अध्याय २ रा - श्लोक ६१ ते ७२

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।

वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥

अनासक्ति - बळें पार्था । ह्यांसी निर्दळी सर्वथा ॥५२६॥

भोग - सुखें होतां प्राप्त । चित्त होई ना मोहित ॥५२७॥

मज एकातें अंतरीं । विसंबे ना क्षणभरी ॥५२८॥

आत्मबोधें परिपूर्ण। तोचि स्तितप्रज्ञ जाण ॥५२९॥

वरीवरे जरी । सोडिले विषय । परि गोडी होय । अंतरांत ॥५३०॥

तरी साधकासी । साद्यन्त संसार । चुके ना साचार । धनंजया ॥५३१॥

अंशमात्र विष । तें हि होतें फार । कराया संहार । जीविताचा ॥५३२॥

येथें नाहीं पार्था । सर्वथा संशय । तैसा चि विषय । लेशमात्र ॥५३३॥

राहे जरी देखें । साधकाचे मनीं । तरी पूर्ण हानि । विवेकाची ॥५३४॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ॥

सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहत्स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रंशाद्‍बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥

विषयांचें जरी । अंतरीं स्मरण । विरक्त हि जाण । लिप्त होय ॥५३५॥

होतां अंतरांत । आसक्तीचा जन्म । प्रकटतो काम । मूर्तिमंत ॥५३६॥

प्रकटतां काम । दिलें क्रोधें ठाण । आधीं चि गा जाण । तेथें पार्था ॥५३७॥

जेथें क्रोध तेथे । आला अविचार । स्वभावें साचार । धनंजया ॥५३८॥

चण्डवातें जैसी । विझे दीप - ज्योति । तैसी लोपे स्मृति । अविचारें ॥५३९॥

किंवा अस्तमानीं । रवि - प्रकाशातें । सर्वस्वीं ग्रासिते । रात्र जैसी ॥५४०॥

देखें साधकाची । तैसी होय स्थिति । सर्वथा ती स्मृति । लोपतां चि ॥५४१॥

मग अज्ञानांध । होवोनि केवळ । देखे तो सकळ । तमोव्याप्त ॥५४२॥

तेणें तयाचिया । बुद्धीलागीं पार्था । येई व्याकुळता । अंतरांत ॥५४३॥

देखें जन्मांधासी । पळावें लागावें । मग तें जैसें धावे । सैरावैरा ॥५४४॥

तैसें स्मृति । भ्रंशें । बुद्धीचें भ्रमण । चाले रात्रंदिन । धनुर्धरा ॥५४५॥

होतां सर्वथैव । बुद्धीचा गोंधळ । नासतें समूळ । ज्ञानजात ॥५४६॥

बुद्धि - नाशें होय । त्याची स्थिति तैसी । प्राण जातां जैसी । शरीराची ॥५४७॥

जैसा इंधनातें । लागोनि स्फुल्लिंग । भडकतां आग । विश्वा पुरे ॥५४८॥

तैसें विषयांचे । अल्प हि चिंतन । एवढें पतन । पाववितें ॥५४९॥

रागेद्वषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्वरन् ‍ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥६४॥

म्हणोनियां सर्व । विषय हे पार्था । सोडावे सर्वथा । मनानें चि ॥५५०॥

सोडितां विषय । स्वभावें निःशेष । मग प्रीतिद्वेष । दूर होती ॥५५१॥

आणिक हि पार्था एक । तुज सांगतसें ऐक ॥५५२॥

मग इंद्रियें दहा हि । सर्व विषयांचे ठायीं ॥५५३॥

जरी झालीं रममाण । तरी अलिप्त तो पूर्ण ॥५५४॥

जेथें प्रीति - द्वेष नाहीं । तेथें बाधक तें काई ? ॥५५५॥

सूर्य तैसा आकाशांत । असे राहिला अलिप्त ॥५५६॥

निज - किरणांच्या हातें । स्पर्शे सर्व हि जगातें ॥५५७॥

तरी त्यासी काय लागे । संग - दोष मज सांगें ॥५५८॥

तैसा जो का मनांतून । इंद्रियार्थी उदासीन ॥५५९॥

आत्मरसें परिपूर्ण । असे काम - क्रोध - हीन ॥५६०॥

विषयीं हि त्यासी कांहीं । आत्मरुपाविण नाहीं ॥५६१॥

मग विषय ते काई । कोणा बाधतील पाहीं ! ॥५६२॥

जरी जळीं बुडे जळ । ज्वाळेमाजीं जळे ज्वाळ ॥५६३॥

तरी संग - दोषें लिप्त । होय पूर्ण योग - युक्त ॥५६४॥

स्वयें सर्वरुप आहे । सर्व आत्मरुप पाहे ॥५६५॥

जाण अर्जुना निभ्रांत । तो चि स्थितप्रज्ञ संत ॥५६६॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।

प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥६५॥

चित्त ज्याचें सर्वकाळ । राहे प्रसन्न निर्मळ ॥५६७॥

कैसीं स्पर्शतील तया । भव - दुःखें धनंजया ॥५६८॥

दिव्य अमृताची झरी । वाहे जयाचे अंतरीं ॥५६९॥

तया शिवे ना कल्पान्तीं । भूकतहानेची भीति ॥५७०॥

तैसें प्रसन्न हृदय । तरी दुःख कोठें काय ॥५७१॥

मग आपोआप पाहें । बुद्धि आत्मरुपीं राहे ॥५७२॥

जैसा निर्वातींचा दीप । कदा काळीं नेणे कंप ॥५७३॥

तैसा स्व - रुपीं निवांत । स्थितप्रज्ञ योग - युक्त ॥५७४॥

नास्ति बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।

न चाभावयतः शान्तिशान्तस्य कुतः सुखम् ‍ ॥६६॥

बुद्धियोगाचा विचार । नाहीं अंतरीं साचार ॥५७५॥

तो चि गुंते भोग - पाशीं । श्वेतवाहना सर्वाशीं ॥५७६॥

तया बुद्धीची स्थिरता । नसे कधीं हि सर्वथा ॥५७७॥

चित्त रहावें निर्मळ । ऐसी नाहीं तळमळ ॥५७८॥

निश्चळत्वाची भावना । जरी मनातें शिवे ना ॥५७९॥
तरी अर्जुना तयासी । शांति लाभेल ती कैसी ॥५८०॥

आणि शांतीचा ओलावा । जया नरा नाहीं ठावा ॥५८१॥

तेथें सुख चुकोनि हि । प्रवेशे ना पार्था पाहीं ॥५८२॥

जैसा पातक्याच्या ठायीं । मोक्ष राहेना केव्हां हि ॥५८३॥

अग्निमाझारीं भाजलें । बीज जरी उगवलें ॥५८४॥

तरी असोनि अशांति । घडूं शके सुख - प्राप्ति ॥५८५॥

म्हणोनियां ऐक पार्था । मनाची जी चंचलता ॥५८६॥

तें चि सर्वस्व दुःखाचें । ऐसें जाणोनियां साचें ॥५८७॥

इंद्रियांतें आवरिलें । तरी सर्वथा तें भलें ॥५८८॥

इंन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।

तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥६७॥

जें जें सांगती इंद्रियें । तें तें करिती जे स्वयें ॥५८९॥

तरले ते ऐसें वाटे । तरी सर्वथा तें खोटें ॥५९०॥

पार्था , भोगसिंधु पार । नाहीं झाले ते साचार ॥५९१॥

तीर नावेनें गांठावें । तों चि वादळ सुटावें ॥५९२॥

मग चुकला अपाय । तो चि पुनरपि होय ॥५९३॥

तैसा असो ज्ञाता भला । जरी भोगाधीन झाला ॥५९४॥

जें जें आवडे इंद्रियां । तें तें तयां देवोनियां ॥५९५॥

कौतुकानें केले लाड । परी पुढें अवघड ॥५९६॥

साधनांत झाली चुकी । बुडाला तो भव - दुःख्हीं ॥५९७॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६८॥

जरी स्वभावतां जाण । होती इंद्रियें स्वाधीन ॥५९८॥

मग अर्जुना सार्थक । असे काय तें आणिक ॥५९९॥

जैसा हर्षला कासव । सोडी मोकळे अवयव ॥६००॥

इच्छावशें आवरोन । घेई आपुले आपण ॥६०१॥

तैसीं सर्व इंद्रियें तीं । ज्याच्या आज्ञेंत वागती ॥६०२॥

ज्याचीं इंद्रियें स्वाधीन । तो चि स्थितप्रज्ञ जाण ॥६०३॥

आतां आणिक हि एक । पार्था , सांगेन तें ऐक ॥६०४॥

पूर्ण - पुरुषाचें लक्षण । असे जें का अति गहन ॥६०५॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥

लागलीसे झोंप जगा । असे तेथें चि जो जागा ॥६०६॥

जीवमात्र जेथें जागे । तेथें ज्यासी झोंप लागे ॥६०७॥

तो चि नित्य निरंतर । जाण पार्था मुनीश्वर ॥६०८॥

ऐसा जो का निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ॥६०९॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ‍ ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥७०॥

आणिक हि एके परी । जार्णो येईल अवधारीं ॥६१०॥

जैसा सागर प्रशांत । असे पार्था अखंडित ॥६११॥

ओघ नद्यांचे समस्त । पूर्ण मिसळले त्यांत ॥६१२॥

तरी अल्प हि न वाढे । सोडि सीमा हें न घड ए॥६१३॥

किंवा येतां ग्रीष्मकाळ । नद्या आटल्या सकळ ॥६१४॥

परी सागराचे जळीं । नाहीं उणीव भासली ॥६१५॥

तैसी ऋद्धिसिद्धि येतां । बुद्धीलागीं अक्षोभता ॥६१६॥

आणि न हो त्यांची प्राप्ति । तरी न चळे धीरवृत्ति ॥६१७॥

सांर्गे सूर्यासी पांडवा । हवा दाखवाया दिवा ॥६१८॥

दिवा मालविला तरी । का तो कोंडेल अंधारीं ? ॥६१९॥

ऋद्धिसिद्धि तैशा परी । आली किंवा गेली तरी ॥६२०॥

नसे तयासी आठव । ऐसा बाणला स्वभाव ॥६२१॥

कीं तो निजान्तरीं पूर्ण । महासुखीं झाला मग्न ॥६२२॥

रम्य स्व - गृहा पाहोन । तुच्छ ज्यासी इंद्र - भुवन ॥६२३॥

त्यासी भिल्लाची झोंपडी । सांग पार्था कैसी ओढी ॥६२४॥

अमृतासी नांवे ठेवी । तो न जैसा कांजी सेवी ॥६२५॥

तैसा स्वानुभवी योगी । ऋद्धि - सिद्धीतें न भोगी ॥६२६॥

पार्था , नवल हें देख । तुच्छ जेथें स्वर्ग - सुख ॥६२७॥

तेथें ऋद्धि - सिद्धि गौण । मग पुसे त्यांसी कोण ॥६२८॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्वरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ॥७१॥

ऐसा आत्मज्ञानें तुष्ट । ब्रह्मानन्दें परिपुष्ट ॥६२९॥

तो चि स्थितप्रज्ञ भला । जाण अर्जुना एकला ॥६३०॥

दूर करोनि मीपणा । सर्व सोडोनि कामना ॥६३१॥

स्वयें विश्व होवोनि तो । विश्वामाजीं वावरतो ॥६३२॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैना प्राप्य विमुह्यति ।

स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मानिर्वाणमृच्छति ॥७२॥

इति श्रीमद्भगवद्भीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णर्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥

ऐसा ब्रह्मभाव । अर्जुना निःसीम । भोगितां निष्काम । जाहले जे ॥६३३॥

परब्रह्म - पद । नित्य परिपूर्ण । पावले ते जाण । अनायासें ॥६३४॥

ज्ञानरुप होतां । रोधिते ना चित्ता । तयां व्याकुळता । देहान्तेंची ॥६३५॥

ती च ब्रह्मस्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगे पार्थाप्रति । ऐकें राजा ॥६३६॥

संजय तो बोले । ऐसी कृष्ण - वाणी । ऐकोनियां मनीं । पार्थ म्हणे ॥६३७॥

आमुचिया काजा । आला युक्तिवाद । आता श्रीगोविंद । बोलिला जो ॥६३८॥

बुद्धियोग श्रेष्ठ । कर्ममात्र गौण । त्याज्य तीं म्हणोन । सर्व कर्मे ॥६३९॥

तरी आतां नको । मज झुंजावया । कासया हें वायां । घोर कर्म ॥६४०॥

ऐसा आशंकोन । आनंदें अर्जुन । आतां भला प्रश्न । विचारील ॥६४१॥

असे तो प्रसंग । सुरस सुंदर । धर्माचें आगर । सकळ हि ॥६४२॥

कीं तो विवेकाचा । अमृत - सागर । अनंत अपार । परिपूर्ण ॥६४३॥

सर्वज्ञांचा राजा । स्वयें कृष्णनाथ । संवादेल जेथ । अर्जुनाशीं ॥६४४॥

तीच कथा आतां । निवृत्तीचा दास । सांगे श्रोतयांस । ज्ञानदेव ॥६४५॥

इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् ‍ अभंग - ज्ञानेश्वरी द्वितीयोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : February 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP