अंक चवथा - प्रवेश पहिला

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


[ स्थळ : वाराणशीचा रस्ता- एका मोठया मठावरून जाणारा. पडद्यांत कोलाहल-“ चलो हटो यहांसे, ” “ हटो हटो.” “ निकालो उसको,” “ निकम्मा ” “ जगन्नाथका कुत्ता ” इत्यादि. मग विकट हास्य. नंतर काशीप्रसाद झोकांडया खात प्रवेश करतो. ]

काशीप्रसाद : ( तोल सांबरून रोषानें पाहात-- ) धिक्कार असो तुमचा कर्मचांडाळांनो ! या मठांत मला देखील मज्जाव करतां ? नादान नरराक्षस ! औरंगजेबी राजवटींत प्याद्याचे फर्जी झालेले बदमाष !

[ मठाचा अधिपति बनलेला बन्सीराम प्रवेश करतो. ]

वन्सीराम : क्यों नाहक बकबास करते हो काशीप्रसाद ? कां आमच्या शिष्यांना उगाच शिव्या देतां ? तुम्हांला हजारदां बजावलं होतं, कीं त्या भिकारडया जगन्नाथाची तरफदारी करायला इथं याल, तर धक्के खाल. अग्नीवर आपणहून पाय द्यायचा, अन तो भाजला कीं शंख करायचा ! कशाला पाय ठेवलांत इथं ? माझ्या शिष्यांची डोकीं फिरवायल ? त्यांना फित‌वायला ? आमच्या त्या दयानंदाला तुम्हीं फितवलं, तें पुरें नाहीं का झालं ? याद राखा, पुन: इथं पाऊल टाकाल तर !

काशीप्रसाद : हा सार्वजनिक मठ आहे; तुमचं अंतःपुर नव्हे. एकदां सोडून हजारदां इथं येऊन तुमच्या पापकर्मांचा पाढा वाचीन. जगन्नाथांना देखील ‘ तुमचं रूढीभंजन मला पसंत नाहीं ’ असं त्यांच्या वैभवकाळांत सांगणारा हा काशीप्रसाद. तुमचीं पातकं चव्हाटयावर मांडायला कचरेल काय ? तुम्हां संधिसाधू पोटभरूंच्या धमकीला घाबरून, या मठांत येणं मी सोडीन, असं वाटतं होय ? किती काळ तुमचं पापकर्म.

वन्सीराम : कसलं पापकर्म ? आम्हीं काय मुसलमागन शाहजादीशीं लग्न करून धर्म बाटवला आहे जगन्नाथासारखा ?

 [ बन्सीरामचा मित्र नि साथीदार हरीराम प्रवेश करतो. ]

हरीराम : ( संत्तापानें ) क्या पाप किया है हमने ? मघापासून ऐकतों आहें तुमची बाष्कळ बडबड. त्या बाटग्या जगन्नाथाला आम्हीं वाळींत टाकलं, हें काय पापकर्म झालं ?

काशीप्रसाद : त्याला पापकर्म नाहीं, तर कर्मठपणा म्हणूं या हवं तर ! पण तुम्हीं सार्‍या माणुसकीला वाळींत टाकलं, हें मात्र निखालस पाप आहे. जगन्नाथरायांचा चिमुकला पोरगा गंगेच्या घाटावर तापानं फणफणत असतां, तुम्हीं त्याला औषध मिळूं दिलं नाहीं, ही क्रूरपणाची हद्द झाली; माणुसकीचा मुडदा पडला ! अरे, जगन्नाथानं वर्णाश्रम-धर्म मोडला असेल फार तर; पण तुम्हीं खुनशी अधमांनीं माणुसकीचा धर्म मातीस मिळविला आहे; पातकांचा डोंगर उभारला आहे !

बन्सीराम : उसमें काहेका पाप है, फतरेका ? तें सापाचं पिल्लू मेलं तर ठीकच झालं !

हरीराम : बिलकुल बराबर ! नाहींतरी धर्मभ्रष्ट जगन्नाथाची ती औलाद धर्मभ्रष्टच निघाली असती !

काशीप्रसाद : जगन्नाथ धर्मभ्रष्ट ? अबे जल्लाद, ज्यानं शाहजहान बादशहाला “ धर्म सोडणारा नाहीं ” असं तोंडावर सांगितलं , तो धर्मभ्रष्ट ? आणि औरंगजेबी सुभेदाराच्या चिथावणीनं घरच्या म्हातारीचे काळ बनलेले इथले मत्सरी ब्राह्मण धर्मनिष्ठ अं ? मुसलमान शाहजादीशीं राजरोस लग्न केलेला महापंडित धर्मद्रोही, पण मुसलमान नायकिणींच्या माडया चुपचाप चढणारे बुद्दू पंडत धर्माचे अवतार काय ?

हरीराम : मूं संभलके बात करना काशीप्रसाद ! आतांपर्यंत तुमच्या वडीलकीचा मान आम्हीं राखला; पण यापुढें असेच बेछूट आरोप इथल्या ब्रह्मवृंदावर करणार असाल, तर या मठांतच काय, पण विश्वेश्वराच्या मंदिरांतहि तुम्हांस मज्जाव होईल !

काशीप्रसाद : खुशाल होऊं द्या ! ज्या मंदिराच्या आवारांत जगन्नाथांसारख्या ‘ गंगालहरी’च्या थोर कर्त्याला सुद्धां मनाई आहे, त्या मंदिरांत भगवान विश्वेश्वरालादेखील राहाणं आवडणार नाहीं. म्हणून म्हणतों. खुशाल मज्जाव करा मला. वाटलं तर वाळींतहि टाका. तुमच्या निलाजर्‍या मग्रूरीला निर्दय नियती कुठवर साथ देते, हें पाहूंच द्या आम्हांला. अरेरे, हें वारणशी शहर म्हणजे निव्वळ उकिरडा बनला आहे. आणि जगन्नाथ पंडित म्हणजे त्या उकिरडयावर निष्ठुर नियतीनं फेकून दिलेलं तेजस्वी रत्न !

हरीराम : ‘ रत्न ’ ? ( हांसतो ) हां, आहे आहे ! रत्न आहे खरं, पण वेगळ्या अर्थानं, जें दिल्लील करून करून भागलं आणि मग कुठें काशीला आलं ! पण या रत्नाचा रंगेलपणा, या उतारवयांतहि कमी झालेला नाहीं !

बन्सीराम : अहो, फटफटीत उजाडालं, तरी गंगेंच्या वाळवंटांत तुमचं हें रत्न.

हरीराम : अर्थात्‌ तेजस्वी !

बन्सीराम : हो हो, हें महान‌ तेजस्वी रत्न आपल्या हिरकणीबरोबर. हँ हँ हँ. एकाच पांघरूणांत. हँ हँ हँ-- सगळ्या वाराणशी शहरांत डंका वाजतोय या गोष्टीचा !

काशीप्रसाद : अबे मालूस है, मालूम है. त्या विद्वान‌ पंडिताची नुसती वस्त्रप्रावरणंच नव्हे, तर सारी धनदौलत तुम्हीं लिलावांत काढल्यावर, त्याला घरादारांतून हुसकावून लावल्यावर, त्या दोघांनीं एकाच पांघरुणांत कुडकुडत सारी रात्र काढली, तर त्याला निर्लज्जासारखं हिणवण्याचं काय कारण ?

हरीराम : पण काशीप्रसाद, त्या चांडाळ जगन्नाथाची ही आगांतुक वकिली केवळ तुम्हींच शिरा ताणताणून करीत आहांत; पण तो मिजासखोर तर कोणाशीं कांहीं बोलायला तयार नाहीं.

काशीप्रसाद : अरे, कोणाशीं कांहीं बोलायला तो पंडित या जगांत आहे कुठें ?

बन्सीराम : म्हणजे ? पुत्र--मरणाच्या दुःखानं तो हाय खाऊन मेला बिला कीं काय ?

काशीप्रसाद : बेवकूफ, या मलिन दुनियेच्या शेणांत स्वार्थाचे वाडे बांधणारे तुम्ही मेलेले आहांत, जीवन्मृत आहांत; तो महापुरुष तर अमृताशीं पैजा जिंकणार्‍या ‘ गंगालहरीं ’ त डुंबत आहे; ब्रह्मज्ञानाच्या अमृतपानानं त्याचा आत्मा धुंद झाला आहे !

बन्सीराम : वा : ! आत्मानंदांत मश्गुल झालेला महंत आहे का तो ? वा: ! वा: !

हरीराम : मग तुमच्या त्या महंतानं “ आधीं यवनीशीं काडीमोड घेऊन, मग वाटलं तर रक्षा म्हणून तिला जवळ बाळग आणि प्रायश्चित्त घेऊन शुद्ध हो ” हा आमच्या धर्मसभेचा निर्णय मानलाच पाहिजे.

बन्सीराम : अलबत‌ ! मोठा महंत झाला, तरी त्याला लोक--व्यवहार हा पाळलाच पाहिजे; कारण, महंतच लोक--व्यवहार मोडूं लागले, तर अधर्म माजेल !

काशीप्रसाद : असं मुळींच नाहीं, ‘ मन: पूतं समाचरेत‌ ’ म्हणजे आपल्या शुद्ध मनाला जें पवित्र वाटेल तेंच आचरायचं, अन‌ हा मनाचा कायदा पाळल्यानं जनांचा केवढाहि रोष झाला तरी डगमगायचं नाहीं, असा त्या महापुरुषाचा निर्धार आहे. मनाचा कायदा तर पाळायचा, पण जनांचा रोष झाला. कीं प्रायाश्चित्ताचं गोमूत्र पिऊन, समाजाच्या कृपेचे पिंडहि लचारीनं पोटांत भरायचे हा मिथ्याचार आहे, अधम आचार आहे, असं त्या तत्त्वनिष्ठ तेजस्वी पंडिताल वाटतं, म्हणूनच तो प्रायश्चित्तास तयार नाहीं.

हरीराम : काशीप्रसाद, तुमच्या या धूर्त वकिलीनं आमचे दयानंदासारखे मूर्ख शिष्य फसले, पण आम्ही फसणर नाहीं. मनःपूतं समाचरेत‌ हें भलतं तत्वज्ञान, म्हणजे दुराचरणाच्या लोखंडाला दिलेला सोनेरी मुलामा जाहे, असा रोखठोक आरोप आहे माझा !

काशीप्रसाद : आरोपच करायचा म्हटलं, तर मीहि म्हणूं शकतों, कीं जगन्नाथ पंडिताच्या घरादारावरून नांगर फिरविणार्‍या तुम्हीं नंग्यांनीं, तुमच्या कुटिल कारवायांना धर्मनिष्ठेचा सोनेरी मुलामा दिला आहे ! जगन्नाथांना पुन: प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त झालं. तर तुम्हांला समाजांत कुत्रंहि विचारणार नाहीं, तो स्पष्टक्कता महापंडित तुमचं पितळ उघडं पाडील. या भीतीनंच तुम्ही जगन्नाथांना जीवनांतून उठविण्याचा घाट घाटला आहे !

बन्सीराम : असे खोटे आरोप तुम्ही खुशाल करूं शकाल; पण.

काशीप्रसाद : खोटे नाहीं, खरे आरोप; साधार आरोप !

हरीराम : पण हे आरोप करायला तुम्ही आणि तो चांडाळ जगन्नाथ शिल्लक राहिलांत तर ! तुम‌ क्या समझे हो काशीप्रसाद  ?. जनाब ! जरा अदबसे बात करो ! राजा प्राणनारायण याचं पंचवीस हजाराचं वर्षासन असलेला हा मठ म्हणजे एक मजबूत किल्लाच आहे. अन‌ आम्ही मठपति आहोंत त्याचे किल्लेदार ! आमच्याशी टरेंबाजी कराल, तर इथंच नाहक मराल ! समझे ?

काशीप्रसाद :  अरे जारे औरंगजेबी सुभेदाराच्या कुत्र्या !

जितने तारे गगनमें
उतनें बैरी होय.
एक कृपा भगवानकी,
बाल न बांका होय !

[ इतक्यांत काशीप्रसादाचा एक शिष्य जगन्नाथरायांचा भक्त ‘ दयानंद ’ प्रवेश करतो. ]

दयानंद : सत्य है ! भगवंताच्या कृपेनं जगन्नाथपंडितांचे हाल संपलेच म्हणून समजा, आपला वेत सिद्धीस जाणार आचार्य !

काशीप्रसाद : म्हणजे ? माझ्या लक्षांत नाहीं आलं दयानंद . क्या हुवा ?

दयानंद : आचार्य मैं यहाँ मथुरासेहि आ रहा हूं ! वहाँ शतचंडी यज्ञके समारोह में कामरूपके राजा प्राणनारायणसे मेरी मुलाखत हुई !

बन्सीराम : ( चपापून ) कामरूप के राजा प्राणनारायण ? पंचवीस हजारांचं वर्षासन आपल्या मठाला देणारे ?

दयानंद : हां, आणि या मठाचा गोठा झाला आहे. मद्यप्यांचा पिठा झाला आहे, याची हकीकत माहीत असणारे !

काशीप्रसाद : तें जाऊं दे रे, काय बोलणं झालं त्या दिलदार राजाशीं ?

दयानंद : खूप बोलणं झालं, या मठाच्या महंतांनीं जगन्नाथरायांचा जो छळ चालवला आहे, त्याची सारी माहिती सांगितली मीं महाराजांना,

बन्सीराम : यह तूने क्या किया दयानंद ? अरे , हीं आपलीं गांवांतलीं क्षुल्लक भांडणं महाराजांना का सांगायचीं असतात ? आज ना उद्यां मिटलींच असतीं ?

दयानंद : हां जरूर. लेकिन‌ जगन्नाथराय मिट्टीमें मिलनेके बाद !

काशीप्रसाद : वो जाने दो दयानंद ! उधर ख्याल मत देना. जगन्नाथपंडितांचं दैन्य ऐकून महाराज काय म्हणाले, तें सांग आधी.

दयानंद : ते म्हणाले, ‘ जगन्नाथ पंडितांना ताबडतोब आमच्या दरबारांत पाठवून द्या !’ हा त्यांचा लखोटा अन‌ ही प्रवासखर्चासाठीं पांचशें मोहरांची थैली ! ( लखोटा व थैली पुढें करतो. )

काशीप्रसाद : धन्य धन्य राजा प्राणनारायणांची ! मोंगल दरबारांतहि त्यांना अद्यापि एवढा मान आहे, तो उगाच नाहीं. गुणीजनांची कदर करणारा हा कामरूपाचा राजा खरोखरच धन्य पुरुष आहे !

बन्सीराम : वा: ! वा: ! सचमुच धन्य है !--दयानंदजी, अजी काशीप्रसादजी महाराज, आम्हीं इकडे जगन्नाथपंडितांना वरपांगी विरोध केला, पण तिकडे राजा प्राणनारायण यांना चार महिन्यापूर्वी मींच गुप्त पत्र लिहिलं, कीं ‘जगन्नाथरायांना आपल्या दरबारांत बोलावून घ्या !. आतां हें खरं नाहीं वाटणार तुम्हांला !

दयानंद : आम्हांलाच नव्हे, तर खुद्द प्राणनारायणांना देखील ! इतकंच नव्हे. तर साक्षात सत्यनारायनालाहि सत्य नाहीं वाटणार हें !

बन्सीराम : कर, खुशाल कोठया कर. अशा गचाळ कोटया मलाहि करतां येतात.

दयानंद : गचाळच करतां येतात !

काशींप्रसाद : दयानंद. उगाच भलता वाद कशाला घालतोस ?

दयानंद : हे मधेंमधें तोंड घालतात म्हणून ! आतां जगन्नाथराय कामरूपचे राजकवि होणार, त्यांचा वशिला वर्षासन वाढवायला उपयोगी पडणार, म्हणून या थापारामांनीं पगडी फिरवली आहे. सगळंच्या सगळं श्रेयहि लाटूं पाहात आहेत हे !

काशीप्रसाद : तें जाऊं दे. या मतलबरामांना इथंच सोडून आपणांस जगन्नाथरायांकडे गेलं पाहिजे.

दयानंद : होय. ही आनंदाची वार्ता त्यांना आर्धीं सांगितलीच पाहिजे,

काशीप्रसाद : तर मग चल लवकर, आधीं जगन्नाथरायांचे दागिने सोडवून आणूं त्या हलकट सावकाराकडून आणि मग दोन्ही आनंदाच्या वार्ता त्यांना सांगूं . चल दयानंद. [ दोघेहि जातात. हरीराम--बन्सीराम तेथेंच थांबतात. ]

बन्सीराम : लक्षांत आलं ना ? वारा वाहील तशी पाठ फिरवायची ! हे तिथं जाऊन पोहोंचण्यापूर्वीच मी तिथं जाऊन जगन्नाथाला गांठतों. तूंहि सगळ्या तयारीनिशीं पाठोपाठ ये. शाहजहानशिवाय कोणाचीहि चाकरी न करण्याचा त्या मूर्ख पंडिताचा हट्ट आहे. पण न जाणो, त्यानं तो हट्ट सोडलाच आणि कामरूपच्या दरबारची चाकरी पत्करलीच, तर त्याची पालखींतून आपण मिरवणूक काढूं ! आणि तें जमलं नाहीं तर ( कारस्थानी आवाजांत-- ) त्याच पालखींतून त्याच्या बायकोल सुभेदाराच्या .

हरीराम : हां, तें माझं एकटयाचं काम ! उस बारेमें आप चिंता मत करिये !

[  दोघे पगडया फिरवून दोन बाजूंनीं निघून जातात ]

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP