अध्याय पंचवीसावा - श्लोक २०१ ते २६३

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


म्हणे बाण येतात कोठुनी ॥ संधानकर्ता न दिसे नयनीं ॥ जरी प्रगट दिसे समरांगणीं ॥ तरी बाणी वरी फोडोन ॥१॥

ओढवलें परम दुस्तर ॥ कित्येक उडाले ऊर्ध्व वानर ॥ शोधिलें बहुत अंबर ॥ परी तो वीर दिसेना ॥२॥

वानर आले परतोन ॥ अवघे पाहाती म्लानवदन ॥ रामलक्ष्मणासी बाण ॥ बहुसाल खडतरले ॥३॥

ते समयीं मूर्च्छा येऊन ॥ भूमीवरी पडले दोघेजण ॥ तों इंद्रजित बोले वरून ॥ कां निवांत राहिलां ॥४॥

मारूनियां दूषण खर ॥ शिळीं बांधिला सागर ॥ म्हणवितां क्षत्रिय राजकुमार ॥ कां रे शर सोडाना ॥५॥

वरकड कपींवर बाण ॥ शक्रजितें टाकिले वरून ॥ तरू उन्मळती मुळींहून ॥ हरिगण तैसे पडियेले ॥६॥

किंशुक फुलतां बहुत ॥ सिंदुरवर्ण दिसे पर्वत ॥ तैसीं कपींची शरीरें आरक्त ॥ असंख्यात पडियेली ॥७॥

शक्रजित खालीं उतरून ॥ मुख्य जे पडले राक्षसगण ॥ त्यांचीं कुणपें उचलून ॥ लंकेसी नेता जाहला ॥८॥

जयवाद्यांचा होतां घोष ॥ परम आनंदला लंकेश ॥ हृदयीं आलिंगोनि पुत्रास ॥ म्हणे धन्य मी तुझेनि ॥९॥

त्रिजटेस म्हणे रावण ॥ पुष्पकीं सीतेसी बैसवून ॥ दृष्टीस दावीं सकळ रण ॥ रामसौमित्रांसमवेत ॥२१०॥

त्यांचीं विलोकितां प्रेतें ॥ मग ती वश होईल आम्हांतें ॥ अवश्य म्हणोनी जानकीतें ॥ विमानीं बैसवी त्रिजटा ॥११॥

सकळ मंडळ विलोकित ॥ तों अनुजासहित रघुनाथ ॥ दृष्टी देखतां मूर्च्छित ॥ जनकात्मजा पडियेली ॥१२॥

मग त्रिजटेनें सीता धरूनी ॥ उठवोनि बैसविली सांवरूनी ॥ म्हणे माये धैर्य धरी मनीं ॥ चापपाणि उठेल आतां ॥१३॥

तंव ते बिभीषणाची राणी ॥ सरमा जवळी गुप्त येउनी ॥ विदेहतनयेचे कर्णीं ॥ निजगुज सांगतसे ॥१४॥

म्हणे जगन्माते धरी धीर ॥ आता उठतील रामसौमित्र ॥ संहारितील सकळ असुर ॥ आन विचार येथें नाही ॥१५॥

मी अनृत बोलेन साचार ॥ तरी माझें खालीं पडेल शिर ॥ माझे पूर्वज अपार ॥ नरक भोगितील आकल्पवरी ॥१६॥

त्रिजटा म्हणे जानकीसी ॥ माते चिंता न करी मानसीं ॥ पुष्पक अशोकवनासी ॥ वेगेंकरून पातले ॥१७॥

सीतेस बैसवून स्वस्थानीं ॥ करी मानसीं ॥ पुष्पक अशोकवनासी ॥ वेगेंकरून पातलें ॥१७॥

सीतेस बैसवून स्वस्थानीं ॥ त्रिजटा सांगे रावणालागुनी ॥ म्हणे सीतेचिया सत्वा हानी ॥ कल्पांतीही नव्हेचि ॥१८॥

मग त्रिजटा परतोनि ॥ सीतेपासी बैसें येऊनी ॥ जैसी चित्तवृत्ति मुरडोनी ॥ स्वरूपीं पावे विश्राम ॥१९॥

सरमा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं चिंता कांही न करी मनी ॥ पुराणपुरुष चापपाणी ॥ त्याची करणी जाणसी तूं ॥२२०॥

आपुला प्रताप विशेष ॥ वाढवावया अयोध्याधीश ॥ आधीं शत्रूस दिधलें यश ॥ कांही एक आरंभी ॥२१॥

हे ब्रह्मांड सकळिक ॥ बाणीं जाळील रघुनायक ॥ तेथें इंद्रजित मशक ॥ उशीर काय वधावया ॥२२॥

रावण कुंभकर्ण इंद्रजित ॥ तोचि ही बाहुलीं निर्मित ॥ खेळ मांडिला जो अद्भुत ॥ जाणसी समस्त तुझें तूं ॥२३॥

निशा संपतां चंडकिरण ॥ उगवे की नुगवें म्हणोन ॥ या चिंतेचें कारण ॥ कांही नाही जाणपां ॥२४॥

करितां रामनामस्मरण ॥ पापें जाती न जाती जळोन ॥ या संदेहाचें कारण ॥ कांहीच नसे जाण पां ॥२५॥

हृदयीं प्रगटतां शुद्ध ज्ञान ॥ चुके कीं न चुके जन्ममरण ॥ या चिंतेचें कारण ॥ काहीच नाही जाण पां ॥२६॥

क्षमा शांति धरितां जाण ॥ कलह होय न होय म्हणोन ॥ या चिंतेचें कारण ॥ कांहीच नाही जाण पां ॥२७॥

अयोध्यानाथ रघुनंदन ॥ यासी जय कीं अपजय म्हणोन ॥ या चिंतेचें कारण ॥ कांहीच नसे जाणपां ॥२८॥

ज्या रामाचे करितां स्मरण ॥ भक्त पावती जयकल्याण ॥ तो जगदानंद पूर्ण ॥ विजयी असे जानकी ॥२९॥

असो इकडे बिभीषण ॥ सूर्यसुतासी बोले वचन ॥ म्हणे राक्षस पर्वत आणून ॥ रामावरी टाकितील ॥२३०॥

उदय पावे जंव गभस्ती ॥ तंव जतन कराव्या दोनी मूर्ति ॥ बोल बोलतां अश्रु स्रवती ॥ रावणानुजाचे तेधवां ॥३१॥

मग जिवंत होते जे वानर ॥ त्याही पुच्छमंडप करूनि सत्वर ॥ दोन्ही स्वरूप सुकुमार ॥ रक्षिली तेव्हां अंतरीं ॥३२॥

कीं पुच्छेपेटी करून ॥ ब्रह्मादि देवांचे देवतार्चन ॥ वानर बैसले सांठवून ॥ सभोंवते सद्रद ॥३३॥

सूर्यवंशमंडण दशरथ ॥ त्याचे महत्पुण्याचा पर्वत ॥ तो वानरीं वेष्टूनि बहुत ॥ चिंताक्रांत बैसले ॥३४॥

मारुति बिभीषण रण शोधित ॥ तों महावीर पडले बहुत ॥ एक नेत्र उघडोनि पुसत ॥ बिभीषणाप्रती ते काळीं ॥३५॥

म्हणती या चराचराचें जीवन ॥ तो सुखी आहे कीं रघुनंदन ॥ सद्रद होऊन बिभीषण ॥ म्हणे चिंता न करावी ॥३६॥

तों घायें जांबुवंत विव्हळत ॥ बिभीषणासी जवळी बोलावित ॥ पुसे क्षेम आहें की रघुनाथ ॥ पुराण पुरुष जगदात्मा ॥३७॥

स्फुंदस्फुंदोनि सांगे बिभीषण ॥ नागपाशीं बांधिले दोघेजण ॥ तों मूर्च्छना सांवरून सुषेण ॥ नेत्र उघडोनि बोलत ॥३८॥

म्हणे द्रोणाचळीं औषधी बहुत ॥ जरी कोणी आणील बळवंत ॥ तरी रामसौमित्रांसहित ॥ दळ अवघें उठवीन ॥३९॥

मग बोले बिभीषण ॥ ऐसा बळिया आहे कोण ॥ रात्रीमाजी जाऊन ॥ औषधी येथें आणील ॥२४०॥

जांबुवंत बोले वचन ॥ एक सीताशोकहरण ॥ त्यावांचूनि गिरी द्रोण ॥ आणूं कोणी शकेना ॥४१॥

मग सुषेण आणि जांबुवंत ॥ बिभीषण तयांसी हातीं धरित ॥ श्रीरामापाशीं बोलत बोलत ॥ येते जाहले तेधवां ॥४२॥

तंव रण शोधूनि हनुमंत ॥ तोही तिकडोनि आल त्वरित ॥ याउपरि किष्किंधानाथ ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४३॥

म्हणे रामसौमित्रांसी उचलून ॥ जा तुम्ही किष्किंधेसी घेऊन ॥ मी रावणा सहकुळीं मारून ॥ घेऊन येईन जानकी ॥४४॥

राज्यीं स्थापीन बिभीषण ॥ बंदींचे सोडवीन सुरगण ॥ राहूं मी आणि वायुनंदन ॥ सर्वीं परतोन जावें आतां ॥४५॥

तेव्हां सोडवीन सुरगण ॥ राहूं मी आणि वायुनंदन ॥ सर्वीं परतोन जावें आतां ॥४५॥

तेव्हां आकाशीं वदे देववाणी ॥ आतांचि उठेल चापपाणी ॥ नेत्र उघडिले तये क्षणीं ॥ अयोध्याधीशें सत्वर ॥४६॥

भोंवतें पाहे राघवेश ॥ तों निकट बैसले निजदास ॥ मानस वेष्टोनि राजहंस ॥ बैसती जैसें प्रीतीनें ॥४७॥

कीं कमळवेष्टित भ्रमर ॥ कीं अहिवेष्टित मलयागर ॥ कीं दिव्यमुक्ताभोंवतें चतुर ॥ परीक्षक जेंवी मिळती ॥४८॥

असो सुग्रीवास म्हणे रघुनंदन ॥ बारे तूं आपुला दळभार घेऊन ॥ किष्किंधेसी जाई परतोन ॥ येथे दोघे राहू आम्ही ॥४९॥

ऐसें उदास बोले रघुनाथ ॥ सर्वांसी आले अश्रुपात ॥ सुग्रीव सद्रद बोलत ॥ म्हणे विपरीत केवी घडे ॥२५०॥

सांडोनियां दिनपती ॥ किरणें कोणीकडे जाती ॥ कनकावेगळी कांती ॥ कल्पांतीहि नव्हेची ॥५१॥

घटास मृत्तिका सांडूनी ॥ कोणीकडे राहील भिन्न ॥ पटास तंतु त्यागोन ॥ वेगळा नोहेच सर्वथा ॥५२॥

लहरी सागरासी सांडूनी ॥ काय बैसतील काननीं ॥ तुज सांडून चापपाणी ॥ आम्हीं केवीं राहावें ॥५३॥

बिभीषण म्हणे अयोध्यापती ॥ जरी तमकूपी पडेल गभस्ती ॥ शेषही सांडील जगती ॥ परी सामर्थ्य तुझें उणे नोहे ॥५४॥

रसहीन बोलती मात ॥ जे न मानिती रणपंडित ॥ तों नवल वर्तलें अद्भुत । वायु गुप्तरूपें पैं आला ॥५५॥

सीतावल्लभाचे कर्णीं ॥ गरुडमंत्र गेला सांगोनी ॥ रघुवीरें जपतांचि ते क्षणीं ॥ सुपर्ण वेगें धांविन्नला ॥५६॥

जैसी आंगीं केश अमूप ॥ तैसे रामासी जडले सर्प ॥ तो विष्णुवहनप्रताप ॥ देखतां सर्प पळाले ॥५७॥

तात्काळ उठले रामसौमित्र ॥ अष्टादशपद्में वानर ॥ उठोनि करिती भुभुःकार ॥ तेणें लंकानगर दणाणिलें ॥५८॥

निरभ्र नभीं दिसे दिनकर ॥ तैसे देदीप्यमान रामसौमित्र ॥ देव करिती जयजयकार ॥ सुमनसंभार वर्षती ॥५९॥

सुग्रीवादि कपि बोलती ॥ आजि लंका घालूं पालथी ॥ कोदंड चढवूनि सीतापती ॥ अरिपंथ लक्षीतसे ॥२६०॥

युद्धकांड रसभरित ॥ जेथें वीररसचि अद्भुत ॥ ते कथा ऐकतां समस्त ॥ शत्रुक्षय होय पैं ॥६१॥

ब्रह्मानंदा श्रीरघुवीरा ॥ दशमुखांतका समरधीरा ॥ भक्तपाळका श्रीधरवरा ॥ निर्विकारा अभंगा ॥६२॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकीनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ पंचविंशतितमोध्याय गोड हा ॥२६३॥

अध्याय ॥२५॥ ओंव्या ॥२६३॥

श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु श्रीमज्जगदीश्र्वरार्पणमस्तु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP