शुक्रनीति - अध्याय पहिला

प्रस्तुत नीति शुक्राचार्यांनी न लिहिता मूळ नीति भगवान् श्रीशंकरांनी लिहिली आहे.


जगाची उत्पत्ति, पालन आणि नाश यांचे कारण आणि जगाच्या आधारभूत अशा परमात्म्याला प्रणाम आणि पूजा करुन भृगुपुत्र शुक्राचार्य यांनी असुरांकडून पुजा, स्तुति आणि वंदना करुन घेऊन विचारल्यावर त्यांना न्यायानुसार नीतिमध्ये श्रेष्ठ असे नीतिशास्त्र सांगितले ते एक कोटी श्लोकांचे होते. जे शास्त्र भगवान ब्रह्माने लोक कल्याणासाठी पूर्वींच शुक्राचार्यांना सांगितले होते. ॥१॥२॥

त्यानंतर आम्ही वशिष्ठादि ऋषिंनी मनुष्यांची वृद्धि व्हावी ह्या इच्छेने त्या शास्त्राचा सारांशरुपाने संग्रह केला. तो जरी संक्षिप्त असला तरी तर्कशास्त्रानुसार परिपूर्ण आहे आणि आधुनिक जगातील अल्पजीवी राजे आणि इतर लोक यांना वाचण्यास योग्य आहे. ॥३॥४॥

नीतिशास्त्राप्रमाणे इतर जी शास्त्रे आहेत ती व्यवहाराच्या एखाद्या अंशाला सांगणारी आहेत. परंतु सर्व लोकांना हितकारी, समाजाच्या स्थितीला सुरक्षित राखणारे " नीतिशास्त्र " आहे. कारण हे धर्म, अर्थ आणि काम यांचे मुख्य कारण आहे आणि मोक्षदायक आहे. ॥५॥

म्हणून राजाने प्रयत्नपूर्वक नीतिशास्त्राचा नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्याच्या ज्ञानाने राजा शत्रूंना जिंकणारा आणि प्रजेला प्रसन्न करणारा होतो. राजाने सुनीतिमान होऊन त्याचे व्यवहारात स्वतः पालन केले आणि प्रजेलाही पालन करायला लावले तर त्या राजाचे सुशासन आणि लोकप्रियता विद्यमान रहाते. ॥६॥

राजे लोक ह्या शास्त्राच्या अभ्यासाने सुंदररीतीने नीतिमध्ये निपुण होतात. व्याकरणाशिवाय शब्दाचा अर्थ समजत नाही असे थोडेच आहे. त्याच्याशिवाय जरुर ज्ञान होते. ॥७॥

भोजनाशिवाय प्राणिमात्रांच्या शरीराची जी स्थिती होते तशीच स्थिती नीतिशास्त्राशिवाय संपूर्ण लोक व्यवहाराची होते. ॥८॥

लोकांचे संपूर्ण अभीष्ट सिद्ध करणारे हे नीतिशास्त्र आहे. ह्या शास्त्राला सर्वजण जवळ करतात. राजे लोकांनाही याचे ज्ञान अत्यावश्यक आहे. कारण राजा सर्वांचा स्वामी आहे. ॥९॥

ज्याप्रमाणे कुपथ्याचे भोजन करणार्‍याला कुठला रोग लवकर तर काही रोग काही काळाने होतो आणि पथ्याचे भोजन करणार्‍याला रोग होत नाही. त्याचप्रमाणे नीतिविहीन लोकांचे शत्रू कधी लवकर तर कधी उशिरा तयार होतात. परंतु नीतिने चालणार्‍या माणसाला शत्रूच नसतात. ॥१०॥

प्रजेचे पालन आणि दुष्टांचे दमन हे दोन्ही राजाचे धर्म आहेत आणि ते नीतिशास्त्राच्या अभ्यासाशिवाय शक्य होत नाहीत. ॥११॥

नीतिहीन असणे हा राजाचा फार मोठा दोष आहे. हा दोष नेहमी भीति निर्माण करणारा, शत्रूंची वाढ करणारा आणि स्वतःच्या शक्तीला क्षीण करणारा आहे. ॥१२॥

म्हणून जो राजा नीति सोडून उच्छृंखल व्यवहार करतो तो दुःख भोगतो. अशा राजाची सेवा करणे म्हणजे तरवारीची धार चाटण्यासारखेच आहे. ॥१३॥

नीतिमान राजाची सुखपूर्वक आणि अनीतिमान राजाची दुःखाने आराधना केली जाते. ज्या राजाजवळ नीति आणि शक्ती ही दोन्ही आहेत त्याच्याजवळ चारी बाजूंनी लक्ष्मी येते. ॥१४॥

ज्या नीतिशिवाय राजाच्या केवळ प्रेरणेने स्वतःचे हित करणारे संपूर्ण राष्ट्र असते त्या नीतिच्या हितासाठी अशा राजाला जवळ करणे उचित असते. ॥१५॥

ज्या राजाच्या नीतिने नेहमी त्याचा देश, सेना आणि मंत्री यांच्यात परस्पर मतभेद होतात ती नीति राजाची अकुशलता दर्शक आहे. ॥१६॥

जगतातील सामान्य लोकराजदंडाच्या भीतिमुळे आपल्या धर्माच्या पालनात तत्पर असतात. परंतु जो मनुष्य आपल्या धर्म पालनात स्वतः निष्ठावान असतो तो जगात तेजस्वी होतो. ॥१७॥

स्वतःच्या धर्माचे पालन केल्याशिवाय सुख मिळत नाही. आपल्या धर्माचे पालन करणे हे फार मोठे तप आहे. म्हणून ज्याने स्वतःच्या धर्माच्या पालनाचे तप नेहमी वाढते ठेवले आहे त्याच्या सेवेत देवतासुद्धा तत्पर असतात. मग त्यांच्यापुढे माणसांची काय स्थिती ? ॥१८॥१९॥

राजाने आपल्या धर्मात राहून अतिशय भीतिदायक अशा शिक्षांच्या सहाय्याने प्रजेला त्यांच्या धर्मांत व्यस्त ठेवावे. जर तो हे करणार नसेल तर तो तेजहीन होतो.
    बुद्धिमान राजाचे थोडेसे धन त्याला नेहमी वृद्धि प्राप्त करुन देते. आणि त्याची शूरता, नीति, शक्ती आणि धन ह्या गोष्टी त्याला पशुपक्षी आपल्या ताब्यात ठेवता येतात. ॥२०॥

सात्विक, राजस आणि तामस हे तपाचे तीन प्रकार आहेत. म्हणून राजाचे ज्या प्रकारचे तप असेल त्यानुसार तो सात्विक, राजस किंवा तामस गुणाचा होतो. ॥२१॥

जो राजा आपल्या धर्मामध्ये तत्पर, प्रजेचे पालन करणारा, संपूर्ण यज्ञ करणारा, शत्रूंना जिंकणारा, दानशूर, क्षमावान, शूर, इंद्रियांच्या बाबतीत विरक्त आणि वैराग्यपूर्ण असतो. त्याला " सात्विक " राजा समजले जाते. त्या राजाला मृत्युनंतर मोक्ष प्राप्त होतो. ॥२२॥२३॥

वरील श्लोकात सांगितलेल्या गुणांच्या विरुद्ध गुण असणारा राजा " तामस " राजा समजला जातो. असा राजा मरणानंतर नरकात जातो. तो दयारहित, गर्वाने उन्मत्त, हिंसा करणारा आणि सत्यापासून दूर रहाणारा असतो. ॥२४॥

जो राग दंभ करणारा, लोभी, विषयी, ठग, मनात एक आणि बाहेर दुसराच व्यवहार करणारा, वाणी आणि कर्माने कलह लावणारा, नीचांबरोबर प्रेम राखणारा, नीति नसलेला, मनांतून कपट कारस्थान करणारा अशा राजाला " राजस " राजा समजले जाते. मरणानंतर तो पशु पक्षी यांची योनी प्राप्त करतो. ॥२५॥२६॥

सात्विक राजा देवतांच्या अंशाना, तामस राजा राक्षसांच्या अंशाना आणि राजस राजा मनुष्यांच्या अंशाना भोगतो. म्हणून सत्व गुणांकडे मन गुंतवावे. ॥२७॥

सत्वगुण आणि तमोगुण यांच्या सारखेपणाने मनुष्य जन्म मिळतो आणि भाग्यात जसे गुण असतील त्यानुसार तो मनुष्य होतो. ॥२८॥

ह्या जगात सुगति आणि दुर्गति यांच्या मागे कर्म हेच कारण असते. कर्म प्राक्तन होत असते. म्हणजे पूर्व जन्मातील कर्म " प्रारब्ध " असते. कुठलाही जीव कर्म केल्याशिवाय क्षणभरसुद्धा राहू शकत नाही. ॥२९॥

ह्या जगात जन्माने कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा म्लेच्छ नसतो. हा भेद फक्त त्या माणसाचे गुण आणि त्याचे कर्म ह्यामुळेच ठरतो. ॥३०॥

संपूर्ण जीव ब्रह्मापासून उत्पन्न होतात म्हणून सर्वांना ब्राह्मण म्हणू शकतो कां ? नाही. वर्णाने आणि पित्यांकडून ब्रह्मतेज प्राप्त होत नसते. ॥३१॥

ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड आणि उपासनाकाण्ड यांचा प्रकाण्ड विद्वान असूनही देवतांच्या आराधनेमध्ये लीन, शांतचित्त, इंद्रियांचे दमन करणारा आणि दयाळू असणे ह्या समस्त गुणांनी " ब्राह्मण " निर्माण होतो. ॥३२॥

जनतेचे चांगल्या प्रकाराने रक्षण करण्यात चतुर, शूर, इंद्रियांचे दमन करणारा, पराक्रमी, स्वभावतः दुष्टांना शिक्षा करणारा जो असतो तोच गुणांनी " क्षत्रिय " समजला जातो. ॥३३॥

जे लोक खरेदी विक्रीमध्ये कुशल, दुकानदारी करुन जीवन जगणारे, पशुपालन आणि शेती करणारे असतात त्यांना " वैश्य " समजले जाते. ॥३४॥

जी माणसेब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्यात तत्पर, शूर, शांत चित्ताची, जितेन्द्रिय, नांगर, लाकडे आणि गवत इत्यादिंना उचलून नेणारी त्यांना " शूद्र " समजले जाते. ॥३५॥

जे लोक स्वतःचे धर्माचरण करीत नाहीत, दयाशून्य, दुसर्‍यांना त्रास देणारे, अत्यंत क्रोधी तसेच हिंसा करणारे असतात. त्या सर्वांना " म्लेच्छ " समजले जाते. अशा लोकांमध्ये विवेक जरासुद्धा नसतो. ॥३६॥

पूर्व जन्मातील कर्मांचे फळ भोगण्यास योग्य असेल अशी बुद्धि मनुष्याची जेव्हा तयार होते तेव्हा त्यानुसार पाप किंवा पुण्यकर्म करण्यास मनुष्य समर्थ होतो नाहीतर तो असमर्थ असतो. ॥३७॥

ज्याप्रमाणे कर्मांच्या फळाचा उदय होत जातो त्यानुसार माणसाची बुद्धि होत जाते. तसेच त्याचे जसे भाग्य असेल त्यानुसार त्याचे मित्रही होतात. ॥३८॥

जे काही होते ते पूर्वजन्मातील कर्मानुसार होते. हे एकदा निश्चित झाले की " हे कर्म आहे आणि हे अकर्म आहे " असा उपदेश व्यर्थ होतो. ॥३९॥

जी माणसे बुद्धिमान आणि प्रसंशनीय चरित्राची असतात ती माणसे पुरुषार्थाला मोठा मानतात आणि उद्योग करतात. आणि जी माणसे पुरुषार्थ करण्यास असमर्थ आणि भित्री असतात ती भाग्याची उपासना करतात आणि भाग्याच्या भरवशावर रहातात. ॥४०॥

भाग्य आणि पुरुषार्थ ह्या दोघांवरच संपूर्ण जगाचे कार्य उभे आहे. ह्यामध्ये पूर्वजन्मात केलेले कर्म " भाग्य " आणि ह्या जन्मात केलेले कर्म " पुरुषार्थ " समजले जाते. अशाप्रकारे एकाच कर्माचे दोन भेद केले गेले आहेत. ॥४१॥

भाग्य आणि पुरुषार्थ ह्यामधील जे दुर्बल आहे त्याला दूर करणारा नेहमी बलवान होतो. सबल आणि दुर्बल यांचे ज्ञान फलप्राप्तिने होत नाही किंवा दुसर्‍या कुठल्याच रितीने होत नाही. ॥४२॥

पुरुषार्थाच्या प्रत्यक्ष करण्याने फळाची प्राप्ती दिसत नाही, ती प्राक्तन कर्म म्हणजे पूर्व जन्मातील कर्म यांच्यावर आधारीत असतात. दुसर्‍या कशावर नाही हे निश्चित आहे. ॥४३॥

कधी कधी अगदी थोडे कर्म केल्यावर माणसाला अधिक फळ मिळते असे दिसते. पण ही गोष्ट प्राक्तनातील कर्माने होत असते. कोणी कोणी आचार्य ह्याला पुरुषार्थाने मिळालेले फळ असे मानतात. ॥४४॥

मनुष्य जो पुरुषार्थ फलप्राप्तीसाठी करतो तो ह्या जन्मातील तात्कालिक कर्माचे कारण असतो. ज्याप्रमाणे तेलाच्या दिव्याची ज्योत हवेने विझून जाऊ नये म्हणून जो प्रयत्न केला जातो त्या प्रमाणेच हा पुरुषार्थ आहे. ॥४५॥

अवश्य होणार्‍या कार्याचा प्रतिकार होणे संभव नसते तेव्हा आपली बुद्धि आणि शक्तीनुसार दुष्टांचा नाश करणे कल्याणकारक होत नाही. म्हणजेच पुरुषार्थाने दुर्बल भाग्याला संपविता येते. ॥४६॥

ह्यालाच राजने प्रतिकूल आणि अनुकूल फळ देणार्‍या भाग्याला थोडे, मध्यम आणि अधिक ह्या तीन भेदाचे तीन प्रकाराचे समजावे. ॥४७॥

अशोक वनाचा एकट्या हनुमान नावाच्या वानराने विध्वंस केलेला पाहून रावणाला आणि एकट्या अर्जुनाने विराट नगरात गाईंना पकडून ठेवलेले पाहून भीष्मादि दुर्योधन कौरवांना भाग्याची प्रतिकूलता समजली.॥४८॥

रामचंद्र आणि अर्जुन यांच्या काळांतील अनुकूलता तर स्पष्ट आहे. जेव्हा दैव अनुकूल असते तेव्हा अगदी थोडासा पुरुषार्थ सफल होतो. ॥४९॥

भाग्य जर प्रतिकूल असेल तर कितीही मोठे पुण्यकर्मसुद्धा अनिष्ट फळ देणारे होते. जसे दान देऊनही बलीराजा बांधला गेला आणि राजा हरिश्चंद्रालाही डोमाकडे नोकरी करावी लागली. ॥५०॥

चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते. आणि वाईट कर्माचे फळ वाईटच असते. म्हणून शास्त्रात सांगितलेल्याचा विचार करुन चांगले कोणते आणि वाईट कोणते यांचे ज्ञान मिळवून अशुभ कार्याचा त्याग आणि शुभ कार्याचे ग्रहण केले पाहिजे. ॥५१॥

चांगले आणि वाईट कर्म करणार्‍याच्या मागील कारण राजा असतो. म्हणून आपल्या क्रूरतेने राजाने दण्ड देण्यास तत्पर राहून प्रजेला आपल्या धर्माचरणामध्ये स्थिर राखावे. ॥५२॥

राजा, मंत्री, मित्र, खजिना, देश, किल्ले, सेना ही राजाची सात अंगे समजली जातात. ह्यातील राजाला मस्तक मानले जाते. मंत्र्याला डोळे मानले जाते. मित्राला कान, खजिन्याला तोंड, सैन्याला मन, किल्ल्यांना दोन हात आणि देशाला दोन पाय समजले जाते. ह्या प्रकाराने राज्यरुपी शरीराची ही सात अंगे मानलेली आहेत. ॥५३॥५४॥

उत्तमरितीने राजा आपल्या प्रजेला आप आपल्या धर्मानुसार चालविणारा नसला तर नावाड्याशिवाय समुद्रात असणारी नाव जशी नष्ट होते तसे सर्व राज्य नष्ट होते. ॥५५॥

राजाशिवाय प्रजा आप आपल्या धर्मात रहात नाही. त्याचप्रमाणे प्रजेशिवाय राजालाही शोभा येत नाही. ॥५६॥

न्याय प्रवृत्त असलेला राजा आपल्याबरोबर प्रजेलाही धर्म, अर्थ आणि काम यांच्याकडे प्रवृत्त करतो. अन्यायाकडे प्रवृत्त असणारा राजा आपल्या बरोबर प्रजेला वरील त्रिवर्गापासून दूर करुन नष्ट करतो. ॥५७॥

ज्याप्रमाणे वारा चांगला आणि वाईट ह्या गंधाचा प्रेरक होतो. त्याचप्रमाणे राजासुद्धा चांगली आणि वाईट कर्माचा प्रेरक होतो. एक सूर्य अंधकाराचा नाशक आणि धर्माचा प्रवर्तक होतो. त्याचप्रमाणे राजासुद्धा अधर्माचा नाशक आणि धर्माचा प्रवर्तक होतो. ॥५८॥

पिता, माता, गुरु, भाऊ, नातेवाईक, कुबेर आणि यम ह्या सातही दिसणार्‍या गुणांनी नेहमी युक्त असणारा राजा म्हणण्यास योग्य असतो. हे गुण नसले तर योग्य नसतो. ॥५९॥

आपल्या मुलांना गुणवान बनविण्यासाठी पिता जसा निपुण असतो. त्याप्रमाणे आपली प्रजा गुणवान बनविण्यासाठी राजाने निपुण असावे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांच्या अपराधाना क्षमा करते आणि त्यांना धष्टपुष्ट करणारी असते. त्याप्रमाणे राजानेही असावे. ॥६०॥

ज्याप्रमाणे गुरु आपल्या शिष्याला हितकर उपदेश करणारा आणि सुंदर विद्या शिकविणारा असतो. त्याचप्रमाणे राजाने प्रजेच्या बाबतीत असावे. जसा भाऊ शास्त्रानुसार पित्याच्या धनात आपला हिस्सा घेणारा असतो. त्याचप्रमाणे राजानेही प्रजेपासून कर ग्रहण करणे उचित आहे. ॥६१॥

ज्याप्रमाणे एक भाऊ आपल्या दुसर्‍या भावाचे शरीर, स्त्री, धन आणि गुप्त रहस्य यांचे रक्षण करणार्‍या मित्राप्रमाणे असतो त्याप्रमाणे राजानेही प्रजेसाठी असावे. आवश्यकता वाटली तर कुबेराप्रमाणे धन प्रजेला देणारा राजा असावा. ह्याचप्रमाणे अपराधी माणसाला यमाप्रमाणे शिक्षा देणारा राजा असावा. ॥६२॥

बुद्धिमान राजाजवळ हे सर्व गुण असतात. म्हणून राजेलोकांनी ह्या सात गुणांना कधीही सोडू नये हे उचित आहे. ॥६३॥

जो अपराधाबद्दल क्षमा करणारा असतो त्याला " क्षमाशील " आणि जो दुष्टांचा नाश करणारा असतो त्याला " शक्तिमान " म्हणतात. परंतु सर्व गुणांनी संपन्न असूनही जो राजा क्षमारहित असतो त्याची शोभा रहात नाही. ॥६४॥

जो राजा आपल्या दुर्गुणांना सोडून देऊन निंदा सहन करणारा, दान, मान, आणि सत्कार यांनी आपल्या प्रजेला नेहमी प्रसन्न ठेवणारा, शत्रुना नष्ट करणारा, धारणाशक्तिमान, ज्ञान आणि विज्ञान यांनी युक्त, नीच गुण आणि नीच संगतीपासून दूर रहाणारा, वृद्धांचा आदर करणारा, सुंदर नीतिमान अशा गुणांनी युक्त असतो तो देवतांच्या अंशापासून उत्पन्न झालेला आहे असे समजले जाते. ॥६५॥६६॥६७॥

कर्म फळाच्या निवृत्तीसाठी उपाय केला नाही तर त्या कर्मांची फळे माणसाला भोगावी लागतात. जर त्या कर्मफळांच्या निवृत्तीसाठी उपाय केला तर ती भोगावी लागत नाहीत. ॥६८॥

ज्या रोगाचे निदान होते, त्या रोगाची निवृत्तीसाठी उपाय न करण्याने तो रोग भोगावाच लागतो आणि उपाय केला तर तो रोग नाहीसा होऊन भोगावा लागत नाही. समाजामध्ये अनिष्टकारक उपदेशाला जवळ केल्यावरही तो आपल्याजवळ कायमचा रहावा अशी इच्छा करणारा कोण असतो ? अर्थात कोणी नसतो ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. ॥६९॥

चांगळे फळ देणार्‍या कार्यांत माणसाचे मन लागते आणि वाईट फळ देणार्‍या कार्यात माणसाचे मन लागत नाही. म्हणून चांगले तसेच वाईट कार्यासंबंधी बोधक अशा शास्त्रांना पाहून त्यानुसार आचरण करावे. ॥७०॥

नीतिचेमूळ विनय आहे आणि शास्त्रांवर विश्वास ठेवण्यानेच विनय निर्माण होतो. विनयाचे मूळ इंद्रियांवर विजय मिळविणे ह्यावर आहे म्हणून जो जितेंद्रिय आहे तोच शास्त्राचे ज्ञान मिळवितो. ॥७१॥

म्हणून राजाने स्वतःला प्रथम विनयशील बनवावे. नंतर मुलांना, त्यानंतर मंत्री लोकांना, त्यानंतर नोकरांना आणि शेवटी प्रजेला विनयशील करावे. राजाने केवळ दुसर्‍यांना उपदेश देण्यात कुशल असू नये. ॥७२॥

काही गुणवान राजे प्रजेवर अधिकार चालवू शकत नाहीत. कारण दुर्गुणी प्रजा राजाला सोडू शकत नाही. ज्याप्रमाणे इंद्राची विधवा म्हणून इंद्राणी राहू शकत नाही. त्याचप्रमाणे राजाशिवाय प्रजा राहू शकत नाही. ॥७३॥७४॥

म्हणून ज्या राजाची प्रजा राजावर नेहमी अनुरक्त रहाणारी असते, आणि राजा प्रजापालनांत तत्पर असतो आणि विनयशील असतो तो जास्तीत जास्त संपत्ती प्राप्त करतो. ॥७५॥

राजाने अनेक विषयरुपी जंगलात धावणार्‍या मनाला मदाने मस्त झालेल्या इंद्रियरुपी हत्तीला ज्ञानरुपी अंकुशाने आपल्या ताब्यात आणावे. ॥७६॥

जो राजा केवळ एका मनाला जिंकण्यास असमर्थ असतो तो समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीला जिंकण्यास कसा समर्थ होईल ? ॥७७॥

शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध ह्यामधील प्रत्येकी स्वतंत्रपणे लोकांचा विनाश करण्यास समर्थ असतात. ॥७८॥

जुगार खेळणे, स्त्रीची संगत करणे आणि मद्यपान ह्या तीन गोष्टी अधिक प्रमाणांत केल्यास अनर्थाला कारण होतात. परंतु त्यांचा उचित उपयोग केला तर जुगारात धन, स्त्रीपासून पुत्र आणि मद्याने बुद्धि यांची प्राप्ती होते. ॥७९॥

स्त्रियांचे नुसते नांव घेतल्याने आनंद होऊन चित्तामध्ये कामविकार निर्माण होतात. तर मग विलासपूर्वक हावभाव करुन नाचायला लावणार्‍या स्त्रियांचे दर्शन मनामध्ये कामविकार निर्माण अवश्य करतात. ॥८०॥

एकांतात भेटून कुशल, कोमल आणि गोड गोड बोलणारी आणि अनुरागयुक्त हालचाल करणारी स्त्री सर्व पुरुषांना वशीभूत करते. ॥८१॥

मनाला नेहमी अधीन ठेवणार्‍या मुनी लोकांच्या मनांतही स्त्रीयां कामवासना निर्माण करतात. जर जितेन्द्रिय माणसाची ही दशा आहे तर इंद्रिये ताब्यात न ठेवणार्‍या कामुक लोकांची काय स्थिती होत असेल ? अशा माणसांना स्त्रिया अवश्य आपल्या ताब्यात आणू शकतात. ॥८२॥

बरेचसे लोक परस्त्रीवर प्रेम करुन स्वतःच्या नाशाला कारण झालेले दिसतात. जसे इंद्र, नहुष आणि रावण यांचे उदाहरण प्रसिद्ध आहे. ॥८३॥

अतिशय दारु पिणार्‍याची बुद्धि निश्चित नाहीशी होते. थोड्या प्रमाणांत दारु पिणार्‍याच्या प्रतिभा, बुद्धिमध्ये उज्वलता, धीरता आणि चित्ताची स्थिरता यामध्ये वाढ होते. ह्या उलट जास्त प्रमाणांत दारु प्याल्याने शरीर नष्ट होते. दारुप्रमाणेच काम आणि क्रोध हे सुद्धा चित्ताला स्वार्थी बनवितात. म्हणून ह्या दोघांचाही यथोचितरितीने प्रयोग करणे उचित आहे. ॥८४॥८५॥

राजाने कधीही परस्त्री गमन करण्यासाठी कामाला, दुसर्‍याच्या धनाच्या प्राप्तीसाठी लोभाला, प्रजेला शिक्षा करण्यासाठी क्रोधाला दूर ठेवावे. कारण काम, लोभ आणि क्रोध हे तीन जण पतनाचे कारण असतात. ॥८६॥

परस्त्री गमन करण्यार्‍या मनुष्याला कधी कुटुंबी म्हणता येईल का ? आपल्या प्रजेला शिक्षा करणार्‍याला शूरवीर आणि दुसर्‍याचे धन घेणार्‍या मनुष्याला धनी म्हणता येईल कां ? अर्थात कधीही म्हणता येणार नाही. ॥८७॥

प्रजेचेरक्षण न करणार्‍या राजाला, तपस्या न करणार्‍या ब्राह्मणाला आणि दान न देणार्‍या धनी माणसाला देवता नष्ट करतात आणि मरणानंतर त्यांना नरकात टाकून देतात. ॥८८॥

राजा, दानी आणि धनवान असणे हे सर्व तपाचे फळ आहे आणि याचक, दास आणि दरिद्री असणे हे सर्व पापाचे फळ आहे. ॥८९॥

म्हणून राजाने शास्त्रांना पाहून त्याप्रमाणे आपल्या मनाला विषयांपासून योग्य प्रकाराने ताब्यात ठेवून परलोक आणि ह्या लोकात सुख मिळण्यासाठी आपले आचरण योग्यरितीचे ठेवावे. ॥९०॥

दुष्टांचा नाश करणे, दान देणे, प्रजेचे परिपालन, राजसूयादि यज्ञ करणे, न्यायपूर्वक खजिना वाढविणे, राजे लोकांकडून कर वसूल करणे, शत्रूंची मिजास नाहीशी करणे, पुनः पुनः राज्य वाढविणे हे आठ प्रकारचे राजाचे आचरण असावे. ॥९१॥९२॥

जो राजा आपले सैन्य वाढवित नाही, मांडलीक राजे, ज्यांच्याकडून भरपूर खंडणी वसूल करता येते, त्यांची संख्या वाढवित नाही, प्रजेचे पालन नीटप्रकाराने करीत नाही अशा राजाला तेल विरहित तिळाप्रमाणे तुच्छ मानले जाते. ॥९३॥

ज्या राजाची प्रजा उद्विग्न झालेली असून त्या राजाच्या कर्माची निंदा करते आणि ज्याला श्रीमंत आणि गुणी लोक सोडून जातात त्या राजाला " अधम " समजले जाते. ॥९४॥

नट, गाणारे, वेश्या, पहेलवान, हिजडे आणि नीच जातवाल्यांजवळ जो राजा अत्यंत आसक्ती ठेवतो त्या राजाला " निन्द्य " समजले जाते. आणि तो लवकरच शत्रूच्या मुखांत पडतो. ॥९५॥

जो राजा नेहमी बुद्धिमान लोकांचा द्वेष करतो आणि स्तुतिपाठकांमुळे खुष असतो त्याचप्रमाणे आपल्या दुर्गुणांना समजत नाही तो आपल्या नाशाचे कारण स्वतःच बनतो. ॥९६॥

जेव्हा राजा अपराध सहन करीत नाही आणि उग्र शिक्षा देतो, लोकांचे धन हरण करतो, आपले दुर्गुण ऐकल्यावर सांगणार्‍याला त्रास देतो तेव्हा त्याची प्रजा क्षुब्ध होते आणि भेदभाव राखू लागते. म्हणून अशा स्थितीतून संरक्षण करण्यासाठी राजाने आपल्या गुप्तचरामार्फत प्रजेला समजवावे आणि आपले आचरण दोषयुक्त आहे अशी कोण माणसे आहेत हे जाणून घ्यावे. हे समजल्यावर मंत्री इत्यादि आपली प्रशंसा कशी करतात हे त्यांना समजवावे. ॥९७॥९८॥९९॥

माझ्या गुणांमुळे कोण कोण माझ्यावर कसे प्रेम करतात आणि माझ्या अवगुणांमुळे कोण लोक माझ्यावर कशी अप्रीती दाखवितात हे सर्व आपल्या गुप्तचरांकडून समजल्यावर आपल्या दुर्गुणांना समजून घेऊन आपल्या किर्तीसाठी त्या दुर्गुणांना सोडून देऊन आणि निंदा करणार्‍या आपल्या प्रजेचा कधी तिरस्कार राजाने करु नये. ॥१००॥

ज्ञान विज्ञान यांनी संपन्न असणार्‍या राजाने अभय दिले असले तरी कोणी व्यक्ती राजाच्या भितीने राजाचे दोष त्याच्यासमोर सांगत नाहीत. असे ऐकले जाते की विष्णु आदि देवतांनासुद्धा स्तुती प्रिय असते तर मनुष्याची काय बात ! क्रोध निंदेमुळे उत्पन्न होतो हे शाश्वत सत्य आहे म्हणून राजाने योग्य शिक्षा देणारा असावे, चांगली सहनशक्ती असणारे असावे आणि नेहमी प्रजेचे मनोरंजन करणारा असावे. ॥१०१॥१०२॥१०३॥

यौवन, जीवन, धन, छाया, लक्ष्मी आणि प्रभुत्व हे सहा चंचल आहेत. हे जाणून राजाने धर्मामध्ये तत्पर असावे. ॥१०४॥

राजाच्या दान न देण्यामुळे, अपमान करण्यामुळे, छळ करण्याने, कडु भाषा बोलण्यामुळे, आणि फार मोठी शिक्षा देण्यामुळे प्रजा राजाला सोडून देते. ॥१०५॥

अत्यंत भित्रा, सावकाश सावकाश कार्य करणारा, अत्यंत असावधान आणि व्यसनी होऊन विषयासक्त असणार्‍या राजाची प्रजा त्याची सेवा करीत नाही आणि त्याचा त्याग करते. ह्याच्या उलट गुण असणार्‍या राजावर प्रजा प्रसन्न असते. ॥१०६॥

एक दुर्गुणसुद्धा अपयशी करतो तर अनेक दुर्गुण असल्यावर काय कथा ! शिकार खेळणे, जुगार खेळणे, दारु पिणे ह्या तिन्ही गोष्टी राजासाठी निंदनीय आहेत. कारण शिकारीमुळे पांडुची, जुगारामुळे नलाची आणि दारुमुळे यदुकुलाची विपत्ती पहावयास मिळते. ॥१०७॥

काम, क्रोध, मोह, लोभ, मान आणि मद यांना " षडवर्ग " असे समजले जाते. त्यांचा त्याग करावा. यांचा परित्याग करण्याने राजा सुखी होतो. ॥१०८॥

कामामुळे दण्डक्य राजा, क्रोधामुळे जनमेजय, लोभामुळे राजर्षि ऐल ( इलाचा मुगला ), मोहामुळे वातापि नावाचा असुर, मानामुळे पुलस्त्यवंशी रावण, मदामुळे दम्भोद्रव नावाचा राजा यांचा नाश झाला कारण ह्या सर्वांनी शत्रूप्रमाणे षडवर्गाचा आश्रय घेतला होता. ॥१०९॥११०॥

गुरुच्या सेवेने शास्त्राचे ज्ञान होते आणि शास्त्रज्ञानाने विनम्रतेची वाढ होते. म्हणून विद्येमुळे विनम्र झालेला राजा सज्जनांकडून प्रशंसिला जातो. ॥१११॥

वाईट आचरणाची लोकांनी प्रेरणा केली तरी चांगल्या वाईटाचा विचार करणारा राजा वाईट कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही. कारण तो वेद, स्मृति आणि लोकव्यवहार ह्यांना चांगले समजून जे धर्मसंमत चांगले कर्म आहे त्याचे पालन करतो. म्हणून प्रत्येक कार्य करावे का न करावे ह्या कलेत निपुण असलेल्या राजाला चांगला राजा म्हणतात. ॥११२॥११३॥

अशाप्रकारे जितेन्द्रिय होऊन नीतिशास्त्राचे अनुसरण करणार्‍या राजाच्या घरी लक्ष्मी नाचत असते आणि त्याची कीर्ति स्वर्गापर्यंत पसरत जाते. ॥११४॥

शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद ही सहा वेदांगे, ऋक्‍, यजु, साम, अथर्व हे चार वेद, मिमांसा, न्याय शास्त्राचा विस्तार, धर्मशास्त्र, पुराण ह्या सर्वांना त्रयी म्हणतात. ॥११५॥

कृषि, व्यापार, गो पालन ह्या सर्वांना " वार्ता " म्हणतात. ह्या वार्ताशास्त्राचे उत्तम ज्ञान ठेवणार्‍या राजाला जीवनासंबंधी भीति कधी वाटत नाही. ॥११६॥

धर्म आणि सुख मिळविण्यासाठी सज्जनांची संगत धरावी लागते. कारण सज्जनांची सेवा करणारा राजा अत्यंत मोठा होऊन शोभायमान होतो. ॥११७॥

जसे चंद्र आणि नवीन कमळे उगवलेला तलाव लोकांच्या चित्ताला आनंदित करतो तसेच सज्जनांचा व्यवहारसुद्धा आनंदित करतो. ॥११८॥

ग्रीष्म ऋतुमधील सूर्याच्या किरणांपेक्षा अधिक तप्त, उद्वेग निर्माण करणारा, सावलीसाठी वृक्षादींच्या आश्रयापेक्षा हीन आणि मरुभूमिप्रमाणे उदंड दुर्जनाची संगत यांचा त्याग केला पाहिजे. ॥११९॥

निश्वासाने निघालेला विषाग्नीच्या धुराने मिसळलेल्या तोंडाच्या सापाची साथ करणे चांगले परंतु दुर्जनांची साथ चांगली नाही. ॥१२०॥

हिताची अपेक्षा करणारा माणूस सज्जनाचे हात जोडून स्वागत करतो. त्यापेक्षा अधिक दुर्जनाचे हात जोडून स्वागत करुन दुर्जनाचा सन्मान करुन त्याला प्रसन्न ठेवतो. ॥१२१॥

पीडित होऊनही बुद्धिमान माणसाने अशी भाषा बोलू नये की जी ऐकणारा मनुष्य बाण लागल्याप्रमाणे लटपटू लागेल. ॥१२२॥

सज्जन किंवा दुर्जन या सर्वांजवळ नेहमी गोड वचन बोलावे. कारण जो मनुष्य मोराप्रमाणे प्रिय भाषण करतो तो सर्व समाजाला प्रिय होतो. ॥१२३॥

मदाने युक्त झालेले हंस, कोकिळ आणि मयूर यांची वाणी मनाला चांगल्या विद्वानांच्या वाणीप्रमाणे मोहित करते. ॥१२४॥

जी माणसे प्रिय भाषा बोलतात आणि आपल्याला प्रिय असणार्‍याचा सत्कार करु इच्छितात असे प्रशंसनीय चरित्र असणारे लोक मनुष्यरुपात असलेली देवताच आहे. ॥१२५॥

प्राण्यांवर दया आणि त्यांच्याजवळ मैत्रीचा भाव ठेवणे, त्यांना अभीष्ट दान देणे अथवा प्रिय वचन बोलणे ह्यापेक्षा त्रिलोकांत दुसरे वश करण्याचे साधन नाही. ह्यानेच मनुष्य वशीभूत होतो. ॥१२६॥

पराक्रम, शक्ती, बुद्धि आणि शूरता हे चार श्रेष्ठ गुण समजले जातात. हे गुण नसले आणि दुसरे गुण असले आणि तो धनवान असला तरी तो राजा लहानशा राज्याचा स्वामी होत नाही. आणि जर असला तरी त्याचे राज्य लवकरच नष्ट होते. महाधनवान राजापेक्षा लहान राजा सुशोभित होतो कारण पराक्रमादि गुण असल्याने त्याची आज्ञा कोणी टाळीत नाही आणि तो तेजस्वी असतो. ह्या चार गुणांपेक्षा इतर सर्व गुण सामान्य मानले जातात. अशा राजाला राज्य पालन आणि विस्तार करता येत नाही. ॥१२७॥१२८॥१२९॥

वरील चार गुण असले तरच राजाला पूज्य समजले जाते. नुसता राजकुळात जन्मला आहे म्हणून त्याला कोणी पूज्य मानीत नाही. कारण ज्याप्रमाणे प्रतिष्ठा शक्ती, शूरपणा आणि पराक्रम यामुळेच मिळते. केवळ राजकुळात जन्म झाला म्हणून नाही. ॥१३०॥

दोन गावांच्यामध्ये एक धर्मशाळा असावी आणि त्याची नियमित साफसफाई आणि रक्षणाची जबाबदारी गावाचा जमिनदार किंवा मुख्य मनुष्य यांच्यावर सोपवावी. धर्मशाळेच्या व्यवस्थापकाने तेथे रहाणार्‍या प्रवाशाला विचारावे की - खरे सांग तू कुठून आला आहेस ? कशाला आला आहेस ? कुठे जाणार आहेस ? तुझ्याबरोबर तुझे कोणी मित्र वगैरे आहेत कां तू एकटाच आहेस ? तुझ्याजवळ शस्त्र किंवा प्रवासाचे साधन आहे कां ? तुझी जात कोणती ? तुझा वंश कोणता आहे ? तुझे नाव काय आहे ? तूं जास्त दिवस कुठे रहातोस आणि तुझे घर कुठे आहे ? ह्या सर्व गोष्टी संध्याकाळी विचारुन लिहून ठेवाव्यात आणि प्रवासी माणसाजवळ जर शस्त्र असेल तर ते आपल्याजवळ ठेवावे. आणि नंतर सावधानतेने झोपावे. अशाप्रकारे प्रवाशांवर शासन ठेवावे आणि धर्मशाळेत आलेल्या प्रवाशांची संध्याकाळी मोजदाद करुन धर्मशाळेचे मुख्य दार बंद करुन चौकीदाराला रात्रभर रक्षण करायला सांगावे. सकाळी प्रवासी लोकांना उठवावे आणि त्यांची शस्त्रे त्यांना परत करावी. पुन्हा त्यांची गणना करावी आणि दरवाजा उघडून त्यांना बाहेर जाण्यास परवानगी द्यावी. गावातील लोकांनी गावाच्या वेशीपर्यंत जाऊन यात्रेकरुंचे नेहमी रक्षण करावे. ॥१३१॥१३२॥१३३॥१३४॥१३५॥१३६॥

राजधानीत रहात असताना राजाने खालीलप्रमाणे आपली दिनचर्या ठेवावी. रात्रीच्या चार भागातील पहिले दोन भागात आज किती धन कोषात आले आणि किती बाहेर गेले ? खजिन्यात असलेल्या पैशातून किती खर्च केले आणि अयव्यय झाल्यावर किती शिल्लक आहेत ह्या संबंधी प्रत्यक्ष तसेच हिशेबाच्या वह्या वगैरे पहावे आणि आज किती खर्च आहे त्यानुसार खजिन्यातून तेवढे द्रव्य काढून बाजूला ठेवावे. ॥१३७॥१३८॥१३९॥१४०॥

ह्यानंतर एक मुहूर्तपर्यत मल, मूत्र, त्याग आणि आंघोळ करावी. संध्या, पुराण, श्रवण आणि दान करण्यासाठी दोन मुहूर्ताचा वेळ द्यावा. समजदार असणार्‍या राजाने पारितोषिक देण्याच्या कामात एक मुहूर्त वेळ द्यावा. नेहमी धान्य, वस्त्र, सुवर्ण, रत्ने हे पाहण्यासाठी, सेनेला आदेश देणे आणि आय आणि व्यय यांचे निरीक्षण करण्यासाठी चार मुहूर्त खर्च करावेत. नंतर राजाने आपल्या मित्रांसोबत भोजन करुन एक मुहूर्तपर्यंत विश्राम करावा. जुन्या आणि नवीन वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी एक मुहूर्त आणि न्यायाधीश आणि वकील इत्यादिंकडून समजलेल्या खटल्यांना पहाण्यासाठी दोन मुहूर्त खर्च करावे. शिकार खेळणे आणि इतर खेळ यासाठी दोन मुहूर्त, व्यूहाभ्यास करण्यास एक मुहूर्त आणि संध्येसाठी एक मुहूर्त, भोजनासाठी एक मुहूर्त आणि गुप्तहेरांकडून ऐकलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी दोन मुहूर्त आणि झोपण्यासाठी आठ मुहूर्त खर्च करावेत. अशाप्रकारे व्यवहार करणार्‍या राजाला चांगले सुख मिळते. वर सांगितलेल्या तीस मुहूर्तांना दिवस आणि रात्र याच्यात वाटून कार्य करावे. स्त्री आणि दारु पिणे ह्यात फुकटचा वेळ नष्ट करु नये. ॥१४१॥१४२॥१४३॥१४४॥१४५॥१४६॥१४७॥

ज्यावेळी जे कार्य करणे योग्य आहे त्याचवेळी ते कार्य झटपट करावे. कारण वेळेनुसार न पडणारा पाऊस धान्यादि विनाशक होते. ॥१४८॥

नीति आणि नीतिच्या निरनिराळ्या चालीरिती समजणारा राजा नेहमी कामाच्या सर्व स्थानांचे चारी बाजूने शस्त्र चालविण्यास निपुण, चांगले चार, पाच किंवा सहा पहारेकर्‍यांकडून रक्षण करतो. ॥१४९॥१५०॥

ह्या कार्यस्थानांची दैनंदिन कार्यवाही तिथे नेमलेल्या लेखाध्यक्षांकडून समजून घ्यावी आणि दररोज पहारेदार बदलावेत. ॥१५१॥

" माझ्या राज्यात रहाणार्‍या लोकांनी ध्यानात ठेवावे की गुलाम, नोकर, स्त्री, पुत्र आणि शिष्य यांना कुठल्याही प्रकाराने कठोर शब्दांनी शिक्षा करु नये. " असा शासनादेश राजांनी प्रजेला दिला पाहिजे. ॥१५२॥१५३॥

वजन करण्यामध्ये, आज्ञा पालनामध्ये, वाटाघाटी करण्यामध्ये, नाण्यांमध्ये, गोंद इत्यादिंमध्ये, धातू त्याचप्रमाणे त्यांच्यासारखे इतर पदार्थ, तूप, मध, दुध, चरबी इत्यादि, चूर्ण इत्यादिमध्ये कधीही बेईमानीपणा किंवा मिलावट करु नये. कुणाकडून जबरदस्तीने काही लिहून घेऊ नये. लाच घेऊ नये आणि राजाचे कार्य नाश करु नये. ॥१५४॥१५५॥

दुष्ट आचरण करणारे गुंड लोक, चोर, जाट म्हणजे लंपट ही माणसे दोषी असोत किंवा नसोत त्यांची बाजू घेऊन त्यांचे कधीही रक्षण करु नये. ह्याचप्रमाणे जनतेला अपायकारक असणार्‍या लोकांचेही कधी रक्षण करु नये. आई, वडील, पूज्य, विद्वान, चांगल्या आचरणाची माणसे, सत्पुरुष यांचा अपमान किंवा उपहास करु नये. स्त्री - पुरुष तसेच मालक - नोकर यामध्ये कधीही दुरावा होईल असा व्यवहार करु नये. त्याचप्रमाणे भाऊ-भाऊ, गुरु-शिष्य, पिता-पुत्र हे एकमेकांपासून दुरावतील असा व्यवहारही कधी करु नये. ॥१५६॥१५७॥१५८॥

राजाच्या आज्ञेशिवाय जुगार खेळणे, दारु पिणे, शिकार खेळणे, शस्त्र जवळ ठेवणे, गाय, हत्ती, घोडे, उंट, म्हैस, स्थावर मिळकत, चांदी, सोने, रत्न, मादक पदार्थ, विष ह्या सर्व पदार्थांचा व्यापार करणे, दान पत्र, कर्जासंबंधी कागदपत्र तयार करणे, चिकित्सा, महापापाचा दोष देणे आणि जमिनीत गाडलेल्या द्रव्याला घेणे इत्यादि कामे करु नयेत. ॥१५९॥१६०॥१६१॥१६२॥

आपल्या धर्माची हानी, खोटे बोलणे, परस्त्रीगमन, खोटी साक्ष, खोटे लिखाण, राजापासून लपवून काही वस्तू घेणे, निर्धारीत करापेक्षा जास्त कर घेणे, चोरी, डाका घालणे, मालकाजवळ द्रोह करणे ह्या गोष्टी मनातसुद्धा कधी आणू नये. ॥१६३॥१६४॥

वेतन, पथकर, कर ह्या गोष्टी शक्ती आणि छळ ह्या मार्गाने वसूल करुन कुणालाही त्रास देऊ नये. वजन, मापे या गोष्टी राजाचा शिक्का मारलेल्या असाव्यात. ॥१६५॥१६६॥

संपूर्ण जन गुणी असावेत आणि अपराधी लोकाना पकडून पोलीसांच्या ताब्यात द्यावे. जर बैल वगैरे सोडलेले असतील तर त्यांना योग्यप्रकारे बांधून ठेवावेत. ॥१६७॥

" ह्या प्रकारची राजाज्ञा ऐकून जे लोक त्या आज्ञेचे पालन करीत नाहीत अशा पापी लोकांना फार मोठी शिक्षा दिली जाईल " अशी राजाज्ञा प्रजेला समजावी म्हणून दवंडी पिटून दररोज सांगितली पाहिजे. ॥१६८॥१६९॥

राजाने नीतिपूर्वक प्रजेचे पालन करावे. प्रवासी लोकांच्या सुखासाठी रस्त्यांची व्यवस्था केली पाहिजे. प्रवासी लोकांना लुटणार्‍यांचा प्रयत्नपूर्वक बंदोबस्त केला पाहिजे. ॥१७०॥

राज्य, यश, कीर्ति, धन आणि गुण हे सर्व प्राप्त झाल्यावरही त्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असावे. तसेच दुसरी राज्ये घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे शूरता, पण्डिता, वक्तृतता, दानशीलता, शक्ती, पराक्रम आणि नेहमी चढाई करण्याची वृत्ती ह्या गोष्टी राजाने कधीही सोडता कामा नयेत. ॥१७१॥१७२॥१७३॥

निःशंक मनाने आपल्या किंवा आपल्या धन्याच्या हितासाठी जीव जाण्याची भीति सोडून जो युद्ध करतो तो शूर समजला जातो. ॥१७४॥

जो दुराग्रह न धरता लहान मुलांनीही सांगितलेली चांगली गोष्ट जवळ करतो आणि धर्मतत्वाचा निश्चय करतो तोच पंडित समजला जातो. ॥१७५॥

जो राजाच्या समोर निःशंक मनाने त्याच्या दुर्गुणांची निंदा करतो आणि गुणसदृश दुर्गुणांची कधीही स्तुती करीत नाही तोच वक्ता समजला जातो. ॥१७६॥

ज्याला उपयुक्त पात्राच्या निमित्त स्त्री, पुत्र, धन आणि शरीर देण्यास काहीच वाटत नाही तोच दाता समजला जातो. ॥१७७॥

ज्याच्याजवळ कार्य करण्यासाठी निःशंक सामर्थ्य असते त्यालाच " बल " म्हणतात. ज्याच्या समोर दुसरे राजे दासांप्रमाणे वागतात त्याला " पराक्रम " म्हणतात. युद्धात झालेला जय हा " उत्थान " समजला जातो. ॥१७८॥

विषदोषांची परीक्षा माकड, कोंबडा यांच्यातर्फे करावी. विषयुक्त अन्न बघूनच हंस पक्षी लडबडू लागतात. भुंगे आवाज करु लागतात. मोर नाचू लागतो, कोंबडे ओरडू लागता. माकड मलमूत्र यांचा त्याग करु लागते. सारिका पक्षी उलटी करु लागतो. ह्यारितीने विषयुक्त अन्नाची परीक्षा करावी. राजा आणि त्यांचे अधिकारी यांनी अन्न खाण्याअगोदर ते विषयुक्त आहे कां नाही याची परीक्षा करावी. ॥१७९॥१८०॥१८१॥

शिकार खेळण्याने शूरता वाढते. नेम ठीक योग्य ठिकाणाला लागतो. भीति नाहीशी होते. शस्त्रास्त्रांना लवकर चालविण्याचा अभ्यास होतो. शिकार खेळण्यामध्ये हे सर्व गुण असले तरी " हिंसा " हा महान दोष त्यात असतो. ॥१८२॥१८३॥

राजाने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी नेहमी एकच ठरवावा. कारण अनेक मालक असणे ही गोष्ट राज्याला हितकारक नसते. राजाशिवाय स्वामीने राज्य राखण्याची इच्छाही करु नये. ॥१८४॥

जर राजकुळात राज्य मिळविण्यास अधिकारी अनेकजण असतील तर त्यापैकी जो मोठा असेल त्याला राजा बनवावे. बाकी उरलेले सर्वजण त्याचे सहकारी म्हणून राहतील. कारण राज्याच्या वृद्धिसाठी सहाय्यकांपेक्षा ज्येष्ठ उत्तम असतो.  ॥१८५॥

राज्याचा उत्तराधिकारी ज्येष्ठ जर कोड उठलेला, बहिरा, मुका, आंधळा किंवा नपुंसक असेल तर तो राज्यासाठी योग्य समजला जात नाही. अशावेळी त्याचा धाकटा भाऊ किंवा त्याचा मुलगा किंवा त्याच्या भावाचा मुलगा राज्याचा उत्तराधिकारी होतो. ज्याप्रमाणे मोठा पुत्र नसेल तर धाकटे राज्याचे भागिदार होतात. ॥१८६॥१८७॥

राजाने आपल्या स्वार्थसिद्धिसाठी " तुम्हा सर्वांमध्ये अधिकदाता, शूर आणि धार्मिक कोण आहे ? याचे उत्तर सांगणारा जर ठग असेल आणि ज्याचे बोलणे ऐकून त्याचा राग, लोभ आणि भितीमुळे मंत्री गप्प रहात असतील तर तो खरे सांगत नाही असे समजावे. आणि त्याच्या मतांना वेगवेगळे लिहून त्यावर आपल्या मताचा विचार करावा. जो विचार बहुमताचा असेल त्यानुसार निर्णय करावा. ॥१८८॥१८९॥१९०॥

राजाने आपले बांधव, मित्र आणि आपल्या गुणांसारखेच असणारे लोक, मंत्री ह्यांच्या बरोबर जावे. कधीही नीच माणसांशी संगत करु नये. ॥१९१॥

खोट्यावरुन मनुष्य नीच आणि सत्य व सदाचार यांच्यावरुन सज्जन समजला जातो. आणि साधुंपेक्षा नीच माणसे जास्त प्रमाणात आपली मृदुता दाखवितात. ॥१९२॥

दरवर्षी गाव, नगर, आणि देश यांचे स्वतः निरीक्षण करुन अधिकार्‍यांनी कुठल्या प्रजेचे मनोरंजन केले आहे आणि कुठल्या प्रजेला कष्ट दिले आहेत यामध्ये जो सत्य व्यवहार असेल त्याचा विचार करावा. अधिकारी नोकरांचा पक्षपाती न होता प्रजेचा पक्षपाती असणे राजाच्या हिताचे असते. ॥१९३॥१९४॥

राजाने आपले स्थान कधी सोडू नये. परंतु नीतिनुसार शत्रूला जिंकावे. कारण स्थान सोडणारे दात, केस, नख आणि राजा सुशोभित होत नाहीत. ॥१९५॥

राज्यासंबंधी कृत्यांचे संक्षिप्तरुपात ह्याप्रकारे वर्णन केले आहे. पुढील अध्यायात याचे विस्तारपूर्वक वर्णन करु. ॥१९६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP