भाग २ - लीळा २५१ ते २६०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २५१ : लखुदेवोबा भेटि
लखुदेवोबा गोदाना कटकासि गेले होते : तेथौनि करंजाळेयासि आले : सामकोसां भेटले : पाय धुतें असति : तेधवां लखुदेवोबायें सामकोसातें पुसीलें : ‘हा आइ : सापें आबैचा नागदेवो केउता देखो ना’ : ‘ना तो गोसावीयाचां ठाइं असे’ : ‘गोसावी कोण’ : ‘ना : श्रीचांगदेवो राउळ : हीवरळीये असति’ : गोसावीयांची गोष्टि सांघीतली : आणि स्तिति जाली : पाहारा रात्रीं नीगाले : पाहानपटेंचि आले : हीवरळीये दारवठेयापासि उभे असति : तवं भटोबास बाहीरे निगाले : तवं दारवठां भेटले : क्षेम जालें : ‘जें काइ लुखभदेया : तुं केधवां आलासि’ : ‘ना : मीं आतांचि आला’ : भटोबासीं पूसीलें : ‘कांहीं गोसावीयांसि दर्शन करावेंया आणिलें असे’ : ‘ना : नाहीं’ : मग ते हातवटीए पाने पोफळें आणूं धाडिले : ते पानें पोफळें : माळ : घेउनि आले : गोसावीयांसि पटिसाळे वोटेयावरि आसन : लुखदेवोबां बीजें केलें : गोसावीयांतें देखिलें : आणि स्तींति अधीक सूभरली : हातां कंपु आला : पानें पोफळें माळ : पुढां दरिसनां केलीं : तें वीखूरलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘वानरेया : घेया गा’ : भटोबासिं गोसावीयां पुढें सरिसीं ठेवीलीं : लखूदेवोबा गोसावीयां जवळे बैसले : नावेक होते : मग कंपू गेला : मग गोसावी पूसीलें : ‘हें तुह्मांसि दृष्ट आति’ : ‘ना जी’ : ‘तरि काइ : श्रुत आति : श्रवण’ : ‘हो जी’ : या उपरि लुखदेवोबायें मागील आवघें सांघीतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसीं एकें सुक्षेत्रें आति : एकदोनि वाहीया घालीजति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसीं एकें सुक्षेत्रें आति : एकदोनि वाहीया घालीजति : भुइं बियां मेलापकू कीजें : आणि भारू आतौनि पीकति : (एकी वासना) घुमरीसीं उठीति : एकें बरडे नांगरवेर्‍हीं धाटे वाफे : की तेथ बीहीं न निगे : तैसे एक अधिकार्ये आइते असति’ : या उपरि गोसावी रामीची गोष्टि सांघीतली : ‘हे पूर्वीं रामीं होतें’ : ब्राह्मणाची स्तीति सांधीतली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसें एथीचेया नामापासौनि होए : कीं स्थानापासौनि’ :

लीळा २५२ : तथा नामकरण
एकुदीसीं गोसावीयांचे क्षेउर जालें : मग गोसावी मढा भीतरि गेले : तवं लुखदेवोबायें ‘डोहरवनि पीयालों’ ह्मणौनि डोइ तिमूनि क्षेउर करवीलें : भीतरि गोसावीयांपासि आले : गोसावीयांसि भीतरिला वोटेयावरि आसन : तेयांतें देखीलें : मग ह्मणीतलें : ‘हां हो : महात्मे जालेति : मां : खेउर करवीलें : सांघा सांघा : क्षेउर कां करवीलें : क्षेउर कां’ : ऐसें वेळां दोनि च्यारी ह्मणीतलें : ‘जी जी : कटकीं डोहरवनीयें पीयालों : वीटाळु जाला जी : आणिकीं तीर्थी करावें तें गोसावीयांचा ठाइं केलेया पुण्य होईल’ : सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘तीर्थी क्षेउर केलेयां पुण्य होए’ : ‘जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ ऐसेयां माहात्मेयां नांव काइ ठेवावें : क्षेउर केलेयां माहात्मे जाले : तरि तुम्हीं पुण्य माहात्मे ह्मणा’ : ॥

लीळा २५३ : तथा वस्त्रपुजा उपाहारू स्विकारू
एकुदीसीं लखुदेबायें भटोबासातें पूसीलें : ‘गोसावीयांकारणे वस्त्र घेवों’ : भटीं ह्मणीतलें : ‘तुतें काइ असे’ : ‘ना : मीं कटका गेलां होतां : तेथ मज तिन आसू आणि च्यारि दाम आले : दोनि वेचले : तिन आसू : दोनि दाम असति’ : ‘हो कां : तरि गोसावीयांलागि बरवें वस्त्र घे : आणि गोसावीयांचि पूरता बरवा उपाहार करि’ : तेहीं मानिलें : गोसावीयांसि पुर्वीळे सोंडेयेवरि आसन : तेहीं गोसावीयां पुढें सांघीतलें : ‘जी जी : मीयां नागदेयातें पूसीलें : तव नागदेवों ऐसें ह्मणें’ : ह्मणौनि अवघें सांघीतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आप्ताचें वाक्य लागे’ : मग गोसावीयांलागि बरवें वस्त्र घेतलें : (शोधु) वीसा दामाचें : गोसावीयां पूरता उपाहारू निफजवीला : मग गोसावीयांसि पुजा केली : वस्त्र वोळगवीलें : (शोधु) वीळिचा उपाहारि : मग गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : ॥

लीळा २५४ : यल्हाइ मठा वाहाणें
एकुदीसीं महादाइसें गोसावीयांचेया दरिसनासि नीगालीं : येल्हाइसीं ह्मणीतलें : ‘आइ राहे हो : मा : मीं गोसावीयांचेया दरिसनासि येइन’ : महदाइसें राहीलीं : तें परिवंटें साउला नेसतें होतीं : महादाइसीं पुसीलें : ‘येल्हो तुं ऐसी कल्हणाकारणें वेठत अससि’ : ‘ना : मीं श्रीचांगदेव राउळां गोसावीयां लागि वेठत असें’ : महादाइसें तोखलीं : सूख जालें : उचलीलीं : आळंगीलीं : मग गोसावीयांचेया दरिसनासि आलीं : गोसावी मढावरि भक्तजनांसहित बीजें करिती : पाठीला कडौनि महादाइसें वेंधलीं : येल्हाइसे भवतीं भवति : ‘जी जी : मीं वरि येइन’ : गोसावी पूर्वीले सेवटीहुनि पसिम कोनटावेऱ्हीं बीजें केलें : एल्हाइसें हा शब्द ह्मणतें चालुनि कोनटावेऱ्ही गेलीं : तेथ गोसावी फुटेयाचा पालौ घातला : पदराचीया दशीया कांहीं आंगुळीयें लागलीया : कांहीं न लगतिचि : आणि गोसावी फुटा वरता ओढीला : तैसींचि वरि आली : ॥ आणि तेयां आश्र्चर्य जालें : ‘हें काइ जी : कांहीं धरिलें : कांहीं न धरे : आणि वरि आलियें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : आर्ति करूनि’ : ॥

लीळा २५५ : इको उपद्रवकथन
एकुदीसीं गोसावी आसनीं उपविष्ट असति : गोसावीयांचीय श्रीकंठी उडसली होती : गोसावी श्रीकरीं घेउनि ऐसी दाखविली : मग ह्मणीतलें : ‘एथ सकेशीयांचा उपद्रो देखीला गा : कें बिढार घेतलें असे’ : भटीं ह्मणीतलें : ‘जी जी’ : गोसावीयांचा हेतु भटोबासा नुमटेचि : गोसावी ते वस्त्रीं घालुनि सांडवीली : ॥

लीळा २५६ : महदाइसां परिसू दृष्टांतकथन
वायेनायक कुटुंबीचे महादाइसासि भकति : ‘रूपै वाया गेली’ : मग गोसावीयां पूढां सांधीतलें : ‘जी जी : कुटुंबीचे वांयनायक ऐसें ह्मणति : जें रूपै वायां गेलीं’ : मग गोसावी परिसाचा दृष्टांत निरोपिला : ॥

लीळा २५७ : तथा देहांतर
एकुदीसीं महदाइसीं पुसीलें : ‘हा देहीया जाए : मग काइ होए’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘प्रतदेह होए : प्रतदेहापासौनि निवतें : मग अतीवाहीकीं घालुनि आणिका फळा नेइजे’ : ॥

लीळा २५८ : तथा श्राध प्रश्नू
एकूदीसीं महादाइसीं पूसीलें : ‘हां जी : श्राध केलेयां पीतरां पावे : तथा पीतर देवतें पावे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘दाहा दीसां कीजे’ : ॥

लीळा २५९ : आबैसीं समुद्रप्रांतीं वोळखणें : ॥ भटां क्षेउर
एकुदीसीं गोसावीयांसि क्षेउर जालें : वारिकासि पाठवणी दीधली : भट पाठीमोरे बैसले असति : गोसावी तेयांपासि बीजें केलें : आंगीचीया बाहीया वरतीया केलीया : मानेवरि श्रीचरण ठेवीला : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बोलावा गां वारिकू : क्षेउर करा : आतां तुझा कोणु राखैल’ : मग भटोबासांसि उमटलें : जें : गोसावी मजकरवि क्षेउर करवीत असति : मग दीसां दो चौ ह्मणीतलें ‘जी जी : मीं क्षेउर करिन’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आतां तुमचें परमेश्र्वरपुरा जाणें होत असे : तेथ करा जा’ : ॥

लीळा २६० : काचराळां तीकवनायका
एकुदीसीं तीकवनायेकें आवंतीलें : तथा वीनवीलें : गोसावी वीनंती स्विकारिली : मग उदयाचा पुजावस्वर जालेयानंतरें गोसावी काचराळेया वीहरणा बीजें केलें : तिकवनायक उपाहारू घेउनि मढासि आले : सरिसा पुत्र होता : भक्तजनांतें पुसीलें : ‘गोसावी कव्हणीकडे बीजें केलें’ : तेहीं ह्मणीतलें : ‘काचराळेया बीजें केलें’ : तें अनुसारिखे जाले : आणि तिकवनायेकें ह्मणीतलें : ‘’महात्मेयांतें काइ लटीकें बोलीजे’ : तैसेंचि उपाहारेंसीं काचराळेया आले : गोसावीयांसि तपोवनाचां चौकीं आसन : गोसावीयांतें देखिलें : आणि ह्मणीतलें : ‘महात्मेयातें तें काइ लटीकेंचि बोलीजे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नायेको श्रमलेति’ : जी जी : अवघा श्रमु गेला जी : थोर श्रमला होतां जी : अवघाचि श्रमु गेला’ : गोसावी तेयाचीए डोइची पाटी उतरवीली : मग गोसावीयांसि पूजावसर : गोसावीयांचीये पांती भक्तजनासहीत जेवणें जालीं : गोसावीयां गुळळा : वीडा : पहुड : उपहुड : मग वीळीचां वेळीं तिकवनायक गावांसी निगाले : (शाधु) ‘जी जी : तुम्ही याल’ : हें पाहें एइल’ : मग गोसावीयांसि तेथ वसति जाली : उदीया बीजें केलें :॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP