अंक पहिला - प्रवेश चवथा

गडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.


[अप्पासाहेब यशोदाबाई]

अण्णाः काय करावें आतां प्रकृतीला ! अगदीं तील खपेनासा झाला आहे ! आज सकाळीं अग्निमांद्य झालें म्हणून चूर्ण आणिवलें वैद्यबुवांकडून तों लागलीच इतकी क्षुधा प्रदीप्त झाली कीं सार्‍या मुलखाची खाई सुटली आहे ! काय ही भूक !
यशोदाः मग खायचें होतें कांहीं थोडेंसें ! देऊं का आणून कांहीं ?
अण्णाः अग, खायचें काय कयाळ ! मागें त्या रामभाऊला असेंच अग्निमांद्य झालें; पुढें चूर्ण घेटल्याबरोबर अशीच खाई सुटून त्या नादांत खाल्लेंहि त्यानें थोडेंसें ! झालें; सहा महिने खाटेला खिळून पडावें लागलें ! वैद्य तरी आतां कोणता आणावा ?
यशोदाः खरें तर काय ? इतके वैद्य झाले पण मेल्या एकाच्यासुद्धां हाताला गुण नाहीं. सारे मेले---
अण्णाः अग, वैद्याला शिव्या देऊं नयेत अशा ! वैद्यांच्या स्वाधीनच्या का या गोष्टी आहेत ? वैद्य काय करणार इथें ? आतांशा हवा पहा ना कशी असते ती ! सकाळीं सारें आमाळ झाकलेलें ! दुपारीं अंगाचीं कारंजीं होतात आणि संध्याकाळीं गार वारा लागतो ! रात्रीं असाच वार्‍याचा खेळ ! घटकेंत वारा इतका बंद होतो कीं श्वासोच्छ्‌वास सुद्धां बंद व्हावयाची वेळ येते, तर घटकेंत असा वारा सुटतो कीं घरें सुद्धां उडून जातील असें वाटतें ! घर पडेल म्हणून बहिर यावें म्हटलें तर लागलीच सर्दी व्हावयाची ! काय-करावें काय या वार्‍याला ?
यशोदाः असें वार्‍याशीं भांडून काय होणार ? हें सारें बाहेरचें आहे आणि त्यानेंच इकडे असें वाटतें !
अण्णाः कसलें आलें आहे कर्माचें बाहेरचें
यशोदाः नाहीं म्हणून कसें चालेल ? परवां का कालच वाटतें, कोपर्‍यांत तेलाचा डबा होता आणि सकाळीं बघतें तो डबा आपला आंगणांत !
अण्णाः अग, उडाला असेल या वार्‍यानें !
यशोदाः तसेंच, परवां पहांटे पहांटेस गोठयांत सारखी खडबड आणि सकाळीं कपिलेनें दुधाचा एक थेंब दिला असेल तर शपथ !
अण्णाः वार्‍यानें वासराचें दावें तुटलें असेल, नाहीं तर या उन्हानें गाय आटली असेल झालें !
यशोदाः कांहीं नाहीं, वेणूला पाहिलें तर काल आपली एकदम उचकीच लागली; घटका झाली, दोन घटका झाल्या, उचकी आपली तशीच ! नाना उपाय केल; पण ज्याचें नांव तें ! अखेर अंबाबाईच्या नांवानें अंगारा लावला; म्हटलें चुकलें, कांहीं चूक झाली असेल तर आईनें पदरांत घ्यावी ! झालें घटकेंत उचकी बंद !
अण्णाः बाकी ती आतांशा फारच झुरणीस लागल्यासारखी दिसते.
यशोदाः पहावत नाहीं पोरींकडे ! कसली गेंदासारखी पोर, पण फाटल्यासारखी झाली आहे बघतां बघतां ! खाणें नाहीं, पिणें नाहीं ! इकडे पोरीची ही दशा आणि तिकडे लोकांचीं घालून पाडून बोलणीं ! नकोसा झाला आहे जीव ! कुणी म्हणतात पोरीनं लग्नाची धास्ती घेतली आहे तर कुणी म्हणतें तिचें मीठ तोडलें आहे !
अण्णाः धास्ती कसली आणि मीठ कसलें ? तिला मुळीं पहिल्यापासूनच क्षयाची भावना आहे !
यशोदाः आतां बोललें तर येईळ राग ? क्षय नाहीं, खोकला नाहीं; हा सारा बाहेरवा आहे ! म्हणून हे सारे खेळ होताहेत.
अण्णाः पण बाहेरवा व्हायाला आम्हीं काय कुणाचें खाल्लें आहें ?
यशोदाः आज सकाळींच मी पिलंभटाचा देव खेळविला, देवानें स्पष्ट सांगितलें, कीं करंजगांवच्या विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची न्हाऊनमाखून, डोकींत गजरा घालून गेली होती तिथें तिला तिला बाहेरचा पायरव झाला. तसा मागें मी एकदां अंबाबाईला गोंधळ बोललें होतें तो कांहीं अजून घातला नाहीं त्याची ही सारी घरांत नड आहे !
अण्णाः तुला नाहीं उद्योग आणि त्या पिलंभटालाहि नाहीं उद्योग ! घाला गोंधळ झालें; पण घरांत कुणाचें औषध मात्र बंद करूं नका !
[मधुकर व पिलंभट येतात.]

मधुः अण्णा, देऊन आलों वसंतरावांची पत्रिका आजोबांजवळ !
पिलं: हें पनवेलकरांचें क्षिणामृत वेणूताईसाठीं ! या माधवरावाच्या कफपित्तवातनाशक गोळ्या दिल्या आहेत भाऊशास्त्री घाटयांनी ! आणि हीं तुमच्याकाढयांचीं औषधें ! पिंपळीं, हिरडा, बेहडा, कोष्टिकोळिंजन, धमासा, पित्तपापडा, वावडिंग, डिकेमाली.
अण्णा: भले शाबासा ! पण, पिलंभट, जीर्णज्वर कांहीं हटत नाहीं अजून ! पहा, बरें, आहे का आतां ताप !
पिलं: (नाडी पाहून) ओ, हो, हो, पुष्कळ ताप आहे अंगांत, काढा बदलला पाहिजे असें वाटतें !
यशोदाः (अण्णांच्या अंगाला हात लावून) कुठें, आहे कुठें ताप ! उगीच पराचा कावळा करायचा झालें.
अण्णाः अग, नाही कसा ताप ? कालपासून अंगांत कणकण आहे नी म्हणे ताप नाहीं ! काल रात्रीं आंचवायला बागेंत गेलों आणि जरा बोलत उभा राहिलों जरासा उघडया अंगानें वार्‍यांत; तेव्हां मन कचरलें ! आणि म्हणे ताप नाहीं !
यशोदाः मग हाताला लागत नाहीं कुठें माझ्या ?
पिलं: बाईसाहेव, हाडीज्वर हाताला कसा लागणा ? बोलून चालून चोरटें दुखणें हें,  त्यांतला दरदी असेल त्यालाच कळायचें !
अण्णाः (कण्हत) अहाहा, काय पाठींत कळ आली पाहा.
पिलं: ही झुळूल आली ही, वार्‍याची, तिनें !
मधुः बरें; अण्णा, पत्रिकेचें तसेंच राहिलें ! बसंतरावांची---
अण्णाः वसंतराव, वसंतराव, माळ का करून घालायची आहे वसंतरावाची ! छप्पन्न वेळा सांगितलें आणि आतां पुन्हां सांगतों एकदां, कीं तो सोन्यानें भरला असला तरी मला त्याला मुलगी द्यायची, नाहीं !
यशोदाः पण उगीच का जिवाचें पाणी करून घ्यायचें तें ! तिनें ज्याचे तीळतांदूळ खाल्ले असतील तो येऊन आपण होऊन घेऊन जाईल तिला. आपण कशाला उगीच संताप करून घ्यायचा ?
अण्णाः तसें नव्हे; मीं एकदां सांगितलें कीं मीं वेणू बाळाभाऊला देणार, त्याच्या वडिलांना माझें वचन गेलें आहे तें कांहीं मी मोडणार नाहीं आणि बाळाभाऊनें आपण होऊन नको म्हटलें तर दुसर्‍या एखाद्या वैद्याच्या घरीं देईन ! पोरीला क्षय आहे, तिला वैद्याच्याच घरीं दिली पाहिजे.
यशोदाः बाळाभाऊचें ठिकाण कांहीं वाईट नाहीं; आज इतके दिवसांचा नाद आहे आणि मुलगाही माहितीचा ! आतां अंमळ मुलगा आहे बसवया बांध्याचा आणि पोरीची जात पडली उफाडयाची. म्हणून वरणभाव व्हायची भीति आहे थोडीशी, पण तेवढयावर कांहीं हातचें स्थळ घालवायला नको !
मधुः पण जें करायचें तें जरा विचारानें केलें तर बरें नाहीं का ?
यशोदाः अरे सारें खरें; पोरीला सुख लागलें पाहिजे; मुलगा हाताचा धड पाहिजे,---
पिलं: नाहीं तर आपली हातातोंडाशीं गांठ.
यशोदा हो; सगळें खरें; पण करायचें कसें ! पोरीचें बाशिंगबळ असें कीं आजवर लग्नाचें नांव सुद्धां निघायची पंचाईत. आतां कुठें हातातोंडास गांठ पडते तोंच हीं कुसपटें कशला हवींत ? कुठून तरी पोरीला हळद लागली म्हणजे मिळविली असें झालें आहे.  थोरापोरीं बोलबोलून नकोसें केलें आहे मला.
मधुः पण, आई, लोकांसाठीं का लग्न करायचें आहे ? उगीच एखाचा उडाणट्प्पूला धरला आणि दिली पदाराला गांठ तर तिकडून पुन्हा लोक नांवें ठेवणारच.
अण्णाः आतांच्या लोकांना भारी समजायला लागलें. आम्ही यांच्या वयाचे होतों पिलंभट, पण वडिलांचे समोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती कधीं. कांहीं मागणें-सवरणें झालें तर तें सुद्धां चिठ्ठीनें, तोंडांतून म्हणून व्र निघायचा नांव कशाला पाहिजे !
पिलं: हल्लीं सुद्धां आम्हीं पाहात नाहीं का प्रत्यक्ष ! तात्यासाहेबांच्या तोंडीं लागतांना आपण अण्णासाहेबांना अजून तर कांहीं पाहिलें नाहीं. अगदीं सांभाच्या पिंडीवर हात मारून सांगावें कुणी यांतलें एक अक्षर खोटें असेल तर !
अण्णाः तात्यांची मजीं निराळी दिसली अंमळ कीं आमचें आपलें माधार घ्यायचें ठरलेलें; पण आमचे चिरंजीव पाहा.
मधुः अण्णा, तुम्हांला येतो राग, पण कांहीं वेळाच अशा असतात.
यशोदाः ऐक रे, मधु, भारी तोंड तुला, आपला साधारण कल पाहिला; सोडून दिली गोष्ट, सर घोडया पाणी खोल, उगीच तोंड करायचें कारण काय ?
मधुः आई, आतां तोंड न केलें तर उद्यां लोक तोंड काढूं देणार नाहींत कुठें. तुला सांगितलें ना नाटकमंडळींत काय चाललें होतें तें, अशा वेडयापिराच्या गळ्यांत पोर बांधली तर लोक काय म्हणतील ?
अण्णाः अरे, नाटकमंडळींत गेलें आलें एखादे वेळीं म्हणून काय होतें त्यानें ? पोरपण आहे, होतोच असा हूडपणा थोडा माणसाच्या हातून ! आम्ही लहान होतों तेव्हां किर्लोस्कारांचें नाटक नवीनच निघालें होतें; आम्ही खुशाल जात येत होतों. अण्णा मोठा योग्य पुरुष ! लाख मनुष्य ! शरीरानें असा सुद्दढ असें कीं हा एकेक दंड ! कधीं ताप नाहीं, खोकला नाहीं; कांहीं नाहीं.
पिलं: अण्णाची गोष्ट कशाला ! हजारों माणसांचा पोशिंदा तो ! अत्तराचे दिवे जाळलेत त्यानें ! भटाभिक्षुकाला मुठीनें पैसे द्यावे त्यानें. आल्यागेल्याला, गोब्राह्मणाला खेळ पहायची सदर परवानगी ! आतांचे नाटकवाले कसले भुकेबंगातल ! कुणाला फुकट सोडतील का नाटकाला ? नांव कशाला ? अण्णाची गोष्ट कशाला ?
अण्णा: त्यांचा आमचा मोठा घरोबा ! पण म्हणून माणसांतून का उठून गेलों होतों ? त्यांतलेंच बाळाभाऊचें काम ! आस्ते आस्ते संसाराचें ओझें पडूं लागलें कीं तितकें राहात नाहीं तें वारें. बरें, हा वसंतराव तरी काय असा लागून गेला आहे मोठा ? त्याचे तरी काय हात लगले आहेत आकाशाला ?
मधु: काय वाईट आहे वसंतराव? आपल्या दादासारखी त्याची सुद्धां वकिलीची परीक्षा झाली आहे !
य शो दा : मग यांनीं काय दिवे लावले एवढें शिकून, तर त्यानें लावायचे राहिले आहेत ? शिवाय आमच्या मुलीला मोहरकरांचें वळणच निराळें ! देव नाहीं, धर्म नाहीं; शिवण नाहीं टिपण नाहीं ! त्या मुलाचे गुण तर काहीं विचारूंच नका ! तुम्ही पाहिलेच असतील आपल्या मधूच्या लग्नांत, पिलंभट !
पिलं: हो, न पाहायला डोल्यावर भात का बांधला होता माझ्या ? बाई, शिकलेले लोक ना हे !
य शो दा: अहो, शिकलेले झाले म्हणून काय झालें ! आमचीं मुलें नाहींत का शिकलेलीं ? पण शिकण्याशिकण्याच्या परी आहेत ना ?
पिलं: आमच्या मुलांची गोष्ट कशाला पाहिजे ? मधु-माधवांच्या एवढाल्या परीक्षा झाल्या पण कधीं बुवा फयरीला पाय लावतील ? जीभ कापून देईन मी आपली हवी तर ! लौकिक केवढा, अगत्य काय माणसाचें ! केव्हांही पानतंबाखूला चार सहा आणे मागा; नाहीं म्हणून नाहींच निघायचें एकाच्या तोंडांतून ! तेंच याच्या जवळ कधीं मागितलें-मागतो कोण आधीं. आपण तर त्यानें एकदां नाहीं म्हटल्यापासूनच कानाला खडा लावला आहे ! पण एकदां म्हटलें संकल्य सांगतों, उद्क सोडा; म्हणे, आम्हांला संकल्य नको; म्हटलें तशीच दक्षणा द्या. धर्माला पाठ देऊं नये अशी ! म्हणे, धर्म आंधळ्यापांगळ्यांना करावा. तात्पर्य काय, अखेर दक्षणा दिली नाहीं, साफ नाहीं म्हटलें !
यशोदाः तें असो; पण मधूच्या लग्नांत वसंतराव करीत होता विडे आणि चुना होता थोडासा कोरडा. या मुलानें पाणी घेतलें हातीं तेव्हां म्हटलें मामाच्या भाच्यानें चुन्यांत पाणी घालूं नये; तर म्हणतो त्यानें काय व्हायचें आहे ? खुशाल त्यानें पाणी टाकलें चुन्यांत ! झालें, म्हटलें तर, शनवारीं आदरून दूध घ्यायचें, भरल्या घरांत दिवे लावतांना जोवायला बसायचें, असें नाहीं तें करायचें.
पिलं: तसेंच वरातीच्या वेळीं माझा देव खेळविला ना तुम्ही आणि देवानं मधुकरावरून उतरलेला नारळ, यानें घेतला तो हातीं, म्हटलें हा उतरलेला नारळ हाती घेऊं नये, द्या इकडे, मी करतो त्याची व्यवस्था. त्यानें तिथल्या तिथें फोडला नारळ आणि हंसत हंसत खाऊन टाकला.
यशोदा: छे ग बाई, मी नाहीं द्यायची माझ्या पोरीला असल्या मुलाला ! साराच मेला भ्रष्टाकार !!
अण्णा: आणी शरीरानें तरी काय आहे ? बरगडीन् बरगडी मोजून घ्यावी मुलाची ! मला वाटतें त्याला क्षयाची बाघा असावी !
पिलं: हो, हो, आहेच ना १ कालच मीं त्याला खोकतांना पाहिला. खोकला म्हणजे क्षयाचें मूळ आहे. येरव्ही यायचाच नाहीं. (अप्पासाहेब खोकतात.) नाहीं तर हें खणखणीत खोकणें पाहा. खोकण्याखोकण्याच्या तरी परी आहेत. त्या पोराचें शरीर काय आणि खोकणें काय ?
अण्णाः छे, हो, अगदींच पाप्याचें पितर. पोरीला काय डोळे झांकून विहिरींत का लोटावयाची आहे ?
मधु: (स्व.) बिचार्‍या वसंतरावाचे ग्रह कांहीं ठीक दिसत नाहींत ! (पाहून) झालें, हे तात्या आलेच ! यांचे कांहीं निराळेंच असेल आणखी.
[तात्यासाहेब व माधव पत्रिकांनीं भेंडोळीं घेऊन येतात.]
माधव: हं, घ्या पित्रिकांचीं बिंडाळीं सारीं. (खालीं टाकतो.)
तात्याः अरे, अरे, माधवू, पत्रिका ना त्या वेडया ! अशा टाकूं नयेत त्या !
पिलं: हो, जन्मजन्माचा संबंध त्यांत. एखाद्या पत्रिकेंतला एखादा ग्रह या घरांतला या घरांत लवंडला तर फटू म्हणतां ब्रहाहत्या व्यायची.
तात्या: वः पिलंभट, वसंतरावाची पत्रिका घेऊन मी तुमची वाट पाहात बसलों. म्हटलें आतां याल, मग याल अखेर कंटाळून मीच आलों माधवाबरोबर पत्रिका घेऊन इकडे.
पिलं: मी गेलों अण्णासाहेबांचीं औषधें आणायला ! त्यांचा जीर्णज्वर आज जरा बळावला आहे !
तात्याः आतां काय सांगावें या लोकांना ? अरे, औषधें घेऊन काय होणार कपाळ ? जीर्णज्वर नाहीं आणि विषमज्वर नाहीं; ही सारी ग्रहांची पीडा आहे ! यंदा आण्णाला मुळीं शनीची महादशा आहे !
पिलं: हो, हो, तरीच शरीर काळें ठिक्कर पडत चाललें आहे ! शनीखेरीज काळसरपणा नाहीं. जपजाप्य करायला हवें उद्यांपासून.
मधुः बरें, तात्या, त्या टिपणांचें काय झालें ?
तात्याः आज इतके दिवस घालविले तेव्हां अखेर दोन टिपणें वेणूच्या टिपणाशीं जमतातशीं आढळलीं. अगदीं झाडून जुन्यापान्या सार्‍या कुंडल्या पालथ्या घातल्या ! ही विक्रमाची; ही काशीकर गागाभट्टाची ! ही थोडीबहुत जमते. पण त्याला मरून झालीं अडीचशें वर्षें ! आतां ही हिंदुस्थान देशाची आणि ही बाळाभाऊची कुंडली. या दोन्ही मात्र जमतात.
पिलं: तेव्हां त्यांत बाळाभाऊच बरे. हो, हिंदुस्थान देशाशीं तर लग्न नाहीं लावतां येत.
मधु: पण ती वसंतरावाची नाहीं जमत कुंडली ?
तात्याः मुळींच नाहीं. ती तर अगदींच जमत नाहीं. फारच भयंकर योगायोग !
मधुः साधारण जमत असेल तर पाहा. अगदींच फार बारकाईनें
तात्या: छत् , वेडया नांव सुद्धां काढूं नकोस त्या मुलाचें ! त्याच्या लग्नीं राहू, केंद्रांत मंगळ, त्रिकांत शनि असे सारे ग्रह अनिष्ट पडले आहेत. काय सांगूं तुला, अरे, त्याच्या गळ्यांत लग्नाची माळ पडल्याबरोबर त्याला मृत्यु येणार. अगदीं मृत्यु ठेवलेला.
पिलं: मी म्हणतों निदान अपमृत्यु, अपमृत्युला तर मरण नाहीं ना ?
अण्णा: आणि हीं पाप्याचीं पितरें अपमृत्यूनें सुद्धां मरायचीं !
पिलं: तर काय ? यांना मरायला मृत्यूच कशाला हवा ! खरें कीं नाहीं माधवराव ?
माधवरावः कशाचा मृत्यु आणि कशाचा जन्म. हे सारे या स्थूल देहाचे विकार आहेत. अंतवंतं इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण:॥ आत्म्याला या उपाधि मुळींच नाहींत. आत्मा अविनाशी, अविकारी अनंत असा आहे. त्याला नाश नाहीं. नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयपि मारुत:॥ पंचवीस तत्त्वांचा मेळ म्हणजे देह. मात्र, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ॥ तशांतला आत्मसंक्रमणाचा प्रकार. मायाभ्रमानें मूढ जीव त्याला मरण म्हणतात. वाकी खरें पाहतां, आत्मा अमर आहे. ‘नायं इंति न हन्यते !’
यशोदा: माधव हें रे काय बडबडणें ? एकुलत्या एक बहिणीच्या लग्नाचें घाटतें आहे आणि
माधव: बहीण, भाऊ, आई, बाप सर्व भ्रम आहे हा. का तव कांता कस्ते पुत्र: संसारोयमतीव विचित्र: । कस्य त्वं त्वा कुत आयात: । मी कोण याचा विचार केला पाहिजे ! संसार मृगजलवत् आहे. गेल्या जन्मींचीं बहीणभावंडें कुठें गेलीं; पुढल्या जन्मींचीं आतां कुठें आहेत; हा सारा मोय्वा खेळ आहे. ‘ अहं ब्रह्मास्मि’ मी ब्रह्म, तूं ब्रह्म, तात्या ब्रह्म, आण्णा ब्रह्म
पिलं: मीही ब्रह्म आहें; पत्रिका ब्रह्म आहेत; पैसा ब्रह्म आहे.
माधव: एकं सद्‌विप्रा तद्वहुधा वदन्ति ! तें शोधून काढलें पाहिजे ! ब्रह्म हविर्ब्रंह्म भोक्ता ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् !
मधुः दादा, जरा थांब, मुख्य कामाचा ब्रह्मघोटाळा होतो आहे सारा. तात्या, पत्रिकेवर इतका भरंवसा ठेवून कसें चालेल ? वेळ थोडी चुकली तर लागलीच जमीनअस्मानाचें अंतर पडतें भविष्यांत.
पिलं : हो, सरासरी आणि शतमान.
मधु: म्हणून म्हणतों कीं पत्रिकेकडे थोडें दुर्लक्ष केलें तर नाहीं का चालणार ? मुलगा चांगला आहे.
तात्याः भलतेंच कांहीं तरी. मुलगा चांगला आहे; पण लाभला पाहिजे ना ? विषाची परांक्षा पहायची कीं काय ? खुळा नाहीं तर. आजन्म मुका राहीन माझें बोलणें खोटें झालें तर !
पिलं: भलतेंच ! होप्यमाण कुठें चुकतें काय ?
यशोदा: शिवाय परतवेल होईल तें निराळेंच.
मधुः मग काय हा नाद सोडून द्यायचा ? दैव पौरीचें; दुसरें काय ?
अण्णाः चला: मधु, जा आणि बाळाभाऊला आतांच घेऊन ये.
मधुः जातो. काय करायचें ? मर्जी प्रभूची !
माधव: मधु, वेडया, असा हताश काय होतोस ? काय करायचें तें केलें पाहिजे ! परिणाम कांहीं हा होईना ?
कर्मण्येबाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ॥
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
[पडदा पडतो.]

N/A

References : N/A
Last Updated : December 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP