TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अंक पहिला - प्रवेश पहिला

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


प्रवेश पहिला
[ स्थळ : दिल्लीचा एक रस्ता. पडदा. उघडण्यापूर्वी दूर कोठें तरी चाललेलें भजन ऐकूं येतें--]

जय गंगे भागीरथी !
हर--गंगे भागीरथी ! ॥ध्रु.॥
चिदानंद--शिव--सुंदरतेची पावनतेची तूं मूर्ती
म्हणुनि घेडनी तुला शिरावर गाइं महेश्वर तव महती !॥
जगदाधारा तव जलधारा अमृतमधुरा कान्तिमती
शंकर शंकर ! जय शिव--शंकर !’ लहरि लहरि त्या निनादती ॥

[ पडदा उघडल्यावर या भजनाच्या ओळी मंद मंद होत विलीन होतात. तोंच शहाजादी लवंगिकेचा संगीत--नृत्य--शिक्षक उस्ताद जमनलाल, वरील भडनाचें ध्रुवपद गुणगुणत रंगभूमीवर प्रवेश करतो. ]

जमनलाल : ( स्वतःशींच ) वा: ! किती मधुर भजन हें जगन्नाथ पंडिताचं ! धन्य त्याची कवित्वशक्ति : धन्य त्याची गंगाभक्ति !.  भागीरथीची ती सर्वांगसुंदर अमृतमधुर जलधाराचन डोळ्यांसमोर उभी राहिली ! ( गुणगुणतो-- )

“ जगदाधारा तव जलधारा अमृतमधुरा कान्तिमती ।
‘ शंकर शंकर जय शिवशंकर ’ लहरि लहरि त्या निनादती ।
जय गंगे भागीरथी । हर गंगे भागीरथी ! ॥”

[ इतक्यांत ‘ इष्टके गहिरे खतरेमें बडे भी खा गये ठोकर ’ ही कर्णकटु आवाजांत म्हटलेली गजलाची ओळ कानीं येऊन जमनलालची तंद्री पावते. ]

जमनलाल : ( उद्वेगानें ) ही वल्ली कशाला इकडे येत आहे ? जगन्नाथानं रचलेच्या गोड भजनांत मन कसं तल्लीन होऊन गेलं होतं, तोंच हा मन्सूरखांचा चेला कशाला इथं उपटला ? छे छे , दुधाच्या घागरींत मिठाचा खडा.
[ मन्सूरखां नामक नादान दरबारी शायरचा चेला ‘ कलंदरखां ’ तीच गजलाची ओळ किंचाळत प्रवेश करतो. त्याच्या हातांत हुक्का आहे. ]

कलंदरखां : इष्कके गहिरे खतरेमें बडे भी खा गये ठोकर !

जमनलाल  : हां हां, कलंदरखां, जरा सामने देखकर चलिये जनाब ! रस्त्यावरच्या दगडाची ठोकर बसेल नाहीं तर.

कलंदरखां : बडे मैय्या, रस्त्यावरच्या पत्थराची ठेंस बसली, अगर तुमच्यासारख्या वस्ताद खडकाची संगीत ठोकर बसली, तरी फिकीर नाहीं. लेकिन. इष्काची ठोकर बहोत बुरी, बडे भैय्या !

जमनलाल : कां खांसाहेब, अगदीं अनुभवी माणसासारखे विव्हळत आहांत ! तुम्हांला जिंदगीच्या मुसाफिरींत, जवानीच्या रात्रीं, बसली वाटतं ठोकर एखाद्या खुबसूरत पोरीची ?

कलंदरखां : अजी नही जी ! हमारे उस्ताद मन्सूरखां आहेत ना ? त्यांची दाणादाण याद येते मला ! हाय कंबख्त ! शाहजादी लवंगिका आजकाल इतकी बेपर्वाईनं वागते आमच्या उस्तादांशीं, कीं त्यांचा दिल फाटून जातो ।

जमनलाल : हो. मला कळलं आहे तें शिंप्याकडून.

कलंदरखां : शिंप्याकडून ? दर्जीदे तरफ्‌से ?

जमनलाल : हां हां दजींके तर‍फ्‌से. आजकाल दिल्लीच्या शिंप्यांना दुसरं काम नाहीं. मन्सूरखांसारख्या पागल प्रेमिकांचं फाटलेलं दिल‌ शिवायं लागतं नादररोज त्यांना !

कलंदरखां : काय मजाक‌ उडवीत आहांत उस्ताद ? तुम्हीच सांगा, शाहजादीनं आमच्या उस्तादांना बेपर्वाईच्या ठोकरा माराव्यात, हें शोभतं का तिला ?  अहो, आमच्या मन्सूरखांची खानदान उंची आहे; त्यांच्यावर शहेन शहांची मर्जी आहे; ते शायर आहेत; रुबाबदार आहेत; शिवाय ते देखणेहि आहेत.

जमनलाल : असूं देत; असूं देत, पण शाहजादीसाहिबा बाहेरच्या डामडौलाला भुलणार्‍या नाहींत, तुझ्या त्या नादान उस्तादाला हेंच तर कळत नाहीं, कीं पा‍क्‌बाज बायका पुरुषाच्या पराक्रमावर भाळतात; सद‌गुणांवर आशक‌ होतात; खुबसूरतीवर नाहीं !

कलंदरखां : मालूम है ! मालूम है ! इतकी कांहीं आपल्या शिष्येची तारीफ करायला नको. जमनलालजी, मी जर उस्तादांच्या जागीं असतों. तर मीं तिला साफ सांगितलं असतं--“खुबसूरतीची इतकी मिजास कशाला मिरवितां ? तुमचे गोरे हात आहेत मेंहदीचे गुलाम, आणि गाल पडले आहेत चंदनाच्या सफेत चूर्णाकडे गहाण ! ओठांवर चढला आहे विडयाचा रंग, आणि कमरबंद करतो कमरेला तंग ! कपाळावर केली आहे बिंदीनं कुरघोडी; डोळ्यांत फिरली आहे सुरम्याचीं कांडी ! इतकी तुमची खुबसुरती चिल्लर गोष्टींचीं गुलाम झाली असून, आमच्याशीं मग्रुरी ? आमच्यासाखे आशिक आहेत, म्हणून ना तुमची शान अन्‌ शिरजोरी ?. चल हट‌ !

हमारे प्यार को जालिम‌ मिट्टीमें मिलाओंगे ।
तो हमभी हैं आदमी, खफा हो जायेंगे ॥”

जमनलाल : शाब्बास ! शाब्बास ! बेटा कलंदर, तुझं हें शेखमहंमदी स्वप्न तर मोठं मजेदार आहे, लेकिन‌ अफसोस‌ ! मन्सूरखांच्या जागीं तूं नाहींस, अन‌ मन्सूरखांपाशीं अशी खुद्दारी नाहीं; स्वाभिमान नाही !

कलंदर : तीच तर बडी पंचाईत आहे. म्हणूनच आमचे उस्ताद मन्सूरखां इष्काच्या पायीं धुळीस मिळणार असं दिसतं आणि त्यांच्या ह्या पठ्ठयाला, जिगरजान‌ दोस्ताल, रडावं लागतं ---

इष्कके गहिरे खतरेमें
बडे भी खा गये ठोकर !

जमनलाल :  ( हंसून ) छू: मंतर, छू: मंतर ! बेटा कलंदर, मन्सूरखांच्या इष्काचा झणझणीत खिमा, तुमच्या डोळ्यांत पाणी, आणि गळ्यांत अशी दर्दभरी गजल आणतो, तर मग खुद्द त्याचा दिल किती वेचैन झाला असेल मियाँ ?

कंलदर : पूछो मत भैय्या ! आमचे उस्ताद राता--दिन शाहजादीच्या नांवानं अल्लाकडे शिकायत्‌ करीत असतात. “ हाय हाय रे बेवफा ! हाय रे जालिम‌ ! हाय कंबख्त ! दिलको आग लगा दी ” असं ओरडत असतात. या आशिकांच्या दिलांतला अंगार नीट वापरला, तर आख्ख्या दिल्लींतील चुलींना जळण घालायला नको !

जमनलाल : जाऊं दे रे त्या आशिकांना चुलींत, मला वेळ नाहीं त्यांचा पागलपणा ऐकायला. माझी शिकवणीची वेळ झाली आहे. ( जाऊं लागतो. ) आज तर सावन--गीत अन्‌ नृत्य यांचा रियाज करून घ्यायचा आहे.

कलंदर : सावन--गीत ? कौनसा सावन--गीत ? हां, आया खियाल में.

ओऽओऽओऽऽआया है सावन‍,
गगन के आंगन‌ !
आजा मोरे साजन‌
दिल मोरा नाचे छन‌ छन‌ छन‌ !.

जमनलाल : अरे हट्‌ ! वे क्या गीत है ? परवां जगन्नाथरायांनीं मुशायर्‍यांत म्हटलेलं सावन--गीत शाहजादीला शिकवीत आहें मी ! आहे, कितना मीठा गीत है वो जगन्नाथका ?

कलंदर : जगन्नाथका ! जमनलालजी, ये क्या कर रहे हो ? जनाब,  जगन्नाथाचीं तीं मीठीं गीतं शाहजादीच्या गळ्यांत बसलीं.  तर उद्यां त्याच्या मोहब्बतीची मगरमिठी तिच्या गळ्याभोंवतीं बसेल ना !

जमनलाल : चूप बस रे ! भलता बकवास करूं नकोस,

कलंदर : वकवास नाहीं हा जमनलालजी ! अजी, खूबसूरत बायकांना दगाबाज जवानी केव्हां धोका देईल, याचा काय भरोसा ? आमच्या उस्तादांना ठोकरा मारणारी शाहजादी स्वतःच इष्काची ठोकर खाईल एखादे वेळीं ! तुमच्या सूरसंगीताऐवजीं प्यार--संगीतांत ती  मश्गुल होईल ! संगीताच्या ‘ ख्यालां ’ वरचा तिचा खियाल उडून, त्या तेलंगी तंबोर्‍याशीं तिचा तंबोरा जुळेल; अन्‍ इष्काच्या ध्रुपद--धमाराची धमाल उडवून भलताच ‘ टप्पा ’ गांठेल ती !

जमनलाल : अबे उडानटप्पू, तुझं कल्पने चं उड्डाण अजबच आहे !
कलंदर :  तुम्हीच अजब अहांत जमनलालजी ! आमचे उस्तासय्ह्व सोडले, तरी दिल्लींत शायर कमी का आहेत ? मग आपल्या दिल्लीचा अभिमान सोडून , कशाला त्या जगन्नाथाचं सावन--गीत घेतलं तुम्हीं ?

जमनलाल : तुमच्यासारखे मनानं कद्रू नाहीं आम्ही, म्हणून ! जें जें कानाला गोड लागेल, तें तें आम्ही उचलणार, मग तें कोणाचंहि असो, तूं अन्‌  तुझा अस्ताद नाहक त्या जगन्नाथाच्या खिलाफ आहांत.

कलंदर : अजी जनाव, आमच्या उस्तादांची बात सोडा, सारे दरबारी शायर और बडेबडे लोकहि त्या दख्खनी पंडिताच्या खिलाफ कां आहेत ? त्याच्यांत कांहींतरी ऐब दिसल्याशिवाय ?

जमनलाल :  त्या जगन्नाथ पंडिताच्या अंगीं अव्वल दर्जाचे गुण आहेत, हाच त्याचा दोष, त्यानं काशीच्या पंडितांचा वेदांच्या आधारानं, अन‌  बडया बडया मुल्ला--मौलवींचा कुराणांतले दाखले देऊन पाडाव केला, हाच त्याचा अपराध ! आणि त्याची ही शोहरत ऐकूनच दाराशुकोह नि शाहजहान यांनीं त्याला सन्मानानं दिल्लीस बोलावलं, हा तर त्याचा मोठाच गुन्हा ! म्हणूनच नादान दरबारी लोक त्याच्यावर नाहक जळतात; समझे ?

कलंदर : हां हां समझे, हा जगन्नाथाच्या तरफदारीचा तराणा इतरांना सुनवा; या मन्सूरखांच्या चेल्याचा त्यावर विश्वास बसणार नाहीं. जमनलालजी, दुसरं कांहीं नाहीं, तुमच्या त्या बडया शाहजाद्यानं--दारा शुकोहनंच---या जगन्नाथाचं बेफाम प्रस्थ वाढवून ठेवलं आहे, शहेनशाहांनीं लाडावलेला दारा, अशा पंडितांच्या नादीं लागून, सारी बादशाही बरबाद करणार ! और.

जमनलाल : औरच आहे ही निंदा नालस्ती, पुरे झाली ती. मला शिकवणीसाठीं गेलंच पाहिजे आतां,

कलंदर : पण मी जाऊं देणार नाहीं तुम्हांला--माझ्या एका पहेलीचा जबाब दिल्याखेरीज, ( दोन्ही हात पसरून वाट रोखतो. )

जमनलाल : काय हा पोरकटपणा ! तूं त्या नवाबजाद्या मन्सूरखांचा चेला शोभतोस खरा !. पण सोड पिच्छा. आतां जाऊं दे मला. नाहींतर तुझ्या पाठीवर मला, ‘ धिक‌ धा धिन्न्या ’ चे बोल कडक हातानं काढावे लागतील !

कलंदर : ( हात जोडून ) गुस्ताखी माफ. जाईये जाईये. तुम्हां संगीतवाल्यांच्या थापा खाण्याची हिंमत आपल्यांत नाहीं. गवय्या--बजवय्यांच्या थापांनीं मृदंगाच्या सफेत तोंडाला काळोखी लागली. मग कोण कंबख्त तुमच्या वाटेला जाईल ?. जाईये जाईये, खुशीसे जाईवे.

[ दोघेहि हंसतात. जमनलाल ‘ जय गंगे भागीरथी ! हर गंगे भागीरथी ’ ही ओळ गुणगुणत निघून जातो, कलंदरखां हंसत हंसत ‘ इष्कके गाहिरे खतरेमें बडे भी भी गये ठोकर ’ ही ओळ गुणगुणत दुसर्‍या दिशेनें निघून जातो. ]

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-04-01T05:44:23.9430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

actio bonae fidei

 • स्त्री. Law सद्भावकृति 
RANDOM WORD

Did you know?

समापत्ती हे काय आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.