वनपर्व - यक्षप्रश्न

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


सरला वनवास, मग द्वैतवनी पांडुनंदन वसति, तैं ।
दिवसांत वांकुल्या शत दावित होतेंचि नदनवसतितें ॥१॥
विप्राशि आधि तेथें बहु दे जो हरिण हरुनि अरणीतें, ।
तन्मारणी करिति ते, कौशल केलें कधीहि न रणी तें ॥२॥
शृंगाग्रविलग्नारणि तो मृग गेलाचि, लागले होते ।
त्यामागें, जे फारचि पांचहि नरसिंह भागले, हो ! ते ॥३॥
भेटे वनी अकस्मात् तापापह साधुसाचि एक वट, ।
तच्छीतच्छायेतें सेविति ते तृषित वीर एकवट ॥४॥
धर्मचि धैर्ये साहे सोसील व्यसन काय दुसरा तें ? ।
नकुळ तदाज्ञा घेउनि आणाया तोय जाय सुसरातें ॥५॥
उष्णें झाला होता तप्त तृषित जेंवि धेनुसुत डागें, ।
धांवे, तरंगैहस्तें जाणॊं पाचारिलाचि सुतडागें ॥६॥
तों यक्ष ह्नणे, ' बापा ! आधी सेवूं नकोचि तोयातें, ।
मत्प्रश्नोत्तरदाता प्याया न्यायाहि योग्य तो यातें ' ॥७॥
करुनि अनादर पीतां पडला तो धैर्यमेरु ही नकुळ, ।
किमपि न वदे, न पाहे, पतित श्रीमंत जेंवि हीनकुळ ॥८॥
मग सहदेव धनंजय भीमहि पडले तसेचि जळपानें; ।
गमले वधिले ते त्या स्वह्नदतटीं कालियाख्यखळपानें ॥९॥
धर्म ह्नणे, ' हा ! दैवा ! न कळे झाला अनर्थ काय कसा ?
मज बंधु एक तरि जळ द्याया यावाचि शीघ्र सायकसा ॥१०॥
हा ! रे ! कितवा ! धर्मा ! स्वकृतें निजजीवितासि आंचव घे,
धिक् धिक् ह्नणोनि, विटते द्यूत न करितास बंधु कां चववे ? ' ॥११॥
ऐसें ह्नणोनि जाउनि धर्मे ते बंधु पाहिले शर्वंसे;
साधूंत अहंताशी ज्यांमध्यें चेतना न लेश वसे ॥१२॥
' हा ! भीम ! हा ! धनंजय ! न स्वर्गी सुख पहाल, हा ! नकुळा !
हा ! सहदेवा ! दोष त्यजितां मज काय हा लहान कुळा ? ॥१३॥
गेलासि केंवि भीमा ! त्यागुनियां मज गुरुप्रति ज्ञात्या ! ।
त्यजिल्या सुयोधनोरुध्वसांदि कशा गुरु प्रतिज्ञा त्या ? ॥१४॥
वत्सा ! न भंगलासि प्रेमुशीहि करुनि तशाहि विर्षम रणा;
कालविलें काय जळी त्या दुष्टांही वशाहिविषै मरणा ? ॥१५॥
विष कालविलें असतें, तरि सलिली करपती न कां नेलिनें !
अलिनें त्यजिली असती,  होती तुमचीहि आननें मलिनें ॥१६॥
गेलां स्वर्गासि, वरें, जा, परि कवणासि हा निरविला, हो !
अत्यद्भुत हें ह्नणतिल ' न कधींही पद्महानि रविला हो ' ॥१७॥
यामागें न, व्यसनी आजि बुडालों, जळी महोपळेसा, ।
रे मुग्ध जीवशुक्र ! जा सोडुनियां, लुब्ध या न हो पळसा ॥१८॥
मेले कसे अकस्मात् ? तेज असे, ह्नणुनि होय न व्याधी,
तर्क न चाले बहुधा, माझी तृष्णाकुलाचि भव्या घी ॥१९॥
प्रियबंधुमरणकारण शोधूं, जलपान करुनि, तर्कशतें, ।
जें क्षुत्तृटप्रतिबंधा न गणी, मुनिचेंचि हदय कर्कश तें ॥२०॥
चिंतुनि ऐसें प्याया गेला जों साधु दक्ष तोयातें ।
विनिवारी तोंचि सरस्तटगत बकरुप यक्ष तो यातें ॥२१॥
' रे कौतेया ! केले अनुज तुझे प्रेतरुप म्यां चवघे,
तूं वीर वांच, हठें जळ सेवुनि मरतां उगेचि कां अवघे ? ॥२२॥
मत्प्रश्नाचें उत्तर दे, जल सेवूं नकोचि थांब कसा. ' ।
धर्म ह्नणे, ' ऐसा तूं कोण प्रभु, जाहलासि कां बकसा ? ॥२३॥
' मी यक्ष ' असें सांगे दावी प्रकटुनि शरीर पर्वतसें. ।
पूर्वी कधीहि झालें प्राप्त न आश्चर्यभीतिपर्व तसें ॥२४॥
धर्म ह्नणे, ' अग्निपुढें पांडित्य करील काय कापूस ? ।
कळल्या उत्तर देईन, पुसणें तें यक्षनायका ! पूस ' ॥२५॥
यक्षातेंचि न निववी नृपदत्त प्रश्नशर्तसमुत्तर तें ।
सुश्रोतृवृंद ज्याच्या श्रवणें होऊनि बहु समुत् तरतें ॥२६॥
यक्ष ह्नणे, ' कौतेया ! या पांडित्यें गुरुहि तुज लाजो, ।
झालों प्रसन्न चवघांमाजि उठो एक इष्ट तुजला जो. ' ॥२७॥
धर्म ह्नणे, ' नकुळ उठो, ' यक्ष ह्नणे, ' मान्य जे शतक्रतुला,
भीम नको, विजय नको, आवडलें त्यजुनि अमृत तक्र तुला ? ' ॥२८॥
धर्म ह्नणे, ' बा ! यक्षा ! मज तों माद्री पृथा समा, नावें ।
दोघीचीहि असावी, म्यां अधिक उणें कधी न मानावें. ॥२९॥
उरलों मी कुंतीचा, माद्रीचा ज्येष्ठ पुत्र उरवा हो ! ।
स्वर्गी न अश्रुधारा त्या मातेचें कदापि उर वाहो. ' ॥३०॥
यक्ष ह्नणे, ' बा ! साधो ! तूंचि परम धन्य भरतसंतानी ' ।
तुझिया यशी निवाया नित्य असावेंचि भरत संतांनी ॥३१॥
पाहसि समभावें अनुजांसि, सुतांसहि असें न बा पाहे, ।
सुप्तोत्थितसे भ्राते चवघहि तुझे उठोत, बापा ! हे ' ॥३२॥
त्या यक्षवरें उठलें सुखसुप्त तसे पळांत चवघे ते, !
फार निवाले पांचहि, अमृताची जेंवि देव चव घेते ॥३३॥
भूप ह्नणे, ' यक्ष न तू, कोण प्रभु ? अद्भुतप्रर्भावांचे ।
लीलेनें असु हरिले, न तुजपुढें आमुची प्रभा वांचे ' ॥३४॥
पुसतां ऐसे प्रेमें सांगे तो त्या नृपास, ' मज तात ।
धर्म, असें जाण सुता ! केवि ज्याची सम कृपा समजतात ॥३५॥

उपसंहार

एवं भक्तमयूरें श्रीमद्रामप्रसादघनपर्वी ।
केलें तांडव तोषे श्रीमद्भारततृतीयवनपर्वी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP