अध्याय तेवीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

दुर्धर अहंकार दशानन ॥ अहंदेहबुद्धि लंका गहन ॥ तेथे वास्तव्य अनुदिन ॥ क्रोध कुंभकर्ण बंधु सखा ॥१॥

अनर्थकारक काम इंद्रजित ॥ मद हा मुख्य प्रधान प्रहस्त ॥ मत्सर दंभ ते निश्र्चित ॥ देवांतक नरांतक पैं ॥२॥

शोक मोह आणि अनर्थ ॥ भेदवादी असुर बहुत ॥ खळ कुटिल कुतर्क समस्त ॥ देह लंकेत दुमदुमती ॥३॥

यांचे बळे माजोनि रावण ॥ बंदी घातले सुरगण ॥ आदिदैवत अध्यात्म होऊन ॥ देहलंकेत बंदी पडिले ॥४॥

रमेश तो अंतःकरण ॥ रमाबंधु तोचि मन ॥ बुद्धि विरिंची चित्त नारायण ॥ रावणें बंदी घातली ॥५॥

चक्षुंच्या ठायीं सूर्यनारायण ॥ रसना ते रसनायक वरुण ॥ अश्र्विनौदेव दोघे घ्राण ॥ रावणें बंदी घातले ॥६॥

वाचा केवळ वैश्र्वानर ॥ पाणी ते जाण पुरंदर ॥ असो देव आकळोनि समग्र ॥ सेवक करूनि रक्षिले ॥७॥

मायामृग छेदावया लागून ॥ निरंजनी प्रवेशे रघुनंदन ॥ कापट्यशब्द उठवून ॥ विवेक लक्ष्मण दवडिला ॥८॥

सद्बुद्धि जानकीचे हरण ॥ अहंकारें केले न लागतां क्षण ॥ अहंदेह लंकेत आणून ॥ दुराचारें कोंडिलें ॥९॥

मग धांविन्नला वैराग्य हनुमंत ॥ तेणें देहलंका जाळूनि समस्त कामक्रोधादि राक्षसांसहित ॥ अहं लंकानाथ गांजिला ॥१०॥

सद्बुद्धीचे करूनि समाधान ॥ घेऊन आला रघुनंदन ॥ तो केवळ सद्भाव बिभीषण ॥ रावणें त्रासिला सभास्थानी ॥११॥

आत्माराम सद्रुरु पूर्ण ॥ त्यास शरण चालिला बिभीषण ॥ बाविसावे अध्यायीं जाण ॥ हेंचि कथन सांगितलें ॥१२॥

देखोनि वायसांचा मेळ ॥ त्रासोनि निघे मराळ ॥ कीं देखानि दुष्ट निंदक खळ ॥ साधु उठे तेथोनियां ॥१३॥

तैसा प्रधानांसह बिभीषण ॥ ऊर्ध्वपंथे क्रमीत गगन ॥ भवसिंधु उल्लंघोनि चरण ॥ गुणसिंधूचे पाहूं इच्छी ॥१४॥

हिरण्यकशिपें गांजिला प्रल्हाद ॥ तेणें हृदयी धरिला मुकुंद ॥ तैसाचि जानकीहृदयमिलिंद ॥ बिभीषणें जवळी केला पै ॥१५॥

वानर अंतरिक्ष विलोकिती ॥ तों पाचही असुर उतरले क्षितीं ॥ सेनाप्रदेशीं उभे राहती ॥ हस्त जोडूनि तेधवां ॥१६॥

कित्येक धांवले वानरगण ॥ घेऊनियां वृक्षपाषाण ॥ तो बिभीषण म्हणे मी तुम्हांसी शरण ॥ दावा चरण रघुपतीचे ॥१७॥

रावणबंधू मी बिभीषण ॥ तेणें अपमानिले मजलागून ॥ आलो सीतावल्लभासी शरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥१८॥

जे सेनादिकांची ध्येय मूर्ति ॥ नारदादि गाती ज्याची कीर्ति ॥ तो ब्रह्मानंद अयोध्यापती ॥ त्याचे चरण मज दावा ॥१९॥

जें निगमवल्लीचे पक्व फळ पूर्ण ॥ जो विषकंठमनमांदुसरत्न ॥ जे पद्मोद्भवाचें देवतार्चन ॥ त्याचे चरण दावा मज ॥२०॥

प्रतापमित्र रघुनंदन ॥ जो अरिचक्रवारणपंचानन ॥ जो खरदूषणप्राणहरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२१॥

वेदांती म्हणती परब्रह्म ॥ अजअजित पूर्णकाम ॥ तोचि हा दशरथात्मज श्रीराम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२२॥

व्याकरणकार शब्द साधिती ॥ त्याचे नामाचे अनेकार्थ्ज्ञ करिती ॥ तोचि हा मंगळभगिनीचा पति ॥ त्याचे चरण दावा मज ॥२३॥

पातंजली योग साधून ॥ योग पावती निरंजन ॥ तोचि हा चंडकिरणकुळभूषण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२४॥

प्रकृति पुरुष सांगत ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तोचि हा जानकीनाथ ॥ त्याचे चरण दावा मज ॥२५॥

प्रकृति पुरुष सांगत ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तोचि हा जानकीनाथ ॥ त्याचे चरण दावा मज ॥२६॥

नैयायिक म्हणती कर्ता ईश्र्वर ॥ जीवासी न कळे त्याचा पार ॥ तोचि हा अजराजपुत्रकुमर ॥ त्याचे चरण दावा मज मीमांसक स्थापिती कर्म ॥

कर्माचरणें पाविजे परब्रह्म ॥ तो परात्पर विश्रांतिधाम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२७॥

ऐशीं बिभीषणाचीं शब्दरत्नें ॥ की ती भक्तिनभींचीं उडुगणें ॥ की तीं वैराग्यवल्लीची सुमने ॥ प्रेमसुवासें विकासती ॥२८॥

श्रीरामसुग्रीवांसी जाऊन ॥ कित्येक सांगती वर्तमान ॥ चौघे प्रधानांसह शरण ॥ राक्षस एक आलासे ॥२९॥

आपला ज्येष्ठ बंधु रावण ॥ आपुलें नाम सांगे बिभीषण ॥ ऐसें ऐकतां जानकीजीवन ॥ सुग्रीवाकडे पाहत ॥३०॥

तो अर्कज बोले उत्तर ॥ वरी भाविक दिसतो निशाचर ॥ परी नोळखतां तयाचे अंतर ॥ जवळी सहसा ठेवूं नये ॥३१॥

दिवाभीताची सेवा करून ॥ कागे लाविला जैसा अग्न ॥ तैसा जरी गेला करून ॥ तरी मग काय विचार ॥३२॥

जांबुवंत म्हणे मारूनि वाळी ॥ किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिधली ॥ हे कीर्ति ऐकोनि तात्काळीं ॥ शरण आला तुम्हांतें ॥३३॥

मारूनियां रावणा ॥ लंकाराज्य द्यावे आपणा ॥ हेचि मनी धरूनि वासना ॥ शरण आला तुम्हांते ॥३४॥

सुषेण म्हणे समयी कठीण ॥ देखोन साह्य करिती बंधुजन ॥ हा रावणासी सोडून आला शरण ॥ हेंचि नवल वाटतें ॥३५॥

तर्क वितर्क बहु विचार ॥ करिते झाले तेव्हां वानर ॥ मग तो शेवटी रुद्रावतार ॥ निश्र्चयवचन बोलिला ॥३६॥

लंकेत शोधितां जनककुमारी ॥ मी प्रवेशलों याचे मंदिरीं ॥ महासाधु निष्कपट अंतरीं ॥ तेच समयी ओळखिला ॥३७॥

वरी तुम्हांस दिसतो राक्षस ॥ परी अंतरीं प्रेमळ निर्दोष ॥ कंटकमय दिसतो फणस ॥ परी अंतरीं सुरस जैसा ॥३८॥

शरणागतांसी वज्रपंजर ॥ रामा तुझें ब्रीद साचार ॥ जवळी बोलावून असुर ॥ अभय तयातें देइंजे ॥३९॥

इतर शास्त्रीचें बोल बहुत ॥ एक वचनें दावी वेदांत ॥ तैसें बोलिला हनुमंत ॥ तेंच समस्तां मानलें ॥४०॥

अंगदासी भ्रूसंकेत ॥ दावीत तेव्हां ताराकांत ॥ बिभीषणास आणावया त्वरित ॥ येरू निघाला वायुवेगें ॥४१॥

बिभीषणास म्हणे वाळीपुत्र ॥ उदेला तुझा भाग्यमित्र ॥ तुज पाचारितो स्मरारिमित्र ॥ राजीवनेत्र अजित जो ॥४२॥

बिभीषणाचा धरूनि हस्त ॥ रामाजवळी आला तारासुत ॥ जेंवि साधकासी सद्विवेक दावित ॥ स्वरूपनिर्धार निश्र्चयें ॥४३॥

असो बिभीषणं पाहिला श्रीराम ॥ जो चरचरफलांकित द्रुम ॥ जयजयकार करून परम लोटांगण घातलें ॥४४॥

दृष्टीं पाहूनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळे बिभीषणभाव समुद्र ॥ प्रेमाचें भरते अपार ॥ दाटतें झालें तेधवां ॥४५॥

श्रीरामचरणारविंदसुगंध ॥ तेथें बिभीषण जाहला मिलिंद ॥ अष्टभावें होऊन सद्रद ॥ आनंदमय जाहला ॥४६॥

रामचरणीं ठेवितां मस्तक ॥ संतोषोनि ब्रह्मांडनायक ॥ शिरी ठेविला वरद हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥४७॥

म्हणे जोंवरी शशी आणि तरणी ॥ जोंवरी रामकथा आणि धरणी ॥ तोंवरी राज्य करी लंकाभुवनीं ॥ बळीध्रुवांसारिखें ॥४८॥

जेंवी चिरंजीव वायुनंदन ॥ त्याचपरी राहें तूं बिभीषण ॥ काळीकाळ तोडरीं बांधोन ॥ लंकेत सुखें नांदे कां ॥४९॥

ऐसा आशीर्वाद देऊन ॥ रामें उठविलां बिभीषण ॥ सप्रेमें दिधलें आलिंगन ॥ वानरगण आनंदले ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP