TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अंक तिसरा - प्रवेश पहिला

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


प्रवेश पहिला
(स्थळ - सुधाकराचे घर. पात्रे- सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद.)

सिंधू - हे काय हे असं? दुधाशीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्ण! धरू का चिमुकला कान एकदा? थांब बाळ, गाणं म्हणून तुला घास भरवते हं! ऐक नीट! गडबड केलीस तर नाही म्हणायची बरं का? आणखी घासाबरोबर दुधाचा एकएक घोटही घ्यावा लागेल.

(चाल- विडा घ्या हो नारायणा.)
घास घेरे तान्ह्या बाळा । गोविंदा गोपाळा । भरवी यशोदामाई । सावळा नंदबाळ घेई ॥धृ०॥
घेई कोंडा-कणी त्रैलोक्याचा धणी । विदुरावरीचा । पहिलावहिला घास ॥१॥
पोहे मूठभरी । क्षीराब्धीच्या हरी । मैत्र सुदामजीचा  । आला दुसरा घास ॥२॥
थाली एक्या देठी । घ्यावी जगजेठी । द्रौपदीमाईचा । आला तिसरा घास ॥३॥
उरल्या उष्टावळी । फळांच्या वनमाळी । शबरीभिल्लिणीचा । घ्या हो चवथा घास ॥४॥
टाकू ओवाळून । मुखचंद्रावरून । गोविंदाग्रजाचा । उरलासुरला घास ॥५॥

हं, चला, झालं बरं आता! झाली पुन्हा दांडगाईला सुरुवात?वन्सं, सांभाळा बाई तुमचं रत्न हे! तुमची माणसंच भारी अचपळ! नाही तर थांबा. हे बघा गीताबाई, बाळाला पाळण्यात नेऊन निजवा बरं! (गीता येते.) हं, गीताबाईंना बघितल्याबरोबर लागला हसायला! गीताबाईंच्याबरोबर भटकायला सापडतंना इकडे तिकडे! (गीता मुलाला घेऊन जाते.) वन्सं, भाईला सकाळपासून दोन-तीन बोलावणी झाली. येतो येतो म्हणून म्हणतो, अजून का बरं येईना? वन्सं, मला आपलं भलतंच स्वप्न पडायला लागलं आहे.

शरद - वहिनी, तुम्ही उगीच काळजी करता, झालं! कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसलं म्हणजे खाल्लेलं अन्नसुध्दा अंगी लागायचं नाही.

(राग: भीमपलास, ताल- त्रिवट. चाल- रे बलमा बलमा.)
छळिती या हृदया अदया । भ्रांत मनोरचना कालगुणा ॥धृ०॥
मातृजीवना झिजवुनि जगती । अंती घेती तयासह त्या निधना ॥१॥

सिंधू - काही म्हणा, काही सांगा. माझ्या मनाचा आपला धीरच सुटल्यासारखा झाला आहे. भाईची तार मिळाल्या दिवसापासून उरात धडकी बसून जिवाला काळजी लागली आहे-

(राग- काफी- जिल्हा, ताल- त्रिवट. चाल- इतना संदेश वा.)
दहती बहू मना नाना कुशंका ॥धृ०॥
विपदा विकट घोर । निकटी विलोकी । मन कंप घेत । गणिते ना विवेका ॥१॥

शरद - पण अशी काळजी लावून घ्यायला तसं काही झालं आहे का? नुसत्या तर्कानं तर्कच वाढवायचे का? सगळं जिथल्या तिथं आहे, मग उगीच का असं आडरान प्यायचं?

सिंधू - वन्सं, आपदा चंद्रा सूर्यासारख्या वेळा सांगून का येत असतात. बरं व्हायचं ते जपातपानं होतं आणि वाईट मात्र झाल्यावर कळायला लागतं. फळ पिकण्यापूर्वी पाडानं रंगून जातं; पण पुरतेपणी कुजल्याखेरीज त्याला कधी घाण सुटली आहे का? एकेकाच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे जिवाला अगदी कसा चरका बसतो!

(राग: खमाज जिल्हा; ताल- पंजाबी; चाल- मै तोसे नाही बोलोरे)
शंकाही नाही काली ज्या । दुर्गती जवे ये तदा ॥धृ०॥
धूर्त कपटी अरी । जैसा रण करी । तेवि विधा ही सदा ॥१॥

शरद - मन चिंती ते वैरी चिंतीना, तशातलं चाललं आहे तुमचं! वहिनी हे पाहा भाईसाहेब आलेच! (रामलाल येतो.) भाईसाहेब, या पाहा, वहिनी कशा एकसारख्या रडताहेत! त्यांना चार धीराच्या गोष्टी सांगून त्यांची समजूत करा पाहू!

रामलाल - (स्वगत) काल रात्री पाहिलेला प्रकार सिंधूला आता कोणत्या तोंडाने सांगू? कितीही टाळाटाळ केली तरी हे मरण काही टळत नाही!

सिंधू - भाई, कळलं नाही का तुला? काही भिण्यासारखं नाही ना? असा मुकाटयानं का उभा आहेस? काय झालं? सांग लौकर मला!

रामलाल - ताई, अशी घाई करू नकोस. लहान मुलं साखळीचा एक खेळ खेळतात. तो तू पाहिला आहेस ना? जसजसा खेळ वाढत जातो, तसतसा मुलाला मूल जोडून त्यांच्या साखळीला जलदीची चाल करता येत नाही. तसंच या संसाराचंही आहे. संसार वाढू लागला म्हणजे अडचणींमागून अडचणी वाढून जबाबदारीमुळं मन जडावत जातं, आणि बालपणीचा चंचलपणा टाकून देऊन मनुष्याला प्रत्येक बाबतीत धिम्या पावलानं चालावं लागतं.

सिंधू - भाई, असं का बोलायला लागलास? माझ्या अदृष्टात काय काय लिहिलं आहे, ते मला एकदम सांगून टाक.

रामलाल - सिंधूताई, उद्या काय होणार आहे हे आज कळलं तर संसार नीरस होईल. म्हणून विधात्यानं प्राणिमात्राचं अदृष्ट डोळयांला न दिसणार्‍या कपाळपट्टीवर लिहून ठेवलं आहे. सर्व विश्वाचा संहार ज्याला रुद्रशक्तीच्या जाणिवेनं करायचा आहे, त्या माहेश्वराला मात्र आपल्या ललाटीचा लेख वाचता यावा, म्हणून कपाळावर असलेल्या तृतीय नेत्राचा लाभ झाला आहे. हा त्रिकालज्ञ तृतीय नेत्र आम्हा मर्त्य जिवांच्या कपाळी नाही!

(राग: खमाज; ताल- पंजाबी; चाल- पिया तोरी.)
गमे सारी । शुभदा प्रभूची मज योजना ॥धृ०॥
हे मनुजा । जाणुनि तयाला । गरल या न दिले प्रभुने ज्ञाना ॥१॥

सिंधू - भाई, माझे प्राण आता कंठाशी आले आहेत रे! काय ऐकायचं असेल ते जितेपणी मला ऐकून तरी घेऊ दे!

(राग- जिल्हा-पिलू; ताल- कवाली. चाल- कनैया खेले होरी.)
करि दया सांग वेगे । खसा ही पदी लागे ॥धृ०॥
क्षण एक अंती । विलंबी फुका जाता । दुर्बल हृदय हे भंगे ॥१॥


रामलाल - ताई, तुला काय सांगू? आपल्या सुधाकरला एक व्यसन- एक फारच भयंकर व्यसन- (स्वगत) निष्ठुर दैव, काय सांगायचं हे माझ्या कपाळी आणलंस? दारू हा अमंगल शब्द या मंगलदेवतेपुढं मी कोणत्या तोंडानं उच्चारू? व्यसनी चांडाळांनो, तुम्ही आपल्या जिवलग मित्रांना कसल्या संकटात पाडता, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? परमेश्वरा, दारूनं भिजलेला हा वाग्बाण हिच्या हृदयावर रोखण्यापेक्षा एखाद्या विषारी बाणानं हिचा एकदम हृदयभेद करण्याचं काम माझ्याकडे का दिलं नाहीस? (उघड) सिंधू, सुधाकराला दारूचं व्यसन लागलं!

सिंधू - देवा, काय ऐकलं मी हे? (बेभान पडू लागते, शरद व रामलाल तिला धरतात.)

रामलाल - ताई, सिंधूताई, सावध हो!

सिंधू - भाई, भाई- (घाईघाईने भगीरथ प्रवेश करतो.)

भगीरथ - भाईसाहेब, अनर्थ झाला. सुधाकर मद्यपान करूनच कचेरीत गेला, वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागला व मुन्सफानं त्याची सनद कायमची रद्द केली.

रामलाल - अनर्थांच्या परंपरेला आता तुम्ही तयार असलंच पाहिजे. ताई, सिंधूताई- (तळीराम सुधाकरला घेऊन येतो.)

सुधाकर - काय रडारड आहे घरात? सनद गेली म्हणून कोण रडतं आहे? नामर्द बायको आहे. तळीराम, एकेकाला लाथ मारून ही गर्दी मोडून टाक. (खाली बसतो.)

रामलाल - शरद, तळीराम, सुधाकरला आत नेऊन निजवा.

सुधाकर - सनद गेली तरी हरकत नाही. मी नामर्द नाही- हा रामलाल नामर्द आहे- सिंधू नामर्द आहे- सनद नामर्द आहे! (ते त्याला घेऊन जातात.)

रामलाल - ताई, अभागी मुली! चल. तुझं रडण्याचंसुध्दा समाधान येथून नाहीसं झालं (तिला जवळ घेऊन) बेटा, ही परमेश्वराची कृपा आहे. (तळीराम येतो.) तळीराम, असाच्या असा चालता हो. इत:पर या घरात पाऊल टाकशील तर खबरदार! सिंधूताई चल.

(राग- ललत, ताल- त्रिवट. चाल- पिया पिया)
गमसि खरी हतभागिनी । जीवनमंगलहेतु तव जरी । स्वकरि लोटी तुज दुर्गतिदहनी ॥धृ०॥
रोदन हेचि जगी हतभागा । विश्रांतिसी चित्ताते जागा । तीसह पति करि तव हृद्भंगा । मंदभाग्य तू तुजसम भुवनी॥
(जातात.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-09T05:34:33.9400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मंकन

  • n. वाराणसी में निवास करनेवाला एक नाई, जो श्रीगणेशजी का परम भक्त था । दिवोदास (द्वितीय) के राज्यकाल में, शिवजी ने काशी नगर को निर्जन बनाना चाहा । इस काम के लिये, उसने अपने पुत्र श्रीगणेश (निकुंभ) को नियुक्त किया । तदोपरांत, श्रीगणेश ने मंकन को दृष्टांत दे कर काशी नगरी के सीमापर अपना एक मंदिर बँधवाने के लिए कहा, जिस आज्ञा का इसने तुरंत पालन किया । काशी क अयह ‘निकुंभ मंदिर’ अत्यधिक सुविख्यात हुआ, एवं अपना ईप्सित प्राप्त करने के लिये देश देश के लोग उसके दर्शन के लिये आने लगे । निकुंभ ने अपने सारे भक्तों की कामनाएँ पूरी की, किंतु दिवोदास राजा की पुत्रप्राप्ति की इच्छा अपूर्ण ही रख दी, जिस कारण क्रुद्ध हो कर उसने निकुंभ मंदिर को उद्‍ध्वस्त किया । इस पाप के कारण, निकुंभ ने सम्स्त काशी नगर निर्जन होने का शाप दिवोदास राज को दे दिया, एवं इस तरह काशी नगर को विरान बनाने की शिवाजी की कामना पूरी हो गई [वायु.९२.३८];[ ब्रह्मांड३.६७.४३] 
RANDOM WORD

Did you know?

उपासना किती प्रकारची असते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.