अध्याय १ ला - श्लोक ११ ते २०

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षान्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥

सर्व सेनापती । आपुले पाहोन । पुन्हां दुर्योधन । काय बोले ॥२०३॥

म्हणे झुंजावया । सिद्ध व्हा सकळ । आपुलालें दळ । सज्ज करा ॥२०४॥

ज्यांच्यापाशीं ज्या ज्या । होती अक्षौहिणी । त्या त्या येथें रणीं । विभागाव्या ॥२०५॥

वरी अधिकारी । जो जो महारथी । तेणें तयांप्रति । आवरोनि ॥२०६॥

रहावें सर्वानी । भीष्माच्या आज्ञेंत । जाणोनि तो श्रेष्ठ । सर्वामाजीं ॥२०७॥

मग पुन्हां ऐसें । बोले द्रोणापासीं । संरक्षावें ह्यासी । तुम्ही आतां ॥२०८॥

सर्वभावें ह्यातें । माझ्या ठायीं माना । सैन्या साचपणा । ह्याच्या योगें ॥२०९॥

तस्य संजनयन्हर्ष कुरुवृद्धः पितामहः ।

सिंहनादं विनद्योच्चैः शडंख दध्मौ प्रतापवान ॥१२॥

ऐकोनि हे बोल। भीष्म संतोषला । मग तेणें केला । सिंहनाद ॥२१०॥

दोन्हीं दळांमाजीं । नाद तो अद्‌भुत । मावे ना नभांत । प्रतिध्वनि ॥२११॥

त्या चि प्रतिध्वनि - । सवें वीरश्रीनें । वाजविला तेणें । दिव्य शंख ॥२१२॥

मिळतां ते दोन्ही । नाद तिये काळीं । बधिरता आली । त्रैलोक्यासी ॥२१३॥

वाटे तुटोनिया । आकाशाचा प्रांत । जणूं धडाडत । आला खालीं ॥२१४॥

क्षोभे चराचर । कांपावया लागे । उसळले वेगें । महा -सिंधू ॥२१५॥

झाला महा -घोष । तयाच्या गजरें । पर्वत -कंदरें । दणाणलीं ॥२१६॥

ततःशडाखश्व भेर्यश्व पणवानकगोमुखाः ।

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ‍ ॥१३॥

तों चि रणवाद्यें । रणांत उदंड । गर्जतां प्रचंड । घोष झाला ॥२१७॥

महा -भयानक । कर्णकटु ध्वनि । ऐकोनि तो रणीं । एकाएकीं ॥२१८॥

योद्धे धीट धीट । त्यांस हि केवळ । वाटे अंतकाळ । ओढवला ॥२१९॥

भेरी डंके ढोल । शंख झांजा कर्णे । घोर ओरडणें । योध्द्यांचें हि ॥२२०॥

थोपटिती बाहू । कोणी आवेशून । कोणी चवताळून । देती हांका ॥२२१॥

झाले अनावर । हत्ती मदोन्मत्त । काय सांगूं मात । भेकडांची ॥२२२॥

होते ढिले जे का । गेले ते उडोन । कस्पटासमान । क्षणार्धात ॥२२३॥

तेथें उभा राहूं । शके ना कृतांत । झाला भयभीत । महा -घोषें ॥२२४॥

उभेपणीं प्राण । गेले कित्येकांचे । पावले धीराचे । ते हि कंप ॥२२५॥

धैर्यवंतांची हि । बसे दांतखीळ । जाहला व्याकूळ । ब्रह्मा तो हि ॥२२६॥

देखोनि आकांत । देव हि स्वर्गात । बोलती कल्पान्त । आला आजि ॥२२७॥

ऐकें राया आतां । काय झाली मात । तेथें त्या सैन्यांत । पांडवांच्या ॥२२८॥

ततःश्वेतैर्हर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।

माधवः पाण्डवश्वैव दिव्यौ शड्खौ प्रदध्मतुः ॥१४॥

पाञ्चजन्यं हृशीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।

पौण्ड्रं दध्मौ महाशड्खं भीमकर्मा वृकोदरः ॥१५॥

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।

नकुलः सहदेवश्व सुघोषमणिपुष्पकौ ॥१६॥

महा -तेजाचें का । असे जें भांडार । मूर्तिमंत सार । विजयाचें ॥२२९॥

गरुडासारिखे । वेगवंत चार । जोडिले साचार । वारु ज्यातें ॥२३०॥

ऐसा रथ -श्रेष्ठ । दिसे शोभिवंत । दिव्य पंखयुक्त । मेरु जैसा ॥२३१॥

ज्याच्या तेजें दिशा । कोंदाटल्या दाही । स्वयें घोडे वाही । पार्थाचे जो ॥२३२॥

देव तो श्रीहरी । ज्या रथीं सारथी । वानूं गुण किती । रथाचे त्या ॥२३३॥

ध्वज -स्तंभीं साक्षात् ‍ । शिव -अवतार । मारुती साचार । बैसलासे ॥२३४॥

देखा विलक्षण । कैसें भक्त -प्रेम । सारथ्याचें काम । देव करी ॥२३५॥

आपुला सेवक । घालोनियां पाठीं । पुढें जगजेठी । उभा राहे ॥२३६॥

तेणें कृष्णनाथें । लीलेनें आपुला । शंख तो फुंकिला । पांचजन्य ॥२३७॥

तैसा कौरवांच्या । दळीं सभोंवार । वाद्यांचा गजर । चालिला जो ॥२३९॥

कळे ना तो कोठें । लोपला सत्वर । तेणें घनघोर । महा -घोषें ॥२४०॥

मग पार्थ तेथ । शंख देवदत्त । वाजवितां होत । महा -नाद ॥२४१॥

दोन्ही हि ते ध्वनी । मिळतां अद्बुत । ब्रह्मांड शतकूट । होऊं पाहे ॥२४२॥

तों चि महाकाळा - । सारिखा क्षोभून । उठे भीमसेन । आवेशानें ॥२४३॥

पौंड्र महा -शंख । फुंकिला तयानें । जैसा का दणाणे । काल -मेघ ॥२४४॥

मग धर्मराज । वाजविता होय । अनंतविजय । शंख थोर ॥२४५॥

नकुळें सुघोष । तो मणि -पुष्पक । वाजविला शंख । सहदेवें ॥२४६॥

प्रचंड गंभीर । ऐकोनि तो ध्वनि । गेला घाबरोनि । काळ तो हि ॥२४७॥

काश्यश्व परमेष्वासः शिखण्दी च महारथः ।

धृष्टद्युम्नो विराटश्व सात्यकिश्वापराजितः ॥१७॥

द्रुपदो द्रौपदेयाश्व सर्वशः पृथिवीपते ।

सौभद्रश्व महाबाहुः शडाखन्दध्मुः पृथक् ‍ पृथक् ‍ ॥१८॥

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ‍ ।
नभश्व पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ‍ ॥१९॥

पांडवाच्या दळीं । भूपती अनेक । द्रौपदेयादिक । आणिक जे ॥२४८॥

महाबाहु काश्य । द्रुपद तो तेथ । अर्जुनाचा सुत । अभिमन्यु ॥२४९॥

सात्यकी अजिंक्य । शिखंडी विराट । तैसा नृपनाथ । धृष्टद्युम्न ॥२५०॥

ऐसे थोर वीर । सैनिक प्रमुख । त्यांनीं नाना शंख । वाजविले ॥२५१॥

प्रचंड तो घोष । दणाणतां तेथ । बैसला आघात । एकाएकीं ॥२५२॥

तेणें शेष -कूर्म । दचकोनि जाती । सोडाया पहाती । भू -भारातें ॥१५३॥

मेरु -मंदराचा । जाउं पाहे झोंक । घोषें तिन्ही लोक । हादरतां ॥२५४॥

भिडे कैलासातें । सागराचें जळ । वेगें मही -तळ । ढळूं पाहे ॥२५५॥

वाटे आकाशातें । बैसोनि हिसडा । होऊं पाहे सडा । नक्षत्रांचा ॥२५६॥

सत्यलोकीं झाली । एकचि आरोळी । पहा गेली गेली । सृष्टि आज ॥२५७॥

आतां सारे देव । झाले निराधार । उठे हाहाकार । तिन्ही लोकीं ॥२५८॥

असोनि दिवस । लुप्त झाला भानु । वाटे आला जणूं । प्रळयान्त ॥२५९।

आदिपुरुष हि । होवोनि विस्मित । म्हणे न हो अंत । ब्रह्मांडाचा ॥२६०॥

म्हणोनियां विश्व । सांवरलें तेथ । लोपोनि अद्बुत । आवेश तो ॥२६१॥

एर्‍हवी युगान्त । होता ओढवला । जेव्हां घोष केला । कृष्णादिकीं ॥२६२॥

महा -शंखांचा तो । ओसरला नाद । परी पडसाद । ठेला त्याचा ॥२६३॥

तेणें पडसादें । झाली दाणादाण । सैनिकांची जाण । कौरवांच्या ॥२६४॥

महा -वनीं जैसा । हत्तींचा समूह । विदारितो सिंह । लीलामात्रें ॥२६५॥

तैसा चि तो तेथें । गेला प्रतिध्वनि । हृदयें भेदोनि । कौरवांचीं ॥२६६॥

घोर प्रतिध्वनि । ऐकोनि तो कोणी । गेले उभेपणीं । गळोनियां ॥२६७॥

म्हणोनियां देती । एकमेकां साद । व्हा रे व्हा सावध । बोलती ते ॥२६८॥

अथ व्यवस्थितान्दृष्टाव धार्तराष्ट्रान्कपिध्वजः ।

प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥२०॥

प्रतिष्ठा -संपन्न । बळी जे सुधीर । महारथी वीर । होते तेथें ॥२६९॥

आवरोनि त्यांनीं । सैन्य आपुलालें । पुन्हां सज्ज केलें । झुंजावया ॥२७०॥

उठावलें तेव्हां । दुण्या आवेशानें । क्षुब्ध झालें तेणें । लोक -त्रय ॥२७१॥

बाणांचा वर्षाव । करिती ते वीर । जैसे जल -धर । प्रलयान्तीं ॥२७२॥

देखोनियां तेथें । अखंड ती वृष्टी । तोष झाला चित्तीं । अर्जुनाच्या ॥२७३॥

मग जों सावेश । करी निरीक्षण । देखे कुरु -जन । आघवा चि ॥२७४॥

झुंजावया सिद्ध । पाहोनियां तेथें । सज्ज केले पार्थे । चाप -बाण ॥२७५॥

लीलेनें ते तैसे । घेवोनियां हातीं । मग कृष्णाप्रति । काय बोले ॥२७६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP