अध्याय पंचवीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

पूर्वीं क्षीरसिंधु मंथूनि ॥ चतुर्दश रत्नें काढिली निवडूनि ॥ तैसा रामकथार्णव शोधूनी ॥ रामविजय काढिला ॥१॥

दह्याचें पोटीं निघे नवनीत ॥ कीं स्वातीतोयापासाव मुक्त ॥ तैसा दशरथापासाव रघुनाथ ॥ महिमा अद्भुत तयाचा ॥२॥

कीं ज्ञानापासोनि शांति ॥ कीं शांतीपासोनि विरक्ति ॥ कीं विरक्तिपासोनि निवृत्ति ॥ पद विशेष पाविजे ॥३॥

तैसा वाल्मीकमतीचा विस्तार ॥ तो हा रामकथाब्धि साचार ॥ याचा पावावया पैल पार ॥ वक्तयासी शक्ति नव्हेंचि ॥४॥

जो पीडिला दरिद्रेंकरून ॥ त्यास मार्गीं सापडें बहुत धन ॥ परी तो यथाशक्तीकरून ॥ मोट बांधी जैसी कां ॥५॥

तैसा यथामती करून ॥ रामविजय निवडिला पूर्ण ॥ असो पूर्वाध्यायीं वालिनंदन ॥ रावणासन्मुख बैसला ॥६॥

मुकुटावरी शोभे दिव्य मणी ॥ तैसा अंगद विराजे पुच्छासनीं ॥ म्हणे दशमुखा ऐकें श्रवणीं ॥ शब्दरत्नें अति सुरस ॥७॥

नरदेहासी येऊन पाहीं ॥ कीर्ति उरवावी भुवनत्रयी ॥ जेणें धन्य धन्य सर्वही ॥ बहुकाळ मागें म्हणतील ॥८॥

विवेकसद्बुद्धीच्या बळें ॥ दुर्बुद्धि त्यजावी कुशळें ॥ संतसंगती रसाळें ॥ वचनें हृदयी धरावीं ॥९॥

कोणाचें हेळण न करावें ॥ दुष्ट वचन न बोलावें ॥ पराचे गुण जाणोनि बरवे ॥ परोपकार करावा ॥१०॥

ज्याची वर्तणूक देखोन ॥ संतुष्ट होती ब्राह्मण ॥ ते सदा चिंतिती कल्याण ॥ तरीच धन्य संसारीं ॥११॥

सर्वांभूतीं जगन्निवास ॥ यास्तव न कीजे कवणाचा द्वेष ॥ वर्मस्पर्शाचे शब्द सदोष ॥ सहसा कोणा न बोलावे ॥१२॥

काम क्रोध मद मत्सर ॥ हे शत्रु घालावे बाहेर ॥ नाशिवंत जाणोनि शरीर ॥ सारासार विचारिजे ॥१३॥

सकळ सत्कर्माचरण ॥ करावें वेदाधारेंकरून ॥ मी कर्ता हा अभिमान॥ सहसाही न धरावा ॥१४॥

जैसं जळावरी जलजपत्र ॥ परी न भिजे अणुमात्र ॥ तैसीं सत्कर्मे करूनि सर्वत्र ॥ न लिंपावें कोठेंही ॥१५॥

मनोजय करणी करूनी ॥ मति योजावी भगवद्भजनीं ॥ जगदाभास मिथ्या मानोनी ॥ आत्मस्वरूपी रमावें ॥१६॥

परधन आणि परदारा ॥ येथें चित्त न घाली राक्षसेंद्रा ॥ सद्भाव धरिजे बरा ॥ सद्रुरुवचनीं सर्वदा ॥१७॥

सत्समागमीं चित्त ठेवून ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥ क्लेशकाळ आलिया पूर्ण ॥ स्वधर्माचरण न सांडावें ॥१८॥

यथान्याय राज्य करीं ॥ दुष्ट तितुकें आधीं संहारीं ॥ मग सद्भजनीं अहोरात्रीं ॥ तनु आपली झिजवावी ॥१९॥

शम दम उपरती ॥ दया क्षमा तितिक्षा शांती ॥ ह्या जवळी रक्षाव्या नृपती ॥ अहोरात्र प्रीतीनें ॥२०॥

भक्ति वैराग्य ज्ञान ॥ आनंद सद्विद्या समाधान ॥ हीं जवळी रक्षावीं अनुदिन ॥ आत्मप्राप्तीकारणें ॥२१॥

दैवें भाग्य विद्या होय अपार ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ अथवा कालांतरीं आलिया दरिद्र ॥ परी धीर न सांडावा ॥२२॥

यालागीं दशमुखा अवधारीं ॥ माझी शब्दरत्नें हृदयीं धरीं ॥ तरी अयोध्याप्रभूसी मैत्री ॥ सर्वभावें करावी ॥२३॥

श्रीराम केवळ गुणनिधान ॥ दुजयाचे अपार दोषगुण ॥ तात्काळ जाय विसरून ॥ अंतःकरण शुद्ध सदा ॥२४॥

पराचे ऐकोनि सद्रुण ॥ स्वयें वाखाणी रघुनंदन ॥ एकबाण एकवचन ॥ एकपत्नीव्रती जो ॥२५॥

त्या रघुपतीसीं सख्य करूनि ॥ अर्पीं आतां जनकनंदिनी ॥ मग तूं अक्षयीं लंकाभुवनीं ॥ चंद्रार्कवरी नांदें कां ॥२६॥

तूं जयाचा म्हणविसी भक्त ॥ तो शिव रघुपतीसी ध्यात ॥ त्यासी वैर करितां यथार्थ ॥ स्वामिद्रोही होसी तूं ॥२७॥

सनक सनंदन सनत्कुमार ॥ मुख्य विरिंचि आणि पुरंदर ॥ हे रघुपतीचे आज्ञाधार ॥ तरी तो मित्र करीं तूं ॥२८॥

जो वेदउदयाचळींचा दिनकर ॥ जो महामायेचा निजवर ॥ तो हा अयोध्यानाथ उदार ॥ तरी तो मित्र करी तूं ॥२९॥

जो सुनीळ चिद्धनगर्भ ॥ जो अनंत ब्रह्मांडांचा आरंभ ॥ गुणसागर सीतावल्लभ ॥ तरी मित्र करीं तूं ॥३०॥

कमलोद्भव कमलाकार ॥ कपालधर ज्याचे अज्ञाधार ॥ तो हा जगवंद्य रघुवीर ॥ तरी तो मित्र त्वां करावा ॥३१॥

वेद शास्त्र पुराणें जाण ॥ नारदादि गाती जयाचे गुण ॥ तो हा दशशतमुखांगशयन ॥ तरी तो मित्र करीं तूं ॥३२॥

शतकोटी अपराध करून ॥ तो जरी परतोन आला शरण ॥ तरी तयावरी रघुनंदन ॥ सर्वांहून प्रीति करी ॥३३॥

भक्तिभावें अर्पितां तीळ ॥ राम मानी जैसा कनकाचळ ॥ जो भक्तांचा होऊन द्वारपाळ ॥ अंतरर्बाह्य रक्षीत पैं ॥३४॥

तरी त्या द्विपंचरथनंदना ॥ शरण जाईं द्विपंचवदना ॥ जनकजा हे मम कन्या ॥ भावूनि अर्पीं रघुत्तमा ॥३५॥

दशकंठा तूं परम सज्ञान ॥ टाकिलीं वेदांची खंडें करून ॥ करी पद्मिणीपतिकुळभूषण ॥ सखा करीं सर्वस्वे ॥३६॥

ऐसी अंगदाचीं वचनें ॥ जीं विवेकभूमीचीं निधानें ॥ कीं भक्तिसागरीची रत्ने ॥ दशकंठासी समर्पिलीं ॥३७॥

यावरी तो दशकंठधर ॥ परम दुर्बुद्धि अविचार ॥ घृतें शिंपिजे वैश्र्वानर ॥ तैसा क्षोभला ते काळीं ॥३८॥

साधूचें वर्म लक्षून ॥ छळिती जेवीं दुर्जन ॥ तैसा अंगदाप्रति रावण ॥ बोलता झाला ते काळीं ॥३९॥

म्हणे रे मर्कटा अविचारा ॥ कोणाचा तूं पालेखाइरा ॥ मज रावणासीं पामरा ॥ शिटाई करूं आलासी ॥४०॥

मशका अग्नीपुढें तृण ॥ कीं शिवापुढें पंचबाण ॥ कीं मृगेंद्रासी गुण ॥ जंबुक शिकवूं पातला ॥४१॥

मर्कटा तुझा पिता कोण ॥ तो सांगें मज लागून ॥ यावरी ताराहृदयरत्न ॥ प्रतिवचन देतसे ॥४२॥

माझा पिता आहे कोण ॥ तो तूं नेणसी दुर्जना अझून ॥ जेणें कक्षेंत तुज दाटून ॥ केलें स्नान चतुःसमुद्रीं ॥४३॥

मग माझे पालखीवरी देख ॥ तुज बांधिला जैसा मशक ॥ तुझ्या दाढ्या मिशा सकळिक ॥ म्यांच उपडिल्या बाळपणीं ॥४४॥

माझ्या मूत्रोदकेंकरून ॥ मशका तुझें कंटाळलें मन ॥ मग तुझा पिता येऊन ॥ भिक्षा मागे वाळीसी ॥४५॥

तुझे मुखांसी मसी लावून ॥ शिरीं पांच पाट काढून ॥ लंकेत दिधला तुज भिरकावून ॥ पायी धरून ते काळीं ॥४६॥

ऐसा शक्रसुत महाबळी ॥ तूं गुंतलासी ज्याचे कक्षेतळीं ॥ तयाचा मी सुत ये काळी ॥ शिक्षा तुज करूं आलों ॥४७॥

आतां पुससी कवणाचा दूत ॥ अयोध्यापति जो रघुनाथ ॥ तुझ्या उरावरील चाप उद्भुत ॥ जेणें उचलोनि मोडिलें ॥४८॥

जेणें ताटिका मर्दून ॥ वीस कोटी पिशिताशन ॥ त्यांसहित सुबाहू मारून ॥ मारीच उडविला बाणवातें ॥४९॥

तुझी भगिनी शूर्पणखा ॥ जेणें केली निर्नासिका ॥ तो सौमित्राग्रज स्मरारिसखा ॥ त्याचा दूत मी असे ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP