श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ४१ ते ५०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


४१
निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढें मुक्ताबाई ॥१॥
देहुडे सुरगण थक्त पडिलें लोकां । सुरु केला डंका वैकुंठींचा ॥२॥
चक्रतीर्थीं उभे देव साधुजन । करविलें स्नान ज्ञानदेवा ॥३॥
देवाचें हें तीर्थ घेतलें ज्ञानेश्वरें । केला नमस्कार पादपद्मीं ॥४॥
विठठल रुक्मिणी ऋषि सुरवर । पूजा ज्ञानेश्वर करितसे ॥५॥
नामयाच्या हातीं गंध अक्षता । पूजा महंता मान्य जाली ॥६॥

४२
टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती ॥१॥
शुक वामदेव अंबऋषि सादर । मध्यें ज्ञानेश्वर ब्रह्मरुप ॥२॥
पिपिलिकेसी मार्ग जावया न मिळे । जाती भार मेळे वैष्णवांचे ॥३॥
नामा म्हणे देवा दाविली नवाळी । पुरविली आळी ज्ञानोबाची ॥४॥

४३
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥
रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर । हरिदिनीं थोर कृष्णपक्षीं ॥२॥
मग केलें स्नान भागिरथीचे तीरीं । संत महंता भारी पूजिजेलें ॥३॥
अवलोकिलें डोळां अंतर बाहेरी । मग सिद्धेश्वरी येत झाले ॥४॥
सिद्धेश्वरालगीं पूजिले निवळ । मागितलें स्थळ समाधीसी ॥५॥
गंगा आणि गिरजा नीलकंठ ईश्वर । केला नमस्कार नामा म्हणे ॥६॥

४४
अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनि मृगछालावर । पाहाती ऋषीश्वर वोसंडोनि ॥३॥
बा माझी समाधि पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ॥४॥
नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसें नारायणें दावियेलें ॥५॥

४५
नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥
हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥
गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥३॥
नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलाविले ॥४॥
वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनियां स्नान इंद्रायणी ॥५॥
पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती । पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥६॥
नामा म्हणे देवा करणें साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा ॥७॥

४६
सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥
रुक्माईचे कानीं सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥
राही रुक्माबाई वाढिती आवडीनें । सोडितो पारणें ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न । जातों बोलावण ज्ञानदेवा ॥४॥

४७
निवृत्ति सोपान मुक्ताई चवथी । अनेक विभूति ज्ञानेश्वरा ॥१॥
नामा पुंडलिक गरुड हनुमंत । परस भागवता बोलविलें ॥२॥
विठ्ठल रुक्माई सत्यभामा राही । इतुके तयेठायीं जमा जाल्या ॥३॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर । सांवता कुंभार एके ठायीं ॥४॥
गंगा गिरजा दोघी नीळकंठ ईश्वर । मध्यें ज्ञानेश्वर घेतियेला ॥५॥

४८
निवृत्ति मुक्ताईचें करिती समाधान । घेतला सोपान मध्यभागीं ॥१॥
ऐक्य अहिक्याची बैसली एकवटे । विस्तारिलीं ताटें रुक्माईने ॥२॥
एक एकालागीं देताती प्रसाद । आतां ज्ञाजराज पाहूं डोळां ॥३।
नामा म्हणे स्वस्थ जेवितां पंगती । घृतपात्र हातीं विस्तारितु ॥४॥

४९
ज्ञानदेवालागीं चंदनाची उटी । पंचारती होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता पुष्पपरिमळा । घेती वोसंगळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव स्वस्थ देवा वोसंगळा । माळा घाली गळां नामदेव ॥३॥

५०
जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं ॥१॥
वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥
दोन प्रहरपावेतों आटोपलें भोजन । तृतीय प्रहरीं कीर्तन आरंभिलें ॥३॥
कीर्तनाच्या नादें मोहिला गोविंद । करावा उद्योग समाधीचा ॥४॥
नामा म्हणे देवा करितां उशीर । विकळ ज्ञानेश्वर जात असे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP