापारी लोक मूळ धन वापरुन व्यापार करतात. म्हणजे वस्तूंचे क्रय आणि विक्रय करुन व्यापार करतात. परंतु आपले सर्व मुद्द्ल व्याजावर देत नाहीत. वस्तु महाग झाली की ती विकतात आणि स्वस्त झाली की खरेदी करुन साठवून ठेवतात. ॥१४॥

साठवून ठेवलेल्या धान्यासारख्या गोष्टींचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे. कारण संग्रह करताना फार दुःख होत असते आणि त्याच्या चौपट दुःख त्याचे रक्षण करताना होते. ॥१५॥

क्षणभर रक्षण करताना दुर्लक्ष झाले तर ती ताबडतोब नष्ट होते. ॥१६॥

संग्रहीत वस्तु नष्ट झाली तर संग्रह करणार्‍याला दुःख होते. त्याच्या पत्नीला आणि मुलांना तसे दुःख होत नाही. मग इतर लोकांना का दुःख होईल ? ॥१७॥   

आपल्या स्वतःच्या कामात जसा स्वतः पूर्णपणे तत्पर असतो तसेच त्याचे सहकारीही त्या कामात तत्पर कसे असतील ? आपल्या कामात जो जागृत रहातो त्याचे सहकारीही त्याच्यासारखेच त्या कामात जागृत रहातात. ॥१८॥

जो एक अधिकार पद असताना दोन अधिकार पदांवर अधिकार ठेवतो, जो एक स्त्री जिवंत असताना दुसरे लग्न करतो, जो दुसर्‍यावर विश्वास ठेवतो, जो धनाची आशा ठेवून आळशी रहतो, जो पत्नीच्या आधीन रहातो. त्याचप्रमाणे जो चोर, परस्त्रीगामी, आततायी माणसाच्यासाठी साक्ष देतो किंवा साक्ष मागतो ते सर्व मूर्ख असतात. ॥१९॥२०॥

कृपणाप्रमाणे आपल्या धनाचे रक्षण करावे आणि वेळ आल्यावर विरक्त माणसाप्रमाणे ते धन वाटून टाकावे. ह्याच्या उलट धनाचा व्यय करणार्‍याला मूर्ख समजतात. ॥२१॥

विकणार्‍या आणि खरेदी करणार्‍या जवळून राजा आपला म्हणून जो भाग घेतो त्याला " जकात " म्हणतात. ॥२२॥

जकात वसुलीची जागा बाजाराच्या रस्त्यावर तसेच गावाच्या सीमेवर जकात नाका बांधून व्यापारी लोकांकडून जकातीची वसुली केली जाते. सर्व वस्तुंवर प्रयत्नपूर्वक एकदाच जकात वसूल करावी. ॥२३॥

आपल्या राज्यात राजाने छळ करुन पुन्हा पुन्हा कुठल्या वस्तूंवर जकात घेऊ नये. आणि राजाने विकल्या जाणार्‍या किंवा खरेदी केलेल्या वस्तुच्या किंमतीच्या बत्तीसावा हिस्सा जकात म्हणून वसूल करावा किंवा मूळ किंमत सोडून जो फायदा होईल त्यावर विसावा किंवा सोळावा हिस्सा जकात घ्यावी. ज्या व्यापार्‍याला मूळ किंमतीपेक्षा कमी किंवा तेवढाच फायदा होईल त्याच्या जवळून जकात घेऊ नये. आणि राजाने थोड्या मूळ रक्कमेपेक्षा जास्त फायदा होतो आहे हे पाहून त्यानुसार विक्रेत्याजवळून जकात घ्यावी. ॥२४॥२५॥

व्यापारी आणि सावकारी करणार्‍यांकडून त्याच्या फायद्याचा बत्तिसावा हिस्सा राजाने कर म्हणून वसूल करावा. आणि घर बांधण्यासाठी दिलेल्या जमिनीवर त्या जमिनीच्या किंमती इतका कर घ्यावा. ॥२६॥

राजाने दुकानदारांकडून दुकानाच्या जमिनीचा कर घ्यावा आणि प्रवाश्यांकडून रस्त्याची साफसफाई आणि स्वरक्षणासाठी कर वसूल करावा. ॥२७॥

राजाने सर्वांकडून कर घेऊन नोकराप्रमाणे त्यांचे रक्षण करावे. ह्या प्रकारे थोडक्यात कोश प्रकरणाचे वर्णन केले आहे. ॥२८॥

तिसरे प्रकरण
विद्या व कला निरुपण
राज्य आणि राज्याची सर्वश्रेष्ठता
ज्या राजाच्या अधिपत्याखाली जेवढे राष्ट्र असते त्याला त्याचे " राज्य " म्हणतात. सर्वगुण संपन्न होण्यापेक्षा शंभरपट जास्त श्रेष्ठ धन कुबेर आहे. त्यानंतर राजा होणे सर्वांत अधिक श्रेष्ठ असते. कारण हे साधारण तपस्येचे फळ नसते. कारण तो जगात देवतांप्रमाणे विहार करीत असतो. ॥१॥२॥

राजाच्या आश्रयाला रहाणारी माणसे आणि त्याची सर्व प्रजा तो राजा जसे आचरण करतो तसेच आचरण करतात. ह्याचप्रमाणे तो राजा राष्ट्राने केलेल्या पाप आणि पुण्य यांचे फळ दुःख आणि सुख ह्या प्रकाराने भोगतो. ॥३॥

ज्या राजाच्या राज्यात प्रजा आप आपल्या धर्मात तत्पर रहाते, धर्म आणि नीति यात तत्पर असणारा राजा चिरस्थायी कीर्ति प्राप्त करतो. पृथ्वीवर त्याची कीर्ति जोपर्यंत विद्यमान रहाते तोपर्यंत तो स्वर्गात रहातो. ॥४॥

अपकीर्ति हाच नरक आहे. परलोकांत दुसरा कुठलाच नरक नाही. मनुष्य देह सोडून दुसरा देह नरक आहे. निरनिराळ्या व्याधी होणे फार मोठ्या पापाचे फळ समजले पाहिजे. ॥५॥६॥

बरेच दिवस प्रचलित असणारा देशधर्म, जातिधर्म, कुळधर्म, ऋषीमुनींनी सांगितलेला धर्म, प्राचीन आणि नवा धर्म, ह्या सर्वांचे ज्ञान प्राप्त करुन राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी राजाने त्यांचे रक्षण करावे कारण धर्माचे रक्षण करण्यानेच राजा लक्ष्मी आणि कीर्ति प्राप्त करतो. ॥७॥८॥

जो प्राणी पूर्व कर्मानुसार ज्या जातीत उत्पन्न होतो तीच त्याची जात असते. तीच माणसे त्यांचे नांव आणि कर्माप्रमाणे जातिभेद मानतात. दुसरी माणसे मानीत नाहीत. ॥९॥

जन्माचे उत्तम वर्णाचा मनुष्य संसर्गामुळे नीच होतो. परंतु जन्माने नीच वर्णाचा मनुष्य संसर्गाने उत्तम होऊ शकत नाही. ॥१०॥

मनुष्य कर्मावरुन तात्काळ उत्तम किंवा नीच समजला जातो. परंतु गुणावरुन काही वेळाने उत्तम किंवा नीच मानण्यात येतो. आणि विद्या आणि कला यांच्या सहाय्याने रहाणार्‍याच्या नावावरुन अनेक जातींची कल्पना केली गेलेली आहे. ॥११॥

यज्ञ करणे, वेद शिकणे, दान देणे ही तीन कर्मे द्विजाति ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ) यांची आहेत. परंतु ब्राह्मणांसाठी यज्ञ करणे, वेद शिकविणे, दान देणे ही तीन कर्मे जीवनासाठी जास्त आहेत. ॥१२॥

सज्जनांचे रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे, आपल्या अंशच्याला ओळखणे ही तीन कामे क्षत्रियाला जगण्यासाठी असतात. शेती करणे, गोपालन करणे आणि व्यापार करणे ही तीन कामे वैश्यांच्या जगण्यासाठी असतात. ॥१३॥

दान देणे, जगण्यासाठी नोकरी करणे, धुणी भांडी करणे ही शूद्राची कर्मे आहेत. क्रियेच्या भेदानुसार सर्व वर्णनाना जगण्यासाठी वृत्ती अनिंदित मानली गेलेली आहे. ॥१४॥

ज्या ब्राह्मणाने संपूर्ण विद्या आणि कलांचा अभ्यास केला आहे तो सर्वांचा गुरु होण्यास योग्य आहे. शिक्षणाशिवाय केवळ जातीमुळे तो गुरु होत नाही. ॥१५॥

जे कर्म वाणीच्या सहाय्याने उत्तम प्रकारे समजावता येते ते कर्म " विद्या " नावाने प्रसिद्ध आहे आणि जे मुका मनुष्यसुद्धा हाताने करु शकतो त्याला " कला " म्हणतात. ॥१६॥

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत. आणि क्रमानुसार आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि तंत्र हे चार उपवेद आहेत. ॥१७॥

शिक्षण, व्याकरण, कल्प, निरुक्त, ज्योतिष आणि छंद ही वेदांची सहा अंगे मानलेली आहेत. ॥१८॥

मीमांसा, तर्क ( न्याय वैशेषिक ), सांख्य, वेदांत, योग, इतिहास, पुराण, स्मृति, नास्तिकमत, अर्थशास्त्र, कामशास्त्र, शिल्पशास्त्र, अलंकारशास्त्र, काव्य, देशभाषा, अधोरेखित उक्ती, यवनांचे मत आणि निरनिराळ्या देशांतील प्रचलित धर्म हे सर्व बत्तीस विद्या या नावाने प्रसिद्ध आहेत. ( चार वेद, चार उपवेद, वेदांची सहा अंगे आणि अठरा विद्या ) ॥१९॥२०॥

ज्याच्यात सांगितलेल्या सर्व विधींचे पालन केल्याने मनुष्याला दीर्घ आयुष्य मिळते. ज्याच्यामुळे रोगांचे लक्षण, औषधे आणि निदान यांचे ज्ञान होते. त्याचप्रमाणे रोग्याच्या आयुष्याचे ज्ञान मिळते त्याला ऋग्वेदाचा उपवेद " आयुर्वेद " म्हणतात. ॥२१॥

ज्याच्या ज्ञानाने मनुष्याला युद्ध, शस्त्र, व्यूहरचना इत्यादिंमध्ये निपुणता मिळते त्याला यजुर्वेदाचा उपवेद " धनुर्वेद " म्हणतात. धनुर्वेदाच्या अभ्यासाने युद्धनीति व शस्त्रांच्या संबंधीचे ज्ञान यात वाढ होते. ॥२२॥

ज्यात नानाप्रकारच्या उपास्य देवांच्या मंत्रांचे प्रयोग, आणि मारण, मोहन, उच्चारन, विद्वेषण, आकर्षण, स्तंभन ह्या सहा प्रयोगांचा भेद, प्रयोग आणि उपसंहार, धर्म आणि नियम यांचे वर्णन आहे त्याला अथर्वेदाचा उपवेद " तंत्र " किंवा " आगम " म्हणतात. ॥२३॥

ज्याच्यात उदात्त, अनुदात्त तसेच स्वरित स्वराने, कालक्रमानुसार, ताल्वादि स्थानाने, प्रयत्नपूर्वक उच्चारण इत्यादिने वर्णांचे शिकणे असते त्याला " शिक्षा " म्हणजे शिकणे म्हणतात. ॥२४॥

ज्याच्यात ब्राह्मण भागाच्या उरलेल्या अंशाने यज्ञाचा प्रयोग सांगितलेला आहे त्याला " श्रोतकल्प " म्हणतात. ह्यापेक्षा भिन्न असतो त्याला " स्मार्त्तकल्प " म्हणतात. ॥२५॥

ज्यामध्ये प्रत्ययाच्या पूर्वरुपातर्फे तसेच धातू, संधी, समास आणि पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यांच्यातर्फे शब्द सिद्ध केलेले आहेत त्याला " व्याकरण " म्हणतात. ॥२६॥

ज्याच्यात शब्दांचे निष्कर्षासह कथन आणि वाक्यांच्या अर्थाचा एका अर्थात संग्रह केलेला आहे त्याला " निरुक्त " म्हणतात. तो शब्दांचा अर्थ चांगल्याप्रकारे सांगतो म्हणून त्याला वेदाचा " श्रोत्र " म्हणजे कान मानला जातो. ॥२७॥

ज्याच्यात नक्षत्रे आणि ग्रह यांच्या गतीमुळे काळाचा पृथक पृथक निर्देश केला जातो आणि ज्याचे संहिता, होरा आणि गणित रुपाचे तीन स्कंध आहेत त्याला " ज्योतिष " म्हणतात. ॥२८॥

ज्यात वेदांच्या वाक्यांची अनुष्ठान भेदानुसार अर्थ कल्पना व्यवस्थित केलेली आहे म्हणजेच वाक्याच्या अर्थाचा विचार केलेला आहे त्याला " मीमांसा " म्हणतात. ह्याला " न्याय " असेही म्हणतात. ॥२९॥

ज्यात भाव ( द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय ) आणि अभाव पदार्थांचे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द प्रमाणाने विचारपूर्ण तर्क होतो, जो कणादि वैशेषिक दार्शनिकांचे मत आहे त्याला " तर्क " किंवा " न्याय " म्हणतात. ॥३०॥

ज्यात एक पुरुष, आठ प्रकृति, सोळा विकार, कुटस्थ पुरुष, प्रकृति, महतत्व, अहंकार, पांच तन्मात्रा - शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध ह्या आठ प्रकृति, तसेच आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी ही पाच महाभूते, हस्त, पाद, जिव्हा, लिंग, गुदा ही पाच कर्मेन्द्रिये, श्रवण, त्वक्‍ चतु, रसना, घ्राण ही पाच ज्ञानेन्द्रिये आणि एक उभयेन्द्रिय मन हे सोळा विकार आहेत. ह्या प्रकारे पंचवीस तत्वादिंच्या संख्येची विशेषता आहे म्हणून त्याला " सांख्य " शास्त्र म्हणतात. ॥३१॥

एक, अद्वितीय, अनिर्वचनीय ब्रह्मच ह्या जगात आहे. नाना प्रकारच्या दिसणार्‍या वस्तू सत्य नाहीत. वस्तुतः मायेने उत्पन्न झालेल्या अज्ञानानेच ह्या सत्य भासतात असे वेदांती लोकांचे मत आहे. ॥३२॥

ज्यात एकाग्रतेच्या साथ ध्यान आणि कुंभकादि प्राणायमाच्या द्वारे चित्ताच्या वृत्तीचा विरोध करणे सांगितले आहे त्याला " योग " शास्त्र म्हणतात. ॥३३॥

ज्यात एखाद्या मुख्य राजाचे चरित्र वर्णन छळाने केलेल्या प्राचीन व्यवहाराचे वर्णन आहे त्याला " इतिहास " आणि " पुरावृत्त " ही म्हणतात. ॥३४॥

ज्याच्यात सर्ग सृष्टि, प्रतिसर्ग, प्रलय, वंश, मन्वन्तर आणि वंशांचे चरित्र हे सर्व वर्णन केलेले असते त्याला " पुराण " म्हणतात. ॥३५॥

ज्यात वेदाच्या अविरुद्ध चारी वर्ण आणि आश्रम यांच्या धर्माचे वर्णन आणि अर्थशास्त्र याचे चांगल्याप्रकारे प्रतिपादन केलेले आहे त्याला " स्मृति " म्हणतात. ॥३६॥

ज्यात श्रृति आणि स्मृति यांच्या अविरुद्ध राजांच्या आचरणासंबंधी उपदेश केला गेलेला आहे तसेच चांगल्या मार्गाने धनार्जन करण्याचा विधी सांगितलेला आहे त्याला " अर्थशास्त्र " म्हणतात. ॥३७॥

ज्यात नरांचे शश, मृग, घोडा, हत्ती यांच्या रुपानुसार जातिभेद तसेच अनुकूल, दुष्ट, शठ आदि नायकभेद, स्त्रियांचे पदमिनी, चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी ह्या रुपानुसार जातीभेद तसेच स्वकीया, परकीया, वेश्या, इत्यादि नायिकाभेद आणि स्त्री आणि पुरुष यांचे अनुरागाच्या पद्धती यांचे विशेषरुपाने वर्णन आहे त्याला " कामशास्त्र " म्हणतात. ॥३८॥३९॥

ज्यात प्रासाद ( राजभवन, देवमंदिर ), प्रतिमा, उद्यानगृह, विहिर इत्यादि सुंदर प्रकाराने निर्माण करुन संस्कार करण्याचा विधी वर्णन केलेला असतो त्याला " शिल्पशास्त्र " म्हणतात. ॥४०॥

हावभाव करुन नाचण्याला " नृत्यकला " म्हणतात आणि अनेक प्रकारच्या वाद्य यंत्रांना बनविणे आणि वाजविणे ह्या ज्ञानाला " वाद्य " आणि " वादन " कला म्हणतात. ॥४१॥

स्त्री आणि पुरुष यांचे पोषाख सुंदररितीने परिधान करणार्‍या कलेला " वस्त्रालंकार संधान " कला असे म्हणतात. आणि अनेक प्रकारची रुपे प्रकट करणार्‍या विधीला " रुप प्रकाशन " कला म्हणतात. ॥४२॥

बिछान्यांना चांगल्याप्रकारे सजवून त्यावर पुरुष आदिंना सुंदर सजवून ठेवण्यालाही कला म्हणतात. आणि द्यूत वगैरे अनेक क्रीडांच्या मार्गाने मनोरंजन करण्यालाही कला म्हणतात. ॥४३॥

अनेक प्रकारची आसने वापरुन संभोग करण्याच्या ज्ञानालासुद्धा कला म्हणतात. वरील सर्व सात कलांचे वर्णन " गांधर्ववेदात " केलेले आहे. ॥४४॥

फुलांच्या रसापासून आसवादि मादक द्रव्य तसेच मद्यादि बनविण्याच्या क्रियेला कला म्हणतात. आणि शरीरात रुतून बसलेल्या दुखण्याला सुखपूर्वक काढण्याला आणि शिरेतील व्रणाला शस्त्र वापरुन चिरण्याच्या ज्ञानाला कला म्हणतात. ॥४५॥

हिंग इत्यादि द्रव्ये आणि मिठासारखे क्षार यांच्या संयोगाने अन्न शिजविण्याच्या क्रियेला कला म्हणतात. तसेच वृक्षांना फुले फळे येईपर्यंत त्यांचे रक्षण करणे हे समजणे हीही एक कला आहे. ॥४६॥

दगड तोडणे आणि सुवर्णादि धातूंना गाळणे आणि त्याचे भस्म करणे ह्यालाही कला म्हणतात. आणि गुळाच्या पदार्थांना बनविण्याच्या विधीलाही कला म्हटले जाते. ॥४७॥

निरनिराळ्या धातूंना तसेच औषधांना एकत्र करणे तसेच त्यावर प्रयोग करण्याच्या ज्ञानालाही कला म्हणतात. सुवर्णादि निरनिराळे धातू एकत्र मिसळल्यावर त्यांना पुन्हा निराळे करण्यालाही कला म्हणतात. ॥४८॥

निरनिराळ्या धातूंना अपूर्वरितीने एकत्र करण्याच्या ज्ञानाला कला म्हणतात. आणि क्षार तयार करण्यालाही कला म्हणतात. वर वर्णन केलेल्या दहा कला आयुर्वेद शास्त्रांत आहेत. ॥४९॥

पाय योग्य जागेवर ठेवून नेम धरुन शस्त्र चालविण्याला कला म्हणतात. संधिस्थानावर प्रहार करणे आणि पकडून खेचणे इत्यादि प्रकाराच्या मल्लयुद्ध करण्यालाही कला म्हणतात. ॥५०॥

शस्त्राशिवाय नुसते बुक्के मारुन दोन मल्लांचे जे युद्ध होते त्याला " बाहुयुद्ध " म्हणतात. ह्यात जो मरतो त्याला स्वर्ग मिळत नाही आणि ह्या जगात यशही प्राप्त होत नाही. ॥५१॥

शत्रूच्या बलाचा दर्प नाश होईपर्यंत होणारे युद्ध कुणाच्या यशासाठी होत नाही ? सर्वांसाठीच होते. म्हणून जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत बाहुयुद्ध करणे जरुर आहे. ॥५२॥

हाताने प्रहार करणे, हाताच्या प्रहाराला रोखणे, निरनिराळ्या प्रकारचे बाहुप्रकार करणे, अत्यंत भीषण बाहुप्रकार करणे, शत्रूवर एका पाठोपाठ बाहुप्रकार करणे आणि बाहुप्रकाराने जखम करणे तसेच असावधान असणार्‍या शत्रूला हाताने कुस्करुन टाकणे इत्यादि प्रकाराने केलेल्या बाहुयुद्धाला " निपीडन " म्हणतात. ह्या पासून स्वतःचा बचाव करण्याला " प्रतिक्रिया " म्हणतात. ह्या सर्व गोष्टी मल्लयुद्ध ह्या कलेमध्येच मोडतात. ॥५३॥५४॥

लक्षाच्या जागेवर युद्धाची सामुग्री तसेच अस्त्र फेकणे म्हणजेच नेम धरुन अस्त्र चालविणे ही सुद्धा कला आहे. आणि युद्धाचा रागरंग पाहून व्यूह रचणे ही सुद्धा कला आहे. ॥५५॥

हत्ती, घोडे आणि रथ यांचे विशेष प्रकाराने संचलन करुन युद्धाचे नियोजन करणे ही कला आहे. ह्या पाच कला धनुर्वेद शास्त्रात वर्णिलेल्या आहेत. ॥५६॥

अनेक प्रकारची पदमासनासारखी आसने तसेच मत्स्य - कूर्म इत्यादि मुद्रा करुन देवतांना संतुष्ट करणे ही कला आहे. त्याचप्रमाणे रथाचे सारथ्य करणे आणि हत्ती व घोडे यांना सांभाळणे ही ही कला आहे. ॥५७॥

माती, लाकूड, दगड आणि धातू यांची भांडी सुंदर रितीने बनविणे ह्यासुद्धा स्वतंत्ररित्या चार कला आहेत. आणि चित्रे काढणे आणि सुंदर लिहिणे ह्याही कला आहेत. ॥५८॥

तलाव, विहिरी, राजभवन, तसेच जमिनीला समतोल बनविणे ह्याही कला आहेत. घड्याळ इत्यादि यंत्राना बनविणे ही ही कला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची वाद्ये बनविणे ही ही कला आहे. ॥५९॥

हीन, मध्यम आणि उत्तम रुपाचे रंग एकत्र करुन वस्त्राना रंग देणे ही कला आहे. आणि पाणी, अग्नि आणि वायु यांचा संयोग किंवा विरोध करुन बाष्प यंत्र बनविण्याच्या कार्याला कला म्हणतात. ॥६०॥

नौका, रथ इत्यादि प्रवासाची साधने बनविण्याच्या ज्ञानाला कला म्हणतात आणि धाग्यापासून दोरी तयार करणे ही ही कला आहे. ॥६१॥

अनेक धाग्यापासून कपडा विणणे ही कला आहे. रत्नांना भोके पाडणे आणि रत्नांची चांगली वाईट अशी परीक्षा करणे ही कला आहे. ॥६२॥

सुवर्णादि धातूंची चांगली परीक्षा करणे ही कला आहे. कृत्रिम सोने आणि रत्ने बनविणे ही कला आहे. ॥६३॥

सोन्याचे दागिने बनविणे तसेच सोन्याचे पाणी चढविणे ह्या सुद्धा कला आहेत आणि चामड्याला मऊ बनविणे ही ही कला आहे. ॥६४॥

पशुंची चामडी काढणे ही कला आहे. तसेच दुध काढून त्याचे तूप बनविण्यापर्यंतच्या क्रियेचे ज्ञान मिळविणे ही कला आहे. ॥६५॥

पोषाख वगैरे वस्त्रे शिवण्याची क्रिया जाणणे ही कला आहे. आणि पाण्यामध्ये हातपाय वापरुन पोहणे ही कला आहे. ॥६६॥

घरातील धातूंची भांडी स्वच्छ करणे कला आहे, कपडा उत्तम साफ करणे आणि केस विंचरणे ह्याही कला आहेत. ॥६७॥

तीळ आणि मांस ह्यापासून तेल काढण्याची क्रिया ही कला आहे. आणि नांगर चालविणे आणि झाडावर चढण्याची पद्धत समजणे ही कला आहे. ॥६८॥

मनापासून सेवा करण्याच्या क्रियेला समजणे ही कला आहे. बांबू आणि गवत यापासून भांडी बनविणे ही कला आहे. ॥६९॥

काचेपासून भांडी बनविणे ही कला आहे. पाण्याचे सिंचन करणे, आणि आवश्यकतेनुसार पाणी आणणे आणि जमिनीतून काढणे ही कला आहे. ॥७०॥

लोखंडाची शस्त्रे आणि अस्त्रे बनविण्याची क्रिया कला आहे. हत्ती, घोडे आणि उंट ह्याच्यावर बसण्यासाठी गादी - जीन बनविण्याची क्रिया कला आहे. ॥७१॥

लहान बालकांचे रक्षण करणे, कुशीत घेणे इत्यादि क्रिया जाणणे ही कला आहे. अपराधी लोकांना योग्यप्रकारे मारणे, पिटणे ह्या क्रिया समजणे ही कला आहे. ॥७२॥

अनेक देशांची लिपी सुंदर प्रकारे लिहीणे ही कला आहे. विड्याच्या पानांचे रक्षण करण्याची क्रिया समजणे ही कला आहे. ॥७३॥

कलांच्या क्रिया शीघ्रपणाने करण्याला " आदान " आणि उशिरापर्यंत करीत रहाण्याला " प्रतिदान " म्हणतात. तसेच एखादी गोष्ट घेण्यात शीघ्रता म्हणजे घाई करणे आणि देण्यात विलंब लावणे ह्या दोन्ही गोष्टी गुण असले तरी त्या वेगवेगळ्या कला आहेत. ॥७४॥

थोडक्यात ह्या चौसष्ट कला सांगितल्या आहेत. ह्यापैकी कुठल्या कलेचा आश्रय मनुष्य घेतो त्यात निपुण बनतो. कायमची निपुणता ठेवण्यासाठी ती कला कायमची सातत्याने करणे आवश्यक असते. ॥७५॥

प्रकरण चौथे
लोकधर्म निरुपण
चार आश्रम
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी हे चार क्रमानुसार ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे चार आश्रम नेहमी ब्राह्मणांचे असतात. ह्यातील शेवटचा संन्यास सोडून उरलेले तीन आश्रम ब्राह्मण आणि अन्य क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचेही असतात. ॥१॥

विद्या शिकण्यासाठी ब्रह्मचारी, सर्व आश्रमांचे पालन करण्यासाठी गृहस्थ, इंद्रियांचे दमन करण्यासाठी वानप्रस्थ, मोक्ष साधनासाठी संन्यासी बनणे योग्य आहे. ॥२॥

जे लोक आपला आश्रम तसेच जात यांच्या धर्माच्या विरुद्ध आचरण करतात ते राजातर्फे दंडनीय असतात. ॥३॥

पती ज्या प्रकाराने आपल्या आधीन होईल अशा प्रकारे गाणे बजावणे, गोड बोलणे, मोहित करणारी कामक्रीडा इत्यादिंचे आचरण करणे स्त्रियांना उचित आहे. जी स्त्री पतिव्रतेच्या कर्तव्याची पालन करीत नाही ती पारिवारिक सुखापासून वंचित होते. ॥४॥

मुले कधी वडिलांच्या मोठेपणामुळे, कधी आईच्या मोठेपणामुळे नीच किंवा उत्तम भाव प्राप्त करतात. आणि कधी वडील आणि आई या दोघांच्यामुळे श्रेष्ठता प्राप्त करतात. ॥५॥

क्षत्रियापासून उत्पन्न झालेले विश्वामित्र, स्वर्गातील वेश्येच्या पोटी जन्मलेले वशिष्ठ, साधारण जातीतून उत्पन्न झालेले मतंग आणि दासीपूत्र नारद इत्यादि विशेष तप केल्याने उत्तमता प्राप्त करणारे झाले. त्यांच्या जातीमुळे नव्हे. ॥६॥

ज्याच्या पूर्वजांनी आप आपल्या जातीसाठी ज्या धर्माचे नेहमी आचरण केले आहे त्याचेच आचरण केले पाहिजे. विरोधी आचरण केल्याने त्या जातीतील लोक राजातर्फे दंडनीय होतात. आणि जाति, वर्ण आणि आश्रम यातील सर्व लोक वेगवेगळ्या चिन्हांनी ओळखले जावेत. ॥७॥८॥

देवतेची प्रतिमा जरी शास्त्रौक्त लक्षणांनी रहित असली तरी मनुष्यासाठी कल्याणकारी असते आणि मनुष्याची प्रतिमा लक्षणांनी युक्त असली तरी ती नेहमी अकल्याणकारक असते. ॥९॥

विष्णु इत्यादि देवतांची प्रतिमा सात्विक, राजस आणि तामस ह्या भेदाप्रमाणे तीन प्रकारची असते. ज्याठिकाणी जी योग्य असेल त्याप्रमाणे प्रतिमेची पूजा करावी. ॥१०॥

जी प्रतिमा योगमुद्रेने युक्त, स्वाभाविक अवस्थेमध्ये स्थित, वर आणि अभय देणारी मुद्रा असलेली आणि हाथ असणारी, आणि इंद्रादि देवता ज्याची स्तुति आणि नमन करीत आहेत ती " सात्विक प्रतिमा " म्हणतात. ॥११॥

जी प्रतिमा कसल्यातरी वाहनावर बसली आहे, नानाप्रकारचे अलंकार धारण करणारी आहे, जिच्या हातात शस्त्र, अस्त्र असून वर आणि अभय देणारी मुद्रा आहे ती " राजस प्रतिमा " समजतात. ॥१२॥

जी प्रतिमा शस्त्र आणि अस्त्रांनी दैत्यांना मारणारी आहे, उग्ररुप धारण केलेली आहे, नेहमी युद्ध करण्यासाठी उत्सुक असे रुप असणारी असते ती " तामसी प्रतिमा " समजली जाते.
    ह्या प्रकारे " लोकधर्म निरुपण " हे प्रकरण लोकांसंबंधी विभिन्न आणि व्यावहारीक विषयांची चर्चा समाप्त झाली. पुढील प्रकरणात " राजधर्म निरुपण " यात राजाच्या धर्माची चर्चा करु. ॥१३॥

प्रकरण पाचवे
राजधर्म निरुपण
पक्षपाताचे कारण
पक्षपात रुपदोष यांच्या निश्चित रुपानुसार पाच कारणांचे असतात. राग, लोभ, भय, द्वेष आणि वादी प्रतिवादी यांचे बोलणे एकांतात ऐकणे. ॥१॥

जो राजा मूर्खपणाने अधर्म कार्य करतो त्या दुरात्त्म्याला शत्रू लवकरच आपल्या ताब्यात घेतात. ॥२॥

वादी आणि प्रतिवादी यांचे दोघांचे म्हणणे ऐकून राजा सभासदांचे मत घेतल्याशिवाय स्वतः निर्णय करीत असेल तर तो नरकात जातो, प्रजेचा नाश होतो, शत्रूच्या सेनेपासून भय, शत्रूंची वाढ, आणि स्वतःच्या आयुष्याचा क्षय करतो. ॥३॥

व्यवहार ( न्याय निवाड्यारितीचे ज्ञान ) जाणणारा, बुद्धिमान, चारित्रवान्‍, आणि गुणी, शत्रू आणि मित्र या दोघांशी सारखा व्यवहार करणारा ( राग आणि द्वेष न ठेवता ), धर्माला जाणणारा, सत्यवादी, आळस नसलेला, क्रोध, काम आणि लोभ जिंकलेला, प्रिय भाषण करणारा, अशा सर्वजातीतील माणसांना राजाने विचार सभेचे सदस्य म्हणजे सभासद नेमावे. ॥४॥५॥

शेतकरी, कारागीर, लाच खाणारे, श्रेणी ( निकृष्ट जातींचा संघ ) नाच करणारे, अंगावर निशाणी गोंदून घेतलेले ( योगी वगैरे ), आणि तस्करी करणारे - हे सर्व लोक आप आपल्या धर्मानुसार आप आपल्या जातींच्या विवादाचा निर्णय स्वतः पंचायित करावा कारण त्यांच्या जातीचा धर्म न जाणणार्‍या लोकांकडून त्यांचा निर्णय होणे असंभव आहे. म्हणून ज्या जातीतील लोकांचा विवाद असेल त्याचा निर्णय त्याच जातीतील लोकांकडून केला पाहिजे. ॥६॥

तपस्वी आणि माया व योग विद्या जाणणार्‍या लोकांच्या विवादाचा निर्णय वेद जाणणार्‍या ब्राह्मणांकडून करावा दुसर्‍या कोणाकडून नाही. कारण चुकीचा निर्णय झाला तर ह्या माणसांना राग येतो. म्हणून त्यांच्यापासून दूर रहाण्यासाठी स्वतः निर्णय करु नये. ॥७॥

स्वतः एखादे विशिष्ट ज्ञान असलेल्या राजाने उत्कृष्ट जाती आणि शीलवान, गुरु, आचार्य आणि तपस्वी यांना उपदेश देऊ नये. ॥८॥

जो धर्मशास्त्र जाणणारा आहे त्याची नेमणूक झालेली असो वा नसो त्यांनी सभेत बोलणे योग्य होते. कारण जो शास्त्रानुसार आचरण करणारा असतो त्याची वाणी देवतांच्यासारखी मानली जाते. ॥९॥

अगोदर विचार सभेत जाऊ नये. यदाकदाचित गेलेच तर जी सत्य गोष्ट असेल ती सांगावी. कारण सभेत जाऊन योग्य गोष्ट न बोलणारा किंवा अयोग्य गोष्ट बोलणारा ह्या दोन्ही व्यक्ती पापाच्या भागिदार होतात. ॥१०॥

केवळ एक शास्त्र जाणणारा मनुष्याला विवादाचा निर्णय करणे समजत नाही म्हणून बरीच शास्त्रे जाणणारी कोणी उत्तम व्यक्ती निर्णायक म्हणून नियुक्त करावी. ॥११॥

आणि जो मनुष्य आत्म - तत्व जाणतो त्याने एकट्यानेच जे सांगितले आहे त्याला धर्म मानले जाते. त्याचा निर्णय सर्वमान्य होतो.

ज्या जागेत धर्मशास्त्रानुसार अर्थशास्त्राची विवेचना जास्त प्रकाराने केली जाते त्याला धर्माधिकरण ( न्यायालय ) म्हणतात. ॥१२॥

धर्मशास्त्र आणि सदाचार यांच्या विरुद्ध मार्गाचा आश्रय घेऊन दुसर्‍यांकडून त्रास दिल्या गेल्याने कोणी राजाजवळ न्यायालयात आवेदन पत्र दिले तर त्याला " व्यवहार पद " ( दावा दाखल करणे ) म्हणतात. ॥१३॥

राजा किंवा त्याचे अधिकारी यांनी स्वतःहून विवाद न्यायालयात उपस्थित करु नये आणि राजाने अनुराग, लोभ आणि क्रोध यांनी वशीभूत होऊन कुणालाही त्रास देऊ नये. वादी प्रतिवादी यांच्या अनुपस्थितीत राजाने आपल्या बुद्धिनुसार न्यायालयात विवाद उपस्थित करु नये. ॥१४॥१५॥

१. रस्ते नष्ट करणारा २. दुसर्‍याचा अपमान करणारा ३. चार भिंती ओलांडणारा ४. पिण्याच्या पाण्याचे जलाशय नष्ट करणारा ५. राहण्यासाठी बनविलेल्या स्थानाना नष्ट किंवा दुषित करणारा ६.७. राजाच्या दोषांना प्रकाशित करणारा ८. आज्ञेशिवाय जनानखान्यांत घुसणारा ९. आज्ञेशिवाय रहात्या घरात १०. भांडारात ११. स्वयंपाक घरात घुसणारा १२. जेवताना खाणार्‍याच्या तोंडाकडे टक लावून बघणारा १३. जाणून बुजून मल १४. मूत्र १५. कफ १६. पादण्याची क्रिया करणारा १७. राजासमोर वीरासन घालून घमेंडीने बसणारा १८. राजासमोर त्याला विरोध करणारा १९. राजाच्या बैठकीच्या जागेसमोर घाण करणारा २०. राजापेक्षा जास्त वेषभूशा धारण करुन राजासमोर उभे रहाणारा २१. कुणाच्या घरात मुख्य दार सोडून दुसर्‍या रस्त्याने घुसणारा २२. अवेळी कुणाच्या घरात जाणारा. २३. अनुमती शिवाय दुसर्‍याच्या बिछान्यावर झोपणारा २४. आसनावर बसणारा २५. खडावा किंवा जोडे वापरणारा २६. राजाच्या झोपायच्यावेळी तो बिछान्याजवळ पोहोचला असला तरी जवळ उभे रहाणारा २७. राजाच्या शत्रूचीसुद्धा सेवा करणारा २८. अनुमतीशिवाय कुणाच्या घरात उतरणारा २९. परवानगीशिवाय कुणाचे कपडे ३०. अलंकार ३१. सोने धारण करणारा ३२. जबरदस्तीने कुणाचे पान घेऊन खाणारा ३३. भाषण करण्यासाठी नियुक्त केलेला नसतानाही भाषण करणारा ३४. राजाची निंदा करणारा ३५. राजाजवळ फक्त एक वस्त्र घालणारा ३६. तेल लावून जाणारा ३७. केस सोडून जाणारा ३८. तोंड लपवून जाणारा ३९. विचित्र ढंगाने शरीराची हालचाल करणारा ४०. गळ्यात माळा घालून जाणारा ४१. डोळे झाकून जाणारा ४२. अंगावरील वस्त्राला हलवित रहाणारा ४३. दुसर्‍याच्या दोषांना धुंडाळणारा ४४. मद्यपानादि व्यसन करणारा ४५. वेशभूषादिंचा त्याग करणारा ४६. आपले नाक ४७. कान किंवा ४८. डोळे यांना विशेष रुपाने दाखविणारा ४९. दातांना कुरतडणारा ५०. कान किंवा नाक यातील मळ काढणारा हे राजाच्या समोर पन्नास छळ म्हणजे दोष मानले जातात. ॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥२१॥२२॥२३॥२४॥२५॥२६॥

१. आज्ञेचे उल्लंघन करणे २. स्त्रीची हत्या करणे ३. विवाह मार्गाने वर्णसंकर करणे ४. परस्त्री गमन करणे ५. चोरी करणे ६. पतीशिवाय दुसर्‍या पुरुषाकडून गर्भ धारण करणे ७. कठोर वचन बोलणे ८. बोलण्यास योग्य नसलेली गोष्ट बोलणे ९. कठोर दंड देणे १०. गर्भपात करणे हे दहा अपराध आहेत. ॥२७॥२८॥

१. उद्वेग करणारा २. धान्य नष्ट करणारा ३. घराला आग लावणारा ४. राजद्रोह करणारा ५. राजचिन्ह नष्ट करणारा ६. राजाची गुप्त यंत्रणा उघड करणारा ७. कैद्यांना तुरुंगातून सोडणारा ८. आपली नसलेली वस्तू विकणारा, कुणाचे दान, हिस्सा आणि दंड लुप्त करणारा ९. राजाने पिटलेली दवंडी लपवून ठेवणारा १०. मालक नसलेली बेवारस वस्तू घेणारा ११. राजाकडून मिळालेल्या द्रव्यावर अधिकार सांगणारा १२. शरीराचे काही भाग कापणारा
    वरील दहा अपराधासह हे बावीस अपराध आहेत ही गोष्ट पंडितांनी ओळखली पाहिजे. ॥२९॥३०॥३१॥

जो वादी उद्धट स्वभावाचा, निष्ठुर भाषा बोलणारा, आणि निष्ठुर कार्य करण्यास योग्य असे कपडे घालणारा, अत्यंत क्रोधी, न्यायाधिशासमोर खुर्चीवर बसणारा आणि अत्यंत मानी असतो त्याला शिक्षा दिली पाहिजे. ॥३२॥

वादीने राजाला जे आवेदन पत्र दिलेले असते त्याला " आवेदन " म्हणतात. आणि जे न्यायाधिशांसमोर जे समक्ष सांगितले जाते त्याला " उत्तर " म्हणजे जबाब म्हणतात. सर्व गोष्टी समजावण्याच्या असतात ते " पूर्वपक्ष " समजले जाते. सभासदांनी विनंती केली गेली तर यथायोग्य विचार करुन जे कमी वाटते त्यासंबंधी वादीला विचारुन पुरे करावे. आणि जे अधिक आहे ते काढून टाकावे. अशा प्रकाराने जबाब पूर्ण करुन त्यावर त्याच्या आंगठ्याचा ठसा घेवून शेवटी राजाने त्यावर आपली मोहर उमटवावी. वादीचा हा असा तयार झालेला जबाब साक्षीदार म्हणून मानला जातो. ॥३३॥३४॥३५॥

जो अधिकारी राग, लोभ किंवा भीति ह्या प्रकरामुळे वादीच्या बाजूने चौकशी करुन प्रतिवादीकडून उत्तर लिहून घेतो अशा अधिकार्‍याला पुन्हा असे निंदनीय कार्य करु नये असे सांगून राजाने त्याला दंड करावा आणि अधिकारावरुन काढून टाकावे. ॥३६॥

राजाने विवाद ऐकण्यास योग्य आहे किंवा नाही याचा विचार करुन जर योग्य वाटला तर दाखल करुन घ्यावा आणि जेव्हा वादीचा जबाब पुरा झाल्यावर पुढील गोष्टी सांगण्यासाठी आपल्या आज्ञेने खरे बोलणारे, गोड बोलणारे, आळस नसलेले, इशारे समजणारे, दृढ, शस्त्र सांभाळणारे अशा माणसांकडून राखून ठेवावा. ॥३७॥३८॥

दुष्टांबरोबर असणारा संबंध तसेच त्याचे एखादे कार्य पाहून, अपराधाचे अनुमान झाल्याने आरोपांवर अपराधाची आशंका होते. हरवलेले किंवा लुटलेले द्रव्य पाहून बुद्धिमान मनुष्य अपराधाच्या तत्त्वाला यथार्थ जाणून अपराध समजतात. ॥३९॥

व्यवहार ( दावा लढणे ) जो जाणत नाही किंवा काही कार्यात व्यस्त आहे असा वादी किंवा प्रतिवादी असतो तो दावा समजून कोणा व्यक्तीला आपला प्रतिनिधी नेमू शकतो. ॥४०॥

जर कोणी कोणाला आपला प्रतिनिधी नेमून त्याच्यातर्फे जे कार्य होते ते त्याचेच म्हणून समजले जाते. त्याला उलट समजले जात नाही. ॥४१॥

ज्या स्त्रिया स्वतः कमाई करुन कुटुंब चालवितात, किंवा व्यभिचारिणी किंवा वेश्यावृत्ती करणार्‍या असतात, किंवा हीन कुळवाली किंवा पतिता आहे त्यांना राजा न्यायालयात बोलावू शकतो. ॥४२॥

कोणी वादी किंवा प्रतिवादी आप आपल्या साधनांमध्ये चालबाजी करीत नाही ना हे जाणण्यास इच्छुक राजाने वादी - प्रतिवादी दोघे आपले समर्थन करीत आहेत किंवा नाही, राजाला त्यांचे समर्थन योग्य वाटत आहे किंवा नाही, आप आपल्या नोकरीनुसार प्रमाणे देऊन त्यांच्या म्हणण्याचे समर्थन करीत आहेत किंवा नाही आणि आप आपले दावे संपूर्ण साधनांनी युक्त आहेत किंवा नाहीत. ॥४३॥

मोहाने किंवा भितीने प्रथम वादीने जे सांगितले नाही आणि प्रतिकारीने उत्तर देताना जे सांगितले नाही ते न्यायाधिशाने प्रश्न विचारुन स्वच्छ समजून घ्यावे. ॥४४॥

सत्य उत्तर, मिथ्या उत्तर, प्रत्यवस्कन्दन आणि पूर्वन्यायविधी ह्या प्रकाराने उत्तराचे चार प्रकार होतात. ॥४५॥

वादीने जे काही सांगितले आहे ते ठीक आहे असे प्रतिवादीने स्वीकार केलेले जे उत्तर असते ते " सत्य " उत्तर म्हटले जाते. त्याला " प्रतिपत्ति " असेही म्हणतात. ॥४६॥

वादीचे प्रार्थनापत्र ऐकून जर प्रतिवादीने ते स्वीकारले नाही म्हणजे त्याचा निषेध केला तर त्याला " मिथ्या " उत्तर म्हणतात. ते उत्तर भले शब्द किंवा अर्थ घेऊन असले तरी. ॥४७॥

हे मिथ्या आहे, ह्याला मी ओळखत नाही, त्यावेळी मी तिथे उपस्थित नव्हतो आणि मी त्यावेळी जन्मलोच नव्हतो. अशा प्रकारची " मिथ्या " उत्तरे चार प्रकारची असतात. ॥४८॥

वादीने जे दाव्यात लिहिले आहे ते प्रतिवादीने स्वीकार करुनही नंतर त्यात दोष आहेत हे कारण सांगितले आहे त्याला " प्रत्यवस्कन्दन " उत्तर म्हणतात. ह्याला म्हणणे मान्य करुन नंतर त्याला विरोध करणे म्हणतात. ॥४९॥

ह्याप्रमाणे ह्याचे व माझे भांडण पूर्वी झालेले आहे आणि त्याच्यात मी जिंकलो आहे असे प्रतिवादी म्हणत असेल तर त्या उत्तराचे नाव " पूर्व न्यायविधी " अथवा " प्राड्न्याय " म्हणतात. ॥५०॥

जयपत्र, न्यायालयातील सभासदांच्या साक्षीने माझ्या बाजूने झाल्याचे मी सिद्ध करीत आहे अशा उत्तराला " प्राड्न्याय " म्हणतात. ते तीन प्रकारच्या भेदांचे असते. ॥५१॥

एक दुसर्‍याच्या समक्ष वादी प्रतिवादी यांचे क्रमशः पक्ष आणि उत्तर ऐकून तदनुरुप लिहित नाही किंवा स्वीकार करीत नाही तो चोराप्रमाणे नेहमी शिक्षा करण्यास योग्य असतो. ॥५२॥

जो आपला नातेवाईक नाही व ज्याला विवादाचा विषय नीट माहित आहे तो योग्य साक्षीदार आहे. साक्षीदार अनेक प्रकारचे असतात. कोणी प्रत्यक्ष डोळ्याने पहाणारा, कोणी केवळ ऐकणारा असतो. कृत आणि अकृत ह्या भेदांचे दोन प्रकार आहेत म्हणजे वादीने आणलेला साक्षीदार " कृत " आणि राजातर्फे आणलेला " अकृत " असतो. ॥५३॥

वादी आणि प्रतिवादी यांच्या जवळ रहाणारा जसे पहिल्यांदा पाहिले किंवा ऐकले असून त्यानुसार साक्षीदाराने दाव्याच्या विषयाचा अनुभव घेतलेला आहे असे सांगणारा असला तर त्याला साक्षीदार म्हणणे योग्य आहे. ॥५४॥

बराच काळ गेलेला असूनही ज्याची बुद्धि, स्मरणशक्ती आणि श्रवणशक्ती क्षीण झालेली नसेल तर तो साक्षी देण्यास योग्य असतो. ॥५५॥

ज्याच्या पाठीशी अनुभव आहे आणि जो सत्य बोलणारा आहे तो साक्षीदार म्हणून योग्य आहे. तसेच कोणी धर्मज्ञ मनुष्य एकटाच वादी आणि प्रतिवादी ह्या दोघांसाठी माननीय असतो. ॥५६॥

जेथे बर्‍याच साक्षीदाराच्या बोलण्यात विभिन्नता दिसल्यामुळे सत्यासत्य निर्णयात संशय होतो. तेथे जास्त संख्येत जिथेसाक्षीदार असतील त्यांची गोष्ट मानावी. जर साक्षीदारांची सारखी सारखी संख्या असेल तर जिथे गुणी पुरुष असतील त्यांचे वचन मानावे. जर गुणी लोकांच्या वचनांत विभिन्नता दिसली तर अधिक गुणी लोकांचे म्हणणे मानावे. ॥५७॥

कोणा माणसाने नेमणूक केलेली नसताना काही पाहिले किंवा ऐकले तर त्या विषयासंबंधी त्याला विचारले गेल्यास त्याने जे पाहिले किंवा ऐकले तेच सांगावे. ॥५८॥

जो साक्षीदार साक्ष देतांना सत्य बोलतो तो उत्तम लोक प्राप्त करतो आणि लोकांमध्ये सर्वोत्तम कीर्ति प्राप्त करतो. हे वाक्य वेदानेही मान्य केलेले आहे. ॥५९॥

सत्याने साक्षिदाराची पुजा होते. सत्याने धर्म वाढतो. म्हणून सर्व वर्णामध्ये साक्षीदाराने सत्यच बोलावे. ॥६०॥

आत्माच आपला साक्षीदार आहे आणि आत्माच आपली गती आहे. म्हणून माणसाचा उत्तम साक्षीदार असलेल्या आत्माचा तू तिरस्कार करु नको. ॥६१॥

पाप करणार्‍याला वाटत असते की त्याला पाप करताना कोणी पहात नाही. परंतु देवता लोक आणि त्याच्या स्वतःचा अंतरात्मा ते पहात असतो. ॥६२॥

यदाकदाचित वादी किंवा प्रतिवादी यापैकी एकाने मानवी क्रिया प्रमाण म्हणून एखाद्या विषयांत सांगितली आणि दुसर्‍याने दैवी क्रिया प्रमाण म्हणून सांगितली तर राजाने मानवी क्रिया घ्यावी आणि दैवी क्रियेला कधीही स्वीकारु नये. ॥६३॥

भलेही मानवी क्रिया दाव्याच्या एकच अंशाची पुष्टि करीत असली तरी ती स्वीकारावी. दाव्याची पूर्णपणे पुष्टि करणारी दैवी क्रिया सांगणार्‍यावर कधीही विश्वास ठेवून ती स्वीकारु नये. ॥६४॥

जे धन ज्याच्या हातात आहे त्याला त्या धनाचा मालक मानला जात नाही. जसे चोराने दुसर्‍याचे चोरलेले धन स्वतःच्या हातात ठेवले आहे म्हणून तो त्या धनाचा मालक मानला जात नाही. ॥६५॥

जर कोणी समर्थ झाल्यावर सावकाराकडील घेतलेले धन परत देत नाही तर राजाने त्याला समजावून किंवा शिक्षा करुन कर्जदाराकडून ते धन सावकाराला परत करण्याची व्यवस्था करावी. ॥६६॥

जो कोणी न दिलेली वस्तू त्याच्या जवळून हिसकावून घेतो आणि दुसर्‍याला दिलेली वस्तू पुन्हा मागतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी धर्मानुसार शिक्षेस पात्र ठरतात. ॥६७॥

जो खोटी वस्तू फसवून दुसर्‍याला विकतो तेव्हा ही गोष्ट चोरीप्रमाणे शिक्षेस पात्र आहे. ॥६८॥

लोकांच्या नाना प्रकारच्या आचरणाने उत्पन्न झालेला आणि पूर्वी मुनींनी निरुपित केलेल्या व्यवहाराचे मार्ग पुष्कळ आहेत. म्हणून त्या सर्वांचे यथावत्‍ वर्णन करणे असंभव आहे. ॥६९॥

ह्या प्रकाराने संक्षेपाने हा पाचवे राजधर्म प्रकरण मी सांगितले. त्यात जे गुण किंवा दोष सांगितले गेलेले नाहीत ते दुसर्‍या ग्रंथात पहावेत. ॥७०॥

प्रकरण सहावे
दुर्ग निरुपण
ऐरिण दुर्गाचे लक्षण
आता सहावे दुर्ग प्रकरण संक्षेपाने सांगतो. खड्डे, काटेकुटे आणि दगड यानी ज्याचा रस्ता कठीण बनतो त्याला " ऐरिण " दुर्ग म्हणतात. ॥१॥

शूरवीर सैन्याने दुर्गासाठी दुर्गाची सर्व स्थाने दुर्भेद्य होतात. आणि राजाने युद्ध सामग्रीने परिपूर्ण होऊन आणि भोजनासाठी अन्न सुसज्जित आहे अशा दुर्गात रहावे. ॥२॥३॥

म्हणून युद्धाला उपयुक्त सामुग्रीने भरलेला असा दुर्ग सर्वश्रेष्ठ होतो. तसेच सहाय्यकशूरवीर आणि अनुकूल बांधवांनी परिपूर्ण दुर्ग सर्वश्रेष्ठ असतो. वर प्रमाणे सहाय्यकासह परिपूर्ण दुर्गात रहाणारा राजा निश्चित विजयी होतो. ॥४॥

जो दुर्ग सहाय्यकांनी परिपूर्ण असतो तो सर्व राजाना फळ देणारा असतो. दुर्ग एकमेकाला सहाय्यक असतात, विजय देणारे असतात. ॥५॥  

सातवे प्रकरण
सेना निरुपण
सेनेचा प्रभाव
सैन्याशिवाय राजा, धन, आणि पराक्रम यापैकी काहीही स्थिर राहू शकत नाही. कारण सर्व लोक बलवान पुरुषाच्या स्वाधीन होतात आणि दुर्बल पुरुषाचे शत्रू होतात. तेव्हा थोडी सेना असणारे राजाचे लोक शत्रू होतात. ॥१॥

शरीराचे बल, शूरतेचे बल, सेनेचे बल, अस्त्राचे बल, बुद्धिचे बल, आणि आयुष्याचे बल हे सहा प्रकारचे बल सांगितलेले आहेत. जो ह्या सर्वांनी युक्त असतो त्याला विष्णूच मानले जाते. ॥२॥३॥

बलाशिवाय साधारण शत्रूला जिंकण्यास लोक समर्थ होत नाहीत. कारण देवाना असुर आणि मनुष्य हे सर्व बल नसले तर दुसर्‍या उपायाने शत्रूला जिंकण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. ॥४॥

एकमात्र मनुष्याचे बल शत्रूला पराजित करण्यासाठी नेहमी समर्थ असते. म्हणून राजाने शत्रूसाठी बलाची नेहमी वृद्धी करावी. ॥५॥

आपल्या सेनेचे बल " स्वीय बल ", मित्राच्या सेनेचे बल " मैत्र बल " असते. ह्यापैकी प्रत्येक क्रमानुसार मौल आणि साद्यस्क भेदाने दोन प्रकारचे असते. पुन्हा सार आणि असार ह्या भेदाने दोन प्रकारचे असते. ॥६॥

बाहुयुद्धात कुशल असणार्‍या आपल्या बरोबरीच्या पैलवानाबरोबर कुस्ती करुन, व्यायाम करुन घेऊन, गुरुजनांना प्रणाम करण्यास शिकवून तसेच पौष्टिक भोजन देऊन बाहुयुद्धासाठी आपल्या सैनिकाचे शारीरिक बल वाढविले पाहिजे. ॥७॥

नेहमी वाघांची शिकार, अस्त्र आणि शस्त्र यांना चालविण्याचा अभ्यास आणि शूरवीरांची संगती करुन सैनिकांचे " शौर्य बल " राजाने वाढविले पाहिजे. ॥८॥

सुंदर पगार देऊन सेना, तसेच तपस्या आणि अभ्यास करवून म्हणजे दिव्य अस्त्रांचा प्रयोग तपस्येने, बाण चालविण्याचे अभ्यास करुन, " आस्तिकबल " म्हणजे अर्थशास्त्र आणि राजनीति जाणण्यासाठी चतुर लोकांची संगत करुन " बुद्धिबल " नेहमी वाढविले पाहिजे. ॥९॥

नेहमी सत्कर्म केल्याने ज्याप्रकारे आपल्या वंशांत राज्य चिरस्थायी असते त्याप्रमाणे राजाने केले पाहिजे. ह्यालाच " आयुर्बल " म्हणतात. कारण जोपर्यंत त्याच्या वंशात राज्य टिकून असते तोपर्यंत तो जिवंत रहातो. ॥१०॥११॥

ज्या ठिकाणी वेळेनुसार सैनिकांची कवायत करण्यासाठी योग्य जमीन आहे आणि शत्रूला तिथे येणे त्रासदायक आहे असे स्थान लढाईसाठी निवडणे उत्तम आहे. ॥१२॥

ज्या ठिकाणी आपली आणि शत्रूची सेना कवायत योग्यप्रकारे करु शकते त्या भूमीला युद्धशास्त्राच्या तज्ञांनी मध्यम भूमी म्हटलेले आहे. ॥१३॥

ज्या ठिकाणी शत्रूच्या सेनेला कवायत करण्यास योग्य आणि पुरेशी भूमी आहे परंतु आपल्या सेनेला विपरीत आहे तो देश युद्धासाठी " अधम " समजला जातो. ॥१४॥

युद्धाच्या समयी परस्पर हत्ती, घोडे देऊन मदत करण्याच्या नियमाने बांधले जाण्यास " संधी " त्या विरुद्ध आचरणाने वैरभाव राखण्यास " विग्रह " शत्रूवर चढाई करण्यास " यान ", शत्रूकडे दुर्लक्ष करुन आपल्या स्थानावर युद्ध सामुग्रीसह बसून रहाण्यास "आसन " , कोणाकडून त्रास झाल्यास दुसर्‍या प्रबलाचा आश्रय घेण्यास " समाश्रय ": आणि स्वार्थसिद्धीसाठी सेनेला तुकड्या तुकड्या करुन ठेवण्यास " द्वैतभाव " म्हणतात. आणि ह्या सहा मंत्राना " षड्गुण " म्हणतात. ॥१५॥

ज्या पद्धतीच्या सहाय्याने शत्रू निश्चित मित्र बनतो त्याला " संधी " म्हणतात. हे प्रयत्नपूर्वक ध्यानात ठेवावे. ॥१६॥

ज्या क्रियेने शत्रूला पीडा होते किंवा तो आपल्या आधीन होतो तिला " विग्रह " म्हणतात. राजाने मंत्रीगणांजवळ खूप विचार करुन ही क्रिया करावी. ॥१७॥

आपले चांगले व्हावे म्हणून शत्रूच्या नाशासाठी चढाई करण्याला " यान " म्हणतात. जेथे पडून रहाण्याने शत्रूचा नाश होऊ शकतो तेथे पडून रहाण्यास " आसन " म्हणतात. ॥१८॥

कुणाच्या सहायास गेल्यास दुर्बलसुद्धा सबळ होईल अशा प्रबळ राजाचा आश्रय घेण्याला " आश्रय " म्हणतात. तुकडे तुकडे करुन विभाजन करुन आपल्या सेनेला ठेवणे ह्याला " द्वैधीभाव " म्हणतात. ॥१९॥

त्यावेळी केवळ उपहार देऊन " संधी " करणे हितकर असते. मित्रता सोडून संधीचे जितके प्रकार आहेत त्या सर्वांना उपहाराचे भेद मानले जातात. म्हणजे ह्याशिवाय संधीचे दुसरे प्रकार श्रेष्ठ नाहीत. ॥२०॥

आक्रमणकारी अत्यंत बलवान असल्याने काहीतरी भेट मिळाल्याशिवाय युद्धापासून निवृत्त होत नाही. म्हणून उपहार सोडून दुसरा संधीचा उपाय नसतो. ॥२१॥

ज्याप्रमाणे घट्ट काट्यांनी घेरलेले बांबूचे बेट कोणी कापू किंवा उखडू शकत नाही त्याचप्रकारे म्लेच्छांशी संधी करुन मदत मिळालेल्या राजाला कोणी पकडू शकत नाही. म्हणून राजाने आपल्या आजुबाजूच्या सर्व राजांजवळ संबंध ठेवावेत असे करण्यामुळे कोणी शत्रू त्याला त्रास देत नाही. ॥२२॥

जो राजा संकटात सापडला आहे किंवा दुसर्‍याकडून पीडला जात असेल तर पुन्हा आपला अभ्युदय व्हावा असे वाटणारा असतो त्याने देश, काल आणि बल उचित आहे हे पाहून युद्ध सुरु करावे. ॥२३॥

जो शत्रू सेना आणि मित्र यांचेकडून हीन समजला जातो, आपल्या किल्ल्यात घेरल्यामुळे पडलेला आहे, अत्यंत विषयासक्त झालेला आहे, किंवा प्रजेला लुटीत आहे किंवा ज्यांच्या मंत्र्यांमध्ये आणि सेनेमध्ये फूट पडली आहे अशा उपस्थित शत्रूला चारी बाजूने घेरुन राजाने पीडा देण्याला वस्तुतः " विग्रह " म्हणतात. ह्या उलट असलेल्या स्थितीला केवळ " कलह " म्हणतात. ॥२४॥२५॥

थोडी सेना असणार्‍या दुर्बल राजाने शूरवीर आणि अत्यंत बलवान शत्रूजवळ विग्रह करु नये. कारण अशांजवळ विग्रह करणार्‍याचा सर्वनाश होतो. ॥२६॥

समयानुसार व्यवहार करणारा राजा जोपर्यंत शत्रू संकटापासून वाचवण्यासाठी काही उपाय निश्चित करीत नाही तोपर्यंत कोणाला त्याचा पत्ता लागता कामा नये. जसे कावळ्याच्या डोळ्याप्रमाणे दोन्ही बाजूंने व्यवहार ठेवावा. देखावा म्हणून एक कार्य आणि करण्याचे दुसरेच कार्य राखावे ह्याला " द्वैधीभाव " म्हणतात. ॥२७॥

तुच्छ माणसाचे चांगले उपाय, चांगला सल्ला आणि उद्योग याच्या सहाय्याने सर्व कार्य सिद्ध होते, मग राजाचे का नाही होणार ? अवश्य होतात. ॥२८॥

कठीणातील कठीण लोखंड उपाय करुन वितळवले जाते आणि प्रसिद्धच आहे की पाणी विस्तवाला विझविते. परंतु जर उपाय योजला तर तोच अग्नि उलट पाण्याला सुकवून टाकतो. उपायानेच माजलेल्या हत्तीच्या मस्तकावर पाय ठेवता येतो. ॥२९॥३०॥

युद्धापासून मागे हटणारा राजा आणि प्रवास करुन तोंड फिरविणारा ब्राह्मण ह्या दोघांना पृथ्वी, सर्प ज्याप्रमाणे बिळांत रहाणार्‍या उंदराला गिळून टाकतो, त्याप्रमाणे गिळून टाकते. ॥३१॥

संकटाच्या काळात क्षत्रियाप्रमाणे उपजिवीका करुन रहाणार्‍या ब्राह्मणाला उत्तम मानले जाते. कारण क्षत्रियाची उत्पत्ती ब्राह्मणापासूनच झालेली आहे. म्हणून ब्राह्मणाने क्षत्रिय कर्म करणे विरुद्ध नाही. ॥३२॥

जो शूरवीर स्वामीसाठी सेनेच्या पुढे राहून युद्ध करुन पराक्रम दाखवितो आणि घाबरुन लढाई सोडून पळून जात नाही उलट मरुन जातो तो अनंतकाळपर्यंत स्वर्गसुख भोगतो. ॥३३॥

युद्धामध्ये मरण पावलेल्यासाठी कधी शोक करु नये. कारण तो सर्व पापांपासून सुटून पवित्र होऊन सुंदर लोकांत गेलेला असतो. ॥३४॥

युद्धामध्ये शूरपणाने लढता लढता मृत्यु पावलेल्या योद्धामागे हजारो अप्सरा जोराने धावतात आणि तो आपलाच एकट्याचा प्रिय स्वामी बनावा दुसर्‍या कोणाचा नको अशी इच्छा करतात. ॥३५॥

जो युद्धातून पळून जात नाही त्याला तेच तप, पुण्य, सनातन धर्म आणि चारी आश्रमाना अनुकूल धर्माचरण करावे लागते. ॥३६॥

शूरतेशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट उत्तम नाही. कारण शूर व्यक्तिच सर्व समाजाचे पालन करु शकते आणि शूरातच सर्व काही श्रेष्ठ समजले जाते. ॥३७॥

बुद्धिमान माणसाने अपमानाला पुढे ठेऊन आणि सन्मानाला मागे ठेऊन आपले कार्य पूर्ण करावे. कारण कार्य नष्ट करणे मूर्खपणाचे आहे. ॥३८॥

शत्रूच्या सैन्याला बनावटी सोन्याच्या राशी देऊन आपल्या बाजूला वळविल्यानंतर अथवा शत्रूच्या सेनेला नित्य शत्रूतर्फे भयाची शंका न ठेवता स्वस्थपणे झोपलेली असताना किंवा जास्त जागरणामुळे थकलेली पाहून स्वतःच सावधानाने त्यांचा नाश करावा. ॥३९॥४०॥

शत्रूच्या मदतीसाठी आलेली आपली मित्राची सेना कुठल्यातरी व्यसनात पडलेले पाहूनही नष्ट करु नये. उलट त्याचे रक्षण करुन आपल्या बाजूने करुन घ्यावी.

आपल्या जवळच्या राज्याला दुसर्‍यातर्फे करुन देऊ नये उलट त्याचे रक्षण करावे आणि आपल्या बाजूला करुन घ्यावे. ॥४१॥

अशाप्रकारे राजाने शत्रूला जिंकून त्याच्या योग्यतेनुसार त्याच्याकडून खंडणी वसूल करावी आणि कधी कधी योग्यतेनुसार शत्रूच्या राज्याचा अर्धा भाग किंवा संपूर्ण राज्य ताब्यात घ्यावे. त्यानंतर शत्रूच्या प्रजेला नाना प्रकारानी प्रसन्न ठेवावे. ॥४२॥

जेव्हा राजा सुंदर नियमांचे उत्तमरितीने पालन करतो तेव्हा तो राजा सर्व लोकाना पूजनीय वाटतो अन्यथा नाही. ॥४३॥

ज्या राजाची सर्व कार्ये नियमितरुपाने होतात आणि चांगल्या विषयांसंबंधी आदर तसेच वाईट कर्मे ग्रहण करण्यास अनादर ठेवण्याची क्रिया नियमित प्रकाराने होते तो राजा बराचकाळ राज्यपद भोगतो. ॥४४॥

जो शुक्राचार्यांनी सांगितलेल्या नीतिसाराचे निरंतर चिंतन करतो तो राजा योग्य व्यवहाराचा भार वहाण्यास समर्थ होतो. ॥४५॥

शुक्राचार्यांनी सांगितलेल्या नीतिप्रमाणे दुसरी नीति समाजात नाही. व्यवहार करणार्‍या लोकांसाठी नीति शुक्रनीतिच आहे. ह्या नीतिच्यापेक्षा दुसरी नीति कुनीति आहे. ॥४६॥

जो भीतिमुळे किंवा धनाच्या लोभाने नीतिचे आचरण करीत नाहीत तो मन्दभाग्य राजा नरकगामी होतो. ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP