शेतकर्‍याचा असूड - पान १४

शूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.


आतां बाकी उरलेले एकंदर सर्व कंगाल. दोनदुबळे, रात्नंदिवस शेतीं खपून कष्ट करणारे, निव्वळ आज्ञानी, माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकर्‍यांच्या हल्लींच्या स्थितीविषयीं थोडेसें वर्णन करितों, तिकडेस सर्वानीं कृपा करून लक्ष पुरविल्यास त्यांजवर मोठे उपकार होतील. बांधबही, तुम्ही नेहमीं स्वतः शोध करून पाहिल्यास तुमची सहज खात्नी होईल कीं, एकंदर सर्व लहानमोठया खेडयापाडयांसहित वाडयांनों शेतकर्‍यांचीं घरें, दोन तीन अथवा चार खणांची कवलारू अथवा छपरी असावयाचीं. प्रत्येक घरांत चुलीच्या कोपर्‍यांत लोखंडी उलथणें अथवा खुरपें. लांकडी काथवट व फुंकणी, भाणुशोवर तवा, दुधाचे मडकें व खालीं आळयांत रांधणाच्या खापरी तवल्या, शेजारीं कोपर्‍यांत एखाटा तांब्याचा हंडा, परात, काशाचा थाळा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुल्या गळक्या तांब्याशेजारीं मातीचा मोखा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुन्या गळक्या तांब्याशेजारीं मातीचा मोखा, परळ व जोगल्या असावयाच्या. त्यालगत चारपांच डेर्‍यामडक्यांच्या उतरंडी ज्यांत थोडे थोडे साठप्याला खपले, हुलगे, मटकी, तुरीचा कशुरा, शेवया भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला हुला, गव्हाच्या ओंब्या, सांडगे, बिवडया, मोठ, ह्ळकुंडें. धने,मिरीं, जिरें, बोजवार, हिरव्या मिरज्या, कांदे, चिंचेवा गोळा, लसूण, कोथिंबी असावयाची. त्याचेलगत खालीं जमिनीवर काल संध्याकाळीं, गोडबोल्या भट पेनशनर सावकाराकडून, व दिढीनें जुने जोंधळे आणलेले तुराठयांच्या पाटया भरून त्या भिंतीशीं लावून एकावर एक रचून ठेवलेल्या असावयाच्या. एके बाजूला वळणीबर गोधडया, घोंगडयांचीं पटकुरें व जुन्यापान्या लुगडयांचे धड तुकडे आडवेउभे दंड घालून नेसण्याकरितां तयार केलेलें धडपें, भितोवर एक लांकडाची मेख ठोकून तिजवर टांगलेल्या चिध्याचांध्याच्या बोचक्यावर भुसकट व गोंबर्‍या वहावयाचीं जाळीं, दिव्याच्या कोनाडयांत तेलाच्या गाडग्याशेजारीं फणी व कुंकाचा करंडा, वरतीं माळयांवर गोंव‍र्‍या व तीनधारी निवडुंगाचे सरपणाशेजारीं वैरण नीट रचुन ठेविलो असावयाची. खालीं जमिनीवर कोन्याकोपर्‍यांनीं कुदळ, कुर्‍हाड खुरपें, कुळवाची फास, कोळप्याच्या गोल्ह्या, जातें, उखळ, मुसळ व केरसुणीशेजारीं थुंकावयाचें गाडगें असावयाचें. दरवाज्याबाहेर डावे बाजूला खापरी रांजणाच्या पाणईवर पाणी बहावयाचा डेरा व घागर असून पलीकडे गडगळ दगडाची उघडी न्हाणी असावयाची. उजवे बाजूला बैल वगैरे जनावरें बांधण्याकरिता आढेमेढी टाकून छपरी गोठा केलेला असावयाचा. घरांतील सर्व कामकाजांचा चेंधा उपसून पुरुषांच्या पायांवर पाय देऊन दिवसभर शेतीं काम उरकूं लागणार्‍या बायकोच्या अंगावर सुताडी धोटा वांट व चोळी, हातांत रुप्याचे पोकळ गोठ व ते न मिळाल्यास कथलाचे गोठ नि गळयांत मासा सवामासा सोन्याचें मंगळसूत्न, पायाच्या बोटांत चटचट वाजणारीं काशाचीं जोडवीं, तोंडभर दांतवण, डोळेभर काजळ आणि कपाळभर कुंकू, याशिवाय दुसर्‍या शृंगाराचे नांवानें आंवळयाएवढे पुज्य. उघडीं नागडीं असून अनवाणी सर्व दिवसभर गुराढोरांच्या वळत्या करीत फिरणार्‍या मुलांच्या एका हातांत रुप्याचीं कडीं करुन घालण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याऐवजीं दोन्ही हातांत कथलाचीं कडीं व उजव्या कानांत पितळेच्या तारेंत खरडयांच्या बाळया. याशिवाय अंगावर दुसर्‍या अलंकाराचे कंबरेला लुगडयांचे दशांचा करगोटा, खादीची लंगोटी टोपीवर फाटकेसे पागोटें, अंगावर् साधे पंचे न मिळाल्यास घोंगडी व पायांत ठिगळें दिलेला अथवा दोरीनें आवळलेल्या जोडयायांशिवाय बाकी सर्व अंग सळसळीत उघडेंबंव असल्यामुळें, त्याच्यानें अतिशय थंडीपावसाळयांत हंगामशीर शेतीं मेहनत करवत नाहीं. त्यांतून तो अक्षरशून्य असून त्यास सारासार विचार करण्याची बिलकुल ताकद नसल्यामुळें तो धूर्त भटांच्या उपदेशावरून हरीविजय वगैरे निरर्थक ग्रंथांतील भाकडकथेवर विश्र्वास ठेवून पंढरपूर वगैरे यात्ना, कृष्ण व रामजन्म व सत्यनारायण करून अखेरीस रमूजीकरीता शिमग्यांत रात्नंदिवस + + मारतां मारता नाच्यापोराचे तमाशे ऐकण्यामध्यें आपला वेळ थोडा का निरर्थक घालवितो ? त्यास मुळापासून विद्या शिकण्याची गोडी नाहीं व तो निवळ अज्ञानी असल्यामुळें त्यास विद्येपासून काय काय फायदे होतात, हें शेतकर्‍याच्या प्रत्ययास आणून देण्याचेऐवजीं शेतकर्‍यांनीं नेहमीं गुलामासारखें त्याच्या तावडींत रहावें या इराद्यानें शेतकर्‍यांस विद्या देण्याची कडेकोट बंदी केली होती. तशी जरी दुष्टबुद्धी आमचें हल्लींचें सरकार दाखवीत नाहींत; तरी त्यांच्या बाहेरील एकंदर सर्व वर्तणुकीवरून असें सिद्ध करितां येईल कीं, शेतकर्‍यांस विद्वान करण्याकरितां विद्याखात्याकडील सरकारी कामगारांचे मनांतून खरा कळवळा नाहीं. कारण आज दोनतागाईत विद्या देण्याच्या निमित्तानें सरकारनें लोकलफंड द्वारें शेतकर्‍यांचे लक्षावधी रुपये आपल्या घशांत सोडले असून, त्या ऐवजाच्या मानाप्रमाणे आजपावेतों त्यांच्यानेम शेतकर्‍यांपैकीं एकालासुद्धां कलेक्टरची जागा चालविण्यापुरती विद्या देण्यांत आली नाही. कारण खेडयापाडयांतील एकंदर सर्व शाळांनीं भट ब्राह्यण शिक्षकांचा भरणा, ज्यांची किंमत चिखलमातीचा धंदा करणार्‍या बेलदार कुंभारांपेक्षां कमी, ज्यांस शेतकर्‍यांच्या नांगरांच्या मुठी कोणीकडून धरावयाच्या, याविषय़ीं बिलकुल माहिती नसून तोंडपाटिलकी मात्न करणारे आयदी, शेतकर्‍यांचे जिवावर लालपडून आपल्या अंगीं, आम्ही सर्व मानव प्राण्यांत श्रेष्ठ, म्हणून गर्वाचा ताठा मिरवणार्‍या मगरून शिक्षकांडून त्यांच्या पूर्वजांनीं सर्वोपरी नीच केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांस शिस्तवार व सोईची विद्या देववेल तरी कशी ?कोठें जेव्हां त्यांस त्यांस शहरगांवीं चाकर्‍या मिळण्याचें त्नाण उरत नाहीं, तेव्हां ते विद्याखात्यांतील ब्राह्यण कामगारांचे अर्ज करून खेडयापाडयांनीं पंतोजीच्या चाकर्‍या करून कशी तरी आपली पोटें जाळितात. परंतु कित्येक शेतकर्‍यांचा, खेडयापाडयांनीं पाहिजेल त्या मोलमजुर्‍या करून पोटें भरीत असतां, त्यांतून फारच थोडया शेतकर्‍यांचीं मुलें कांहीं अंशीं नांवाला मात्न विद्वान झालीं आहेत. तथापि एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं ब्राह्यण विद्वानांचा युरोपियन गोर्‍या कामगारांवर पगडा पडल्यामुळें हीं शेतकर्‍यांची साडेसात तुटपुंजीं विद्वान मुलें, आपल्या इतर अज्ञानी शेतकरी जातबांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्यण कामगार कसा करितात, तो सर्व बाहेर उघडकीस आणुन सरकारचे कानावर घालण्याविषयीं आपल्या गच्च दांतखिळी बसवून, उलटें ब्राह्यणांचे  जिवलग शाळूसोबती बनून त्यांनीं उपस्थित केलेल्या सभांनीं त्यांबरोबर सरकारच्या नांवानें निरर्थ्क शिमगा करूं लागतात. अशीं सोंगें जर ब्राह्यणांबरोबर न आणावींत, तर ते लोक आपल्या पुस्तकांसह वर्तमानपत्नांनीं यांच्याविषयीं भलत्यासलत्या नालस्त्या छापून यांजवर कोणत्या वेळीं काय’ आग पाखडतील व याशिवाय, मामलेदार, शिरस्तेदार, माजिस्ट्रेट, इंजिनीयर, डॉक्टर, न्यायाधीश वगैरे ब्राह्यण कामगार असून अखेरीस सरकारी रिपोर्ट्र जरी, धर्मानें खिस्ती तथापि हाडाचा बाह्यण, या एकंदर सर्व ब्राह्यण कामगारांचा सरकारी खात्यांनीं भरणा असल्याकारणामुळें, ते या तुटपुंज्या साडेसातीस आपलाल्या कचेर्‍यांनीं भलत्या एखाद्या सबबीवरून उभे न करितां, एखादे वेळीं त्यांचा डाव साधल्यास यांच्या पोटावर पाय देतील, या भयास्तव हे आपल्या मनांतून ब्राह्यण कामगारांचें नांव ऐकल्याबरोबर टपटपा लेंडया गाळितात; इतकेंच नव्हे, परंतु कित्येक विद्वान भटब्राह्यण सोंवळयाओवळयाचा विधिनिषेध न करितां या या साडेसाती चोंबडया शूद्र विद्वानांच्या उरावर पाय देऊन विलायतेस जाऊन परत आल्याबरोबर पुनः यांच्या-समक्ष आपल्या जातींत मिळून वावरत आहेत. तथापिया साडेसात शेळीच्या गळयांतील गलेल्या, आपल्या अज्ञानी आप्तबांधव शेतकर्‍यांसमोर निर्लज्ज होऊन भटब्राह्यणांस आपले घरीं उलटे बोलावून, त्यांच्या हातून नानाप्रकारचे विधी करून त्यांच्या पायांचीं तीर्थे प्राशन करितात, या कोडगेपणाला म्हणावें तरी काय ? कदाचित्‌ सरकारी ब्राह्यण कामगारांचे आश्रयावांचून यांचीं पोटें भरत नाहींत म्हणून म्हणावें, तर गांवांत थोडी का + + पोट भरितात ! ! असो, हल्लीं शेतकर्‍यांची निहारी, शिळया तुकडयांवर लाल चटणीचा गोळा, दुपारीं ताज्य भाकरीबरोबर आमटी अथवा सांडग्याचें खळगुट; रात्नी निवळ वरणाचे पाण्यांत जोंधळयाच्या अथवा मक्याच्या कण्या, मध्यें कधीं गाजरें अथवा रताळीं पिकल्यास त्यांच्या वरूवर गुजारा करावा लागतो, तरी त्यांस नेहमीं वेळच्या वेळीं पोटभर भाकरी मिळावयाच्या नाहींत, यास्तव मध्येंच एखादे वेळीं भूक लागल्याबरोबर औत उभें करून हिरव्यासरव्या आंब्याच्या कैर्‍या, भोंकरें, उंबरे, गाभुळल्या चिंचा वगैरे शेताच्या आसपास जो कांहीं खाण्याचा पदार्थ हातीं लागेल, तो खाऊन त्यावर ढसढसा पाणी पिऊन पुन्हा आपले औत हाकावयास जातो, व ज्या वेळीं पोटभर भाकरी मिळतात, त्या त्या वेळीं तो त्या आधाशासारख्या खातां खातां मध्यें कधीं पाणी पीत नाहीं,यामुळें त्यास सर्व दिवसभर किरमिट ढेंकर वगैरे येऊन मोडशी विकारानें त्यास नानाप्रकारचे रोग होतात व त्यांचे शमनार्थ दमडीचा ओंवा अथवा सुठसाखर मिळण्याची भ्रांती ! यामुळें हिंवतापाच्या आजारानें अखेरीस यमसदनास जावें लागतें. सणावारास कित्येकांचे घरीं उत्तम पक्वान्न म्हटलें म्हणजे गुळवण्याबरोबर पुरणाच्या पोळया, तोंडीं लावण्याकरितां तेलांत तळलेल्या कुरडया, पापडया व फुरफुरीं व शेवटीं आमटीबरोबर भात. बहुतेकांचे घरीं डाळरोटया व तोंडीं लावण्याकरिता सांडग्यांचे कोरडयास. बाकी उरलेल्या कंगाल शेतकर्‍यांस गुजरमारवाडयांनीं उधार सामुग्य्रा न दिल्यास ते नाचणी अथवा ज्वारीच्या भाकरीवर कशी तरी वेळ मारून नेतात यास्त्व बहुतेक शेतकर्‍यांनीं आपल्या मुलीबद्दल निदान पांचपंचवीस रुपये घेतल्याशिवाय त्यांस त्यांचीं लग्नें करून देतां येत नाहींत, त्यांतून अट्टल कर्जबाजारी शेतकर्‍यास बाह्यण अथवा मारवाडी सावकारांनीं त्यांचे मुलांच्या लग्नाकरितां कर्ज न दिल्यास, कित्येक मुलें भर ज्वानींत आल्याबरोबर त्यापैकीं कित्येक तरून निराळया मार्गानें मदाग्नि शांत करूं लागल्यामुळें त्यांस क्षयाच्या बाधा होऊन वायां जातात. त्याविषयीं नामांकित डाक्तर विद्वानांच्या पुराव्यासहित मी पुढें एखादे वेळीं आसुडाच्या पुरवणीदाखल शेतकर्‍यांचें थापटणें या नांवाचा एक स्वतंत्न निबंध करून आपल्यापुढें सादर करीन. कित्येक तरूण निःसंग होऊन चोरीछापीनें काडीमहालांतील खाटल्यावर जाऊन खटपटी करूं लागल्यामुळें थोडयाच दिवसांत ते कैलासवासी होतात व बाकी उरलेलीं, चोर, बंडखोरांचे नादीं लागून आपल्या जिवास मुकतात, व ज्यास नवरीच्या वापास देण्यापुरतें कर्ज मिळून उभे केलेल्या लग्नांत शेतकर्‍याजवळ पुरते पैसे नसल्यामुळें एकंदर सर्व माळी, कुणबी व धनगरांपैकीं तरूण दिवसां शेतकामें करून सर्व रात्नभर जात्यावर बसून एकमेकांच्या मांडयांशीं मांडया भिडवून हिजडयासरखीं बायकांचीं गाणीं गाऊन गहूं, ज्वारी दळून बाकी सर्व लहानमोठीं कामें करूं लागतात, त्याचप्रमाणें गांवांतील तरूण स्त्निया वरमाईस बरोबर घेऊन कांदे चिरून, हळकुडें फोडून भाजल्या बाजरीचा वेरूवार, हळद, चिकसा द्ळून काढितात. यामुळें सदरच्या पदार्थांची घाण, रात्नंदिवस काम करणार्‍या वरमाईच्या हिरव्या रंगाच्या, पातळाच्या घाणीमध्यें मिसळून तिच्या सर्व अंगाची इतकी उबट दुर्गंधी चालते कीं तिजपासून जवळच्या मनुष्यास फार त्नास होतो. त्याच्या घरापुढें अंगणांत लहानसा लग्नमंडप शेवरीच्या मेढीं रोवून त्यांजवर आडव्या तिडव्या फोंकाठयावर आंब्याचे टहाळे टाकून नांवाला मात्न सावली केली असते, ढोलकी अथवा डफडयाचे महारमांगाचे वदसूर वाजंत्न्याची काय ति मौज ! नवर्‍या मुलास गडंगनेर म्हटलें म्हणजे पितळीमध्यें अर्ध पावशेराच्या भातावर थोडासा गूळ व नखभर तूप घातलें कीं, नवर्‍या मुलीमुलांबरोबर फिरणारीं मुलें लांडग्यासारखीं घांसामागें घांसाचे लचके मारून एका मिनिटांत पितळी चाटून पुसून मोकळी करितात. लग्नांतील भोजनसमारंभ रस्त्यावर हमेशा बसावयाकरितां पडदा अंथरल्याशिवाय पंगत पडावयाची. देवकार्याचे दिवशीं सर्वांनीं आपआपल्या घरून पितळया घेऊन आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी,कण्या अथवा बाजरीच्या घुगर्‍याबरोबर सागुतीचे बरवट, ज्यामध्यें दर एकाच्या पितळींत एकदां चार अथवा पांच आंतडींबरगडयाचे रवे पडले म्हणजे जेवणारांचें भाग्य, कारण एकंदर सर्व बकर्‍याचीं मागचीं पुढचीं टिंगरें दोनदोन तीनतीन दिवस पुढें घरांतील वर्‍हाडांसहित मुलांबाळांस तयार करून घालण्याकरितां घरांत एका बाजूला टांगून ठेवितात गांवजेवणांत बाळल्याचिळल्या इस्तार्‍यांवर थोडयाशा भातांत उभे केलेल्या द्रोणांतील गुळवण्यांत, तेलांत तळलेल्या तेलच्या कुसकरून खातां खातां, गाजरें अथवा बटाटयाची भाजी तोंडीं लावून अखेरीस हुंदाडयाबबरोबर शेवटचा भात खाऊन वरतीं तांब्याभर पाणी पिऊन डरदिशीं ढेंकर दिले कीं, शेतकर्‍यांचे जेवण संपले, त्या सर्व जेवणामध्यें हजार मनुष्यांमागें दमडीचेंसुद्धां तूप मिळावयाचे नाहीं. अशा थाटाचीं शेतकर्‍यांत लग्ने होत असून येथील एकंदर सर्व गैरमाहित शहाणे ब्राह्यणांतील विद्वान, आपल्या सभांनीं लटक्यामुटक्या कंडया उठवून कारभारींस सुचवितात कीं, शेतकरी आपले मुलाबाळांचे लग्नांत निरर्थ्क पैसा खर्च करितात. यामुळें ते कर्जबाजारी झाले आहेत. अहाहा ! हे सार्वजनिक पोंकळ नांवाच्या समाजांत, एकतरी मांगमहार शेरकर्‍यास त्या समाजाचा सभासद करून त्यास आपल्या शेजारीं कधींतरी घेऊन बसले होते काय ? अथवा यांच्यांतील गांवोगांव वेदावर पांडित्य करणार्‍या गृहस्थांपैकीं एखाद्या स्वामीनें तरी उघड जातीभेदाच्या उरावर पाय देऊन शूद्राच्या पंक्तींस बसून तेथील एखादा बरबटाचा फुरका मारून शेतकरी खर्चीक म्हणून म्हणावयाचें होतें. हे नाटकांतील फार्सात लाडकीचं सोंग घेऊन तंबुरीचे खुंटे करून शेतकर्‍याचीं जात्यावरील गाणीं गाऊन मजा करून सोडितात; परंतु यांला आपले मुलाबाळांचे लग्नांत पल्लोगणती बाजरी गहूं दळतांना कोणी पाहिलें असल्यास त्यानें येथें उभें राहून सर्वास कळविल्यास मी त्यांचा आभार मानीन. हे कधीं तरी शेतकीचीं कामें स्वतः हातांनी करितात काय ? त्यांना शेतकीचा इंगा माहित आहे काय ? असो, परंतु शेतकरणीसारख्या यांच्या घरांतील स्त्निया आपल्या घरांतील शेणशेणकूर करून शेतीं नवर्‍याबरोबर पाभारीमागें तुरी वगैरे मोधून शेतीं खुरपण्याकाढण्या वगैरे करूं लागून खळयावर कणसें मोडून तिवडयाभोंवतीं गंज करून मळणी होतांच दाणे उपणतांना वावडयावर पुरुषास उपणापाटया उरापोटावर उचलून देऊन, डोईर राखराखुंडा, शेण, सोनखताचे पाटयांचीं व काडयागवत वगैरे भुसकटांचीं ओझीं वाहून, उन्हाळयात शेतीं काम कमी असल्यामुळें सडकेवर खडी फोडून दिवसभर मोलमजुरी करून, आपल्या भटभिक्षुक ततीस अशा तर्‍हेच्या मदती करीत नसून दररोज सकाळीं निजून उठल्याबरोबर वेणीफणी करून, घरांतील सडासारवण, स्वयंपाक व धुणेंधाणें आटोपून सर्व दिवसभर पोथ्यापुराणें ऐकत बसून लग्नसमयीं जात्याच्या खुंटयाला हात न लावितां अंगावर शालजोडया घेवून पुढें शेतकर्‍यांच्या बायकापोरींच्या डोक्यावर रुखवतांच्या शिपतरांची धिंड काढून शूद्रांनीं हातीं धरलेल्या अबदागिरीखालीं मशालीचे उजेडांत, पायांत जोडे घालून शृंगाराच्या डौलांत मोठया झोंकानें मिरविणार्‍या असून, या कुभांडयासरखे शेतकरी आपल्या मुलाबाळांच्या लग्नमंडपांत विजेची रोषणाई करून आपल्या जातबांधवांस मोठमोठाल्या रकामांची उधळपट्टी करून तूपपोळया व लाडूजिलब्यांचीं प्रयोजनें घालून फक्त भटब्राह्यणांच्या सभा भरवून त्यांस शेंकडों रुपये दक्षिणा वाटून आपल्या घराण्यांतील गरती सुनाबाळांची परवां न करितां त्यांच्यासमोर निर्लज्ज होऊन गांवांतील वेसवा-कसबिणींच्या नाचबैठकांत बसून त्यांचीं वेडीविद्रीं गाणीं ऐकल्यानंतर त्यांस मन मानेल तशा बिदाग्या देत नाहींत, संणावारांस कां होईना, शेतकरी आपल्या आल्या जन्मांतून एकदां तरी आपल्या खोपटांत घीवर, चुरमा, जिलब्या, बासुंदी, श्रीखंड अथवा बुंदीचे लाडू कुटुंबांतील मुलांबाळांस घालण्यापुरतें, त्यांजवळ यांनीं व गोर्‍या कामगारांनीं, कांहीं तरी त्नाण ठेविलें आहे काय ? या वाचाळांच्या तोंडाला कोणी हात लावावा ? अहो, यांच्या धूर्त पूर्वजांनीं मनू वगैरे धर्मशास्त्नांतील घाणेरडया ग्रंथांत जाविभेदाचें थोतांड उभें करून, उलट शेतकर्‍यांनों इंग्रज लोकांस जर नीच मानणार्‍या प्यादेमातीचा डाव मांडून ठेविला नसता, तर आज सर्वांचेसमोर एक अपूर्व चमत्कार करून दाखविला असता. तो असा कीं. गव्हरनरसाहेबांच्या स्त्निया मखमलीच्या फुलासारख्या नाजूक असल्यामुळें त्यांस तर या कामीं तसदी न देतां, दहापांच युरोपियन कलेक्टसाहेबांच्या मडमांस त्यांच्या मुलाबाळांसहित जर शेतकर्‍यांचे लग्नात आमंत्नणें करून आणिल्या असत्या व त्यांस शेतकर्‍यांचे स्त्नियांबरोबर लग्नांतील सर्व कामें आटोपावयास लाऊन मुख्य वर्‍हाडणी केल्या असत्या, तर त्यांनीं येथील दुर्गधी, खाण्यापिण्याचा थाट, अंथरुणाचा बोभाट व बाज्या भराड-गोंधळाचा किलकिलाट वगैरे अब्यवस्था पाहून दुसरे दिवशीं सकाळींच तेथून आपलीं मुलेंलेंकरें जागचे जागीं टाकून पळून गेल्या नसल्या, तर या धूर्तांनीम माझें नांब बदलून ठेवावें, अशी मी भर सभेंत चक्रीदार पागोटीं घालून हातांत वेळूच्या पिंवळया काठया घेऊन फिरणार्‍या अजागळ शूद्र चोंबडया चोपदारासमोर मिशांवर ताव देऊन छातीला हात लाऊन प्रतिज्ञा करितों, या उभयतां काळया व गोर्‍या कामगारांनीं रात्नंदिवस मौजा मारण्याकरितां विलायत सरकारची नजर चुकावून अज्ञानी शेतकर्‍यांवर नानाप्रकारच्या भलत्मासलत्या बाबी बसवून त्यास इतका नागवा उघडाबंब केला आहे कीं, त्याला एजंट व गव्हरनरसाहेबांस आपल्या दरबारांत पानविडयाकरितां आमंत्नण करून बोलावण्याची शरम वाटते. अरे, ज्यांचे श्रमांवर सरकारी फौजफाटा, दारूगोळा, गोर्‍या कामगारांचा वाजवीपेक्षां जास्ती ऐषआराम व काळया कामगारांचे वाजविपेक्षां जास्ती पगार, पेनशनीव सोंवळेचाव असून, त्यांस चारचौघांत पानविडयापुरता मान मिळूं नये काय ? अहो,जो सर्व देशांतिळ लोकांचे सुखाचा पाया, त्यचे असे बुरे हाल ! ज्यास वेळचे वेळीं पोटभर भाकर व अंगभर वस्त्न मिळत नसून,ज्याचे उरावर सरकारी पट्टी देण्याची कटार लोंबत आहे, जाच्या हालास साहेब लोकांचा शिकारी कुत्नासुद्धां हुंगून पाहीना, याला म्हणावें तरी काय ? ज्यास मुळींचे आपल्या लीपींतीळ मूळाक्षरसुद्धां वाचतां येत नाहीं. त्यानें शेतकी-संबंधीं अन्य भाषेंतील ग्रंथ वाचून शेतसुधारणा तरी कशी करावी ? ज्यास नेहमीं फाके चालले आहेत, त्यानें आपलीं मुलें परगांवीं मोठमोठया शहरांतील ऍग्रिकलचर शाळेंत शिकण्याकरितां कशाच्या अथवा कोणाव्या आधारावर पाठवावीं ?

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP