अध्याय ३ रा - श्लोक २१ ते ३०

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


यद्यदाचरित श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥

येथें गुरुजन । जें जें आचरती । तया नांव देती । धर्म ऐसें ॥२६२॥

सामान्य सकळ । नेणते जे लोक । अनुष्ठिती देख । मग तें चि ॥२६३॥

असे ऐसा ओघ । स्वभावें हा येथें । म्हणोनि कर्मातें । सोडूं नये ॥२६४॥

आचरावें लागे । विशेषेंकरोन । जे का संतजन । तयांतें चि ॥२६५॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥२२॥

काय सांगूं आतां । आणिकांच्या गोष्टी । माझी च रहाटी । देखें पार्था ॥२६६॥

काय मजवरी । पडलें संकट । किंवा कांहीं आर्त । मनीं माझ्या ॥२६७॥

म्हणोनि स्वधर्म । आचरें मी येथें । ऐसें जरी वाटे । तुजलागीं ॥२६८॥

तरी गुणैश्चर्य - । संपन्न आणिक । दुजा नाहीं देख । जगीं कोणी ॥२६९॥

ऐसें माझ्या अंगीं । सामर्थ्य अपार । अर्जुना आचार । जाणसी तूं ॥२७०॥

झाला गुरु -पुत्र । सागरीं जो मृत । करोनि जिंवत । आणिला तो ॥२७१॥

देखिलासी ऐसा । माझा पराक्रम । तो मी करीं कर्म । स्वस्थचित्तें ॥२७२॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥२३॥

जैसा फलाशेंत । गुंतोनियां नर । कर्मी निरंतर । वर्ततसे ॥२७३॥

तैसा देखें मी हि । वर्ते स्वधर्मात । परि अंतरांत । अनासक्त ॥२७४॥

करावया कर्म । एक चि कारण । आमुच्या आधीन । जे का लोक ॥२७५॥

न व्हावें तयांनीं। येथें कर्मभ्रष्ट । आचरावें नीट । स्वधर्मातें ॥२७६॥

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्या कर्म चेदहम ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥२४॥

आम्ही पूर्णकाम । होवोनियां साच । आत्मस्वरुपींच । राहूं जरी ॥२७७॥

तरी कैसे प्राणी । भवार्णवांतून । जातील तरोन । सांगें मज ॥२७८॥

तयांनीं आमुचें । पाहोनि वर्तन । स्वधर्माची खूण । ओळखावी ॥२७९॥

लोक -स्थिति ऐसी । स्वभावें सकळ । नाशिली केवळ । ऐसें होय ॥२८०॥

म्हणोनि ह्या लोकीं । सामर्थ्यसंपन्न । ज्ञानें परिपूर्ण । होय जो का ॥२८१॥

तेणें धनंजया । विशेषेंकरोन । स्वकर्म सांडोन । वर्तो नये ॥२८२॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्विकीर्षुर्लोकसंग्रहम् ‍ ॥२५॥

कर्म -फलीं पार्था । ठेवोनियां दृष्टी । सकाम वर्तती । लोक जैसे ॥२८३॥

तैसें चि रहावें । दक्ष स्वकर्मात । कामनारहित । होवोनि हि ॥२८४॥

कीं ही लोकसंस्था । सकळ सर्वथा । निरंतर पार्था । रक्षणीय ॥२८५॥

म्हणोनि स्वधर्म । आचरोनि चांग । सर्वासी सन्मार्ग । दाखवावा ॥२८६॥

लोकविलक्षण । करोनि वर्तन । न व्हावें आपण । अलौकिक ॥२८७॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसाङ्गिनाम् ‍ ।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ‍ ॥२६॥

मूल जें सायासें । करी स्तन -पान । तयासी पक्कान्न । काय होय ॥२८८॥

दिलें तरी कैसें । येईल भक्षाया । म्हणोनि तें तया । देऊं नये ॥२८९॥

तैसी सर्वथैव । कर्मी अपात्रता । येथें पंडु -सुता । असे जयां ॥२९०॥

तयां कौतुकें हि । नैष्कर्म्याची खूण । उघड करोन । दावूं नये ॥२९१॥

तेथ सत्कर्माचें । लावावें वळण । प्रशंसा करोन । वारंवार ॥२९२॥

स्वयें आचरोन । दाखवावें तें च । निष्काम जे साच । तयांनीं हि ॥२९३॥

वागतां ते कर्मी । लोक -संग्रहार्थ । पावती ना तेथ । कर्म -बंध ॥२९४॥

बहुरुपी जैसे । नटोनियां अंगें । राजा राणी सोगें । ऐसी घेती ॥२९५॥

परी मनीं नाहीं । नरनारीभाव । लोकां हावभाव । दाखवितां ॥२९६॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।

अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥२७॥

इतरांचें ओझें । आपुलिया माथां । घ्यावें तरी पार्था । भार होय ॥२९७॥

तैसीं येथें जीं जीं । शुभाशुभ कर्मे । निपजती धर्मे । प्रकृतीच्या ॥२९८॥

तयांचे कर्तृत्व । मति -भ्रमें साच । आपणाकडे च । घेई मूर्ख ॥२९९॥

सर्वथैव ऐसा । अहंकारारुढ । एकदेशी मूढ । असे जो का ॥३००॥

तयातें कर्माचें । रहस्य हें गूढ । करोनि उघड । दावूं नये ॥३०१॥

असो ; पार्था तुज । सांगतों जें हित । देवोनियां चित्त । ऐक आतां ॥३०२॥

तत्त्ववित्तृ महाबाहो गुणकर्मविभागयोः ।

गुणा गुणेषुअ वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥२८॥

तत्त्वज्ञांच्या ठायीं । नाहीं देहभाव । निपजती सर्व । कर्मे जेथें ॥३०३॥

देहाभिमानातें । सांडोनि ते संत । गुणकर्मातीत । होवोनियां ॥३०४॥

भूतव्यवहारा - । पासोनि अलिप्त । सूर्य आकाशांत । राहे जैसा ॥३०५॥

तैसे साक्षित्वानें । वावरती देहीं । म्हणिनियां नाहीं । कर्म -बंध ॥३०६॥

प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत ‍ ॥२९॥

प्रकृति -आधीन । होवोनियां वर्ते । गुणत्रयीं गुंते । सर्वथा जो ॥३०७॥

गुणत्रयाधारें । आपुले व्यापार । करिती साचार । इंद्रियें जीं ॥३०८॥

तयांचें तें कर्म । जो का बळें साच । आचरें स्वतःच । ऐसें मानी ॥३०९॥

ऐसा देहभाव । जयाचा जागृत । तो चि कर्मे लिप्त । होय येथें ॥३१०॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥३०॥

म्हणोनि उचित । कर्मे तीं आघवीं । मज समर्पावीं । आचरोनि ॥३११॥

परी चित्त -वृत्ति । पार्था निरंतर । ठेवावी सुस्थिर । आत्मरुपीं ॥३१२॥

आणि हें तों कर्म । तयाचा मी कर्ता । आचरेन आतां । एतदर्थ ॥३१३॥

ऐसा चित्तालागीं । नको अभिमान । येऊं जाण । सर्वथा तूं ॥३१४॥

तुवां देहासक्त । न व्हावें अर्जुना । सांडाव्या वासना । सकळ हि ॥३१५॥

मग यथोचित । प्रसंगे जे प्राप्त । भोग ते समस्त । भोगावे गा ॥३१६॥

आतां हातामाजीं । धरोनि कोदंड । येथें रथारुढ । होवोनियां ॥३१७॥

वीरवृत्तीचा तूं । आनंदें स्वीकार । करीं गा सत्वर । धनुर्धरा ॥३१८॥

जगामाजीं कीर्ति । करीं वर्धमान । स्वधर्माचा मान । वाढवोनि ॥३१९॥

भारापासोनी ही । भूमि करीं मुक्त । रणांगणीं दुष्ट । संहारोनिं ॥३२०॥

सर्व हि संशय । सांडोनियां आतां । चित्त देई पार्था । संग्रामीं च ॥३२१॥

संग्रामावांचोन । येथें धनुर्धरा । बोलूं नको वीरा । दुजें कांहीं ॥३२२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP