मूळस्तंभ - अध्याय १६

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥

शंभु म्हणे हो पार्वती ॥ ऐक आतां द्वापाराची स्थिती ॥ तेथें अवतार जाहले किती ॥ आणि राजे तें सांगतों ॥१॥

कृष्णपक्ष माघमास ॥ अमावास्या सोम्य दिवस ॥ तैं प्रारंभ द्वापारास ॥ झाला जाण आदिशक्ति ॥२॥

त्या द्वापाराचें प्रमाण ॥ ऐक देवी चित्त देऊन ॥ आठ लक्ष चौसष्ट सहस्त्र जाण ॥ संख्या असे वर्षाची ॥३॥

आणि त्या युगाभीतर ॥ राजे झाळे कोण कोण वीर ॥ सोमवंशस्य पराक्रमी थोर ॥ ते ऐक सांगतों ॥४॥

आदिपुरुष श्रीभगवान ॥ तयापासुनी चतुरानन ॥ ब्रह्ययापासोनि तपोधन ॥ अत्रिऋषी जन्मला ॥५॥

आत्रीपासुनी सोम जन्मला ॥ सोमापासुनी पुरुरवा झाला ॥ पुढें गविटाल जन्मला ॥ गविटालाचा अपान ॥६॥

त्याचा निघोट त्याचा अर्जुन ॥ तयापासून वोचू जाण ॥ अनुश्रद्वा त्यापासून ॥ तत्पुत्र जाण लघुराजा ॥७॥

लघुपासून परवुभूप ॥ त्यापासूनि जाण सुधारप ॥ पुढें अजयानंद , जनरुप ॥ शंतनु , पराशर , कृशा ॥८॥

दीनपू , पंडू , अर्जुन , अभिमन्यु ॥ परिक्षिती , जन्मेजय , शांतनु ॥ सहस्त्रार्जुन , पुढें वेणू ॥ वत्सराज , नरवाहन ॥९॥

क्षेमक , अजारपण , कामरुप ॥ अधीनन , अस्तलभ्य भूप ॥ याताकर , महारथ , जयरुप ॥ प्रभातु एकुणचाळीसावा ॥१०॥

हे एकुणचाळीस परियेसीं ॥ द्वापारी झाले सोमवंशीं ॥ महाप्रताप धर्मराशी ॥ पार्वती वो ॥११॥

या युगामाझार ॥ सात ताल्ल उंच नर ॥ आणि अंबरीं अठरा सहस्त्र ॥ ग्रहणें जाहली ॥१२॥

तैं षोडशसहस्त्र हत्तिचें बळ ॥ एका नरासी होतें तुंबळ ॥ आणि धर्माचा द्विभाग सकळ ॥ जाण देवे ॥१३॥

तै एकएका मनुष्यातें ॥ सहस्त्रवर्षे आयुष्य होतें ॥ आणि शतवर्षाची अपत्यें ॥ स्तनपान करिती ॥१४॥

तैं पुण्य होतें विस्वे दहा ॥ तैसेचि पापही विस्वे दहा ॥ ऐसे द्वापारी समान पहा ॥ पापपुण्य ॥१५॥

तैं सोमवंशी धर्मस्थापना ॥ महाकाळ कल्पना जाणा ॥ गंगा तीर्थ विष्णुस्थापना ॥ जाहली देवी ॥१६॥

तैं अनेक धर्म प्रवर्तत ॥ ऐसे राजे होते बहुत ॥ दैत्य उदेले असंख्यात पृथ्वीवरी ॥१७॥

तिहीं पृथ्वी गांजिली देखुनी ॥ भार फेडावयास चक्रपाणी ॥ करिता झाला कय करणी ॥ ती ऐकें ॥१८॥

आदिपुरुष श्रीभगवान ॥ अवतार धरिले तयानें ॥ कृष्ण बौद्व ऐसे दोन ॥ ते ऐक देवी ॥१९॥

आतां आठवा अवतार ॥ श्रीकृष्णरुपें सर्वेश्वर ॥ श्रावण मास बुधवार ॥ कृष्णपक्ष अष्टमी ॥२०॥

रोहिणी दिवसनक्षत्रीं ॥ चंद्रोदयीं मध्यरात्री ॥ कंसाच्या बंदीशाळेभीतरीम ॥ अवतरला ॥२१॥

देवकी जननी वसुदेव पिता ॥ संदीपन गुरु लक्ष्मी कांता ॥ क्षेत्र मथुरा देवकीभ्राता ॥ कंसासुर मारिला ॥२२॥

आणि सोडविले मातापितर ॥ सुखी केले सुर भूसुर ॥ धर्म स्थापिला निरंतर ॥ ऐसा अवतार तो झाला ॥२३॥

आतां नवम अवतार ॥ बौद्वरुपें परम सुंदर ॥ अज अजित परात्पर ॥ घेई पैं ॥२४॥

माता सावित्री पिता सुमु ॥ राणी वैसावती गुरु निरोपमु ॥ क्षेत्र गंगापुरी महाभीमु ॥ खापरासुरनामक ॥२५॥

त्या दैत्यासी निर्दाळीलें ॥ सर्व सुरांसी सोडविले ॥ आणि सर्व जग सुखी केलें ॥ ऐसा नवम अवतार ॥२६॥

तैं चर्मगत प्राण होते ॥ पृथ्वी एकदां वाफिजेते ॥ आणि एकवीस वेळा पिकते ॥ वनस्पति सदाफळ ॥२७॥

तैं पूर्ण अतीतधर्म होते ॥ गंगाप्रांतीं रहात होते ॥ स्त्रिया मानिती भ्रतारातें ॥ देवासम ॥२८॥

मागल्या दोयुगांभीतरीं ॥ देवे कष्ट भोगिले भारी ॥ मग द्वापारी नानानटधारी ॥ भोग भोगी नारायण ॥२९॥

जें जें धरी ह्रदयांत ॥ तें तें खेळे अपरिमित ॥ तें मी सांगेन समस्त ॥ जाण देवी ॥३०॥

ऐसी द्वापारीचीम स्थिती ॥ यथार्थ सांगितली तुजप्रती ॥ आतां कलियुगाची सांगेन स्थिती ॥ म्हणे महादेव ॥३१॥

इति श्रीमूळस्तंभे शिवपार्वतीसंवादे द्वापारयुगवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

श्रीरस्तु ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP