TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अंक चवथा - प्रवेश पांचवा

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


प्रवेश पांचवा
(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू दीन वेशाने दळीत आहे. पाळण्यात मूल.)

सिंधू - चंद्र चवथिचा । रामच्या गं बागेमधे चाफा नवतिचा॥

(दोन चार वेळ म्हणते) (पाळण्यात मूल रडू लागते.) अगं बाई, बाळ उठला वाटतं! (उठून त्याला पाळण्यातून बाहेर घेते.) आज चवथीची ही चिमुकली चंद्रकोर लवकर का बरं उगवली? चतुर्थीचा उपास लागला वाटतं चिमण्या चंद्राला? भूक लागली का बाळाला? बाळ, थांब हं जरा. आता गीताबाई येतील, त्यांना दूध आणायला सांगू माझ्या बाळासाठी बरं! आता का बरं काजळकाठ भिजवतोस असा? मघाशी थोडं दूध पाजलं होतं तेवढयावरच थोडा वेळ काढायला नको का? असा हट्ट करू नये? मागितल्या वेळी दूध मिळायचे दिवस, राजसा, आता आपले नाहीत रे! आपल्या लेखी गोकुळीच्या गोठणी ओस पडल्या!

(राग- कालंगडा; ताल- दीपचंदी. चाल- छुपनापे रंग.)
बघू नको मजकडे केविलवाणा, राजस बाळा ॥धृ०॥
ये देवा । अपुली ना करुणा तोवरी समजुनी । वर्ते अनुकाला ॥१॥

गरिबीत लहान जिवालासुध्दा मोठया माणसाची समजूत यायला हवी बरं, बाळ! अस्सं, आता कसा बरा हसलास! असाच शहाणपणा शिकला पाहिजे आता! गुणाचं मोठं गोजिरवाणं आहे माझं! दृष्टसुध्दा लागेल एखाद्याची अशा गुणाच्या करणीनं! झालं, लागलीच दृष्ट! आली बाळगंगा डोळयांतून! माझ्या डोळयांतून पाणी आलं म्हणून का वाईट वाटलं तुला? बाळा, मी रडते म्हणून तू सुध्दा असा रडणारच का? मी रडू नको तर काय करू? आज वाटलं, देवाला दया आली म्हणून! चांगली शपथ घेऊन सोडणं झालं होतं; पण आपलं दैव आड आलं! आताच भाईनं सांगून पाठविलं, की क्लबात जाऊन पुन्हा घ्यायला सुरुवात झाली म्हणून! आता बाळा, संसाराला तुझाच काय तो आधार! बाळ, लौकर मोठे व्हा, आणि आपल्या गोजिर्‍या हातांनी माझी आसवं पुसून टाका! तोवर या आसवांच्या अखंड धारेनं तुझ्या आटलेल्या दुधाचा वाढावा करायला नको का? ऐकता ऐकता डोळे मिटून ध्यान मांडलं का इतक्यात? हसायला वेळ नाही, न रडायला वेळ नाही! नीज, मी गाणं म्हणते हं! (त्याला मांडीवर निजवून पुन्हा दळू लागते. इतक्यात गीता प्रवेश करते.) चंद्र चौथिचा । रामाच्या गं बागेमध्ये चाफा नवतिचा! (पुन्हा पुन्हा म्हणू लागते. गीतेला पाहून) अगं बाई! गीताबाई, अशा उभ्या का? बसा ना? आज तळीरामांची तब्येत कशी आहे? काही उतार वाटतो आहे का?

गीता - उतार नाही न् काही नाही! पण बाईसाहेब, काय तुमची दशा ही? जात्याची घरघरसुध्दा अशा गाण्यानं गोड करून घेता आहात, तेव्हा धन्य म्हणायची तुमची!

सिंधू - म्हणतात ना, वासना तशी फळं! बाबांच्या घरी माझ्या लहानपणी आमची मोलकरीण रोज पहाटेची गोड गळयावर हे गाणं म्हणून दळीत असायची; मी नित्यनेमानं आपली अंथरुणावर पडल्या पडल्या ते ऐकायची. बाळपणाची समजूत- एकदा आलं सहज मनात, आपणही असंच गाणं म्हणून दळावं असं; देव बापडा कुठं तेवढंच ऐकत होता; त्या वेळी त्याला माझा बाळहट्ट नाही पुरवता आला; आता सटवीच्या फेर्‍यात सापडून पुन्हा बाळपण लाभलं आणि दळण्याची हौस फिटली! त्या गोष्टीची आठवण होऊन गाणं म्हणत होते झालं! हो पण, काय हो गीताबाई, संध्याकाळी हे दळण द्यायचे आहे, त्याचे किती पैसे मिळायचे आहेत?

गीता - सहा!

सिंधू - मग ते आता नाही का मिळायचे?

गीता - कामाआधी कसे मिळतील?

सिंधू - अगदी हातापाया पडले तरी नाही का मिळायचे?

गीता - त्या घरची माणसं मोठी नतद्रष्ट आहेत मेली! पाप मागितल्यानं द्यायची नाहीत कुणाला! पण बाईसाहेब, आताच कशाला हवे होते पैसे?

सिंधू - (स्वगत) आता काय सांगायचं या मुलीजवळ? घरात चिमणीच्या चार्‍यापुरतासुध्दा आधार नाही, हे कसं सांगू हिला? देवा लक्ष्मीनारायणा, कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविशी दारोदारी! यात पुरुषार्थ- पण तुझ्याकडे काय दोष? पूर्वजन्मी केलं ते कपाळी उमटलं, त्याला तू काय करणार? मागल्या जन्मी ब्राह्मण ताटावरून उठवला असेल म्हणून आज अन्नासाठी दाही दिशा पाहणं आलं; अतीत अभ्यागताला रित्याहाती दवडलं असेल म्हणून घरची लक्ष्मी पारखी झाली! हिरव्या कुरणांतून गाईगुजीला हाकललं असेल, तेव्हा आज बाळाला दूध मिळत नसेल! आमचं संचित खोटं, तिथं तुझ्याकडे काय बरं गा-हाणं आणायचं?

(राग- सावन; ताल- रूपक. चाल- पति हूं पियूं.)
कशी मी प्रभो निंदू तुला । नच बघे तुझ्या दोषा । कोणावरी रोषते । अणुही धरी न मी । दोषी स्वभावा! ॥धृ०॥
संचित छळिते । माझे असे । भजनी त्याच्या । नच बललव तुझ्या अमरा दयेला ॥१॥

गीता - सांगितलं नाही तुम्ही कशाला आता हवेत पैसे ते?

सिंधू - काय सांगायचं, गीताबाई? आज किनई आमच्या घरात अन्नपूर्णामाई अगदीच रुसून बसली आहे हो! देवाच्या अक्षतांपुरतेसुध्दा तांदूळ नाहीत घरात! म्हणून म्हणत होते- मूठभर भात उकडला म्हणजे मध्यान्ह टळेल कशी तरी! माझ्यापाशी हे एवढे दोन पैसे बाळाच्या दूधापुरते आहेत काय ते!

गीता - हात्तीच्या, अहो, मग माझ्या- (स्वगत) अगंबाई, पण माझ्याजवळचे म्हटले तर या घ्यायच्या नाहीत! (उघड) बाईसाहेब, तसं आवर्जूनच मागितले तर त्यांच्याकडून- किती बरं? (पैसे मोजीत) एक, दोन, तीन अन् (उघड) चार पैसे मिळतील! नाही असं व्हायचंच नाही अगदी! येऊ का जाऊन? अगदी उभ्या उभ्या आले हं-

सिंधू - अगदी बसल्या बसल्यासुध्दा आणाल! हं बघा, तसं नको, हे दोन पैसे घ्या आणि बाळासाठी आधी दूध आणा! मघापासून तो भुकेनं कासावीस झाला आहे! तंवर मी हे दळण आटोपते! मग ते घेऊन जा म्हणजे झालं!

गीता - बाईसाहेब, एक दहा वेळ तोंडावर आलं असेल, पण आता टाकतेच बोलून! तुमच्या घराची अशी विटंबना झाली आणि तुम्ही तिकडच्या तब्येतीच्या चौकशी करता! त्या दिवशी कथेत ऐकलं, त्या घटकेपासून माझ्या मनाला कसा चटका लागला आहे! घटोत्कचाला कर्णाची शक्ती लागली तेव्हा त्यानं विचार केला की, मागं पडलो तर पांडवांचीच माणसं चेंगरून मरतील! म्हणून तशात पुढं झेप घालून त्यानं एवढं मोठं कलेवर कौरवसेनेवर टाकलं! बघा! एकेकांनी मरता मरता आपल्या माणसांची हितं पाहिली आणि आमच्याकडून अगदी अखेरी-अखेरीला दादासाहेबांना ही दारूची सवय लावली, आणखी तुमच्या सोन्यासारख्या सोज्ज्वळ संसारात माती कालवली! होणं जाणं कुणाच्या हातचं नसतं, पण त्यापेक्षा आपलं आज-उद्या व्हायचं तेचं चार वर्स आधी!

सिंधू - हं गीताबाई, असं भलतं बोलावं का? जा, घरातून ते भांडं घेऊन लौकर जाऊन या पाहू आधी! वेडया नाही तर कुठल्या! आणखी हे बघा, बाळ मांडीवर निजला आहे, म्हणून दळताना अवघडल्यासारखं होतं; त्याला तेवढा असाच त्या अंथरुणावर नेऊन ठेवा पाहू जाता जाता! (गीता मुलाला घेऊन जाते.) 'चंद्र चवथिचा-' (मूल रडू लागते.) अगं बाई, जागा झाला वाटतं? आणा त्याला इकडे, गीताबाई! (गीता मुलाला परत आणून देते व जाते.) लौकर या बरं का? (मुलाला) बाळ, का बरं झोपमोड झाली तुमची? फार लागली का भूक? आत्माराम भुकेनं तळमळत असल्यावर डोळयाला डोळा लागणार तरी कसा? बाळ, जरा थांब, आता येतील हं गीताबाई! अगं बाई, असा उपाशी आशेनं या पिठाकडे पाहायला लागलास? बाळ, अश्वत्थामाला त्याच्या आईनं पीठपाणी कालवून देऊन त्याची दूधाची तहान कशी तरी भागवली! पण बाळ, आपली नशिबं अगदीच पांगळी आहेत; यातल्या चिमूटभर पिठावरसुध्दा आपली सत्ता नाही! ते लोकांचं आहे! त्या पीठपाण्याचा ओघळ तुझ्या तोंडावर पाहिला, तर राजसा, तारामतीचा रोहिदास तुला हसून हिणवायचा नाही का?

(राग- भैरवी; ताल- पंजाबी. चाल- बाबुल मोरा.)
गुणगंभीरा । त्यजि न लव धीरा ॥धृ०॥
सत्त्वपरीक्षा महा । यदा परमेश्वर नियोजी । अवसाद तेव्हा उचित का वीरा? ॥१॥
नको रडवं तोंड करू गडे! त्या पाहा आल्या हं गीताबाई दूध घेऊन! (पाहून) अगं बाई, येणं झालं वाटतं! पण हे कसलं येणं? देवा, काय पाहणं नशिबी आणलंस हे? (सुधाकर येतो- त्याचे पाय लटपटत आहेत.)

सुधाकर - सिंधू, इकडे ये, मला आणखी प्यायची आहे! फार नाही, फक्त एकच प्याला! पैसे आण! सिंधू, पैसे आण!

सिंधू - आता कुठले बरं आणू पैसे मी? माझ्याजवळ काही नाही अगदी!

सुधाकर - खोटं बोलतेस! आहेत! चल आण! आणतेस की नाही? का जीव घेऊ?

सिंधू - आपल्या पायांशपथ मजजवळ आता काही नाही. आता दोन पैसे होते तेवढे बाळासाठी दूध आणायला दिले तेवढेच! अगदी बाळाच्या गळयावर हात ठेवून सांगते हवी तर!

सुधाकर - त्याचा गळा दाबून टाक! का दिलेस पैसे?

सिंधू - बाळासाठी नकोत का द्यायला? असं काय करायचं हे?

सुधाकर - चल जाव! मला नाहीत आणि त्याला पैसे आहेत? नवर्‍यापेक्षा ते कारटं जास्त आहे काय? सिंधू, तू पतिव्रता नाहीस! हरामखोर! ते कारटं त्या रामलालचं आहे! माझं नाही!

सिंधू - शिव शिव! काय बोलणं हे?

सुधाकर - शिव शिव नाही, रामलालच आहे! आता मारून टाकतो! (एक मोठी काठी घेऊन मुलाकडे जातो.)

सिंधू - (घाबरून) अगं बाई, आता कसं करू? हाका मारून चारचौघांना जमविलं तर तिकडून काही तरी भलतंच व्हायचं! देवा, काय रे करू आता? माझ्या फाटक्या अंगाचं मायेचं पांघरूण कसं पुरणार माझ्या बाळाला आता! (सुधाकर काठी मारतो. सिंधू मध्ये येते; तिला काठी लागून खोक पडून ती बेशुध्द पडते.)

सिंधू - देवा, सांभाळ रे माझ्या बाळाला!

सुधाकर - तू मर! आता कारटं मर जाव! (काठी मारतो. मूल मरते.) (पद्माकर येतो.)

पद्माकर - हरामखोरा, काय केलंस हे?

सुधाकर - काही नाही; आणखी प्यायची आहे- एकच प्याला!

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-09T05:43:21.8300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

royal

  • पु. (a size of paper) रॉयल 
  • शाही 
  • राज- 
  • राज- 
RANDOM WORD

Did you know?

कांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site